‘आजी’मुळे काव्यात्म न्याय मिळाल्याचा प्रत्यय मिळतो
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘आजी’ सिनेमाचं पोस्टर
  • Sat , 25 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie आजी AJJI देवाशिष मखिजा Devashish Makhija सुषमा देशपांडे Sushama Deshpande

‘आजी’ या सिनेमाच्या प्रिव्ह्यूचं निमंत्रण आलं, त्या दिवशी ‘पद्मावती’ सिनेमाप्रकरणी दीपिका पदुकोन अणि संजय लीला भन्साळींच्या शिरच्छेदासाठी प्रत्येकी दहा कोटींचं पारितोषिक जाहीर झालं होतं; देशातल्या चार मुख्यमंत्र्यांनी ‘पद्मावती’ आमच्या राज्यात प्रदर्शित केला जाणार नाही, असं घोषित केलं होतं; गोव्यात होणाऱ्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘न्यूड’ आणि ‘सेक्सी दुर्गा’ या सिनेमांची हकालपट्टी झाली होती; ‘मोदींकडे अंगुली निर्देश कराल तर हात छाटला जार्इल’ अशी धमकी नित्यानंद राय या बिहारच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखानं दिली होती आणि कोपर्डी खटल्याचा निकालाची तारीख जवळ आली होती. वातावरण विषण्णता आणणारं होतं.

मात्र ‘आजी’ सिनेमा पाहिल्यानंतर अक्षरश: या साऱ्यावरचा उतारा मिळाल्यासारखं वाटू लागलं. हो, ‘आजी’मुळे काव्यात्म न्याय मिळाल्याचा प्रत्यय मिळतो. शिवाय हा बॉलिवुड स्टार्इलचा सूडपट नाही, हे आवर्जून सांगायला हवं. ही आहे एका आजीची न्याय मिळवण्याच्या निर्धाराची कहाणी.

‘मंदा...ए मंदा..’ अंधारातूनच हाका ऐकू येतात. बॅटरीच्या प्रकाशात तुंबलेल्या नाल्यातल्या उंदीर- घुशींचा संचार दिसू लागतो. डुकरं एकमेकांना ढुश्या देत चिखलात लोळत पडलेली असतात. वस्तीतल्या चिंचोळ्या पायवाटा, नंतर लागणारा गलिच्छ नाला, त्यावरची अजस्त्र पार्इपलार्इन आणि पुढे असलेला उकिरडा. आपले दुखरे गुडघे सांभाळत आजी आणि वस्तीच्या जवळच ‘धंदा’ करणारी लीला झोपडवस्तीच्या चिंचोळ्या अंधारवाटातून मंदाला हाका मारत असतात. संध्याकाळ उलटून गेली, अंधार पडला तरी मंदा घरी न आल्यानं आजी कातर झालेली असते. त्यांचा शोध उकिरड्यावरच संपतो. तिथंच दहा वर्षांची मंदा कण्हत पडलेली असते.

स्थानिक पोलिस स्टेशनवर खबर पोचते, अल्पवयीन मुलीवरचा बलात्कार. पोलीस घरी हजर होतो. मुलीच्या अंगावर घातलेलं पांघरूण दूर करून खरोखरच बलात्कार झालाय का याची चाचपणी करतो. ‘करना पडता है... देखना पडता है... खरोखरच बलात्कार झालाय का ते पाहावं लागतं’. तक्रारीची नोंदणी दूरच. हा पोलीस मुलीच्या आर्इ-वडिलांना दमात घेतो. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, धमक्याही देतो. गुन्हेगार स्थानिक आमदाराचा मुलगा आहे, हे त्याच्या लक्षात येतं. पैसे उकळण्याची संधी चालून आलेली असते.

दुसऱ्या दिवशी हा पोलीस एका कुडमुड्या डॉक्टरला घेउन येतो. तो डॉक्टर मुलीची ‘सर्जरी’ करतो.

‘तक्रार करण्याच्या भानगडीतसुद्धा पडू नकोस’, लीला आजीला समजावण्याचा प्रयत्न करते. आमदाराच्या बदफैली मुलानं बलात्कार केलाय. पोलीस काही करणार नाहीत हे लक्षात आल्यावरही आजी हतबल होत नाही. ती निमूटपणे घरी परतते. मनात विचारचक्र सुरू असतं. काही करायला तर हवं असतं. मग ती मध्यरात्री घराबाहेर पडते. वस्तीत आमदाराला शुभेच्छा देणारं होर्डिंग तिला दिसतं. अपरात्री वस्तीत लावलेल्या होर्डिंगमधला आमदार धावलेच्या तरुण मुलाच्या चेहऱ्याचा तुकडा ती कापून आणते. दुसऱ्या दिवशी तो तुकडा नातीला दाखवते. तो चेहरा बघून नात अस्वस्थ होते, थरथर कापू लागते. आजीची खात्री पटते.

दोन दिवसांनतर मुलीला थोडं बळ येतं. आजीची तगमग तिच्यापर्यंत पोचलेली असते. ‘उकीरड्याच्या पलीकडे रेल्वेलार्इन आहे... ती पार केल्याकेल्या कन्स्ट्रक्शन सार्इट आहे...’ आजीचं शोधकार्य सुरू होतं.

मंदाचा रक्तस्त्राव थांबलेला नसतो. आजी वैदू बार्इच्या जुन्या मोडकळीस आलेल्या मेटॅडोरमध्ये थाटलेल्या दवाखान्यातून औषधं आणि मलमं आणते. ‘खून आ रहा है’, आजी सांगते. वैदू स्त्री आजीच्या नजरेला नजर देते. दोघींचा मूक संवाद होतो. आजीला जास्त काही सांगायची जरुरी राहत नाही. हा मूक संवाद बरंच काही सांगतो. 

पुढे आजी आमदाराच्या बदफैली मुलाचा माग काढते. रेल्वेलार्इन पलीकडल्या कन्स्ट्रक्शन सार्इटवर तिला तो दिसतो. ती दूरून पाहत असते. त्याचा मित्र एक भेट घेऊन आलेला असतो. काय असते ती भेट? स्त्रियांच्या कपड्यांच्या दुकानातला पुतळा, मॅनक्वीन. पुतळ्याला बघून धावले उत्तेजित होतो. पुतळ्याची विटंबना करतो. तिचे कपडे फेडतो, हात-पाय वेगळे करतो, तिचा चेहराही निखळतो. मग राहते ते फक्त धड. धावलेला संभोगासाठी ते धडच तर फक्त हवं असतं. स्त्रीला डोकं, मेंदू, हात-पाय नसले तरी काय बिघडतं? सिनेमातील हे रूपक चपखलपणे कथेचा भाग होऊन समोर येतं.  

झोपडवस्तीतील ही केस महिला आयोग, स्त्रीवादी कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेली नसते. मेणबत्ती मोर्चे, धडक मोर्चे, वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स, मार्इक्स, बार्इट्स, कंठाळी घोषणा, भाषणं, भाष्यं... काही काही इथं दिसत नाही. दिसते ती फक्त एका आजीची नातीला न्याय मिळवून देण्याची आस.

पोलिस आणि सरकारी यंत्रणा तपास करणार नाहीत हे आजीला समजून चुकलेलं असतं. मात्र अपराध्याला शिक्षा मिळणार नाही, हे वास्तव आजी नाकारते. आपले दुखरे गुडघे सांभाळत ती आपल्या शोधकार्यासाठी धडपडत असते. तिचे साथीदार कोण असतात? वेश्या व्यवसाय करणारी लीला आणि शराफत कसार्इ.

एका दृश्यात आजी मोठ्या सुरीनं खटाखट मास कापताना आपल्याला दिसते. शराफत कसार्इ  तिला ट्रेन करत असतो. बोकडाचं बरंचसं मास कापून झाल्यानंतर प्राण्याच्या शरीरातले अंडकोषासारखे नाजूक भाग कसे कापायचे याच्या सूचना शराफत तिला देतो. आजी एकाग्रपणे सूचना ऐकत असते. आणि अत्यंत त्वेषानं दोन घावांत अंडकोष धडापासून वेगळं करते. शराफत स्तंभित होऊन तिच्याकडे पाहत राहतो. दोघांची नजरानजर होते. कापलेले अंडकोष आजी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते, दुकानाच्या बाहेर पडते आणि तिथंच घुटमळत असलेल्या कु़त्र्यांसमोर त्या मासाचे तुकडे फेकते. कुत्रे त्या मासाचे लचके तोडू लागतात. थोड्या दुरून आजी हे सारं पाहत राहते. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

अभ्यासक सांगत असतात, “बलात्कारी पुरुष अनेकदा आपल्या ओळखीच्या परीघातलाच असतो. अपरिचित, अनोळखी पुरुषच बलात्कार करतात हा भ्रम आहे.” फक्त अंधाऱ्या जागा, एकाकी रस्ते आणि ठिकाणात बलात्कार होतात हाही भ्रम असल्याचं सांगितलं जातं. बलात्कारी व्यक्ती बाह्यत: विकृत दिसत नाही, असंही सांगितलं जातं.

बलात्कारासंबंधीची जनमानसातली मांडणी मात्र वेगळी असते. देशातील अनेक दुर्गम भागातील पालक आपल्या मुलींना दूरच्या शाळांत जाऊ देत नाहीत. सातच्या आत घरात ये, फार वेळ बाहेर राहू नको, उशीर झाला तर एकटी येऊ नको, निर्जन एकाकी ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही, असं आर्इ आपल्या मुलीला सांगत असते.

अभ्यासकांच्या मांडणीची इथं उलथापालट होते. काही बलात्कार एकाकी निर्जन ठिकाणीही होतात. ‘आजी’तला बलात्कारी धावले लिंगपिसाट, पराकोटीचा विकृत आणि हिंसक म्हणूनच आपल्यासमोर येतो. सिरिअल किलरसारखा हा सिरिअल रेपिस्ट असतो. या बलात्कारी पुरुषानं विकृतीची परिसीमा गाठलेली असते. आपली बायको आणि सातआठ वर्षांच्या मुलीसमोर मंदावर बलात्कार का केला, हे तो निर्लज्जपणे सांगतो.

बलात्कार झालेल्या मुलीला किंवा स्त्रीला बलात्कारी पुरुष हा हैवानासारखाच वाटत असतो. तो जवळचा आहे का दूरचा, यामुळे बलात्कार या घटितामध्ये काही फरक पडणार नसतो. आजी सिनेमानं हे मानसिक वास्तव अधोरेखित केलं आहे. बलात्कारी धावलेचं चित्रण काहींना अवास्तव वा अतिरंजित वाटू शकतं. पण स्त्रीसाठी विशेषत: दहा वर्षांच्या मुलीसाठी तरी बलात्कारी राक्षसच असतो.

या सिनेमानं बलात्कार आणि बलात्कार करणाऱ्या पुरुषांबद्दल खणखणीत भाष्य केलं आहे. गरिबांसाठी पोलीस यंत्रणा आणि राजकारणीही राक्षसरूपी असतात. 

महाश्वेता देवींच्या ‘द हंट’ या कथेतील मेरी या नायिकेलाही तिचा सतत पाठलाग करणारा तहसीलदार राक्षसासारखा भासू लागलेला असतो. आदिवासींच्या उत्सवात तो भरपूर दारू पितो आणि मेरीशी लघट करण्याचा प्रयत्न करतो. मेरी कशीबशी आपली सुटका करून घेते. तहसीलदाराला भरपूर दारू पाजते आणि त्याला एकाकी ठिकाणी घेऊन जाते. शुद्ध हरपत असतानाही तो आपला रासवटपण सोडत नाही. मेरी आपल्या कोयत्यानं सपासप वार करत तहसीलदाराचा खून करते.

आजीही धावलेचं दमन करू शकते का हे पाहण्यासारखं आहे. सुषमा देशपांडे यांनी साकारलेली आजी तुम्हाला अस्वस्थ करेल. काहींना हा चित्रपट अतिरेकी आणि क्रूर वाटू शकतो, पण बलात्कारीच अनैतिक आणि अति क्रूर असतो हे आपण विसरता कामा नये.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 25 November 2017

जबरा.... हा चित्रपट पाहायलाच पाहिजे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख