न उलगडलेली मिस्ट्री
सदर - सत्तावर्तन
चिंतामणी भिडे
  • ‘झोडिअ‍ॅक’चं पोस्टर्स
  • Mon , 27 November 2017
  • इंग्रजी सिनेमा English Movie न-क्लासिक Zodiac झोडिअ‍ॅक

मर्डर मिस्ट्री किंवा सस्पेन्स थ्रिलर आपण का पाहातो? खुनी कोण आहे किंवा जो काही घटनाक्रम सुरू आहे, त्या सगळ्याचा कर्ता करविता कोण आहे, याचं जबरदस्त कुतूहल आपल्याला असतं. हू डन इट पद्धतीचे, म्हणजे खुनी नेमका कोण, या प्रकारातल्या सस्पेन्स थ्रिलरचं यश हे संशयाची सुई विविध संशयितांवर फिरवत ठेवताना दिग्दर्शक क्षणोक्षणी उत्कंठा कशी वाढवत नेतो आणि अखेरीस रहस्यभेद घडवताना या संशयितांपेक्षा वेगळाच कोणीतरी चेहरा समोर आणून कसा धक्का देतो, त्यावर अवलंबून असतं. रहस्यभेदाचा धक्का जितका मोठा, तितकं त्या सिनेमाचं यश खणखणीत. पण दिग्दर्शक डेव्हिड फिंचरच्या ‘झोडिअ‍ॅक’मध्ये यातलं काहीच नाही. तो क्षणीक्षणी उत्कंठा वगैरे काही वाढवत नेत नाही. तो संशयाची सुई विविध व्यक्तिरेखांवर फिरती ठेवत नाही, खऱ्या अर्थानं छातीत धडकी भरवेल असा केवळ एकच प्रसंग चित्रपटात आहे. मुख्य म्हणजे खुनी कोण, हे न सांगताच हा पावणेतीन तासांचा प्रदीर्घ चित्रपट संपतो आणि तरीही फिंचरच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये ‘झोडिअ‍ॅक’ला फार वरचं स्थान देण्याचा मोह समीक्षकांना होतो.

खुनी कोण असावा, याकडे बोट दाखवणारे सर्व पुरावे मिळताहेत. कायद्याच्या भाषेत त्याला परिस्थितीजन्य पुरावे म्हणतात. पोलिसांची खात्री आहे की, अमली एक व्यक्तीच खुनी आहे. अतिशय चिकाटीनं पाठपुरावा करून, एकेक धागा जुळवून पोलिस काही पुरावे गोळा करत करत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्या व्यक्तीशी बोलतानाही ‘हाच तो’ याचं सूचन होत राहातं आणि तरीही खुनी म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकत नाही; खटलाबिटला तर लांबची गोष्ट राहिली, साधा संशयित म्हणूनही पोलिस त्याला अटक करू शकत नाहीत आणि तो मात्र वारंवार पोलिसांना पत्र पाठवून केलेल्या आणि करणाऱ्या खुनाविषयी सांगत आव्हान देत राहतो. तब्बल २२ वर्षं चाललेल्या या प्रकरणामुळे गोष्टीत पोलिस आणि ती गोष्ट पाहताना आपण प्रेक्षक फ्रस्ट्रेट होत राहतो. पोलिसांचं फ्रस्ट्रेशन आपण वाटून घेतो आणि हेच फिंचरच्या ‘झोडिअ‍ॅक’चं यश आहे.

४ जुलै १९६९ला, अमेरिकन स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सगळीकडे सुरू असताना कॅलिफोर्नियातल्या व्हॅलेओ या छोट्याशा शहरात एक डबल मर्डर होतो. खुनी स्वत: पोलिसांना फोन करून मीच हा खून केल्याचं सांगतो. गेल्या वर्षी झालेला अमका अमका खूनही मीच केला होता, अशीही माहिती देतो. चार आठवड्यांनी ‘सॅनफ्रॅन्सिस्को क्रॉनिकल’ या दैनिकाच्या संपादकाला एक पत्र येतं. ते ही या खुन्यानेच लिहिलेलं. त्यात तो आधीच्या दोन्ही खुनांची माहिती देऊन, हे पत्र जर वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केलं नाही तर आणखी खून करण्याची धमकी देतो. सोबत चिन्हांची गुप्त लिपी असलेला एक कागदही असतो. पत्रात त्याने स्वत:चा उल्लेख ‘झोडिअ‍ॅक’ हा सिरियल किलिंगचा प्रकार असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. अन्य वर्तमानपत्रांनाही अशाच प्रकारे पत्र मिळालेलं असतं. पोलिसांना कळवलं जातं.

सॅनफ्रॅन्सिस्को क्रॉनिकल’मध्ये पॉलिटिकल कार्टुनिस्ट म्हणून काम करणाऱ्या रॉबर्ट ग्रेस्मिथ (जेक जिलनहॉल) या काहीश्या नवख्या तरुणाला या प्रकरणात रस वाटतो. तो ती गुप्त लिपी उलगडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कोणीच गांभीर्यानं घेत नाही. थोड्याच दिवसांच्या अंतरानं नापा काउंटी आणि प्रत्यक्ष सॅनफ्रॅन्सिस्को शहरात आणखी दोन खून होतात. सॅनफ्रॅन्सिस्को शहरातल्या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी डिटेक्टिव्ह डेव्हिड तोस्की (मार्क रफालो) आणि त्याचा सहकारी बिल आर्मस्ट्राँग यांच्यावर सोपवली जाते. ‘सॅनफ्रॅन्सिस्को क्रॉनिकल’चा क्राइम रिपोर्टर पॉल एव्हरी (रॉबर्ट डाऊनी ज्यु.) हा देखील त्याच्या परीनं त्याला मिळणाऱ्या धागेदोऱ्यांचा पाठपुरावा करू लागतो.

इथून पुढे कथानक तीन पातळ्यांवर फिरतं. बराचसा भाग हा तोस्की आणि आर्मस्ट्राँग करत असलेला तपास, कायदेशीर प्रक्रिया, या दोघांना येणाऱ्या अडचणी, विविध धागे जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यात त्यांना एका प्रमाणापर्यंत येणारं यश आणि एका टप्प्यावर येऊन थांबणारा प्रवास, हा सगळा भाग अगदी सविस्तर येतो. पावणेतीन तासातले जवळपास पावणेदोन तास तोस्की आणि आर्मस्ट्राँगचे प्रयत्न दिसत राहातात आणि त्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घासही अलगद निसटून जाताना दिसतो. त्यापुढचा एक तास ग्रेस्मिथची धडपड दिसत राहाते. तोस्कीच्या नजरेतून सुटलेले धागे पकडून तोही एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तोस्की आणि आर्मस्ट्राँगप्रमाणेच तोही आपल्या निष्कर्षाच्या बाबतीत ठाम असतो आणि त्यांच्याप्रमाणे ग्रेस्मिथ या निष्कर्षाच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. सर्व परिस्थितीजन्य पुरावे एकाच व्यक्तीकडे बोट दाखवत असूनही अखेरपर्यंत त्या व्यक्तीला अटक न करू शकणं, यातली निराशा, हळहळ हे ‘झोडिअ‍ॅक’चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे.

ग्रेस्मिथनेच या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून लिहिलेल्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा होता. मर्डर मिस्ट्रीसारखा विषय हाताळत असताना खुनी कोण याचंच उत्तर न देणं हा सर्वांत मोठा धोका फिंचरनं पत्करला होता. बॉक्स ऑफिसच्या गणितात तो सपशेल अपयशी ठरला, कारण व्यावसायिकदृष्ट्या चित्रपट फारसा चालला नाही. परंतु, सत्य घटनेवर आधारित सिनेमा करताना सत्याशी प्रतारणा करणं फिंचरला मान्य नव्हतं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच पाटी झळकते : ‘What follows is based on actual case files’. आणि चित्रपट बघत असताना, कथाभाग उलगडत असताना जणू काही आपण त्या केस फाइल्सच वाचत आहोत, असा फील आपल्याला पटकथाकार जेम्स वँडरबिल्ट आणि दिग्दर्शक फिंचर देतात. तब्बल २२ वर्षं या खूनमालिकांचा तपास सुरू आहे.

या २२ वर्षांत अवतीभवतीचं जग बदललंय. तीन तीन वर्षं खुन्याची पत्रं येत नाहीत. खून होणंही बंद होतं. पोलिसांचा या तपासातला रस कमी होतो. नेमकं तेव्हाच ग्रेस्मिथचं कुतूहल पुन्हा जागं होतं. तो पुन्हा सगळे धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करतो. तोस्कीला भेटतो. तोस्की त्याला ऐकवतो, ‘गेल्या तीन वर्षांत खुन्याचं पत्र आलेलं नाही. या तीन वर्षात एकट्या सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये २०० हून अधिक खून झालेत.’ तरीही ग्रेस्मिथ पिच्छा सोडत नाही. वर्षामागून वर्षं उलटत जातात. फिंचर हा सगळा कथाभाग तारखांनिशी दाखवतो. आधी पोलिसांचे प्रयत्न, मध्येच काही प्रसंगांमध्ये पॉल एव्हरीचे प्रयत्न आणि सरतेशेवटी ग्रेस्मिथची धडपड, आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नसल्यामुळे त्याची होणारी तगमग, पत्नी आणि त्याच्यात या प्रकरणामुळे निर्माण होणारा दुरावा, तोस्कीकडून होणारा असहकार अशा सगळ्या अडचणींचा सामना करत करत तो अखेरीस त्याच्या दृष्टीनं खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचतो; पण इथेही पुन्हा तेच : ठोस पुरावा नाही, केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर काहीच करू शकत नाही. पोलिसांप्रमाणेच तोही हताश होतो आणि त्याच्यासोबत प्रेक्षक म्हणून आपण.

चित्रपटात थरारक प्रसंग जवळपास नाहीतच. मर्डर मिस्ट्री किंवा सस्पेन्स थ्रिलर या प्रकारच्या चित्रपटात गरजेचे असतात तसे प्रसंग तर जवळपास शून्य. अपवाद केवळ एका सणसणीत प्रसंगाचा. खुन्याचा माग काढत काढत ग्रेस्मिथ त्या संशयित खुन्यानं एकेकाळी ज्याच्यासोबत काम केलेलं असतं, त्याच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्या घराच्या बेसमेंटमध्ये घडणारा हा प्रसंग अंगावर शहारे उभा करणारा आहे. मात्र, याही प्रसंगात दिग्दर्शक थेट विधान करतच नाही; केवळ सूचन करत राहातो. ही संदिग्धता आणि त्यातून चित्रपटातल्या पात्रांबरोबरच प्रेक्षक म्हणून आपल्याला येणारं फ्रस्ट्रेशन, त्यातून निर्माण होणारी हुरहूर आणि अर्धवट शेवटामुळे येणारं एक प्रकारचं रिकामेपण हा ‘झोडिअ‍ॅक’चा सर्वांत लोभस भाग आहे.

दोन प्रसंगांमध्ये किंवा घटनांमध्ये बराच काळ सरला आहे, हे दाखवण्यासाठी चित्रपटांमध्ये काही ठराविक हातखंडे वापरले जातात. अतिशय वेगवान दृश्यमालिकेतून दिवसाची रात्र आणि पुन्हा रात्रीचा दिवस झालेला दाखवला जातो; वेगानं सरणाऱ्या आभाळाचं दृष्य काही सेकंद दाखवलं जातं. चित्रपटाच्या भाषेत त्याला ‘टाइम लॅप्स’ म्हणतात. ‘झोडिअ‍ॅक’मध्ये अशा टाइम लॅप्सचं एक अप्रतिम दृष्य आहे. छायाप्रकाशाचा खेळ आणि झपाट्यानं सरणाऱ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर सॅनफ्रॅन्सिस्कोमधल्या एका बांधकाम सुरू असलेल्या गगनचुंबी इमारतीचे मजल्यावर मजले चढत जाऊन अखेरीस ही गगनचुंबी इमारत पूर्ण होते, असं दृष्य फिंचरनं दाखवलंय. साधारण शंभरेक मजली इमारत पूर्ण होण्यासाठी ७०च्या दशकात चार-पाच वर्षं सहज लागली असावीत. एका सिरिअल किलरला पकडण्याच्या गोष्टीत चार-पाच वर्षांचा कालावधी बराच मोठा म्हटला पाहिजे. इथं तब्बल २२ वर्षं लागलीत. १९६९ मध्ये सुरू झालेलं कथानक १९९१ मध्ये येऊन संपतं आणि तरीही हाती काहीच लागत नाही.

चित्रपटात एक गमतीशीर प्रसंग आहे. क्लिंट इस्टवूड अभिनित ‘डर्टी हॅरी’ १९७१ साली प्रदर्शित होऊन तुफान गाजला होता. त्यातही स्कॉर्पिओ या सिरियल किलरची गोष्ट आहे. डिटेक्टिव्ह हॅरी कॅलाहन ऊर्फ डर्टी हॅरी कसा शिताफीनं त्याला पकडतो आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याचा खातमा करतो, हे डर्टी हॅरीचं कथानक. या कथानकाला वास्तवात घडलेल्या आणि त्या काळी गाजत असलेल्या या ‘झोडिअ‍ॅक’ प्रकरणाचाच आधार होता. मात्र, डर्टी हॅरीच्या मेकर्सनी तद्दन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून टिपिकल फिल्मी न्याय करत डिटेक्टिव्ह हॅरी कॅलाहन सिरियल किलरचा खात्मा करतो. ‘झोडिअ‍ॅक’मध्ये एका प्रसंगात डिटेक्टिव्ह तोस्की आणि त्याची पत्नी सिनेमा बघायला जातात, तो नेमका ‘डर्टी हॅरी’ असतो. त्याच खेळाला नेमका ग्रेस्मिथही हजर असतो. तोस्की ग्रेस्मिथला म्हणतो देखील, ‘आता तर या प्रकरणावर सिनेमे देखील निघू लागलेत.’

फिंचरने यापूर्वी सिरियल किलरवरच आधारित ‘सेव्हन’ हा चित्रपट केला होता. तो बॉक्स ऑफिसवर चांगला यशस्वीही ठरला. आजही तो फिंचरच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक मानला जातो. त्यानंतर १२ वर्षांनी त्याने ‘झोडिअ‍ॅक’ केला. दोन्ही सिनेमे सिरियल किलरचीच गोष्ट सांगत असले तरी दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे ‘सेव्हन’चा उद्देश प्रेक्षकांना रहस्य आणि थराराचा अनुभव देणं हा आहे, तर ‘झोडिअ‍ॅक’चा सारा भर हे संपूर्ण प्रकरण जसं घडलं तसं तपशीलवार उलगडून सांगणं हा आहे. त्यासाठी व्यावसायिक धोके पत्करण्याची देखील फिंचरची तयारी होती. आणि म्हणूनच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरूनही अनेकांच्या मते तो फिंचरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे.

.............................................................................................................................................

लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......