अजूनकाही
काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपचा ‘उड़ता पंजाब’ नावाचा सिनेमा आला होता. त्यात पंजाबमधली आजची तरुण पिढी अमली व्यसनांमुळे कशी बरबाद होतेय, हे दाखवलं होतं. अगदी तसंच आजच्या महाराष्ट्रातसुद्धा होतंय आणि तेसुद्धा खुलेआम होतं आहे. तर पेश है ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर ‘डुलता अँड झिंगता सातारा’!
पुण्यापासून अवघ्या ११० किलोमीटरवर असणारं सातारा हे छोटंसं ‘शहर’ आहे. उसपट्ट्यात असल्यामुळे आणि पुण्या-मुंबईत असणाऱ्या चाकरमान्यानांमुळे येणाऱ्या ‘रिमीट्न्स’मुळे सातारा शहर हे तसं ‘सधन’ शहर आहे. शहरात रयतची तीन प्रसिद्ध महाविद्यालयं, वायसी, डीजी आणि शिवाजी कॉलेज आणि तितक्याच प्रसिद्ध आहेत इथल्या शाळा. अगदी सयाजीरावपासून सेंट पॉल शाळेपर्यंतच्या शाळा. या महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये आजूबाजूच्या गावांपासून ते कोरेगाव, परळी सज्जनगड, कराड इथपर्यंतचे विद्यार्थी शिकायला येतात.
तर अशा या साताऱ्यात सध्या मुलांमध्ये वेगळंच व्यसन जन्माला आलंय. ते म्हणजे, ‘गांजा’.
गांजा हा तंबाखूसारखा असतो आणि तो सिगारेटसारखा किंवा चिलमीसारखा प्यायला जातो. महाराष्ट्रात गांजाची लागवड करणं बेकायदेशीर आहे. तरीही साताऱ्यात गांजा अगदी बिनधास्त कुठेही मिळतो. विविध पानटपऱ्यांमध्ये, भाजी मंडईत गांजा अगदी ३० रुपयांपासून मिळतो.
हा गांजा इतका ‘युवकप्रिय’ का आहे, याचा मी शोध घेतला, तर एक इंटरेस्टिंग आणि आश्चर्यकारक कारण समोर आलं. ते म्हणजे, साधारण २०११-२०१२च्या आसपास महाराष्ट्रात गुटखाबंदी झाली. हा कायदा नवीन असल्यानं त्याची कडक अंमलबजाणी लगेच सुरू झाली. त्यामुळे साताऱ्यातही गुटखा बंद झाला. अगदी मोजक्याच ठिकाणी तो मिळत होता आणि तिथं जाऊन तो घ्यायचा, तर किंमत वाढवून लावलेली माणिकचंदची छोटीशी पुडी १०० रुपयांना मिळत होती. त्यामुळे त्या वेळी व्यसन करणाऱ्या पोरांना पैशाची टंचाई भासायला लागली. तसंच गुटखा खाल्ल्यानंतर घरी पालकांनाही गुटखा खाल्ल्याचं लगेच समजत असे. तोंडाला वास येत राहिल्याने; हिरड्या, दात खराब दिसायला लागल्यानं घरी पकडलं जाण्याची शक्यता असायची. म्हणून पोरांनी गुटख्याचा नाद सोडला आणि नेमकं त्याच वेळेस त्यांना समजलं की, ‘गांजा’ दिसायला तंबाखूसारखा असतो. तो कुठेही लपवता येऊ शकतो आणि त्याचं सेवन केलं, तरी बाह्य शरीरावर त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत.
मुलांनी गांजा स्वीकारण्याचं दुसरं एक कारण म्हणजे, लहान वयात येणारी निराशा; एकतर्फी प्रेमातून आलेलं, दहावीत सतत नापास होऊन आलेलं अपयश आणि त्या निराशेला कुणीच अड्रेस न करणं. म्हणून किशोर वयापासून ते युवावर्गापर्यंची मुलं गांजाकडे ओढली गेली. पुणे-बेंगलोर हायवेजवळ असणाऱ्या पानटपऱ्यांमध्ये हा गांजा स्वस्त दरात आणि सहज उपलब्ध व्हायला लागला आणि गांजानं युवा पिढीला बघता बघता विळखा घालायला सुरुवात केली. बाहेरगावातून साताऱ्याला शिकायला येणारी पोरं येताना पैसे घेऊन येतात. त्यामुळे पैशाचा प्रश्न सुटला. कधी बाहेरगावची पोरं, तर कधी स्थानिक पोरं पैसे घालून गांजा पिण्याचा कार्यक्रम करायला लागली.
गांजा पिण्याची एक विशिष्ट वेळ, एक विशिष्ट स्थान आणि एक विशिष्ट पद्धत आहे.
ही पोरं गांजा पिण्यासाठी सोमवारी शंकराच्या मंदिरात जातात. खासकरून क्षेत्र माहुलीला जातात आणि या दिवशी गांजा प्यायला की, ‘प्रेम’ या एकाच विषयावर या पोरांच्या गप्पा चालतात. ही पोरं शुक्रवारी कोडोलीजवळच्या जानाई मळाई देवीच्या डोंगराच्या पायथ्याला जातात. तिकडे गांजा प्यायल्यावर ‘आपली लाईफ का सेट होत नाहीये’, यावर त्यांच्या गप्पा चालतात आणि ‘लाईफ सेट व्हावी’ म्हणून जानाई मळाईला ही पोरं प्रार्थना करतात.
बाकीच्या दिवशी अजिंक्यतारा, चारभिंती पाटेश्वर, कुर्नेश्वर, गौरीशंकर महाविद्यालयांच्या आसपासचं रान अशा मोक्याच्या आणि सुरक्षित जागी हा कार्यक्रम चालतो. सकाळी गांजा सिगारेटमध्ये भरून प्यायचा, झिंग उतरेपर्यंत तिकडेच बसायचं आणि गांजा उतरला की, आपापल्या घरी जायचं असं सगळं रूटीन सुरू आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा वितरीत कसा होतो, याचं मला नवल वाटलं. हा गांजा कर्नाटक आणि तेलंगण या प्रदेशांमधून साताऱ्यात आणला जातो आणि मग अगदी लाईफबॉय साबण जसा वितरीत होतो, तसा तो सगळीकडे वितरीत केला जातो. गांजासाठीचा कोडवर्ड आहे, ‘माल’.
गांजा लपवून ठेवणं अगदी सोपं आहे. गाडीचा टुलबॉक्स किंवा सरळ सिगारेटमध्ये भरून तो लपवून ठेवता येतो. त्यामुळे पोलिसांना आणि पालकांना याचा थांगपत्ता लागत नाही.
गांजाच्या या सवयीमुळे शिकणाऱ्या मुलांचं शैक्षणिक नुकसान तर होतंच आहे, पण सोबत त्यांच्या शरीरावर या गांजाचा खूप मोठा प्रभाव पडतो आहे. गांजामुळे डोळे आत जातात, छाती आत जाते, ओठ काळे पडतात. सध्या गांजा स्वस्त आहे, म्हणून आहे त्या पैशात व्यसन चालू आहे, पण जसजशी गांजाची मागणी वाढेल, त्या वेळी गांजाचा कृत्रिम तुटवडा भासवून गांजाची किंमत लगेच वाढवली जाईल आणि एकदा पैसे कमी पडले की, हाच युवक चोरी करायला मागे बघणार नाही आणि एकदा एखादी चोरी यशस्वी झाली की, हळूहळू हिंमत येऊन पुढे हा युवक मोठे गुन्हे करायला कमी करणार नाही.
या गांजाच्या व्यसनानं एक सकारात्मक काम केलं आहे. अगोदर सातारच्या महाविद्यालयातल्या मुलांची कायम जोरदार भांडणं होत असत, पण गांजामुळे ही भांडणं कमी झाली आहेत, कारण भांडणं करणारी बरीच पोरं गांजा पितात आणि एकमेकांच्या गांजाच्या तलफा पूर्ण करतात.
साताऱ्यामध्ये गांजानं एवढा धुमाकूळ घातला असताना पोलीस काय करत असावेत, हा प्रश्न मला पडतो. शोधपत्रकारिता करणाऱ्यांनीही गांजाबद्दल काही विशेष लिहिलेलं मी अजून वाचलेलं नाही. साताऱ्यासारख्या छोट्या शहरात आठवीपासून ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी, एमआयडीसी असलेले कामगार असा बराच मोठा वर्ग या व्यसनात अडकत चालला आहे आणि या प्रश्नाकडे समाजाचं दुर्लक्ष झालं आहे. साताऱ्यासारखी परिस्थिती बऱ्याच इतर शहरांमध्येही सापडेल.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
या समस्येवर आताच काही उपाय केले नाहीत, तर ही समस्या पुढे खूप मोठं रूप धारण करणार हे निश्चित! वर्तमानकाळात याचे परिणाम दिसत नसले, तरी भविष्यकाळ नक्कीच ‘अंधःकारमय’ आहे. यावर काही उपाय आहे का? याचं उत्तर आहे, ‘हो’.
गांजासेवन करणारे बहुतांश युवक शिकत आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयं चाकोरीबाहेर जाऊन ही सवय तोडू शकतात. सातारा शहरात बरेच नामवंत डॉक्टर्स आहेत, मानोपसचारतज्ज्ञ आहेत. त्यांना विनंती करून आठवड्यातून एखादं वर्कशॉप आयोजित करता येऊ शकतं. शाळा-महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी ‘काउन्सिलर’ची नेमणूक करून मुलांना सगळं काही शेअर करण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ची सोय करता येऊ शकते. काही महाविद्यालयं अशा उपाययोजना करतही असतील. मात्र या उपाययोजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी झाली पाहिजे.
दुसरं म्हणजे, कुटुंबाने आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. किमान दिवसातून एकदा मुलांबरोबर बसून मित्राप्रमाणे त्यांच्याशी बोललं पाहिजे. मुलांचे मित्र कोण कोण आहेत, काय करतात हे सगळं माहीत करून घेतलं पाहिजे.
आणि शेवटी पोलिसांनीपण थोडी कडक पाऊलं उचलली पाहिजेत. खबऱ्यांना कामाला लावून गांजाचं सगळं रॅकेट उदध्वस्त करता येऊ शकतं. पहिल्यांदा थोडेसे कष्ट पडतील, दबाव पडेल; पण त्यामुळे साताऱ्याचं ‘भविष्य’ उज्वल होईल!
.............................................................................................................................................
लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.
milind.k@dcfadvisory.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment