टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नित्यानंद राय, नरेंद्र मोदी आणि राबडी देवी
  • Fri , 24 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya Rabri Devi राबडी देवी Narendra Modi नरेंद्र मोदी ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस Global Conference on Cyber Space Nityanand Rai नित्यानंद राय

१. डिजिटल विश्व दहशतवादी व कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान ठरू नये, याची जबाबदारी प्रत्येक देशानं घेतली पाहिजे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. सायबर सुरक्षा हा आगामी काळातील सर्वात मोठा विषय असून सुरक्षा यंत्रणांनी माहितीची देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस’ या परिषदेचं उद्घाटन करताना मोदी हे म्हणाले. १२० देशांतील सायबर तज्ज्ञ परिषदेत सहभागी झाले आहेत.

डिजिटल विश्वात कट्टरतावादी आणि दहशतवादी शिरू नयेत यासाठी मोदी हे केवळ भाषण देत नाहीत, तर त्यांच्या या निर्धाराला आचारांची जोड आहे. त्यांच्या पक्षाचा आयटी सेल आणि ट्विटरवर ते ज्यांना फॉलो करतात, अशी वेचक मंडळी पाहिली की, मोदी यांची या विषयाबद्दलची वचनबद्धता समजून येते.

.............................................................................................................................................

२. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूप जण आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांनी, मोदींच्या विरोधात उठणारा प्रत्येक हात, प्रत्येक बोट कापून काढू अशी भाषा केली होती. त्यावर राबडी देवी यांनीही वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतलं.

आपल्या या बाष्कळ बडबडीतून बाकी काही साध्य तर होत नाहीच, उलट आपण ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो, त्या राज्याची प्रतिमा खराब होते, हे या दोन्ही नेत्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. आधीच बिहार हा कायद्याचं राज्य न मानणाऱ्या बेबंद बाहुबलींचा प्रांत मानला जातो. राजकीय प्रगल्भतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहारची ही कापाकापीची प्रतिमा निर्माण करून हे नेते नेमकं काय साधतायत?

.............................................................................................................................................

३. पतियाळा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे खासदार धर्मवीर गांधी यांनी गांजा कायदेशीर ठरवण्यासाठी मांडलेलं खासगी विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. गांधी हे स्वतः हृदयरोगतज्ज्ञ आहेत. भारतात अनेक संस्थां आणि व्यक्तींनी गांजाचे वैद्यकीय उपयोग सांगून तो कायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न केले आहेत. बिजू जनता दलाचे खासदार तथागत सत्पती आणि केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही गांजा कायदेशीर करण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे. भारतात गेली अनेक शतकं गांजा विविध कारणांसाठी वापरला जातो. भारताच्या काही भागांमध्ये त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्थानही देण्यात आलं आहे. विशेषतः उत्तर भारतात त्याचा वापर धार्मिक कारणांखाली केला जातो. मात्र, गांजाच्या अतिवापरामुळे आणि त्याच्या सवयीमुळे वेडाचे झटके किंवा इतर मानसिक, शारीरिक त्रासही होऊ शकतात. तसेच ही गांजा ही एक स्टेपिंग स्टेप म्हणजे नशेच्या बाजारातलं पहिलं पाऊल ठरण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे गांजा भारतामध्ये कायदेशीर ठरणं धोकादायक असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

इतक्या सगळ्या युक्तिवादांची गरज काय? आपले काही सत्ताधारी मंत्री, मुख्यमंत्री, काही संघटनांचे प्रमुख यांची वक्तव्यं, प्रतिनिधीगृहांचं कामकाज आणि टीव्हीवरच्या डिबेटचे कार्यक्रम न्यायालयापुढे सादर केले, तर न्यायाधीश क्षणभराचाही विलंब न लावता गांजा अधिकृत करतीलच- ते म्हणतील, असाही इतका वापरला जातोय तर अधिकृत करणं ही निव्वळ औपचारिकताच आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय मार्ग ७९वर चौकजवळ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या स्टुडिओनं तिथं उभारलेल्या महाकाय पुतळ्यांमुळे हा परिसर अपघातप्रवण झाल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानंही याबाबत या स्टुडिओला नोटीस बजावली आहे. या स्टुडिओत नेहमीच मालिका वा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात. शिवाय हा मार्ग कर्जतहून पुढे मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला आणि त्याहून पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा आहे. एमएमआरडीएनं दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचं रूंदीकरण केल्यामुळे तसंच कर्जतपासून मुरबाडपर्यंत टोल नसल्यानं या मार्गावरून अवजड वाहने ये-जा करत असतात. याच मार्गावर जराही जागा न सोडता नितीन देसाई यांनी हे २५ फूट उंचीचे महाकाय पुतळे उभारले आहेत.

लोकांचं या पुतळ्यांकडे लक्ष जातं आणि ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असा काही प्रकार होतो का? तसं असेल तर हे पुतळे ताबडतोब हटवले पाहिजेत. म्हणजे तो दाखला देऊन सगळ्या रस्त्यांवर, शहरांत, चौकाचौकात उभारलेली कायदेशीर आणि बेकायदा पोस्टरं हटवण्यासाठी प्रशासनांवर दबाव आणता येईल. या पोस्टरांवरच्या दादा, भाऊ, ताई, डॉन, साहेब मंडळींच्या तुस्त आणि ओशट चेहऱ्यांकडे नजर जाऊन पुढे दिवस खराब जाऊ नये, यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याच्या नादात किती वाहनचालक अपघातग्रस्त होत असतील!

.............................................................................................................................................

५. ‘तुम्हाला गरिबीतून प्रभू येशू ख्रिस्त वाचवायला येणार नाहीत, फक्त शी जिनपिंगचं तुम्हाला या समस्येतून बाहेर काढू शकतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे फोटो काढा आणि त्याजागी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांचा एखादा चांगला फोटो लावा’ असे आदेश दक्षिण चीनमधल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ख्रिश्चन समाजाला दिले असल्याचं समजतं.

स्थानिक ख्रिस्ती समाजानं या आज्ञेचं ताबडतोब पालन करून शी यांच्याच तसबिरी घराघरात लावायला हव्यात... ख्रिस्ताप्रमाणेच क्रूसावर लटकलेले, हातापायात खिळे ठोकलेले शी जिनपिंग. अशी तसबीर तयार केली तर ख्रिस्ती नसलेले चिनीही ती घराघरात लावल्याशिवाय राहणार नाहीत.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......