अजूनकाही
भारताच्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला, इफ्फीला, २० नोव्हेंबर रोजी पणजीत सुरुवात झालीये. पुढच्या आठ दिवसांत ८२ देशांमधले जवळपास दोनशे सिनेमे इथं दाखवले जातील. जगभरातून आणि भारतभरातून आलेले चित्रपटप्रेमी जमतील तेवढे सिनेमे पाहतील, त्यावर चर्चा करतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याचा वायदा करून निघून जातील. येत्या आठ दिवसांमधल्या महोत्सवाची एक छोटीशी झलक दाखवण्याचा हा प्रयत्न...
.............................................................................................................................................
दर वर्षीप्रमाणे पणजी शहर नटलंय.
दर वर्षीप्रमाणे वाद घोंगावताहेत. कधी छोटे, कधी मोठे.
दर वर्षीप्रमाणे सिनेमाप्रेमींनी आपल्या वार्षिक वारीला गर्दी केलीये.
भारताचा ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव परवा दणक्यात सुरू झालाय. उद्घाटनाला हिंदी चित्रपटसृष्टीतले शाहरूख खानसारखे मोठेमोठे स्टार्स येऊन गेले आहेत. ए. आर. रेहमान, नाना पाटेकर, श्रीदेवी, शाहीद कपूर यांनी हजेरी लावली होती. राजकुमार राव आणि राधिका आपटे यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. (हे किंवा आणखी दुसरे स्टार्स आता पुन्हा थेट समारोपाच्या सोहळ्याला उपस्थित राहतील. मधल्या वेळेत कोणते सिनेमे दाखवले जाताहेत, कोणते सिनेमे आयत्या वेळी बाजूला सारले जाताहेत याच्याशी त्यांना फारसं काही देणंघेणं असण्याची शक्यता नाही). आणि अर्थातच, माहिती आणि नभोवाणी खात्याच्या मंत्री स्मृती इराणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जातीने हजर होतेच.
पण चित्रपट महोत्सव म्हणजे काही हिंदी चित्रपटसृष्टीतले स्टार्स नव्हेत. हा महोत्सव असतो सिनेमावर, जागतिक सिनेमावर प्रेम करणाऱ्यांचा. जुन्या जाणत्या दिग्दर्शकांच्या रेट्रोस्पेक्टीव्हपासून ते आजच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नवीन दिग्दर्शकांचे सिनेमे साजरे करणाऱ्यांचा.
असाच एक दिग्दर्शक म्हणजे इराणचे माजिद माजिदी. ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ या त्यांच्या सिनेमामुळे त्यांचं नाव भारताला ओळखीचं झालं. तो सिनेमा होताच थोर. त्यानंतरचे त्यांचे ‘कलर ऑफ पॅरडाईज’ किंवा ‘बरान’सारखे सिनेमेही प्रेक्षकांना भावले होते. थोडक्यात माजिद मजिदी हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठं नाव मानलं जातं. स्वाभाविकच त्यांनी बनवलेल्या पहिल्या भारतीय सिनेमाने या वेळच्या महोत्सवाची सुरुवात होणार म्हटल्यावर जरा जास्तच उत्सुकता होती. पण...
‘नाव मोठं लक्षण खोटं’ या म्हणीचा प्रत्यय माजिदींचा ‘बियाँड द क्लाऊड्स’ हा नवा कोरा सिनेमा पाहताना आला.
दिग्दर्शकाच्या नावाखेरीज रेहमानचं संगीत, विशाल भारद्वाजचे हिंदी संवाद आणि इशान खट्टर या नव्या नायकाचं आगमन हेही उत्सुकतेचा भाग होते. शिवाय दीपिका पदुकोनबरोबर शूटिंगला सुरुवात केल्यानंतर तिच्या जागी माजिदींनी मालविका मोहनन या मुलीला घेतलंय हे वाचलं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिनेमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. कला अकादमी आणि आयनॉक्स या दोन थिएटर्सना हा सिनेमा संध्याकाळी सात वाजता दाखवला जाणार होता. आयनॉक्सला दुपारी तीन वाजल्यापासून लोकांनी रांग लावली होती. थिएटर भरल्यामुळे अनेकांना परत जावं लागलं. या सिनेमाचा आणखी एखादा शो होणार नाहीये हे कळल्यामुळे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी माणसं खट्टु झाली होती. पण झी स्टुडिओज आणि नमाह पिक्चर्सची ही निर्मिती असल्यामुळे भारतात तो प्रदर्शित होईल असा एक सांत्वनपर सूरही ऐकू येत होता. माजिदींच्या सिनेमाचा भारतातला प्रिमिअर आपल्याला बघायला मिळतोय म्हणून थिएटरमध्ये जागा मिळालेल्यांच्या चेहऱ्यावर भरून पावल्याचा आनंद होता. दुर्दैवाने तो फार टिकला नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
इथेही माजिदी आपल्याला आमिर आणि तारा या भावा- बहिणीची गोष्ट सांगतात. पण ही भावंडं ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’सारखी लहान नाहीत, मोठी आहेत. आपापली आयुष्यं जगताहेत. आमिर ड्रग्सची देवाणघेवाण करून पैसे कमावतोय तर तारा छोटीमोठी कामं करून, प्रसंगी शरीरविक्रय करून दिवस काढतेय. ही भावंडं भेटतात आणि त्यांचं जग बदलून टाकणाऱ्या घटना वेगानं घडतात. एखाद्या बॉलीवूड सिनेमासारख्या. एखाद्या बॉलिवुड सिनेमाइतक्याच खोट्या वाटणाऱ्या, ओढूनताणून आणि कृत्रिम. यातला एकही प्रसंग तुमच्या हृदयाला भिडत नाही की प्रेक्षक म्हणून तुम्ही त्यात गुंतून जात नाही. सगळं कसं अगदी स्टिरिओटाईप. अनेक हिंदी सिनेमांमधून बघितलेलं. चिखलातल्या मारामारीपासून ते तुरुंगातल्या भ्रष्टाचारापर्यंत. होळीच्या उधळलेल्या रंगांपासून ते पोलिसांच्या पाठलागापर्यंत. इथल्या गरीब घरात फ्रिज आहे. डायनिंग टेबल आहे. जिना आहे. आणि तरीही केवळ सावल्यांचा खेळ दाखवायचा म्हणून एकाच खोलीत दोरीवर पातळ साडी टाकून पलीकडच्या बाजूला कपडे बदलणं, केस नीट करणंही आहे. हा नायक कधी ट्रेनने फिरतोय तर कधी जेट्टीने. कधी महालक्ष्मीला जाताना रिक्षा दिसतेय तर कधी पावसाळ्यात मध्येच होळी साजरी होतेय. या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करावं म्हटलं तर त्यासाठी सिनेमाकडून एक जबरदस्त अनुभव तरी मिळावा. पण तसं अजिबातच घडत नाही. घोर निराशेखेरीज पदरी काहीही पडत नाही.
अखेर ‘एस. दुर्गा’ झळकणार
कला अकादमीच्या आवारात काल अचानक हालचाल दिसू लागली. काही मुलं आपापसांत कुजबुजत होती. विचारल्यावर एकजण म्हणाला, ‘एस. दुर्गा’ इफ्फीमध्ये दाखवला जाणार आहे, आताच न्यायालयाचा निर्णय आलाय. आणि मग सिनेमासाठी लागलेल्या गर्दीसमोर त्यानं ते जाहीरच करून टाकलं. लोकांमधून उत्स्फूर्त टाळ्या आणि शिट्यांचा गजर झाला. ज्या दिवशी इंडियन पॅनोरमाचं उदघाटन झालं, त्याच दिवशी हा निर्णय यावा, हा न्यायच म्हणायचा!
आगे आगे देखते है, होता है क्या!
.............................................................................................................................................
लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.
meenakarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment