अजूनकाही
१. गौतम बुद्धांप्रमाणे घरदार सोडणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जातीपातीवरून मतदान करणं हे पाप आणि अनैतिक ठरेल, असं भाजपचे खासदार परेश रावल यांनी म्हटलं आहे. राजकोट इथं जनसभेला संबोधित करताना रावल यांनी मोदींची तुलना गौतम बुद्धांशी केली. ‘तुमचा मुलगा भविष्यात कसा व्हायला हवा? पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा की राहुल गांधींसारखा?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला. ‘त्यांच्यासारखी (मोदींसारखी) व्यक्ती सापडणं अवघड आहे. मोठ्या पूजा आणि प्रार्थनेनंतरच अशी व्यक्ती मिळते. राजकारणातून अशी अवतारी व्यक्ती निर्माणच होऊ शकत नाही. गौतम बुद्धांप्रमाणे स्वत:च्या कुटुंबाला सोडून देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भूमीत जातीपातीच्या नावावरून मतदान करणे हे कृतघ्नपणाचे ठरेल,’ असं रावल म्हणाले.
पटेलांनी त्यांच्या जातीच्या उत्कर्षासाठी मोदी हेच योग्य महापुरुष आहेत, असं गृहीत धरून भाजपला मतदान केलं, तर तेही चूक का परेश बोधीजी? बाकी रावलांनी सिनेसृष्टीत राहून ‘विकी डोनर’ही पाहिला नाही, याचं आश्चर्य वाटतं. कुणासारखी मुलं जन्माला यावीत, हे ठरवण्याचा मार्ग मतपेटीतून नाही, तर वेगळ्या शीतपेटीतून जातो, हे यांना कोणीतरी, त्यांचा भावनावेग ओसरल्यावर, सांगा.
.............................................................................................................................................
२. गोहत्येसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारा कायदा केंद्र सरकारनं करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं उडुपी इथं आयोजित केलेल्या धर्मसंसदेत करण्यात आली. गाय ही जगन्माता आहे. ज्या देशात तिचं रक्षण झालं पाहिजे तिथं तिची हत्या होत आहे, ही व्यथित करणारी बाब आहे. गोहत्या करणाऱ्यांना, तसंच गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांनाही फाशीची शिक्षा जाहीर करणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणी राजस्थानमधील अमृत महाराज यांनी केली. गोरक्षकांना गुंड म्हणता येणार नाही, कारण ते पुण्यकर्म आहे, असा दावा नारायण महाराज शिंदे यांनी केला.
ही मंडळी देशाचे तुकडे केल्याशिवाय थांबणार नाहीत. यांच्या बथ्थड आकलनातला तालिबानी हिंदूधर्म हे सगळ्या देशावर थोपायला निघाले आहेत. देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केरळमध्ये, गोव्यात आणि ईशान्य भारतात बीफचा पुरवठा कमी पडणार नाही, अशी आश्वासनं याच पक्षाच्या नेत्यांना द्यावी लागतात, याचा अर्थ यांना कळत नसेल, तर त्यांचं नंदनवन त्यांना स्वतंत्र करून दिलेलं बरं.
.............................................................................................................................................
३. राहुल गांधी हे प्रचारात गुजरातचा आणि देशाचा विकास काय झाला असा प्रश्न विचारतात. मात्र अनेक वर्षांपासून गांधी घरण्याचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काय विकास झाला, ते आधी राहुल गांधी यांनी पाहावं आणि मग आम्हाला जाब विचारावा, त्यांच्या मतदारसंघातील लोक गुजरातमध्ये पोटापाण्यासाठी येतात, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांनी केली आहे.
आपल्या राज्यातील किती लोक देशातच नव्हे तर जगभरात पसरले आहेत, याची तडीपार अध्यक्षांना कल्पना नाही का? ते सगळे पोटामागेच गेले आहेत. गुजरातचा गेल्या २२ वर्षांत नेत्रदीपक विकास झाला असेल, तर महाराष्ट्रातून, मुंबईतून आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून हे बांधव परतीच्या प्रवासाला कसे लागलेले दिसत नाहीत? तिथं किती अफाट विकास झाला आहे, हे इथं बसूनच का सांगतायत?
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
४. देशाच्या प्रगतीत खोडा घालणं आणि खिल्ली उडवणं एवढंच काँग्रेसला चांगलं जमतं असं जेटली यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही विश्वासात न घेता राफेल विमानांच्या खरेदी करारात बदल केले. फ्रान्सला गेले असताना त्यांनी परस्पर निर्णय घेतला. ज्या कंपनीला विमाननिर्मितीचा काहीही अनुभवही नाही अशा कंपनीला त्यांनी कंत्राट दिलं. कारण या कंपनीचे मालक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. त्यावर, काँग्रेस देशाच्या प्रगतीच्या विरोधातच आहे. त्यांच्याकडे इतकी वर्षं देशाची सत्ता होती त्यांनी देशासाठी काय केलं, असा प्रश्न जेटली यांनी विचारला. देशाच्या प्रगतीत खोडा घालणं, ही काँग्रेसची जुनी खोड असल्याचीही खोचक टीका जेटली यांनी केली.
देशात ज्या काही संस्थात्मक उभारणीच्या मोठ्या गोष्टी आकाराला आल्या आहेत, त्या काँग्रेसनेच उभारल्या आहेत, याचा जेटली यांना विसर पडलेला दिसतो. त्याचबरोबर कम्प्युटरच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या मध्ययुगीन मानसिकतेच्या पक्षाचे आपण प्रतिनिधी आहोत, हेही ते विसरलेले दिसतायत. बाकी विमाननिर्मितीचा अनुभव नसलेल्या सत्तास्नेही उद्योजकाला एवढं मोठं कंत्राट दिल्याने देशाचा विकास कसा होतो, हे जेटली यांनी जरा सविस्तर स्पष्ट करून सांगायला हवं.
.............................................................................................................................................
५. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यापासून समाजातून भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे केवळ भगवत गीतेच्या शिकवणुकीमुळे शक्य होऊ शकतं. राजकारणालाही योग्य दिशा देण्याचं काम गीता करू शकते,’ असं हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. खट्टर म्हणाले, ‘कायदा आणि न्यायव्यवस्थेमार्फत आपण भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेऊ शकतो. मात्र, समाजातील सर्व स्तरातून भ्रष्टाचाराचं निर्मूलन व्हावं, तसंच लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यामध्ये गीता महत्त्वाची भूमिका बजावू शकते.’
खट्टर काका टिंबक्टूहून कधी आलात? प्रवास बरा झाला ना? जेट लॅग अजून गेला नाही का? या देशात गीता हजारो वर्षांपासून आहे. तिचं पठण करणारेही तेवढीच वर्षं आहेत. तिच्यावर हजारो भाष्यं आणि टीका लिहिल्या गेल्या आहेत. तरी इथल्या पालथ्या घड्यांमध्ये सद्विचारांचं थेंबभर पाणी शिरल्याचं ऐकिवात नाही. असले ग्रंथ पूजा करायला ठेवायचे असतात, व्यवहारातलं वर्तनाशी त्यांचा काही संबंध नसतो, हे इथल्या जनतेने अंगी बाणवून घेतलेलं आहे. आधी आपल्या पक्षात गीतापाठ करून काही फरक पडतोय का ते पाहा, मग जगाला ज्ञान द्या.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 27 November 2017
टिकोजीराव, गाय कापून खावी हे कुराणात कुठेही लिहिलेलं नाही. तसंच बायबलातही कुठेही नाही. मग गायी कशाला कापायच्या आहेत? हिंदूंचा मानभंग करण्यासाठीच ना? आपला नम्र, -गामा पैलवान