अजूनकाही
पंचवीसेक वर्षांपूर्वी आलेल्या 'टॉय स्टोरी' ते आताच्या 'कोको'पर्यंत पिक्सारनं सहसा निराशा पदरी पडू दिलेली नाही. मुळात पिक्सार आपल्या सभोवतालच्या मूर्त-अमूर्त संकल्पना एकत्र गुंफून, त्यातील पात्रं किंवा घटना पाहून म्हटलं तर काल्पनिक, पण त्यांची मानसिकता, त्यांचे आदर्श, त्यांची तत्त्वं यांच्यामुळे वास्तवाचं भान आणि संदर्भ असणारी कथा चित्रपट म्हणून आपल्यासमोर मांडत आलंय.
मग ते 'टॉय स्टोरी'मध्ये मैत्रीवर भाष्य करणारं वुडी आणि बझ यांचं नातं किंवा 'रॅटटुई'मध्ये 'एनबडी कॅन कुक'चं तत्त्वज्ञान आणि समीक्षेवरील भाष्य असो किंवा मग आताच्या 'कोको'मधील 'सीझ द मोमेंट' आणि 'फॅमिली इज इम्पॉर्टंट' असं म्हणणारी कोकोची फॅमिली असो, पिक्सारनं या दोन-तीन दशकांत आपल्याशी एक भावनिक नातं निर्माण केलं आहे, हे मात्र नक्की.
मिग्वेल हा एका शूमेकर्सच्या कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला मुलगा असतो. अनेक वर्षांपूर्वी मिग्वेलचे खापर पणजोबा त्याची खापर पणजी- इमेल्डा आणि तिची मुलगी- कोको यांना संगीताच्या प्रेमापायी सोडून गेल्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून या कुटुंबात संगीताचं नावही काढलं जात नाही. पण मिग्वेल मात्र लपूनछपून गिटार वाजवणं शिकत, त्याचे आदर्श असलेल्या अर्नेस्टो डी ला क्रुझ यांच्यासारखं महान संगीतकार बनण्याचं स्वप्न पाहत असतो.
'डे ऑफ द डेड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट दिवशी मिग्वेल आणि त्याच्या कुटुंबीयांचं भांडण होतं. आणि मिग्वेल बंड करून, संगीताच्या प्रेमापोटी घर सोडून निघून जातो. याच दिवशी गावात एक स्पर्धा असल्यानं मिग्वेल गिटार वाजवण्यासाठी म्हणून अर्नेस्टोची गिटार चोरतो. पण यामुळे तो थेट 'लँड ऑफ द डेड' म्हणजे मृतात्म्यांच्या जगात पोहचतो. आणि इथून खेळ सुरू होतो त्याच्या इहलोकात परत येण्याचा. ज्यात कधी त्याला त्याचे मृत नातेवाईक वगैरे भेटतात, तर कधी अडथळा आणतात.
पण त्याचा हाच प्रवास एकाच वेळी त्याची स्वप्नं, त्याचं संगीतप्रेम, त्यांचं कुटुंब या सर्वांवर परिणाम करतो. त्यामुळे त्यानं केलेली प्रत्येक कृती त्याचं भविष्य ठरवण्यास कारणीभूत ठरते.
तशी गोष्ट अगदी साधीसोपी आहे. भलेही त्यात काल्पनिक गोष्टी, काल्पनिक पात्रं इत्यादींचा समावेश असला तरी शेवटी 'सीझ द मोमेंट', 'फॅमिली इज इम्पॉर्टंट', असे संदेश ती देते. पण म्हणून ती अतिआदर्शवादी होते असंही नाही. ती शेवटपर्यंत आपल्याशी एक भावनिक नाळ जोडून ठेवण्यात यशस्वी होते.
मानवी भावभावनांचा हा पट आपल्यासमोर मांडताना संगीत, मिग्वेलची स्वप्नं, या गोष्टी फक्त एक रूपक म्हणून काम करतात. मग हे रूपक कशासाठीही असू शकतं, आणि लागू पडू शकतं. मग ते एखाद-दोन व्यक्तींमधील समज-गैरसमजाचं रूपक म्हणून समोर येऊ शकतं, किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वप्नांसाठी कुटुंबीयांविरुद्ध पुकारलेलं बंड यांचं चित्रण करू शकतं.
पण खरी गोष्ट या बंडाची किंवा त्या व्यक्तीच्या स्वप्नांच्या पूर्ततेची नाही, खरी गोष्ट आहे ती 'त्या' कुटुंबाची. कोणतीही बाब असो, 'ते' ठरावीक कुटुंब त्याकडे कसं पाहतं आणि तिच्याशी कसा सामना करतं, याची ही गोष्ट आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
जिथं संगीत हा कथेचा महत्त्वाचा भाग आहे, तिथं संगीताकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. आणि डिस्ने व पिक्सार दोन्हीही यात निष्णात आहेत, यात नवल नाहीच. (डिस्नेच्या अशाच एका जुन्या म्युझिकल चित्रपटाच्या आणि लेखिकेच्या प्रवासाचा 'सेव्हिंग मि. बँक्स' हा चित्रपटदेखील एकदा पाहण्यालायक आहे.)
एक म्युझिकल तयार करताना त्यातील गाणी कथेला आणि त्या ठराविक दृश्याला कशी पूरक आहेत, ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. इथं महत्त्वाची असलेली 'रिमेम्बर मी', 'उन पोको लोको', 'मच नीडेड अॅडव्हाइस', अशी मुख्य गाणी तर त्या ठिकाणी परफेक्टली फिट बसलेली आहेतच. शिवाय इतरही लहानसहान गाणीही त्या दृश्यांमध्ये चित्रण आणि संगीताच्या जोरावर आपल्याला खिळवून ठेवतात आणि आपल्या मनावर ताबा मिळवतात.
चित्रपटाचं अॅनिमेशन तर उत्तमच आहे. आणि काही दृश्यांमध्ये रंगांची जी काही उधळण केलेली आहे, ती मोठ्या पडद्यावर पाहणंच योग्य आहे.
अॅनिमेटेड चित्रपटात अॅनिमेशन इतकाच महत्त्वाचा भाग हा त्या पात्रांच्या आवाजाचा असतो. इथं मिग्वेलला आवाज दिलेले अॅन्थनी गोन्झालिझ, अर्नेस्टो म्हणून असलेले बेन्जामिन ब्रॅट आणि इतरही जवळपास सर्वच आवाज त्या त्या पात्राला शोभतात. बहुतांशी पात्रं लॅटिन, त्यातल्या त्यात मेक्सिकन असल्यानं कलाकारही मेक्सिकनच आहेत. आणि ते शोभूनही दिसले आहेत.
काही लोक हा चित्रपट पाहून म्हणतील की, यात काय नवीन किंवा विशेष आहे? ही तत्त्वं, आदर्शवत मतं तर आम्ही याच डिस्ने-पिक्सारच्या इतरही चित्रपटांमध्ये पाहिली आहेत. पण इथं तिचं तात्पर्य काय याहून जास्त महत्त्व ती गोष्ट कशी आणि किती प्रभावीपणे मांडली आहे, याला आहे.
आणि तसंही, त्यात चित्रपटाच्या ओघात लक्षात येणारे अथवा न येणारे फ्लॉज जरी असतील तरीही एखादा चित्रपट पाहून आपण आनंदाश्रू ढाळत, समाधानकारकपणे जर चित्रपटगृहातून बाहेर पडत असू तर तो चित्रपट उत्तम आहे, याबाबत दुमत नसावं.
त्यामुळे डिस्ने-पिक्सार अध्यायातील ही कोकोच्या स्वप्नांची आणि त्याच्या कुटुंबासोबतच्या नात्याच्या गुंत्यातून मार्ग काढण्याची गोष्ट या आठवड्यात चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment