महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने अहमदनगरमध्ये झालेल्या विभागीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी ४ नोव्हेंबर २०१७ रोजी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश...
.............................................................................................................................................
आपल्या वर्तमानाविषयीची सजगता संपली की लेखक संपतो. त्या स्थितीत तो लिहायला उद्युक्त कसा होणार? अन त्याने लिहिले तरी ते मौलिक होण्याच्या शक्यतेपासून कोसो दूरच राहणार, यात काय तो संशय? एक लेखक म्हणून माझ्या वर्तमानातील झळांची उकल करण्यासाठी गरज पडली तर मी काळात अवश्य मागे पुढे जाईन. पण झळांचे मूळ तर माझ्या वर्तमानातच असते ना! आणि कोणतेही अर्थपूर्ण आणि घनसर लेखन करताना लेखकाला/कवीला काही एक जोखीम ही पत्करावीच लागत असते.
मी आपल्याला पाश नावाच्या पंजाबमधल्या कवीचे उदाहरण देतो. ‘सबसे खतरनाक होता है सपनोंका मर जाना,’ अशा ओळी लिहिणाऱ्या आणि आपली भारतीयता हे सर्वश्रेष्ठ मूल्य मानणाऱ्या या कवीला मारण्याचा त्या काळातील खलिस्तानी मंडळींनी चंग बांधलेला होता. या कवीला मरण्याची बिलकूल इच्छा नव्हती. जिवंत राहून आपल्याला जे म्हणायचे आहे ते म्हणण्याचा लोकशाहीतील निसर्गदत्त अधिकार त्याला बजावयाचा होता. पण आपले म्हणणे मांडत असताना प्रत्यक्ष जीवनात जगण्यासाठी त्याला खूप पळापळ करावी लागली होती. देश-विदेशात राहावे लागले होते. तो भेकड नव्हता. कारण तसे करताना, दहशतीच्या त्याही स्थितीत, तो आपले म्हणणे सोडत नव्हता. अखेर खलिस्तानी लोकांनी त्याला पाळत ठेवून, टार्गेट करून मारले. त्यातून त्याला स्वतःला वाचवता आले नाही. जगण्यातील झळांचा दंश या प्रकारे मरणाला सामोरे जाण्याची जोखीम पत्करण्याचे बळ लिहिणाऱ्याला देत असतो. एक लिहिणारा म्हणून त्याचे मूल्य माझ्यासाठी असाधारण आहे.
म्हणूनच मला माझे आजचे वर्तमान कसे आहे याचा धांडोळा घेणे आवश्यक वाटते. ज्याला मी माझे वर्तमान म्हणतो ते माझे, तुमचे – आपल्या सगळ्यांचे - वर्तमान असण्याची शक्यता आहे. किंवा मी मांडतो ते प्रश्न आपल्यापैकी अनेकांचे प्रश्न असू शकतात. माझ्या वर्तमानात माझे समानधर्मा तत्त्वतः लाखो-करोडो असू शकतात. त्यांच्या तसे असण्याचा मला फार आधार वाटतो. मी ह्या आधार वगैरेच्या गोष्टी करतो म्हणजे मी घाबरलेलो आहे, असे कदाचित आपणास वाटत असेल. मला असे वाटते की मी घाबरलेलो नाहीय. पण मला चिंता वाटते. मला काळजी वाटते. काही काळाआधी अशा लोकांना ‘चिंतातूर जंतू’ म्हणण्याचा प्रघात होता. मी त्या प्रकारचा माणूस आहे असे मला वाटत नाही. हे असे beating around the bush करण्यापेक्षा मी स्पष्ट शब्दात थेट ते मांडतो.
माझ्या देशाच्या लोकशाही परंपरेवर माझा भरवसा आहे. आधुनिक काळातली लोकशाही येण्याच्या आधीसुद्धा आपल्या इथे लोकांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्याची प्रथा दीर्घकाळ होती. म्हणूनच लोकशाही ही आपल्यासाठी काही नवी गोष्ट नाहीय. आणि तिला चिरडण्याच्या गोष्टीदेखील आपल्याला नव्या नाहीत. त्या सगळ्यांना पुरून उरलेले लोक आपण आहोत, याचा मला फार अभिमान वाटतो.
आपण कायमच प्रश्न उपस्थित करणारे लोक राहिलेलो आहोत. आपल्या अशा वृत्तीचा आपल्या सामाजिक व्यवस्थेने सहसा पुरस्कारच केलेला आहे. जेव्हा ते आपल्याला जमले नाही, तेव्हा इथल्या भद्र वर्गाचे हितसंबंध राखण्यासाठी त्या भद्र लोकांनी परकियांना आमंत्रण दिलेले आहे आणि त्यांना इथे राज्य करता यावे अशा सोयी प्रदान केलेल्या आहेत.
आधुनिक काळात महात्मा गांधींचा उदय होण्याच्या आधीपर्यंत अगदी दीर्घकाळ आपण एक प्रकारे एका स्मृतिभ्रंशात जगत होतो. गांधीजींनी आपल्याला एक समूह म्हणून प्रश्न विचारणे पुन्हा शिकवले. किंवा मुळात आपल्यात जे होते, त्याचे त्यांनी पुनर्जीवन केले. मी आपल्याला म्हणताना आपल्या सामान्य माणसांविषयी बोलतो आहे, जो आपल्या अस्तित्वाचा कष्टकरी कणा आहे. आधुनिक काळात गांधीजींनी सामान्य माणसाला घडामोडींच्या केंद्रस्थानी आणून उभे केले. आणि सांगितले की बाबा, जे काही चालले आहे, ते हे हे आणि असे असे आहे. तुला त्याबद्दल जे काय म्हणायचे ते म्हण. आपला सामान्य माणूस त्याला जे बोलायचे ते ते बोलला. आपले व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हा आपल्यातल्या या श्रेष्ठ लोकशाही मूल्याचा परिपाक आहे. याच्या बळावर एक भारतीय बहुभाषी समूह म्हणून आपण नुसतीच तग धरलेली नाही तर अनेक अंगांनी आपला भौतिक, भावनिक आणि मानसिक विकास केलेला आहे. सगळ्या प्रकारच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मुबलक उपलब्ध असल्याने अनेक कल्याणकारी संस्थांची उभारणी आणि विकास आपण करू शकलो आहोत.
स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या एवढ्या वर्षांत कायमच या आपल्या silent majorityने आपल्याला काय हवे ते फार जबाबदारीने सांगितलेले आहे. आणि जे व्हायला हवे ते करण्यासाठी याच लोकांनी त्याच प्रकारे – म्हणजे मागे मागे राहून विनातक्रार कष्ट करत – फार त्याग केलेला आहे. औपचरिक शिक्षणाचा अभाव असण्याच्या काळात आपल्या जनसामान्यांनी ते केले आहे, हे मला एक भारतीय म्हणून अभिमानास्पद वाटते.
या पार्श्वभूमीवर आपले आजचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तमान कसे आहे? अगदी एका वाक्यात सांगायचे तर ते भय निर्माण करणारे आहे. असे बघा, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आहेत याला माझा आक्षेप नाही. आपल्या ज्या काही बऱ्या-वाईट असेल त्या लोकशाही व्यवस्थेने त्यांना त्या जागी बसवलेले आहे. ज्या प्रकारच्या विचारधारेचा ते पुरस्कार करतात, ती मला मान्य नाही. विचारांच्या अंगाने मी तिच्या दुसऱ्या टोकावर उभा आहे. पण माझ्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेने त्यांना शीर्षस्थानी आणलेले आहे, तर त्याचा एक नागरिक म्हणून मी आदरच केला पाहिजे. आणि तो मी करतो.
या देशात लोकशाही आहे म्हणूनच एक तेली किंवा त्यासदृश जातीतील मनुष्य शीर्षस्थानी जाऊ शकलेला आहे, ही आपल्याला अभिमान वाटावी अशीच गोष्ट आहे. पण म्हणून ते जे करत आहेत, किंवा त्यांच्या या कारकिर्दीत जे घडते आहे, त्याच्याविषयी प्रश्न करण्याचा माझा अधिकार गमावण्याची माझी तयारी नाही. आपल्यापेक्षा वेगळे मत असलेल्या इसमाला नेल्सन मंडेला एकदा म्हणाले होते, तुझे म्हणणे भले मला मान्य नसेल. पण तुझ्या ते मांडण्याच्या अधिकाराचा मी प्राणपणाने पुरस्कार करतो.
लोकशाहीत या प्रकारे विविध स्वरांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य अपेक्षितच असते. असे, या प्रकारचे आपले स्वातंत्र्य आज प्रश्नांकित झाले आहे. किंवा, खरे तर ते धोक्यातच आले आहे असे दिसते. अगदी पारतंत्र्याच्या काळातसुद्धा बाळ गंगाधर टिळक हे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे शीर्षक असलेला लेख ‘केसरी’मध्ये लिहू शकत होते. आज आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकलेली आहे.
दादरी येथे काय झाले हे आपल्याला माहीत आहे. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी किंवा घटना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतरत्र भरपूर झालेल्या आहेत. (महाराष्ट्र याला अपवाद आहे असे नाही. अगदी आपला पुरोगामी म्हणवला जाणारा नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. आपल्या जिल्ह्यातील कोणत्याही राज्यकर्त्याने इथे झालेल्या अनेक घटनांचा जाहीर निषेध केल्याचे माझ्या ऐकिवात नाही.) अशा घटना घडून गेल्यावर खूप उशिरा पंतप्रधान त्यांचा गुळमुळीत निषेध करतात. कायदा हातात घेतलेल्या लोकांना शासन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. अगदी अलीकडे गुजरातमध्ये एक दलित मुलगा गरबा बघायला गेला, म्हणून त्याला काही सवर्णांनी ठार केले आहे. आणखी एका दलित मुलाला तो मिशा ठेवतो म्हणून धमकावण्यात आले आहे, मारण्यात आलेले आहे. आता, मिशा राखणे ही कोणत्याही जातीची मिरासदारी नाहीय. आपले रानडे, गोखले, टिळक, आगरकर मिशा ठेवत होते. हल्ली रामोशी, बेरड आणि तत्सम जातीचे लोक मिशा ठेवतात. बाकी आपल्या मराठ्यांसकट सगळे श्मश्रू ठेवून गुळगुळीत राहण्यात धन्यता मानतात. तो समजा ज्याचा त्याचा प्रश्न. पण गरिबाने मिशा ठेवण्याची हौस केली तर त्याला कायदा हातात घेऊन झुंडीने मृत्युदंड द्यायचा याला काय म्हणायचे?
आज दलित आणि मुस्लीम यांना टार्गेट करून धमकावण्याच्या आणि मारण्याच्या घटना वाढत आहेत. हे आधीच्या काँग्रेस राजवटीत घडत नव्हते असे मला म्हणायचे नाहीय. फरक एक आहे की, असे करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास आता फार वाढला आहे. आपला पक्ष आता सत्तेत आहे आणि बाकी कोणीही आपल्याला काहीही करू शकत नाही असा काही लोकांचा समज झालेला आहे. तो दूर करण्यासाठी पंतप्रधान खूप उशिरा काही दुबळ्या औपचरिक गोष्टी बोलतात. पण बोलतातच फक्त. त्याला हिंग लावूनसुद्धा किंमत द्यायची नाही, त्याची आवश्यकता नाही, असा कायदा हातात घेणाऱ्या लोकांचा समज होतो आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात ज्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत, त्यांचा तपास दीर्घ काळ गेला तरी लागत नाही, हे काय आहे? भालचंद्र नेमाडे हे आपल्या भाषेतले आणि आपल्या देशातले एक श्रेष्ठ लेखक आहेत. त्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असणे हा या वास्तवाचा एक बारका अनुषंग आहे असे मी मानतो. त्यांना दिल्या गेलेल्या धमक्या आणि त्याच्या परिणामी त्यांना सोसावा लागलेला भावनिक आणि मानसिक ताप यांचा तर मी स्वतः साक्षी होतो आणि आहे. सरकारी, निमसरकारी आणि सरकार पुरस्कृत असूनही कायदा करून स्वायत्त ठेवलेल्या अनेक साहित्य आणि संस्कृतीविषयक संस्था यांच्या कामात आजचे सरकार ज्या अमानुष अडाणीपणे हस्तक्षेप करत आहे, ते अत्यंत धोकादायक आहे.
इतिहासाची मांडणी आणि त्याचे वाचन यांच्यामध्ये याच प्रकारचा हस्तक्षेप होतो आहे. शेजारी पाकिस्तान देशात इतिहासाची मूर्ख मांडणी करताना ते पाकिस्तान हा देश मुहम्मद बिन कासीम इसवी सनाच्या सातव्या शतकात इकडे आला तेव्हापासून निर्माण झाला असे अभ्यासक्रमाच्या पुस्तकात सांगतात. १९४७ पर्यंत भारत हा पाकिस्तानचा भाग होता असे सांगतात. आपण आज ज्या प्रकारे इतिहासात हस्तक्षेप करू बघत आहोत, ते यापेक्षा फार वेगळे नाहीय. कारण ऐतिहासिक वास्तवापेक्षा काही एक धारणा बाळगणाऱ्या वर्गाला सोयीचा वाटणारा ‘सिलेक्टिव्ह’ इतिहास आपण आपल्या पाठ्यपुस्तकात टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.
भारत नावाचे जे एक बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वास्तव आहे, त्याच्यात इतिहासाची अशी परंपरा नाहीय. आधी ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ असे नाव असलेल्या आणि नंतर ‘महाभारत’ या नावाने रूढ झालेल्या सगळ्या भरतखंडाला अनेक पिढ्या बांधून ठेवणाऱ्या महाकाव्यातसुद्धा बऱ्या-वाईट, सुष्ट आणि दुष्ट अशा सगळ्या मांडणीत अर्थांचे आणि मूल्यनिर्णयाचे सगळे पदर खुले राहतील अशी काळजी घेण्यात आलेली आहे. पांडव सुष्ट आणि कौरव दुष्ट अशी वरवर मांडणी असली तरी कौरवांच्या बाजूने विचार करता त्यांचे काहीही चुकलेले नाहीय, दुर्योधनाचे म्हणणे त्याच्या अंगाने विचार केला तर पटू शकेल असेच आहे, अशी खुली मांडणी आहे. आणि पांडवांनी मिळवलेले सगळे विजय धर्मयुद्धाचे नियम उल्लंघून मिळवलेले आहेत असे प्रतिपादन करायला वाव आहे. इतिहास हा जेत्याच्या बाजूचा आहे असे म्हणता म्हणता तो अत्यंत संयत प्रकारे कोणाचीही बाजू न घेता मांडण्याचा आदर्श व्यासांनी या महाकाव्यात आपल्याला घालून दिलेला आहे. अर्थनिर्णयन त्यांनी वाचकांवर सोडलेले आहे. आपल्यामधली संयत आणि समंजस दृष्टी यांचा पाया या महाकाव्याने घातलेला आहे, असे म्हणणे फार चुकीचे होणार नाही.
पण आज आपण तिथून एका वेगळ्या, अडाणी आणि अत्यंत चुकीच्या दिशेने जाऊ पाहात आहोत, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. जी गोष्ट भौतिक इतिहासाची ती किंवा तशीच आपल्या वैज्ञानिक इतिहासाच्या मांडणीची आहे. आज दुनियेत विज्ञानात जे जे ज्ञान उपलब्ध आहे किंवा मांडले जातेय, ते सारे आपल्या पूर्वजांना आधीच माहीत होते किंवा ते त्यांनी आधीच शोधलेले होते, अशा प्रकारची मांडणी आपण करत आहोत. विमानापासून ते अनेक ग्रहांचा आणि त्यांच्या असण्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या मानवनिर्मित उपग्रहांच्या वास्तवासंबंधी, हे आपल्याकडे आधीच होऊन गेलेलं आहे, अशी आत्मतुष्टी करणारी मांडणी होत आहे. एक समाज म्हणून दीर्घकाळ ज्या अंधारात आपण जगलो आहोत, त्याच्या वास्तवाकडे आणि त्याच्या कारणांकडे ही मांडणी सोयीस्कर दुर्लक्ष करते. ती आपल्याला एक समाज म्हणून पुन्हा अंधाराकडे नेणारी आहे. दुनिया कशी बदलत आहे आणि ती कोणत्या दिशेने चालली आहे, याचा विचार आपण करत नाही. ती गोष्ट आपल्याला तितकी तातडीची वाटत नाही.
काही लोक आणि काही देश आपले नागरिक वगळता इतर लोक, म्हणजे बाकीचे सगळे lesser human beings आहेत अशा अघोषित धारणा मनाशी बाळगत जगत आहेत. ह्या सगळ्यात कधी काय होईल आणि मानवी प्रजातीचे भविष्य काय असेल, हे सांगणे मुष्कील; जवळपास अशक्यच झालेले आहे.
जगाच्या व्यवहारात, त्या पटलावर कसे वागायचे आणि काय करायचे, हे ठरवताना एक बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक भौगोलिक वास्तव म्हणून आपल्या देशबांधवात जो भ्रातृभाव आहे, त्याचे पुनःजागरण करण्याची फार आवशकता आहे. एकमेकांना सहन करण्याची, सहिष्णू असण्याची आपल्याला दीर्घ परंपरा आहे. अमेरिका जशी अमेरिकन लोकांची, ब्रिटन हे ब्रिटिशांचे तसा हिंदुस्तान हिंदूंचा असे म्हणणे या देशात राहणाऱ्या इतर धर्म, पंथ आणि श्रद्धा बाळगणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारे आहे. असे म्हणणारे त्यांना सोयीचे म्हणून या देशाला हिंदुस्तान म्हणतात. ते भारत हा भारतीयांचा असे नाही म्हणत. भारताला हिंदुस्तान म्हणण्याला माझा आक्षेप नाही. पण भारतात फक्त हिंदू लोक राहत नाहीत. मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, जैन अशा अनेक धार्मिक श्रद्धा बाळगणारे लोक या देशाचे नागरिक आहेत. आणि हिंदू म्हणून तरी आपण कुठे एकसंध आहोत? प्रचंड मोठ्या संख्येने आपल्यात असलेल्या विविध दलित जातींना आपण आपल्या अंतःकरणापासून आपल्या बरोबरीचे कुठे मानत आहोत? की ते फक्त आपली टक्केवारी वाढवण्यासाठी हिंदू? अनेक जाती, अनेक प्रथा, अनेक भाषा अशा कितीतरी वेगवेगळी ओळख सांगणाऱ्या गोष्टी आपल्यात आहेत. त्या सगळ्या आपल्याला अभिमान वाटावा अशा आहेत, असे म्हणता येणार नाही. जगात सारीकडे असेच असते.
अमेरिका अमेरिकनांची म्हणताना अमेरिकन असे कोणते एकक तिथे आहे? काळे, गोरे, हिस्पॅनिक्स, रेड इंडियन असे तिथेही आहेत.खेरीज जगभरातून तिथे रहिवासाला गेलेले भारतीय,चिनी,फिलिपिनो असे सगळे आहेतच.त्या सगळ्यांच्या श्रमातूनच आजच्या बलाढ्य अमेरिकेची निर्मिती झालेली आहे. आधुनिक काळात अमेरिकेत जे झाले, ते या आपल्या देशात हजारो वर्षांपासून सुरु आहे. जगातल्या यच्चयावत वंशांची उपस्थिती आपल्या लोकात आहे. ती आपल्याला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. ते आपल्या सहिष्णुतेचे एक सुंदर दृष्यरूप आहे. या देशात राहणारे ख्रिस्ती, मुसलमान आणि इतर धर्मश्रद्धा बाळगणारे लोक आपल्याइतकेच - म्हणजे स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या लोकांइतकेच - भारतीय आहेत. कोणालाही बाहेरचे आणि परके म्हणण्याचा आपल्याला काडीचाही अधिकार नाही. तसा विचार करायचा झाला तर या भारतीय उपखंडातील आपण अधिकांश लोक हे बाहेरचेच लोक आहोत. इथल्या आदिवासी; कोळी, भोई आणि तत्सम लोकांवर आक्रमणे करून आपल्या बहुतेकांच्या पूर्वजांनी इथे जागा करून घेतलेली आहे. कोणी कितीही संख्येने आले तरी त्या सगळ्यांना जगण्यासाठी भरपूर अन्न, पाणी आणि हिमालयाच्या प्राचीन बर्फावरून शुद्ध होऊन आलेली उत्तम हवा या देशात अतिप्राचीन काळापासून मुबलक राहिलेली आहे. मानवी प्रजातीच्या वाढीसाठी आणि उत्कर्षासाठी इतकी सहज उत्तम भूमी दुनियेत आणखी कुठेही नाही. साहजिकच अगदी प्राचीन काळापासून सगळ्या दिशांनी माणसांच्या टोळ्या इथे येऊन राहिलेल्या, रहिवसलेल्या आहेत. इथल्या भूमीने आणि इथे आधी आलेल्या लोकांनी विशेष खळखळ न करता नंतर आलेल्यांना सामावून घेतलेले आहे.
पण आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटल्यानंतरही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महापुरुष इथे होऊन गेल्यानंतरही आपण सर्व जातीधर्मांमधल्या दलितांना आपल्यात पुरेसे सामावून घेतलेले नाहीय. आपल्यासाठी अन्न निर्माण करून आपल्याला जगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जगण्यातली परवड वाढती आहे. त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. देश महासत्ता होण्याच्या वल्गना करणाऱ्यांना अन्नाविना उपाशी मरणारे लक्षावधी लोक दिसत नाहीत. ते लोक कसलाही आवाज न करता निमूटपणे नाहीसे होतात. लक्षावधी लहान बालकांना दुनियेतला उजेड दिसतो न दिसतो तो इथून नाहीसे व्हावे लागते. लक्षावधी स्त्री-भ्रूणांना तर तो उजेड पाहण्याची संधीसुद्धा मिळत नाही.
बाबरी मशिदीचे पतन ही आपल्या लोकांच्या धार्मिक सौहार्दावर घाला घालणारी फार दुःखद घटना आहे. तो आपल्यातल्या गंगाजमनी वृत्तीवर झालेला फार मोठा आघात आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी काही लोकांनी ते केले. त्यांनी त्यावेळी या आघाताचा विचार कसा केला नाही? आणि त्यावेळी सत्तेत असलेल्या लोकांचीही झाले त्याला मूक संमती होती की काय? धार्मिक कारण घेऊन आपल्यापासून अलग झालेल्या शेजारी देशातील राज्यकर्त्यांना तर हे फारच सोयीचे झाले आहे. आम्ही सांगतोय ना, की हे हिंदू लोक मुसलमानांवर किती अत्याचार करतात, त्यांच्या भावना पायदळी तुडवतात. हा बघा त्याचा पुरावा. असे म्हणण्यासाठी त्यांना आपण जागा करून दिलेली आहे. इतके सगळे होऊनही आपले आजचे वर्तमान तितके विस्कटलेले नाहीय याचे कारण आपल्यातल्या गंगाजमनी वृत्तीचे दीर्घ संचित.
परवा कोणत्या तरी एका चॅनलवर एक चर्चा चालू होती. ते असतंच सतत. मी कधीमधी बातम्या पाहण्याची करमणूक म्हणून टीव्ही बघतो. तिथेही प्रचंड पाणी टाकून सगळे दाखवत असतात. तरीही थोडा वेळ का होईना बघण्यासारखंच असतं. तर तिथे चर्चा चालू होती, अयोध्येत राममंदिर बांधण्याची. एक मुसलमान म्हणाला, ‘मी बांधीन राममंदिर. मुसलमान असलो तरीही मी कुछवाहा राजपूत आहे. मी प्रभू रामचंद्राचा वंशज आहे.’ आता, या आपल्या एकमेकात दीर्घकाळ सरमिसळ झालेल्या देशात कोण कोणाचा वंशज आहे हे सांगणे मुष्कील. प्रभू रामचंद्र कुछवाहा राजपूत होता का, हाही प्रश्नच आहे. काही लोकांच्या मते तो मुंडा जातीच्या लोकात जन्मला होता. पण त्या मुसलमान माणसाची स्वतःला रामचंद्राशी जोडण्याची वृत्ती मला महत्त्वाची वाटते. हे आपले गंगाजमनी संचित. राम असो व कृष्ण, मुंडा असो वा गवळी – आपण त्यांना देवांच्या जागी नेले आहे. आणि आपल्या देशातील सगळ्या धर्माच्या लोकांनी ते केले आहे. आपण यातून बळ घेतले पाहिजे. काळ कठीण आहे. सौदी अरेबियातून आलेल्या पैशाने आपल्या मुसलमानांना भडकावून वेगळे राहण्यास प्रवृत्त केले आहे. त्याचा सामना हे आपले संचित करत आहे. त्याला आपण उचलून धरले पाहिजे.
मी आपल्याला आणखी एक अनुभव सांगतो. अलीमुल्लाखान वकील नावाचे माझे एक मित्र आहेत. ते माझे संगमनेर महाविद्यालयातील सहकारी. इतिहास, राजकारण, प्रशासन आणि संस्कृती यांचे एक महत्त्वाचे अभ्यासक. हल्ली ते नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे राहतात. काही काळापूर्वी त्यांचे कराचीला राहणारे काही नातेवाईक महिन्याभरासाठी तिकडे आले होते. इथले वातावरण बघून ते त्यांना म्हणाले, “आम्हाला तर खूपच वेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या. इथे मुसलमानांवर फार जुलूम होतोय. त्यांचे जिणे इथे हराम झाले आहे, अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात आलेल्या होत्या. पण इथे तर आप लोग कितने चैन और सुकूनसे जी रहे हो. हमारे यहां बिलकुल अलग किस्मका माहौल है. हमारी जिंदगी किडेमाकोडेके माफिक हो गयी है. यहां तो औरते भी- चाहे वो हिंदू हो या मुस्लीम – आरामसे कहीभी स्कूटरपर घूम सकती है.”
कोणत्याही क्षणी महायुद्धाचा, आण्विक युद्धाचा भडका उडेल अशी जगातली परिस्थिती आहे. या वर्तमानात आपले एक बहुसांस्कृतिक वास्तव म्हणून एक असणे, एकमेकांचा आदर करणे फार महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.
या सगळ्यात मी मराठी साहित्य, आजचे साहित्य, महत्त्वाचे लेखन यांच्याविषयी काहीही बोललेलो नाहीय. त्याच्याविषयी बोलणे शक्य आणि आवश्यकसुद्धा आहे. पण इथे मी निर्देशित केलेले प्रश्न आणि त्यांच्यासारखे अनेक प्रश्न हे एक समाज म्हणून आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे, अधिक महत्त्वाचे आहेत, हे आपण मान्य कराल. मी आधी म्हणालो तसे साहित्याचे सारे प्रश्न भाषा आणि संस्कृती याच्याशी, त्यांच्या वर्तमानाशी संबंधित असतात. ते आपल्या वर्तमान जगण्याशी संबंधित असतात. एक भाषिक समाज म्हणून आपल्या भाषेच्या वर्तमानाविषयी, प्रश्नांविषयी मी इतरत्र भरपूर बोललेलो आहे. या देशाचा नागरिक म्हणून आज जे मला जिव्हाळ्याचे आणि तातडीचे वाटते, ते मी आपल्यासमोर मांडले आहे. जग प्रत्यही बदलत आहे. फार वेगाने हे बदल होत आहेत. कल्याणकारी दिशेवर एक प्रजाती म्हणून आपण माणसे ठाम राहिलो तर आपले भवितव्य फार उज्ज्वल आहे. पण त्याला छेद देण्याची, आत्मनाशाची प्रवृत्तीसुद्धा आपल्यात कमी प्रबळ नाहीय. एक प्राचीन आणि सहिष्णू संस्कृती म्हणून या दुनियेला आत्मनाशापासून वाचवण्याची जबाबदारी आपण पत्करली पाहिजे. आपल्या प्रदीर्घ सांस्कृतिक संचिताने ती आपल्यावर टाकलेली आहे, असे आपण मानले पाहिजे. त्यासाठी आपल्यातल्या विविध धर्म, पंथ, जाती या सगळ्यांनी एकमेकांविषयी सौहार्द, भ्रातृभाव बाळगणे गरजेचे आहे.
आजच्या या अशा वर्तमानात लेखकांनी काय करावे असे मी काहीही म्हणालेलो नाहीय. कारण लेखकांना कोणी आदेश द्यावा आणि त्यांनी तो तंतोतंत पाळावा अशा मताचा मी नाहीय. आपल्या वर्तमानाला प्रतिक्रिया देण्याची प्रत्येक लेखकाची रीत वेगळी असते. त्यांच्या त्या विविध रीतींचा मी आदर करतो. त्यांच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा मी आदर करतो. त्यांनी त्यांचे ते स्वातंत्र्य जपावे, त्यासाठी पडेल त्या त्यागाची तयारी ठेवावी, हे मात्र मी अवश्य म्हणेन. आजच्या आदेश देणाऱ्या, भय निर्माण करणाऱ्या या काळात आपल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य टिकवणे, आपला स्वर आपले नीतिधैर्य टिकवून प्रकट करणे फार महत्त्वाचे झालेले आहे. आणि हे मी फक्त आपल्या भाषेतील किंवा आपल्या देशातील लेखकांसंबंधी म्हणत नाहीय. दुनियेतल्या प्रमुख देशात सारीकडे एकाच वेळी या प्रकारचे भय उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्ती सत्तेत आलेल्या असण्याचा हा असाधारण काळ आहे. लेखकांच्या नीतीधैर्याची कसोटी पाहणारा हा काळ आहे. आपले आंतरिक स्वातंत्र्य प्राणपणाने जपण्याचा काळ आहे. ते ते किती आणि कसे जपतात, यावर येणाऱ्या दुनियेचे भवितव्य अवलंबून आहे. असे स्वातंत्र्य जपणे हे अनेक प्रकारची जोखीम पत्करतच शक्य असते. ते पत्करण्याचे बळ आपल्या भाषेतल्या आणि दुनियेतल्या सगळ्या भाषांमधल्या लेखकांना या ना त्या प्रकारे प्राप्त होवो, अशी शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 28 November 2017
रंगनाथराव, फार त्रास होतोय का? थांबा जरा. तुमची एकेक विधानं पाहूया. मग आजून त्रास होईल. १. >>आपण कायमच प्रश्न उपस्थित करणारे लोक राहिलेलो आहोत. जेव्हा ते आपल्याला जमले नाही, तेव्हा इथल्या भद्र वर्गाचे हितसंबंध राखण्यासाठी त्या भद्र लोकांनी परकियांना आमंत्रण दिलेले आहे >> हे तुम्हाला कोणी सांगितलं? एखादं उदाहरण देणार का? २. >> आधुनिक काळात महात्मा गांधींचा उदय होण्याच्या आधीपर्यंत अगदी दीर्घकाळ आपण एक प्रकारे एका स्मृतिभ्रंशात जगत होतो. >> काहीही हं रंगनाथबुवा ! टिळकांनी १९०८ साली केलेलं चतु:सूत्रीचं आवाहन माहितीये ना? स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्याची मागणी हे काय स्मृतिभ्रंशाचं लक्षण आहे का? शिवाय गांधी येण्याच्या अगोदर बंगालची फाळणी रद्द करणारी आंदोलनं चालवली ती काय स्मृतीभ्रष्ट लोकांनी का? उगीच काहीतरी ठोकून द्यायचं. ३. >> आधुनिक काळात गांधीजींनी सामान्य माणसाला घडामोडींच्या केंद्रस्थानी आणून उभे केले. >> परत एक निरर्थक विधान. "It costs the nation a fortune to keep Gandhi living in poverty." हे सरोजिनी नायडूंचे उद्गार तुम्हांस ठाऊक नसतील. पण आम्हांस माहितीयेत. ४. >> असे बघा, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आहेत याला माझा आक्षेप नाही. >> असता तरी काही करता आलं नसतं तुम्हाला. लोकशाही झिंदाबाद. ५. >> दादरी येथे काय झाले हे आपल्याला माहीत आहे. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी किंवा घटना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतरत्र भरपूर झालेल्या आहेत. >> सावन राठोडला पुण्यात भर दुपारी जिवंत जाळला तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? काश्मिरी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हाकलून दिलं गेलं तेव्हा मिठाची गुळणी धरून बसले नव्हते का तुम्ही? मग अखलख नामे कोण्या किरकोळ धर्मांधाला त्याची जागा दाखवून दिली तर इतका का पोटशूळ उफाळतो तुमचा? कुराणात गोमांस खायची कसलीही आज्ञा नाही. दादरीच्या अखलखचा एक मुलगा हवाई दलात आहे. तो बापाला काकुळतीला येऊन विनवीत असे, की गोमांस खाणं सोडा. हे कुठल्या मीडियाने सांगितलं का? नाही ना? का बरं? काय बोध घ्यायचा आपण यांतून? ६. >> अगदी अलीकडे गुजरातमध्ये एक दलित मुलगा गरबा बघायला गेला, म्हणून त्याला काही सवर्णांनी ठार केले आहे. >> याचा मोदींशी वा हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नाही. ७. >> आज दलित आणि मुस्लीम यांना टार्गेट करून धमकावण्याच्या आणि मारण्याच्या घटना वाढत आहेत. >> दलित हा हिंदूंची समस्या आहे. तिचा मुस्लिमांशी संबंध जोडण्याचं कारण नाही. धर्मांधांनी जिवंत जाळलेला सावन राठोड दलित होता. तेव्हा कोणी कसले टाहो फोडले नाहीत ते? जेव्हा हिंदूंना झोडपायचं असतं तेव्हा 'दलित आणि मुस्लिम' असा सरसकट प्रयोग केला जातो. पण मुस्लिमांनी दलिताचा खून पाडला तर मात्र अळीमिळी गुपचिळी. ८. >> महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात ज्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत, त्यांचा तपास दीर्घ काळ गेला तरी लागत नाही, हे काय आहे? >> थोडक्यात सांगतो. दाभोलकर माफिया आहे. पानसरे यांच्या बँक खात्यात बेहिशोबी पैसा सापडला आहे. गौरी लंकेश स्वत:च्या गुन्ह्यामुळे तुरुंगात गेलेली (राजकीय तुरुंगवास नव्हे) भुरटी गुन्हेगार पत्रकार आहे. हत्येच्या दोनेक आठवडे पूर्वी प्रा.कलबुर्गी यांचा त्यांच्या कॉलेजच्या प्रशासनाशी वाद झाला होता. कोण करतंय तपास बघूया. चारही प्रकरणांचा हिंदुत्ववादी व्यक्तींशी संबंध नाही. ९. >> ‘सिलेक्टिव्ह’ इतिहास आपण आपल्या पाठ्यपुस्तकात टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. >> उदाहरण द्या. १०. >> दुर्योधनाचे म्हणणे त्याच्या अंगाने विचार केला तर पटू शकेल असेच आहे, >> कुठलं म्हणणं पटण्याजोगं आहे? द्रौपदीच्या निरीला हात घालणं? की भीमाला विष देऊन नदीत बुडवणं? की वारणावतात पांडवांना व कुंतीला जाळून ठार मारणं? की पांडव वनवासात असतांना त्यांना खिजवण्यासाठी घोषयात्रा काढणं? लुडखलेले फासे द्यूतासाठी घेऊन रडीचा डाव खेळणं? काय समर्थनीय आहे दुर्योधनाचं? ११. >> आज दुनियेत विज्ञानात जे जे ज्ञान उपलब्ध आहे किंवा मांडले जातेय, ते सारे आपल्या पूर्वजांना आधीच माहीत होते किंवा ते त्यांनी आधीच शोधलेले होते, अशा प्रकारची मांडणी आपण करत आहोत. >> आजिबात नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलं? १२. >> विमानापासून ते अनेक ग्रहांचा आणि त्यांच्या असण्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या मानवनिर्मित उपग्रहांच्या वास्तवासंबंधी, हे आपल्याकडे आधीच होऊन गेलेलं आहे, अशी आत्मतुष्टी करणारी मांडणी होत आहे. >> कोण करतंय? आणि असे लोक तुम्हालाच बरे सापडतात. माझ्यासमोर कोणीच असं काही बरळत नाही. १३. >> काही लोक आणि काही देश आपले नागरिक वगळता इतर लोक, म्हणजे बाकीचे सगळे lesser human beings आहेत अशा अघोषित धारणा मनाशी बाळगत जगत आहेत. >> उदाहरण द्या. उगीच ढगांत गोळीबार नको. १४. >> अमेरिका जशी अमेरिकन लोकांची, ब्रिटन हे ब्रिटिशांचे तसा हिंदुस्तान हिंदूंचा असे म्हणणे या देशात राहणाऱ्या इतर धर्म, पंथ आणि श्रद्धा बाळगणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारे आहे. >> आजिबात नाही. काश्मिरातनं हिंदू हाकलले गेले ते हिंदुत्वाचा ठाम अंगीकार न केल्यामुळेच. १५. >> पण भारतात फक्त हिंदू लोक राहत नाहीत. मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, जैन अशा अनेक धार्मिक श्रद्धा बाळगणारे लोक या देशाचे नागरिक आहेत. >> कोण हाकलून लावतोय बाकीच्या लोकांना? १६. >> हिंदू म्हणून तरी आपण कुठे एकसंध आहोत? प्रचंड मोठ्या संख्येने आपल्यात असलेल्या विविध दलित जातींना आपण आपल्या अंतःकरणापासून आपल्या बरोबरीचे कुठे मानत आहोत? >> तुम्ही मानंत नसाल. मी मानतो. १७. >> की ते फक्त आपली टक्केवारी वाढवण्यासाठी हिंदू? >> अगदी बरोबर. ये हुई ना बात. जिथून हिंदू अल्पसंख्य झाला ते भाग भारतापासून तुटले. नुसते तुटलेच नाही तर भारताचे शत्रूदेखील झाले. हिंदूंची संख्या वाढवणं हे आमचं ध्येय आहे. १८. >> इथल्या आदिवासी; कोळी, भोई आणि तत्सम लोकांवर आक्रमणे करून आपल्या बहुतेकांच्या पूर्वजांनी इथे जागा करून घेतलेली आहे. >> हे विधान म्हणजे मेकॉलेछाप शिक्षणातनं उत्पन्न झालेला बकवास आहे. श्रीराम आणि गुहा नावाडी एकाच शाळेत शिकले. श्रीकृष्ण आणि सुदामा एकाच आश्रमात शिकले. आज इंटरन्याशनल स्कूल आणि महापालिका शाळा वेगळ्या का आहेत? कोण कोणावर आक्रमण करतंय? दिसतंय आम्हांस. आमचे डोळे फुटले नाही अद्यापि. १९. >> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महापुरुष इथे होऊन गेल्यानंतरही आपण सर्व जातीधर्मांमधल्या दलितांना आपल्यात पुरेसे सामावून घेतलेले नाहीय. >> त्यासाठी आरक्षण संपवायला हवं. नुसते आंबेडकरांच्या नावाने ढोल बडवून काय होणारे. हिंमत असेल तर आरक्षण नाकारून दाखवा. नाहीतरी आंबेडकरांनी आरक्षण फक्त दहा वर्षंच ठेवा म्हणून सांगितलं होतं. जा ना त्यांच्या मार्गाने. कोणी अडवलंय ! २०. >> बाबरी मशिदीचे पतन ही आपल्या लोकांच्या धार्मिक सौहार्दावर घाला घालणारी फार दुःखद घटना आहे. >> घंटा बाबरी मशीद. काफिरांच्या पूजास्थानी मशीद उभारणं म्हणजे इस्लामचा घोर अवमान आहे. बाबरी नावाची कोणतीही मशीद नव्हती. बाबरी मशीद हे थोतांड आहे. २१. >> सौदी अरेबियातून आलेल्या पैशाने आपल्या मुसलमानांना भडकावून वेगळे राहण्यास प्रवृत्त केले आहे. त्याचा सामना हे आपले संचित करत आहे. त्याला आपण उचलून धरले पाहिजे. >> अभिनंदन. समर्पक विधान केल्याबद्दल अभिनंदन. तुमचे विचार अगदीच टाकाऊ नाहीत. २२. >> पण इथे तर आप लोग कितने चैन और सुकूनसे जी रहे हो. >> हाच भारत आणि पाकिस्तानातला फरक आहे. पाकिस्तानातली हिंदूंची संख्या वाढवणे हा त्यावरचा उपाय आहे. असो. करा पाहू आता आत्मपरीक्षण. आपला नम्र, -गामा पैलवान