कमल हसन यांनी बंड केलंय आणि त्याची भाषा व दिशाही स्पष्ट केलीय
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • कमल हसन
  • Thu , 23 November 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar कमल हसन Kamal Haasan

ख्यातनाम अभिनेता पद्मभूषण कमल हसन यांनी 'हिंदू कट्टरवादा'विरुद्ध नापसंती व्यक्त केली आणि ते चर्चेत आले. एक मित्र चर्चेत म्हणाला, "कमल हसन मुस्लिम आहे काय?" मी म्हणालो, "मुस्लिम नाही. तो तर ब्राह्मण आहे." "ब्राह्मण असून एवढे धाडस!" ही मित्राची प्रतिक्रिया.

कमल हसन ब्राह्मण असूनही हिंदू कट्टरवादाच्या विरुद्ध भूमिका घेतो यात आश्चर्य वाटायचं खरं तर काही कारण नाही. भारतात बंडखोर ब्राह्मणांची खूप मोठी परंपरा आहे. पं. जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट ही काही पटकन समोर येणारी नावं आहेत. त्यांनी सर्व धर्मातल्या अतिरेकी प्रवृत्तींना नेहमीच विरोध केला. धर्मनिरपेक्षता आणि संवादाचा आग्रह धरला. कमल हसन त्याच वाटेनं जात आहेत एवढंच म्हणता येईल. तमिळी ब्राह्मणांमध्येही बंडखोरीची, वेगळी वाट चालण्याची परंपरा आहे. ती परंपरा कमल हसन चालवताहेत. कमल हसन राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांना 'आप'मध्ये येण्याचं निमंत्रण देताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकारण मला पसंत नाही हे कमल हसन यांनी जाहीर केलंय. काँग्रेस पक्षावर किंवा राहुल गांधींबद्दल मात्र त्यांनी अजून काही मत व्यक्त केलेलं नाही. कमल हसनसारखेच तमिळनाडूत रजनीकांत हे लोकप्रिय अभिनेतेही राजकारणात येऊ पाहताहेत.

कमल हसन आणि रजनीकांत हे दोघे एकत्र येऊन तमिळ राजकारणात प्रस्थापित अण्णा द्रमुक आणि करुणानिधींचा द्रमुक या दोन पक्षांना पर्यायी तिसरा पर्याय तयार करतात की, दोघे वेगवेगळे पक्ष काढतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा रजनीकांतला भाजपमध्ये ओढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला अजून रजनीकांत यांनी प्रतिसाद दिलेला नसला तरी भाजपशी संवादाचे दरवाजे त्यांनी उघडे ठेवलेले दिसतात.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर तमिळ राजकारणात नेतृत्वाची एक पोकळी आहे. ती भरून काढण्याची संधी कमल हसन यांना आहे. कमल हे विचारी व्यक्ती आहेत. राजकारणात येणारे नट, नट्या केवळ प्रसिद्धीच्या जोरावर फार काळ टिकत नाहीत. टिकल्या तरी फारशा प्रभावी राजकारणी ठरत नाहीत हे अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, रेखा, विनोद खन्ना, गोविंदा यांच्या राजकीय कारकिर्दीतून स्पष्ट झालं आहे. रजनीकांत हे जरी लोकप्रिय असले तरी त्यांच्याजवळ वैचारिक बैठक नाही. त्यामुळे त्यांची गत अमिताभ बच्चन, गोविंदासारखी होणारच नाही असं नाही.

तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात मात्र विचारी अभिनेते राजकारणात येऊन त्यांनी इतिहास घडवल्याची उदाहरणं आहेत. तमिळनाडूत अभिनेते एम. जी. रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता यांनी प्रभावी राजकारण केलं. आंध्रात तेलगूदेशम पक्ष काढून अभिनेते एन. टी. रामराव यांनी स्वतःचा प्रभाव पाडला. कमल हसन यांची वैचारिक बैठक बघता त्यांना एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामराव, जयललिता यांच्यासारखा महत्त्वाचा रोल बजावता येऊ शकेल. चेन्नई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी ते प्रभावी ठरू शकतील. 

अलीकडच्या काळात राजकारणाचे नवे वेगवेगळे व्यक्तिकेंद्रीत पॅटर्न विकसित झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा 'आप'चा प्रयोग आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाचा 'तेहरीक-ए-इन्साफ'चा प्रयोग आहे. असा नवा प्रयोग केला तर कमल हसन कोणत्या वाटेनं जातील?, ते तमिळनाडूचे केजरीवाल बनतील की, दक्षिणेच्या राज्यातले इम्रान खान बनतील, हे आताच सांगता येणार नाही. पण त्यांचा प्रभाव तमिळनाडूपुरता मर्यादित न राहता तो तमिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या पाचही राज्यावर पडेल हे आता म्हणायला जागा आहे. कारण मी राजकारणात उतरणार हे फक्त त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ३३ कोटी रुपये जमा करून दिले. अर्थात ते त्यांनी परत करण्याची घोषणा केली. पण त्यांच्या चाहत्यांचा त्यांना किती मोठा पाठिंबा आहे हे त्यातून दिसतं.

कमल हसन यांनी राजकारणाच्या मैदानात उतरताना स्पष्ट केलं की, भ्रष्टाचार, हिंसाचार आणि कट्टरवाद याला विरोध करेन. हिंदू धर्म भारतात मोठ्या भावाची भूमिका निभावतोय. मोठ्या भावाने इतरांना सांभाळून घ्यावे. इतर धर्मात कट्टरवाद आहे तोही वाईटच. पण हा कट्टरवाद निपटून काढण्याचे काम पोलीस आणि इतर यंत्रणेचे आहे. त्यांना त्यांचे काम करू द्यावे. हिंदू धर्मातल्या अतिरेकी गटांनी कायदा हातात घेऊ नये, त्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडे जातात, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलीय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

तमिळनाडूत राजकारण करायचंय पण कमल हसन यांनी द्रविड चळवळीबद्दल काही उल्लेख केलेला नाही. अण्णा दुराई आणि द्रविड मुन्नेत्र कळघम ही चळवळ द्रविड अस्मितेचा टोकाचा पुरस्कार करत आलीय. १९६० च्या दशकात तर या चळवळीनं स्वायत्त तमिळनाडू राज्याची मागणी केली होती. काश्मीरमध्ये जशी उग्र आंदोलनं होतात, तसं त्याकाळी तमिळनाडूत वातावरण तापलेलं होतं. त्या चळवळीतून द्रमुक पक्ष उभे राहिले. करूणा निधी, एम. जी. रामचंद्रन हे नेते त्या चळवळीत घडले. करुणानिधी हे पटकथा लेखक तर रामचंद्रन हे अभिनेते होते. रामचंद्रन यांनीच पुढे स्वतःची राजकीय वारस म्हणून जयललितांना पुढे आणलं.

तमिळनाडूत चित्रपट क्षेत्र आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रं हातात हात घालून चालतात. तमिळ माणूस अभिनेत्यांना नेता म्हणून बघतो आणि राजकीय नेत्यांनी अभिनेत्यांसारखं वागावं, असा हट्ट धरतो. म्हणून त्या राज्यात ही दोन्ही क्षेत्र कमालीची लोकप्रिय आहेत.

तमिळनाडूचं राजकारण 'हिंदी'विरोध, दिल्ली विरोधावर जोर देणारं आहे. कमल हसन यांनाही त्या वाटेनंच जावं लागेल की, ते नवी भूमिका घेणार हे अजून अस्पष्ट आहे. कमल हसन यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी या दोघांचा उल्लेख केला, या दोघांना ते वैचारिक आयकॉन मानतात. विवेकानंद हे दाक्षिणात्य, बंगाली असून देशभर त्यांना स्वीकारलं गेलं. गांधी हिंदू गुजराती असून त्यांनाही देशाचा नेता म्हणून लोकांनी मानलं. या दोन प्रतिकांमधून, महापुरुषांच्या विचारातून कमल हसन यांनी संकुचित प्रादेशिकता वाद, धार्मिक कट्टरवाद दूर ठेवणारं राजकारण मी करू इच्छितो ही भूमिका मांडलीय. 

हिंदू कट्टरवादाविरोधात भूमिका घेतल्यानंतर कमल हसन यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी भूमिका घेणाऱ्यांना कमल यांनी सांगितलंय की, स्वामी विवेकानंद आणि म. गांधी यांच्या हिंदू धर्माचा मी पाईक आहे. हा धर्म सर्व प्रकारच्या ओंगळ विचारांना विरोध करतो. तुम्ही विवेकानंद, गांधींचा हिंदू धर्म मानत नसाल तर तुमच्या हिंदू असण्याबद्दल शंका घेतली पाहिजे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपला दक्षिणेत कोंडीत पकडण्यासाठी मोदी विरोधकांना कमल हसन हा मोहरा उपयोगी पडणार आहे. कमल म्हणजे कमळ. दक्षिणेत कमळ विरुद्ध कमल अशी लढाई उभी राहणार हे उघड आहे. कमल हसन यांनी बंड केलंय, त्या बंडाची भाषा आणि दिशाही स्पष्ट केलीय. आता हे एका तमिळी ब्राह्मणाचं बंड सुफळ संपूर्ण किती होईल, कसं होईल हे येत्या काळात पाहायचं.

.....................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 23 November 2017

च्यायला, अस्तित्वात नसलेला हिंदू कट्टरतावाद (की हिंदू आतंकवाद ?) कमळ्याला दिसतो आणि केरळातला पॉप्युलर फ्रंटचा उघड हिंसाचार दिसंत नाही? प्राध्यापक जोसेफ यांचा हात काय हिंदूंनी तोडला काय? केरळात मार्क्सवादी नराधम रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांच्या राजरोस हत्या करताहेत आणि कमळ्या मात्र हिंदू दहशतवादावर बरळ ओकतोय. धन्य आहे. कमळ्याला राजकारणात यायचंय तर हिंदूंनी अपमान का म्हणून गिळायचे? मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांखेरीज निवडणूक जिंकता येत नाही या कालबाह्य सिद्धांतावर कमळ्या विश्वास ठेऊन आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......