ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं २८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८०व्या वर्षी नाशिक इथं निधन झालं. पळशीकरांनी सामाजिक–राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केलं आहे. ‘नवभारत’या मासिकाचे ते काही काळ संपादकही होते. समीर शिपूरकर आणि त्यांचे सहकारी त्यांच्यावर लघुपट बनवत आहेत. त्यासाठी ज्येष्ठ अभ्यासक आणि पळशीकरांच्या पुस्तकांचे संपादक किशोर बेडकीहाळ यांची त्यांनी दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्यातील संपादित अंश…
प्रश्न : वसंत पळशीकरांशी तुमची पहिली भेट केव्हा आणि कधी झाली?
बेडकीहाळ : पळशीकरांचा आणि माझा परिचय जवळपास १९७३ साली झाला. त्यावर्षी आमची गाठ डॅा. नरेंद्र दाभोलकरांच्या घरी पडली. त्यावेळी ते वास्तव्याला काही काळ सातारला होते. त्यांच्या पत्नींची बदली साताऱ्याहून श्रीरामपूरला व्हायची होती. त्या काळात जी गाठ पडली ती प्राधान्याने शिबिरांच्या संदर्भात पडली. मी तेव्हा ‘समाजवादी युवक दल’ संघटनेत काम करत होतो. या संघटनेची वर्षातून दोन-तीन सकस बौद्धिक शिबिरं व्हायची. त्यात नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मे.पुं. रेगे, गं.बा. सरदार अशी सगळी दिग्गज मंडळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करत. त्या चौकटीत आमच्या अभ्यासाला सुरुवातही झाली. तेव्हा लक्षात आलं की, कुरुंदकर, सरदार यांच्यापेक्षा पळशीकर काहीतरी वेगळं मांडू पाहत आहेत.
त्यांच्या सहवासाच्या ४० वर्षांचा प्रचंड फायदा मला किंवा माझ्यासारख्या संघटनेत असलेल्या अनेक मित्रांना झालेला आहे. प्रत्येक प्रश्नावर भरपूर वाचूनसुद्धा पळशीकर काय म्हणतात, हा प्रश्न आमच्या मनोविश्वात असायचा आणि त्यांचं म्हणणं विचारात घेतल्याशिवाय आपलं मत पक्क करायचं नाही, असं आमचं ठरलेलं असायचं.
पळशीकरांच्या सहवासाविषयी नेमाडे एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते- ‘या माणसाच्या जवळ तुम्ही एक तास जरी व्यतीत केला तरी तुम्हाला जगण्याची वेगळी दिशा प्रतीत होते.’ ते अगदी तंतोतंत खरं आहे. जगण्यातली सहजता किती असू शकते आणि साधेपणाला किती मूल्य असू शकतं, हे त्यांच्या सहवासातल्या लोकांशिवाय इतरांना कळणार नाही. पुन्हा त्या साधेपणाचं कुठेही अवडंबर नसायचं. आपल्या पोषाखाबद्दलही ते कधी फारसे जागरूक नव्हते. पण त्यांचं कुठलंही भान, दडपण त्यांच्या विचारांवर नसे. त्यांच्या सहवासात येणाऱ्या कुठल्याही माणसावर कोणतंही वैचारिक दडपण येत असे, असा माझा तरी अनुभव नाही. आमच्या संघटनेमधल्याही अनेकांना याची खात्री पटलेली आहे.
माझ्या आयुष्यातल्या दोन व्यक्तींची उदाहरणं द्यायची झाली तर कुरुंदकरांशी बोलताना सुरुवातीला खूप दडपण वाटायचं. कारण ते फटकळ म्हणून प्रसिद्ध होते. अर्थात जवळचा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तो फटकळपणा विनोदाच्या स्वरूपात परावर्तीत होतो, हे आम्हाला माहीत होतं. पण तरी आपल्याला वेड्यात काढतील की काय, किंवा तुम्ही असा कसा विचार केलात असं म्हणतील की काय असं एक दडपण वाटत असे. पळशीकरांच्या सहवासात असं कोणतंही दडपण मला कधीच जाणवलं नाही. उलट आपली भूमिका अत्यंत आस्थेनं आणि मनःपूर्वक कुणीतरी ऐकतं आहे आणि मग त्याच्याशी आपल्याला संवाद करायला मिळतो आहे, याचा आनंद त्यांच्या सहवासात भरपूर मिळाला.
प्रश्न : वसंत पळशीकरांचं एक अभ्यासक, विचारवंत म्हणून तुम्हाला कोणतं वेगळेपण जाणवतं?
बेडकीहाळ : ‘जीवनदृष्टी आणि स्वतःचं जीवन यामध्ये अत्यंत कमीतकमी अंतर ठेवून जगणारा ज्ञानोपासक’ असं वसंत पळशीकरांचं एका वाक्यात वर्णन करता येईल. मराठी विचारविश्वाचा सबंध इतिहास जर लक्षात घेतला तर आपल्याला एक-दोन प्रवाह दिसतात. जसं आपण बघतो की, ब्रिटिश आले त्या काळच्या आरंभामध्ये परंपरांचा प्रभाव भरपूर असताना त्यांच्याविरुद्ध बोलणं ही बंडखोरी मानली जायची. हळूहळू पुढच्या ५०-६० वर्षांमध्ये परंपरेविरुद्ध बोलणं ही काही बंडखोरी राहिली नाही. तो एक भाग म्हणून स्वीकारला गेला. १९५० नंतर विशेषतः सबंध भारताच्या आधुनिकतेच्या प्रकल्पाला जेव्हा सुरुवात झाली आणि आधुनिक विचारांनी सगळं विचारवंतांचं विश्व भारलेलं होतं. अशा काळामध्ये प्रचलित असणाऱ्या युगधारणांपेक्षा वेगळी धारणा बाळगून धैर्यानं लेखन करणारा आणि दीर्घकाळ सातत्यानं लिहिणारा विचारवंत असं पळशीकरांचं वेगळं वैशिष्टय म्हणून सांगता येईल. हे इतरांच्या बाबतीत सांगणं फार अवघड आहे. विशेषतः महाराष्ट्रातलं जे पुरोगामी विचारविश्व आहे, त्यावर जवळपास ५० सालापासून आजतागायत पुरोगामीत्वाचा पगडा आहे. यातून आधुनिकतेच्या अंगाने जाणारे समाजवादाचे, मार्क्सवादाचे, फुले-आंबेडकरीवादाचे जे विचारप्रवाह निर्माण झाले, त्यांची अत्यंत कठोर चिकित्सा करणं ही गोष्टच महाराष्ट्राला तुलनेनं नवीन होती. कारण या सगळ्या युगधारणा आहेत आणि पुढचा काळ यांचा आहे असं धरूनच एकप्रकारचं भाष्य करणारं लेखनच महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त झालेलं दिसतं. अशा वेळेला निव्वळ भाष्य करून न थांबता त्याची एक मूलगामी चिकित्सा होणं गरजेचं होतं. या चळवळींच्या हिताच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं आणि ती चिकित्सा करण्याचं काम अत्यंत व्रतस्थ पद्धतीनं, कुठलाही हेत्वारोप न करता, कुठलाही शत्रूभावी दृष्टिकोन न ठेवता पळशीकरांनी केलं.
प्रश्न : पळशीकरांवर कुणाचा प्रभाव होता असं तुम्हाला वाटतं?
बेडकीहाळ : पळशीकरांच्या एकूण जीवनपटाकडे पाहिलं तर फार मोठा प्रेरणास्रोत त्यांच्यासमोर होता आणि त्यावरून प्रेरणा घेऊन त्यांचं आयुष्य बदललं वगैरे असं काही आपल्याला फार सांगता येणार नाही. शिक्षण अर्धवट सुटल्यानंतर स्वतःचा शोध घेत आणि जगण्याचा शोध घेत ते हळूहळू काही कामांकडे वळले. बाबा आमटे, ओरिसा, कोराकुटला या ठिकाणी त्यांनी बराच काळ वास्तव्य व काम केलं. त्यानंतर ते १९५९ सालापासून महाराष्ट्रात आले आणि इथल्या विचारविश्वाशी समरस झाले, लिहायला लागले. मराठी विचारविश्वातल्या काही जबाबदाऱ्याही संपादकाच्या रूपाने त्यांनी स्वीकारलेल्या दिसतात. त्यांच्यावर एका बाजूला गांधींचा फार मोठा प्रभाव आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जे वाचतो, त्याची कठोर चिकित्सा करत, पण सबंध लोक, त्यांचं विचारविश्व, मानस, परंपरा हे सगळं तुच्छ मानण्याचा मानायचं नाही, हे त्यांचं वेगळेपण होतं. मला वाटतं ते त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेलं होतं. त्यामुळे एका अर्थानं ‘स्वतःची घडण स्वतःच केलेला विचारवंत’ असं पळशीकरांचं वर्णन करणं जास्त रास्त होईल असं मला वाटतं.
शिपूरकर : हे फारच वेगळं आहे...
बेडकीहाळ : पळशीकरांवर विनोबांचा संस्कार होता. साने गुरुजींचा काही काळ त्यांना सहवास मिळाला होता. त्याचा परिणाम त्यांच्यावर नक्कीच झाला. पण कुठलीही एक स्थिर दृष्टी घेऊन किंवा स्थिर विचारप्रणाली डोळ्यासमोर ठेवून तिच्या चष्म्यातून जगाकडं बघणं हे त्यांनी नेहमीच नाकारलं आहे. मला वाटतं अलीकडच्या ५०-६० वर्षांच्या महाराष्ट्राच्या बौद्धिक इतिहासामध्ये ही खूप वेगळी गोष्ट आहे. याचं कारण प्रत्येक विचारवंत त्याच्या चष्म्यातून जगाकडे पाहत असतो आणि भाष्य करत असतो. पळशीकर असा कुठलाही चष्मा वापरत नसत. ते वस्तुस्थिती, त्यातून निघणारे निष्कर्ष आणि या विचारप्रवाहांचा तिच्याशी असलेला संबंध या अंगानी सतत विचार करत. म्हणून त्यांचं वेगळेपण उठून दिसतं.
प्रश्न : याचा अर्थ पळशीकरांची जीवनदृष्टी समग्रतेला, व्यापकतेला कवेत घेणारी आहे…
बेडकीहाळ : पळशीकरांच्या सबंध लेखनाचा आणखी एक वेगळा पैलू आहे. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि लेखनामध्येही आहे. पळशीकरांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, त्यांची सबंध शैली कुठल्याही वाङ्मयीन गुणापेक्षा त्यांच्या स्वभाव गुणांनी बद्ध झालेली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जो संवादीपणा होता, संवाद करण्याची प्रेरणा होती, ती त्यांच्या लेखनामध्येही आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समग्रतेनं पाहणं ही जी साठोत्तर काळामध्ये तुटलेली वैचारिक परंपरा आहे, ती त्यांनी पुन्हा उजेडात आणली. त्या दृष्टीनं ते सगळ्या गोष्टींकडे पाहत. समग्रतेनं पाहणं याचा अर्थ काय? तर कुठल्याही गोष्टीकडे किंवा मुद्याकडे तेवढा मुद्दा स्वतंत्र म्हणून पाहणं आणि त्याचा इतर गोष्टींशी असलेला संबंध तोडून पाहणं. या प्रकारची जी एक आधुनिक विचारविश्वाची धारणा आहे, त्या पद्धतीनं ते पाहात. त्यामुळे गो.पु. देशपांडेंनी त्यांचा संबंध थेट जोतिबा फुल्यांपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. गो.पु.सारख्या मातब्बर विचारवंताला समग्रतेनं पाहण्याची परंपरा आधुनिक महाराष्ट्रामध्ये पळशीकर आणि शरद पाटील या दोघांमध्येच दिसे. समग्रतेपासून आपलं विचारविश्व किती दूर गेलेलं होतं, याचा हा एक पुरावा मानायला हरकत नाही. ही समग्रता पळशीकरांनी शेवटपर्यंत जपली होती. समग्रता जपण्याचा दुसरा एक भाग असा असतो की, तुम्ही ज्या मुद्यावर लिहिता, ज्या प्रश्नांवर लिहिता त्यांचा जो काही इतिहास असेल किंवा त्या प्रश्नांच्याबद्दलच्या ज्या काही भूमिका असतील, निरनिराळ्या विचारविश्वामधल्या भूमिका असतील त्या सगळ्या कवेत घेणं. या प्रकारची समग्रता त्यांच्या लेखनामध्ये जास्त आढळते.
प्रश्न : याची काही उदाहरण सांगता येईल का? कारण पळशीकरांवर अशीही टीका झालेली आहे की, ते कुठलं तत्त्वज्ञान पुढे करताहेत समजत नाही. काहींना वाटे ते गांधीवादी आहेत, काहींना वाटे समाजवादी आहेत. तुम्हाला काय वाटतं?
बेडकीहाळ : गांधी, मार्क्स आणि फुले यांच्यावरील पळशीकरांचं लेखन, नमुना म्हणून पाहिलं तरी मी काय म्हणतो याचा प्रत्यय यायला हरकत नाही. मार्क्स-गांधी हे दोन भिन्न धारणा असणारे आणि मुळातच भिन्न भूमिका असणारे विचारवंत आहेत. पण या दोघांमधलं साधर्म्य पळशीकरांच्या लेखनामधून आपोआप उलगडत जातं. आता ते का उलगडत जातं मूलभूत भूमिका विरोधी असतानासुद्धा? त्याचं एक कारण म्हणजे पळशीकर सातत्याने तुमच्या जगण्याचं, जीवनाचं आणि चांगला समाज कोणत्या श्रेयसावर आधारलेला पाहिजे, हे सतत केंद्रस्थानी ठेवून विचार करत.
एखाद्या सुट्या प्रश्नाचा विचार करताना याचा विचार आजचा आधुनिक अभ्यासक करेलच असं नाही. तो एखाद्या मुद्याकडे साधक-बाधक पद्धतीनं, तरतम पद्धतीनं पाहत, त्याचा श्रेयसाशी काय संबंध आहे असा प्रश्न उपस्थित करेल किंवा करतो. पळशीकर तसं कधीही करत नसत. कोणत्याही विषयावर लिहिताना तुम्ही कोणत्या पद्धतीनं जगणं श्रेयस्कर आहे, तुमचं श्रेयस काय आहे याच्याशी जोडूनच पळशीकर विचार करत. त्यामुळे तुम्ही त्यांचं गांधी, मार्क्स किंवा म. फुल्यांवरचं लेखन पहा.
जोतिबांवर लिहिताना त्यांनी शेवटी जोतिबा आणि गांधी यांच्यातलं साम्य दाखवायचा प्रयत्न केला आहे. मार्क्स आणि गांधींवर लिहिताना मार्क्स आणि गांधी यांच्या मूलभूत भूमिकांमधलं साम्य काय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे शेवटी जगणं आणि श्रेयस्कर जगणं या पातळीवरच ते सतत विचार करत. त्यामुळे सगळ्या विचारप्रवाहांची चिकित्सा किंवा साध्या प्रश्नाची चिकित्सा करताना हा संदर्भ ते कधीही नजरेआड करत नसत, हे उदाहरण म्हणून नक्कीच सांगता येईल असं मला वाटतं.
प्रश्न : त्याची जीवनदृष्टी इतकी व्यापक असूनही त्यांच्याविषयी पुष्कळ गैरसमजही निर्माण झालेले दिसतात…
बेडकीहाळ : गैरसमज त्यांच्याबद्दल पुष्कळच झाले आणि त्यातले बरेचसे पूर्वग्रहदूषित होते. त्यातले काही त्यांच्या भूमिकेचं नीट आकलन न झाल्यानेही झाले होते. ते पुसून काढण्यासाठी पळशीकरांनी अनेकदा संवादाची तयारी दाखवली, अनेकदा त्यांनी ‘समाज प्रबोधन पत्रिका’ किंवा ‘नवभारत’ यांसारख्या नियतकालिकातून संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे. संवाद करण्यात ते कमी पडत नसत तर प्रतिपक्ष कमी पडे असा नेहमीचा अनुभव असे.
एका टप्प्यावर जे नाही जमणार, ते नाही जमणार असं समजून दोघंही बाजूला होणं असंही वादविवादात होत असतं. तसंही काही वेळेला झालेलं आहे. मुळात मराठी विचारविश्वामध्ये ८०नंतरच्या काळामध्ये लेबलं लावण्याचा फार घातक प्रकार सुरू झालेला आहे. त्याचा फटका सगळ्यात जास्त पळशीकरांना बसला असं मला वाटतं. एखादा विचारवंत किंवा अभ्यासक अमूक एका भूमिकेचा आहे असं लेबल एकदा बसलं की त्याच्याकडे दुसऱ्या दृष्टीनं पाहिलंच जात नाही. पळशीकरांना गांधीवादी का ठरवलं गेलं ते मला अद्यापही कळलेलं नाही. गांधींचा संस्कार असणं आणि गांधीवादी असणं यातला फरक त्यांच्याइतका इतर कोणी सूक्ष्मपणे केला आहे असं वाटत नाही. त्यामुळे अशी काही लेबलं त्यांच्यावर बसणं, त्यांच्या परंपरेबद्दलच्या लेखनाबद्दल ते ब्राह्मणी आहेत किंवा परंपरेच्या विषमतेचं समर्थन करतात, दलितांनी खेड्यात राहायला हरकत नाही वगैरे अशा प्रकारच्या ज्या भूमिका होत्या, त्यांच्या मांडणीमध्ये आलेल्या त्याचाही एक सोयीस्कर गैरसमज करून त्यांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण हा त्यांच्या लेखनशैलीचा दोष आहे असं मला वाटत नाही. याचं कारण ज्यावेळेला विचारप्रवाह धारदार आणि अस्मिताजन्य बनतात, त्यावेळेला माणसं दुसऱ्यांच्या विचाराकडे शत्रूभावी दृष्टीतून पाहतात आणि तो त्या दृष्टीचा दोष असतो. पळशीकरांच्या लेखनामध्ये तो शत्रूभाव कुठेच दिसणार नाही. शत्रूभाव तर सोडाच पण उद्धटपणा, औद्धत्य, उपहास यासारखा एकही शब्द त्यांच्या साहित्यामध्ये दिसणार नाही.
आता हे लक्षात घेतलं तर त्यांच्याशी ज्यांना संवाद करायचा आहे, त्यांनाच स्वतःलाच काही पथ्य पाळायला लागतात. हे पथ्य पाळण्याची तयारी नसेल तर मग पळशीकरांबद्दलचं आकलन हे गैरसमज व पूर्वग्रहाकडेच नेणारं ठरेल. उदाहरणार्थ, त्यांच्या शैलीचा एक मोठा विशेष असा आहे की, ते वाचकाला बोट धरून खूप खोलवर नेतात. ज्या प्रश्नावर लिहीत त्याच्या इतिहासापर्यंत, परंपरेपर्यंत नेत, दुसऱ्या बाजूला त्या कालखंडामध्ये ज्या प्रकारच्या धारणा, संकल्पना आहेत, त्या त्या ऐतिहासिक चौकटीमध्ये ते समजावून सांगतात. म्हणजे समजा आज एखादी मार्क्सवादाची संकल्पना समजून घ्यायची असेल तर आपण ती एका वेगळ्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. पण मूळ ऐतिहासिक पद्धतीमध्ये ती कशी होती हे जर वाचकाला समजलं नाही तर त्या संकल्पनेचं त्यांचं आकलन वेगळं होऊ शकतं. ते होणार नाही याची दक्षता पळशीकरांनी जास्त घेतली. महाराष्ट्रामध्ये दि.के. बेडेकर सोडले तर दुसरा नंबर हा पळशीकरांना द्यावा लागेल असं मला वाटतं. त्या त्या कालखंडातल्या संकल्पना कोणत्या, त्यांची ऐतिहासिक कोंदणं किंवा चौकटी काय होत्या आणि मग त्याच्या प्रस्तुतता काय आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनशैलीमध्ये त्यांच्याबरोबर जर आपण संवादी पद्धतीनं उतरलो आणि खोलात गेलो तर निश्चितच वाचक म्हणून आपलीसुद्धा संकल्पनांची समज नक्कीच वाढलेली असते.
आता हे वेगळेपण जपण्यासाठी तुम्हाला एका पेशन्सची गरज असते. पळशीकर नेहमीच विस्तारानं आणि तपशीलानं लिहित. त्यामुळे त्यांचे मोठे लेख २५-३० पानांच्या खाली नसत. गंभीरपणे ते वाचण्याची सवय किंवा सहनशीलता नसेल तर मग वरवर पाहणं आणि शेरेबाजी करणं याला महत्त्व राहतं. ते पळशीकरांच्या बाबतीत दुर्दैवानं झालेलं आहे.
प्रश्न : वाचकांना सखोल काही देणं ही पळशीकर स्वत:ची जबाबदारी मानत, असं तुम्ही म्हणता. ते जरा स्पष्ट करून सांगा ना…
बेडकीहाळ : गंभीरपणे वैचारिक लेखन करणं ही एक जबाबदारी, निष्ठा आणि बांधीलकी आहे आणि ती करत असताना प्रसंगी स्वतःला खरवडण्याची भूमिका ठेवायला हवी. स्वतःवरची सगळी पुटं बाजूला काढून आपल्याला पाहता यायला हवं. तरच आपण दुसऱ्याशी संवाद करू शकतो ही पळशीकरांच्या व्यक्तिमत्त्वाची धाटणी होती. त्यांच्या समकालीन विचारवंतांपैकी नरहर कुरंदकरांची शैली पाहू. ती वाचकाला अनेक प्रश्नांची जाणीव करून देते. प्रश्नाला किती बाजू असतात हे कुरुंदकरांच्या लेखनात उत्तमपणे सांगितलेलं असतं. पण त्याचबरोबर त्यांनी मांडलेला मुद्दा अंतिम असल्याचं सांगत ते वाचकाला निरुत्तर करतात. त्यामुळे वाचकाला असं वाटतं की, आता याच्या पलीकडे काही नाही. पळशीकरांमध्ये तुम्हाला ही भूमिका कधीच डोकावताना दिसणार नाही. त्यामुळे वाचकाला या सगळ्या संकल्पनांच्या आधारे स्वतःला काही घडवण्याचा एक मोकळा अवकाश राहतो, तो इतर विचारवंतांच्या लेखनामध्ये राहतोच असं नाही. याप्रकारचा फरक फक्त शैलीच्या अनुषंगाने आला आहे असं मला वाटत नाही, तर तो स्वभावाच्या अनुषंगाने आलेला आहे. दुसरं आपण कित्येकदा हे लक्षात घेत नाही की, महाराष्ट्रामध्ये चमकदार वक्तृत्व ही जशी एक परंपरा आहे, तशी चमकदार विचारवंत ही अलीकडच्या काळात निर्माण होत चाललेली दुसरी परंपरा आहे. चमकदार विचारवंतांच्या यादीमध्ये बसणं किंवा त्याचे काही फायदे घेणं हे पळशीकरांच्या जीवननिष्ठेत कधीच बसणारं नव्हतं. याचा अर्थ इतर जे विचारवंत त्यांनी मुद्दाम काही चमकदारपणे केलं असा काही आरोप करायचं कारण नाही. पण दिसते ते असं की, ज्यांच्याकडे चांगलं वक्तृत्व आहे आणि ज्यांच्याकडे उपहासात्मक, उपरोध करणारी वा नर्मविनोदाच्या अंगाने पण व्यंगात्मक जाणारी शैली आहे, अशा विचारवंताचं लेखन सामान्यतः आपल्याला भावतं. आपल्याकडे त्यांचा उदोउदो, वाहवा होते. हे कशाचं लक्षण आहे? तुमच्या जगण्याला एका गंभीर गोष्टीची किंवा तत्त्वांची बैठक असावी लागते, ही धारणा क्षीण असेल तर मग उपहासात्मक पद्धतीचं लेखन वाढणार आणि गंभीर प्रवृत्तीचं लेखन कमीच राहणार. पळशीकर गंभीरतेच्या बाजूने उभे असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला, जगण्याला गांभीर्याची किनार आलेली दिसेल.
प्रश्न : विचारवंत म्हणून पळशीकरांचं नेमकं स्थान काय आहे, असं तुम्हाला वाटतं?
बेडकीहाळ : लेखन, काम आणि जगणं या तिन्ही गोष्टींकडे पळशीकर एकात्म पद्धतीने पाहत. त्यांच्या या तिन्हीत काही फरक आहे असं वाटत नसे. गंभीर लेखन करणारा माणूस ज्या वेळेला ज्ञानोपासकाचं व्रत घेऊन लिहायचं ठरवतो, त्यावेळेला समाजजीवनातला जेवढा अनुभव गोळा करता येईल तेवढा गोळा करतो आणि त्याची स्वतःशी चिकित्सा करत राहतो. मग ते लेखनात उतरवणं ही पळशीकरांनी नेहमीच आपली गरज मानली. सुदैवाने त्यांना गांधी परिवारातल्या काही व्यक्तींचा सहवास मिळाला. काही ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्याही पलीकडे जाऊन भारतामध्ये जेवढे विविध प्रकारचे परिवर्तनवादी गट आहेत, त्या सगळ्या गटांशी त्यांचा संवाद होता. ही माणसं आपल्यापेक्षा वेगळ्या भूमिका राखून आहेत, मग यांच्याशी कशाला संवाद करा असा प्रश्न त्यांना कधीच भेडसावला नाही. हे सगळं समजून घेऊन मग आपली भूमिका कशी ठरवता येईल या अंगाने ते नेहमीच विचार करत आले. म्हणून कोणत्याही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचं काम समजून घेणं, त्याच्या प्रेरणा समजून घेणं आणि मगच आपल्या भूमिकांच्या आधारे काही लिहिणं हे पळशीकरांचं मिशन राहिलं. त्यामुळे सामाजिक कार्याबद्दलचा एक अतोनात आदरभाव त्यांच्या लेखनामध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये आपल्याला पहायला मिळतो. दुसरं म्हणजे सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचं जे जोडलेपण होतं, ते केवळ भूमिका भिन्न आहेत किंवा भूमिकांमध्ये साम्य आहे या कारणानं झालेलं नव्हतं. तर माणसं समजून घेण्याची मूलभूत प्रेरणाही त्याच्याशी जोडलेली होती असं मला वाटतं. ही मूलभूत प्रेरणा जर नसेल तुमच्याकडे तर सामाजिक कार्य सामाजिक कार्याच्या जागी व लेखन लेखनाच्या जागी आणि जगणं जगण्याच्या जागी अशा प्रकारची त्रिधा अवस्था निर्माण होऊ शकते. ती पळशीकरांनी कायम टाळलेली आहे. म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी एका संस्थेच्या कुठल्याही जबाबदारीशी स्वतःला कायम बांधून घेतलं नाही. पण समाज प्रबोधन संस्थेमध्ये ते दीर्घकाळ काम करत होते. ‘समाज प्रबोधन पत्रिके‘चं संपादन त्यांनी जवळपास सात-आठ वर्षं केलं. नवभारत आणि प्राज्ञ पाठशाळा या दोन संस्थांशी त्यांनी जोडून घेतलं होतं. ‘नवभारत‘चं जवळपास १९९५ ते २००४ असं ९-१० वर्षं त्यांनी संपादन केलं. प्राज्ञ पाठशाळेच्यावतीने त्यांनी अनेक बौद्धिक शिबिरंही घेतली. ज्याला तुम्ही प्रचलित अर्थानं सामाजिक कार्य म्हणता, की एखाद्या संस्थेला जोडून घेऊन तिथं जन्मभर राबणं, त्यात ते फारसे गुंतून पडलेले दिसत नाहीत. पण असं काम करणाऱ्या सगळ्या माणसांशी मात्र त्यांचं जोडलेपण कायम राहिलं. म्हणून त्यांना विचारवंत म्हणून कोणत्याही एका इझमशी जोडता येत नाही. त्यामुळे सर्व विचारप्रवाहांची चिकित्सा करूनही कोणत्या प्रकारचं जगणं श्रेयस्कर आहे, या पद्धतीनं त्यांच्या श्रेयसाची चर्चा करणं हे त्यांना जास्त न्याय देणारं ठरेल असं मला वाटतं. नाहीतर मग मार्क्सवादी, समाजवादी, गांधीवादी, सर्वोदयवादी, नक्षलवादी अशा प्रकारची अनेक लेबलं लावली जाऊ शकतात. पण सुदैवानं ते या प्रकारच्या कुठल्याही चौकटीमध्ये बसणारं व्यक्तिमत्त्व नव्हतं.
प्रश्न : हे खूपच प्रस्तुत आहे…
बेडकीहाळ : ठामपणे एखाद्या विचारप्रणालीचा आग्रह धरणं, अस्मिताजन्य पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या चौकटीत लेखन करणं, ही आधुनिक महाराष्ट्रातली एक शिष्टमान्य परंपरा आहे. त्यात जे बसणार नाहीत ते सामान्यतः याच्या बाहेर जातात. पण मग दखल कोणाची घेतली जाईल? तर विद्यापीठीय विचारवंतांची एक परंपरा आधुनिक काळामध्ये निर्माण झाली आहे हे आपल्याला माहिती आहे. पण विद्यापीठाच्या बाहेर ज्ञान ही एक सामाजिक शक्ती आहे असं समजून तिचा विचार करणं, या विचारपरंपरेत जी काही नावं व्यासंगामुळे व ज्ञाननिष्ठेमुळेच घ्यावी लागतात, त्यापैकी एक नाव पळशीकरांचं आहे, दुसरं शरद पाटलांचं. ही दोन्ही नाव त्या अर्थानं विद्यापीठीय वर्तुळाच्या बाहेरची आहेत. विद्यापीठीय विद्वत्तेचं कोणतंही कोंदण त्यांना लागलेलं नाही. पण व्यासंग आणि निष्ठा या बाबतीत कदाचित विद्यापीठीय विचारवंत कमी पडतील इतक्या पातळीवर त्यांनी काम केलं आहे. पण दुर्दैवाने हे कोणत्याच विचारप्रणालीचे नसतील तर मग कशाला यांचं वाचा, कशाला यांचा विचार करा अशा प्रकारचा समज त्यांच्याविषयी झालेला आहे. जसं शरद पाटलांविषयी आपण म्हणतो की, त्यांनी अतिशय ताकदीनं आणि गांभीर्यानं सबंध भारतीय इतिहासाचा उलगडा करण्याचा एक नवा प्रयत्न केला, नवदर्शन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण ते नवदर्शन चिकित्सेच्या पातळीवर न जाता काही मंडळींना त्याचा पुढे हत्यार म्हणून वापर करण्याचा मोह झाला. विचारप्रणालीचं हत्यार कधी ना कधी बोथट होणारच असतं. परिणामी विचारप्रणाली पुढे जात नाही. हत्यारच जास्त प्रमाणात लोकांच्या समोर नेलं जातं. पळशीकर या प्रकारचे विचारवंत नव्हते.
किशोर बेडकीहाळ
kishor077@yahoo.co.in
समीर शिपूरकर
sameership@yahoo.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment