अजूनकाही
‘तुम्हारी सुलू’ हा सिनेमा म्हणजे एक मध्यमवर्गीय शहरी स्त्री स्वत:ची गृहिणीपलीकडची ओळख कशी निर्माण करते, हे सांगणारी कथा. या सिनेमाला समीक्षकांनी गौरवलं आहे. ‘चूल आणि मूल’ यातून बाहेर पडणाऱ्या आजच्या स्त्रीचं भावविश्व कलाजगताला कथेसाठी भावलं नाही, तरच नवल.
परंतु याच सिनेमामध्ये सावलीसारखं आणखी एक महत्त्वाचं भावविश्व आहे. ‘कमावता’, ‘रक्षणकर्ता’ या पारंपरिक प्रतिमेतून धडपडत बाहेर पडणाऱ्या आजच्या पुरुषाचं भावविश्व. तिशी-चाळिशीमध्ये असलेल्या, नवरा आणि वडील अशा भूमिकेतल्या अनेक शहरी मध्यमवर्गीय पुरुषांचं प्रतिनिधित्व ‘अशोक’, म्हणजे सुलूचा नवरा यशस्वीपणे दाखवतो.
कमावण्याची पारंपारिक जबाबदारी मुख्यत्वे त्याची; पण आता तो एकटाच कमावत नाही.
भारतीय पुरुषसत्ताक समाजात स्त्रीची पारंपरिक जबाबदारी घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, स्वयंपाक करणं, पाहुणे-रावळे बघणं, आजाऱ्याची सेवा करणं ही असते. तर पुरुषाची समाजानं ठरवलेली कर्तव्यं म्हणजे पैसे कमावणं, सगळ्यांचं रक्षण करणं, खरेदी-विक्रीसारखी बाहेरची कामं करणं इत्यादी. अनेक पिढ्यांनी प्रश्न न विचारता ही चौकट मुकाट्यानं निभावली. पण आज जसजशी स्त्री शिकून, जागरूक होऊन या प्रतिमेतून बाहेर पडत आहे, तसा पुरुषही यातून पडतो आहे. किंवा त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाहीये.
अशोकनं चहा कधी केला नाहीये, पण बायको कामाला गेल्यावर त्याला चहा करावा लागतो आणि चहा-साखरेचे डबे शोधण्यासाठी तो धडपडतो. मुलाला वाईट वर्तनामुळे शाळेतून काढून टाकल्यावर ‘आता त्याच्याकडे मी स्वत: लक्ष देईन’ असं तर तो त्राग्यानं म्हणतो. पण मारणं, ओरडणं, शिक्षा करणं, नातेवाईकांकडे ठेवणं, या पलीकडे मुलाला कसं सांभाळायचं, हे त्याला कळत नाही. बायकोनं पैसे कमावले तर त्याची हरकत नाही, उलट तो तिला मदतही करतो, पण पहिला पगार घरी आल्यावर ‘अब तो तुम कमाने लगी हो ना’ असं म्हणताना त्याचा पुरुषी अहंकार, पैसा कमावण्यावर असलेली इतक्या वर्षांची मक्तेदारी हळूच बाहेर येते. बायकोचे पाय रात्री एकांतात चेपायला त्याची हरकत नाही, पण घरी पाहुणे आल्यावर मात्र तो त्यांच्याशी गप्पा मारतो आणि बायको स्वयंपाकघरात काम करते. बायको रात्री उशिरा कामावर जाणार म्हटल्यावर त्याच्यातला तथाकथित ‘रक्षणकर्ता’ आधी तिच्या सुरक्षेची खातरजमा करतो.
अशोक समाजानं ठरवून दिलेल्या पारंपरिक भूमिकेतून पुरता बाहेरही पडला नाहीये, नवीन भूमिकांना सरावलेलाही नाहीये आणि ‘फिट’ होण्याचा प्रयत्न करतोय, कधी यशस्वी प्रयत्न तर कधी केविलवाणा.
तो थोडा थोडा आरशात बघू लागलाय.
पारंपरिक चौकटीनुसार सुंदर दिसणं, नटणं, मुरडणं, हे प्रामुख्यानं स्त्रियांचं क्षेत्र. पुरुष कमावता, रक्षणकर्ता वगैरे असल्यानं स्वत:च्या ‘दिसण्याकडे’ लक्ष देणं, अशा गोष्टी त्याच्यासाठी दुय्यम. ‘काय नटत बसलाय मुलीसारखा’ हा मुलांना वाढवताना समाजात उल्लेखला जाणारा एक सामान्य वाक्प्रचार... स्त्रीचं वस्तूकरण आणि पुरुषाची चाकोरी घट्ट करणारा.
आजचा अशोक मात्र ‘आपले केस गळत तर नाहीत ना’, या चिंतेत आहे. ‘असतील ते चार कपडे अंगावर चढवले’ हे आता त्याचं वर्तन नाही, तर याउलट ‘लाल रंगाचा कुर्ता मी घालत नाही’ असं त्याचं ठरलेलं आहे. बेडरूममध्ये बायकोबरोबर नाचताना अशोक शृंगारी नृत्यांगना बनू शकतो आणि बायको हातात ग्लास घेऊन त्याच्या नृत्याला दाद देऊ शकते. आजचा अशोक थोडा थोडा का होईना, पण आरशात स्वत:कडे बघू लागलाय.
तो दु:ख सांगू तर लागलाय, पण ओरडून स्वत:ला व्यक्त करू शकत नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
समाजातील अलिखित नियमांनुसार दु:ख, आनंद, भीती अशा ‘कमजोर’ समजल्या जाणाऱ्या भावना स्त्रिया व्यक्त करतात, तर पुरुष मात्र फक्त रागासारख्या ‘शूर’ भावना उघडपणे व्यक्त करू शकतात. त्यामुळे रडणं, भीतीनं थरकाप उडणं, आनंदानं चित्कारणं हा ‘व्यक्त होण्याचा’ सगळा स्त्रियांचा प्रांत. ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई’, ‘रडतोय काय मुलीसारखा’ हे असे असंख्य संवाद समाजातल्या भावना व्यक्त करण्याच्या नियमांचीच साक्ष देतात.
अशोक त्याला अपवाद नाही. नोकरी गेल्याचं दु:ख तो शब्दांनी सांगतो, पण ढसाढसा रडू शकत नाही. दु:ख व्यक्त करण्याचा (गिळून टाकण्याचा) पुरुषांचा सामान्य मार्ग म्हणजे तो दारू पिऊन घरी येतो. बायकोबद्दल वाटणारी असूया, तिच्या संपर्कात येणाऱ्या पुरुषांबद्दलचा मत्सर, तिचं काम पटलं नाही की येणारा राग – हे सगळं त्याच्या नजरेतून तर जाणवतं पण ते मनात साठवून ठेवतो. झोपून गेल्याचं दाखवतो पण व्यक्त करत नाही. मुलाला शाळेतून काढल्यावर मात्र तो त्रागा करतो, रागासारखी भावना सहजपणे दाखवतो, कारण ‘पुरुषांनी राग दाखवण्यात’ समाजाला आक्षेप कधीच नव्हता. पुरुषाला आपल्या समाजात स्पर्श तेव्हाच उपलब्ध होतो, जेव्हा तो शय्यासोबत करतो. त्यामुळेच लैंगिक भावनांची आतुरता, हपापलेपण अशोक दाखवू शकतो.
त्यामुळेच प्रसंगी घाबरलेला, दु:खी अशोक आपल्याला दिसत राहतो. हे सगळं तो निरोगीपणे व्यक्त करत नाही. पण साचलेल्या भावनांचं करायचं काय म्हणून गोंधळतो मात्र नक्की.
तो बदलतोय, बदलायचा मनापासून प्रयत्न करतोय, पण कदाचित हजारो वर्षांच्या जोखडामुळे त्याला ते सहजासहजी शक्य नाही
पुरुषप्रधान व्यवस्थेतच जगणारे, स्त्रीला दासी मानणारे, पुरुषीपणाच्या ‘दैवत्वा’तून बाहेर न आलेले असंख्य पुरुष आजूबाजूला आहेतच, हे वास्तव आहे. स्त्री-पुरुष समानता मूल्याचा त्यांना स्पर्शही झालेला नाही.
पण अनेक अशोक असे सुद्धा आहेत की, जे मधल्या मध्ये अडकले आहेत. ते बदलू पाहत आहेत, बदलायचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाला कारण शेकडो वर्षांची स्त्री-पुरुष समानतेची लढाई असेल किंवा बदललेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे होणारा नाईलाज. पण अनेक अशोक थोडं तरी बदलू पाहत आहेत, हे नक्की.
पण इतक्या वर्षाचं ‘पुरुषी’ मानसिकतेचं जोखड, त्यात साठलेला अहंकार, स्वामित्व चुटकीसरशी झुगारून देणं कदाचित सहजपणे शक्य नाही. कारण ते जनुकांमध्ये नसलं तरी जडणघडणीत मुरलेलं आहे.
... आणि म्हणूनच आपल्या स्वत:मधल्या आणि आपल्या आजूबाजूच्या अशा अशोकला हेरून त्याला ‘आपलं’ म्हटलं, त्याच्या एखाद्या प्रयत्नाला शाबासकी दिली तर कदाचित स्त्री-पुरुष समानतेचा दूरगामी प्रवास अजून सोपा होईल.
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 25 November 2017
कसा ओळखायचा अशोकला? -गा.पै.