अजूनकाही
मी जरी अमर्याद तांत्रिक-आर्थिक प्रगतीच्या तत्त्वप्रणालीचा कट्टर पुरस्कर्ता नसलो तरी, आधुनिक जवाहरलाल नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी’च्या पुनर्शोधाची माझी ऊर्मी नेहरूंप्रमाणेच प्राचीन सभ्यतेला आपुलकीनं आणि चिकित्सकपणे, विनम्रतेनं आणि आग्रहीपणानं समजावून घेण्याच्या एका समान धाग्यातून उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे विज्ञानवाद आणि निरीश्वरवाद या दोहोंप्रती माझी काही अंशी संदिग्ध भूमिका असूनही निधर्मी नेहरूंचा एक खुला विचार आणि तात्त्विक अस्वस्थता यामुळे मी त्यांच्याकडे पुनःपुन्हा आकर्षित होतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या ‘हिंद स्वराज’मधील नेहरूंना दिसलेलं ‘दारिद्र्य आणि वेदनेचे स्तवन’ मला काही कधी प्रतीत झालं नाही, आणि तरीही मार्क्स, फ्रॉईड आणि डार्विन यांच्या विचारांनी कमालीचे प्रभावित झालेल्या नेहरूंची महात्म्याच्या प्रती असणारी दृढ एकनिष्ठता, ही माझ्यासारख्या अभ्यासकाला सजग करणारी आहे.
होय, मला याची जाणीव आहे की, एक बंदिवान म्हणून नेहरू अहमदनगरच्या किल्ल्यात आपले विचार ज्या वासाहतिक संदर्भातून शब्दबद्ध करत होते, त्या काळापेक्षा आपला वर्तमान हा सर्वस्वी भिन्न आहे. ‘नवउदारमतवादी भांडवलशाही’ आणि ‘आक्रमक धार्मिक राष्ट्रवादी’ अशा प्रबळ ठरत चाललेल्या विचारधारांच्या या वर्तमान कालखंडात काहीतरी कमालीचं चुकीचं घडतं आहे. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी’मागचं तत्त्व तरल संवाद, निर्वसाहतीच्या कालखंडातली वैश्विक नागरिकता आणि सांस्कृतिक संम्मिलन यावरती आधारित होतं, परंतु लोचट ग्राहकता आणि धार्मिक अस्मितेच्या अवाजवी प्रतीकांनी मढवलेल्या आजच्या भयप्रद राष्ट्रवादाच्या कालखंडात असं वाटतं की, नेहरूंनी अंगीकारलेल्या ‘शोधा’च्या सर्व शक्यता आपण हरवून बसलो आहोत. त्यामुळेच वर्तमान अस्वस्थतेच्या या वळणावर मी विज्ञान, संस्कृती आणि धर्म या राजकीय-ज्ञानमीमांसक कूटप्रश्नांबाबत नेहरूंची असलेली भूमिका विशद करत असेन, तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सर्वच आधुनिकतावाद्यांप्रमाणे नेहरूदेखील विज्ञाननिष्ठ होते. विज्ञानानं बहाल केलेलं विवेकवादाचं उदात्त स्वप्न, स्पष्टीकरणाचं सामर्थ्य आणि अशाश्वत असलेल्या विश्वामध्ये शाश्वततेच्या शक्यता रुंदावण्याची असलेली विज्ञानाची क्षमता यांवर नेहरूंची प्रचंड श्रद्धा होती. ‘विचारप्रक्रिया, कृतिप्रवणता आणि या साऱ्याला आपल्या बांधवांशी जोडून घेण्याची हातोटी’ यांवरती आधारित असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी ‘भूतकाळाच्या जोखडाविरोधात’ लढण्यासाठी पाठपुरावा केला आणि भारताला आधुनिकतेचा साज चढवला. मला असं वाटतं की, नेहरूंच्या विज्ञानासोबतच्या प्रेमालापामध्ये एक प्रकारचा आदर्शवाद होता. औद्योगिक विकास आणि मोठ्या धरणांसारखे तंत्रज्ञानाचे चमत्कार यावरती जरी नेहरूंचं प्रेम असलं, तरी त्यांच्या लेखी ‘विज्ञान’ म्हणजे केवळ तंत्रज्ञानशरण तार्किकता नव्हती. याउलट आजचं विज्ञान मात्र वैश्विक भांडवलीकरणाच्या बळावर आधारित संघटित व्यापार आणि समूह आणि निसर्गावरचं अविवेकी वर्चस्व या तत्त्वाला अनुसरून आकुंचन पावलं आहे.
सत्यजित राय यांनी आपल्या ‘गणशत्रू’ या चित्रपटात एका डॉक्टरच्या संघर्षाची कहाणी मांडलेली आहे. सभोवताली पसरलेली काविळीची साथ हा मंदिरातल्या दूषित पाण्याचा परिणाम असतो. ते पाणी भाविक निर्बुद्धपणे प्राशन करत असतात. या सत्याचा वैज्ञानिकदृष्ट्या उलगडा झालेला एक डॉक्टर मंदिरातल्या पूजकांच्या विरोधात उभं ठाकण्याचं धाडस दाखवतो. त्याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळतं. या चित्रपटात अधोरेखित केलेल्या निधड्या, आदर्शवादी डॉक्टरच्या व्यक्तिरेखेशी नेहरूंचा आदर्श विज्ञानपुरुष मिळताजुळता आहे.
‘मुक्ततेचं सामर्थ्य वृद्धिंगत करणारं शास्त्र’ अशी विज्ञानाची असणारी ओळख आज तंत्रज्ञानशरण तार्किकतेच्या अतिरेकापोटी हरवत चालली आहे. ज्या विज्ञानाला हाबरमासनं ‘सुसंवादी क्रियेनं’ ओतप्रोत भरलेला लोकशाहीवादी ‘पब्लिक स्फियर’ म्हणून संबोधलं असतं, त्या विज्ञानाचा आत्मा आज उद्ध्वस्त होताना दिसतो आहे. नेहरूंनी ज्या विज्ञानाला ‘सत्य आणि ज्ञानाचा धीरोदात्त शोध’ किंवा ‘मनाची कणखर शिस्त’ म्हणून गृहीत धरलं असतं, त्या विज्ञानाला नवउदारमतवादी भारतामध्ये केवळ ‘तंत्रज्ञानाचा चमत्कार’ म्हणून गृहीत धरलं जावं हे काहीसं औपरोधिक वाटतं. नेहरूंची विज्ञानाची संकल्पना पुरातन असू शकते, पण याचा अर्थ असा नव्हे की, ‘शायनिंग इंडिया’तल्या टेक्नो-सॅव्ही/राजकीयदृष्ट्या सनातनी असणाऱ्या मध्यमवर्गानं याबाबत संघर्षाची भूमिका घ्यावी.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
एका बाजूला वैज्ञानिक दृष्टिकोनाची उत्स्फूर्तपणे पाठराखण करणारे नेहरू दुसऱ्या बाजूला गूढगंभीर अशा तत्त्वज्ञानाच्या चिंतनात गुंतून राहिलेले पाहायला मिळतात. हे खरं आहे की, धर्माचं ओझं कमी करण्याचं त्यांनी पुनःपुन्हा आग्रही प्रतिपादन केलं आहे आणि तरीही उपनिषदातली गंभीर स्तोत्रं आणि भगवद्गीतेतल्या ‘चिंतनाच्या आणि कर्माच्या’ संदेशाचे सूर त्यांना खुणावत राहतात. अगदी थेट मॅक्स वेबरप्रमाणे तेही वाढता विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता या वैशिष्ट्यांनी भारलेल्या नव्या जगात अस्तित्वाबद्दलच्या प्रश्नांनी अस्वस्थ होऊन जातात. त्यांनी हे मान्य केलं होतं की, ‘विज्ञानानं आपल्या अंतिम ध्येयाच्या तत्त्वाकडे दुर्लक्ष केलं आहे’ आणि याबरोबरीनं त्यांनी असंही मत नोंदवलं होतं की, ‘सचेतन जगाच्या आकलनापलीकडे असणाऱ्या विशुद्ध चैतन्यावरती थोडीफार श्रद्धा असणं गरजेचं आहे’. माझ्या मते ‘निधर्मी’ म्हणवले जाणारे नेहरू तरल आध्यात्मिक अनुभवविश्वाबाबत आजच्या धर्मवेड्या आणि शासनपुरस्कृत ‘सेलेब्रिटी’ बाबांपेक्षा अधिक सजग आणि संवेदनशील होते.
समाजशास्त्रज्ञांनी विविधांगी आधुनिकतेबद्दल पुष्कळ चिंतन केलेलं आहे, सांस्कृतिक लवचीकता आणि सामाजिक परिवर्तन यांच्यातल्या जटिल नातेबंधांचा अभ्यास केलेला आहे. एरवी ‘पाश्चात्य’ धाटणीच्या वाटणाऱ्या नेहरूंमध्ये मी अशा प्रकारची संवेदनशीलता पाहतो. आणि हे खरंच आहे की, ज्या माणसानं आधुनिक विज्ञानावर प्रेम केलं, ज्याच्या ठायी आपणाला उदारमतवादी लोकशाहीवादी आणि समाजवादी आदर्शवादाचा संगम पाहायला मिळतो, त्या माणसासाठी सामाजिक परिवर्तन म्हणजे एक मूलगामी मंत्र असू शकतो. त्यामुळे नेहरूंनी स्वतःला पडणाऱ्या प्रश्नांना नेहमी खतपाणी घातलं. ‘डिस्कव्हरी’ची सुरुवात ‘खरंच मला भारत माहिती आहे?’ या प्रश्नापासून होते. नेहरूंच्या व्यक्तित्वाचं हेच खरं सौंदर्य आहे. ‘डिस्कव्हरी’च्या शोधाद्वारे नेहरू प्राचीन कालखंडातल्या गुहांमधली स्थापत्यकला पाहू शकले, बुद्धाच्या चेहऱ्यावरच्या शांततेबद्दल चिंतन करू शकले, ‘अविरतपणे धडपडणारी, शोध घेणारी कुशाग्र मनं’ आपल्या पूर्वजांमध्ये पाहू शकले. क्वचित प्रसंगी जाणवणारी गांधींबद्दलची अढी वगळता, या शोधाद्वारे नेहरूंना हेही उमगून चुकलं की, ‘संपूर्ण भारताला हादरवून सोडण्याचं तथाकथित क्रांतिकारकांना न जमलेलं काम या प्रतिगामी वाटणाऱ्या माणसाने करून दाखवलं आहे’. होय, ही एक शक्यता आहे की “नेहरू हे ‘अभिजन’संस्कृतीकडे झुकलेले असल्याचे” मत सबाल्टर्न्स किंवा आंबेडकरवादी नोंदवू शकतील. “भारत हे प्रेमात पडायला लावणारे राष्ट्र असून भारतमातेचे कुठलेही अपत्य या गोष्टीचा विसर पडू देणार नाही” या नेहरूंच्या शोधामध्ये अल्पसंख्याकांचा आवाज हरवला असल्याचेही ते प्रतिपादन करू शकतील.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
तथापि ‘पॉप्युलर’ म्हणजेच ‘लोकानुनय करणाऱ्या’ अभिरुचीचा उन्मेष साजरा करत असताना आपण ‘अभिजन’ म्हणून असणारे सारेच काही नाकारण्याची गल्लत करून चालणार नाही. आजच्या कालखंडामध्ये ‘संस्कृती’ ही एक कमॉडिटी बनून गेली आहे, जिची बाजारात विक्री होऊ शकते, जिचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. अशा या कालखंडात जिथे फोफावलेला गौ-राष्ट्रवाद, कायदा हातात घेऊन होणारी अमानवी हत्या आणि सबाल्टर्न्सचा गुरू म्हणून पुढे येणारा राम रहीम म्हणजेच जर ‘पॉप्युलर कल्चर’ मानले जात असेल, तर जनसामान्यांच्या मुक्तीचे ‘पॉप्युलर कल्चर’नं उघडलेलं द्वार ते कोठे आहे याचा शोध घ्यावा लागेल. की त्यापेक्षा असं म्हणणं सोयीस्कर ठरेल की, अभिजन आणि लोकजन यांच्यात आता कसल्याच सीमारेषा उरलेल्या नाहीत? खचितच नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की, नेहरूंच्या संवेदनशीलतेतून उमलून येणारा ‘अभिजन’पणा हा उच्चरव आधुनिकता, उच्चरव राष्ट्रवाद आणि लोकप्रिय संस्कृती याच्या पल्याड जाऊन पाहण्यासाठी आपले डोळे उघडतो.
मी जरी नेहरूवादी नसलो तरी त्यांच्या उणीवेची जाणीव आज मला प्रकर्षानं होते आहे. आजची राजकीय संस्कृती ही दिवसरात्र ओथंबून वाहणाऱ्या दांभिक टेलीव्हिजन चॅनेल्स आणि सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते. तात्त्विक आणि वैचारिक बैठकीचा पूर्ण अभाव असणारी, स्वप्रेमात मशगुल असणारी नेतेमंडळी ही इथल्या नाट्यपूर्ण नौटंकीमधून स्वतःला पेश करताना दिसतात. अशा या कालखंडात नेहरूंची विद्वत्ता, उत्कटता आणि जिज्ञासा यांची हटकून आठवण येत राहते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख Indian Express या दैनिकामध्ये पं. नेहरू यांच्या स्मृतिदिनी, १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाला होता. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक अविजित पाठक हे सेंटर फॉर दी स्टडी ऑफ सोशल सिस्टम्स, जेएनयु, नवी दिल्ली इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
स्वैर अनुवाद - नितिन जरंडीकर. ते इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.
nitin.jarandikar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 23 November 2017
मार्क्स, फ्रॉईड आणि डार्विन यांचे विचार फालतू आहेत. अर्थात, नेहरूंच्या काळी भले ते वेचार लोकप्रिय असतील. पण आज त्यांना चिकटून राहायचं काहीच कारण नाही. -गामा पैलवान