कुटुंबाने अखेर आपले मौन सोडले : सोहराबुद्दीन खटल्याच्या न्यायमूर्तींच्या मृत्यूबाबतची काही धक्कादायक सत्ये
पडघम - देशकारण
निरंजन टकले
  • न्या. (कै) ब्रिजगोपाल हरकिशन लोया
  • Wed , 22 November 2017
  • पडघम देशकारण न्या. ब्रिजगोपाल लोया Brijgopal Harkishan Loya सोहराबुद्दीन केस Sohrabuddin Case

१ डिसेंबर २०१४ची सकाळ होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्या. ब्रिजगोपाल हरकिशन लोया (वय ४८) यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले... मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेले असताना त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. देशातल्या सर्वांत विशेष अशा गाजणाऱ्या केसचे लोया हे प्रमुख न्यायमूर्ती होते. २००५मध्ये झालेल्या सोहराबुद्दीनच्या बनावट चकमक हत्याप्रकरणाचा तो खटला होता. आणि प्रमुख आरोपी होते तेव्हा गुजरातच्या गृहमंत्रीपदावर असलेले अमित शहा. लोयांचा मृत्यू झाला तेव्हा ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. प्रसारमाध्यमांतून बातम्या आल्या- न्या. लोया हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू पावले.

लोया कुटुंबीय त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी काहीही बोलले नाहीत. पण नोव्हेंबर २०१६मध्ये लोयांची भाची नुपुर बालप्रसाद बियानी हिने माझ्याशी पुण्यात मी गेलो असताना संपर्क साधला. आपल्या मामांच्या मृत्यूसंबंधी, तेव्हाच्या परिस्थितीसंबंधी तिला काही शंका उपस्थित करायच्या होत्या. यानंतर नोव्हेंबर २०१६ आणि नोव्हेंबर २०१७ या कालावधीत मी अनेकदा या कुटुंबियांची भेट घेतली. तिची आई अनुराधा बियानी, ही न्या. लोयांची बहीण वैद्यकीय डॉक्टर असून शासकीय सेवेत आहे. आणखी एक बहीण सरिता मांधणे आणि लोयांचे वडील हरकिशन यांच्याशी मी बोललो. नागपूर येथे न्यायमूर्तींच्या शवाची हाताळणी, प्रक्रिया पार पाडणाऱ्या, शव विच्छेदनातही सहभागी असलेल्या, साक्षी असणाऱ्या सर्व सरकारी नोकरांशीही मी संपर्क साधला.

या सर्व भेटीगाठींतून लोया यांच्या मृत्यूसंबंधी फार चिंतित करणारे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत्यूसंबंधी जी माहिती दिली गेली, त्यातील विसंगतीसंबंधी, मृत्यूनंतर ज्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला हव्या होत्या त्यासंबंधी, कुटुंबाकडे शव सोपवण्यात आले, तेव्हा त्या शवाची जी अवस्था होती त्यासंबंधीचे हे प्रश्न आहेत. लोया कुटुंबियांनी न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी चौकशी आयोग नेमावा अशी मागणी केली होती. तो कधीच नेमण्यात आला नाही. 
….
३० नोव्हेंबर २०१४ रोजी रात्री ११ वाजता न्या. लोया यांनी आपली पत्नी शर्मिला हिला नागपूरहून मोबाईलवरून फोन केला. चाळीस मिनिटे झालेल्या या बोलण्यात त्यांनी पत्नीला दिवसभरात कायकाय झालं ते सांगितलं. आपल्या सहकारी न्यायमूर्ती सपना जोशी यांच्या मुलीच्या विवाहासाठी न्या. लोया नागपूरला गेले होते. आधी ते जाणार नव्हते, पण आणखी दोन सहकाऱ्यांनी आग्रह केला म्हणून ते गेले. विवाहविधी झाल्यानंतर त्यांनी स्वागत समारंभालाही हजेरी लावली. त्यांनी आपल्या मुलाची- अनुजचीही चौकशी केली. त्यांनी सांगितले की, ते नागपूरच्या सिव्हिल लाइन्स भागातील विशेष सरकारी अतिथी गृहात राहत असून बरोबर आलेले बाकीचे न्यायाधीश सहकारीही त्यांच्यासोबत आहेत. 

लोया यांनी केलेला हा अखेरचा फोन होता असे कळते. त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली.
“त्यांची पत्नीला मुंबईत, मला लातुरात आणि माझ्या मुलींना धुळे, जळगाव आणि औरंगाबादला १ डिसेंबरला सकाळी लवकरच फोन गेले,” हरकिशन लोयांनी १ नोव्हेंबर २०१६ला आम्ही त्यांच्या मूळ गावी, लातूरजवळच्या गटेगावात झालेल्या पहिल्या भेटीत सांगितले होते. त्यांना असे सांगितले होते की, “रात्री ब्रिजचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टेमही झाले. आणि आमच्या मूळ घरी लातूरला, गटेगावला शव पाठवण्यात आले आहे.” ते म्हणाले, “मला तर भूकंप होऊन उद्ध्वस्त झाल्यासारखेच झाले.”

कुटुंबियांना सांगण्यात आले होते की, लोयांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडून झाला. “त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे नागपुरातल्या दांडे हॉस्पिटल नावाच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. रिक्षाने नेण्यात आले आणि तिथे थोडे उपचारही झाले म्हणे.” हरकिशन सांगत होते. लोयांची बहीण श्रीमती बियानी यांनी सांगितले की दांडे हॉस्पिटल हे एक “अगदीच साधे हॉस्पिटल आहे”. आणि त्यांना नंतर असेही कळले की, “तिथले इसीजी मशीन बंद होते”. नंतर हरकिशन म्हणाले की, त्यांना “मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.” नागपुरातील आणखी एक खाजगी हॉस्पिटल. तिथे नेल्यावर ते “आत येण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.”

मृत्यू झाला तेव्हा सोहराबुद्दीन खटला ही एकच केस न्या. लोयांच्या समोर होती, आणि तिच्याकडे देशभरातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. २०१२साली सर्वोच्च न्यायालयाने ही केस गुजरातमधून मुंबईत हलवण्यात यावी असे निर्देश दिले होते. “या केसची निष्पक्ष हाताळणी व्हावी यासाठी ही केस राज्यातून बाहेर हलवली जाण्याची गरज आहे,” असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही केस सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच न्यायाधीशाने हाताळणे महत्त्वाचे आहे असेही निर्देश दिले होते. पण हे निर्देश डावलून हा खटला प्रथम ज्यांच्यापुढे चालला, त्या जे. टी. उत्पात यांना २०१४मध्ये सीबीआय कोर्टातून बदलण्यात आले आणि त्या ऐवजी न्या. लोयांच्या समोर खटला चालू लागला.

६ जून २०१४, रोजी उत्पात यांनी अमित शहांना न्यायालयासमोर हजर न राहण्याची सवलत मागितल्याबद्दल समज दिली होती. नंतरच्या तारखेलाही- २० जूनलाही शहा उपस्थित राहिले नाहीत तेव्हा उत्पात यांनी पुढली तारीख २६ जून रोजी ठेवली. त्यांची बदली २५ जून रोजी करण्यात आली. नंतर आलेल्या लोया यांनी शहा यांना उपस्थित न राहण्याची मुभा दिली होती. पण ३१ ऑक्टोबर २०१४ ला मुंबईत असूनही अमित शहा न्यायालयात का येऊ शकत नाहीत, अशी स्पष्ट विचारणा त्यांनी केली. त्यांनी पुढली तारीख १५ डिसेंबर ठेवली. 

१ डिसेंबर रोजी लोयांचा मृत्यू झाल्याची बातमी दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांत आली आणि प्रसारमाध्यमांचे त्याकडे विशेष लक्ष गेले नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने ही बातमी देताना “हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला” हे म्हणताना, “पण त्यांच्या अगदी जवळच्या सूत्रांकडून असे समजते की, त्यांचे आरोग्य यापूर्वी व्यवस्थित होते,” असेही म्हटले. प्रसारमाध्यमांचे लक्ष या घटनेकडे गेले, कारण लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी संसदेबाहेर धरणे आयोजित करून केली. दुसऱ्याच दिवशी सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने सीबीआयला पत्र लिहून न्या. लोया यांचा मृत्यू धक्कादायक असल्याचे नमूद केले.

खासदारांच्या निषेध धरण्याचा किंवा रुबाबुद्दीनच्या पत्राचा काहीही परिणाम झाला नाही. लोयांच्या मृत्यूबाबत, त्या वेळच्या घटनांबाबत कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत.

लोया कुटुंबियांशी अनेकदा संवाद साधल्यानंतर मी जे एकसंध चित्र जुळवले आहे, ते सोहराबुद्दीन खटल्याच्या काळात न्या. लोया यांना काय सहन करावे लागले हे भीषण रीतीने समोर आणणारे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर काय झाले तेही समोर येतेच. श्रीमती बियानी यांनी त्या जी दैनंदिनी लिहितात तिची मला प्रत करून दिली आहे. भावाच्या मृत्यू आधीचे काही दिवस आणि नंतरचे काही दिवस काय घडत होते ते त्यांना लिहून ठेवले आहे. या घटनेबद्दल त्या ज्या ज्या मुद्द्यांबद्दल शंकित झाल्या, ते ते सारे त्यांनी लिहून ठेवले होते. मी लोया यांच्या पत्नीशी आणि मुलाशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जिवाची भीती असल्यामुळे बोलण्यास नकार दिला. 
धुळे येथे राहणाऱ्या श्रीमती बियानी म्हणाल्या की, त्यांना १ डिसेंबर २०१४च्या सकाळी फोन आला. न्या. बर्डे असे नाव सांगणाऱ्या त्या व्यक्तीने त्यांना गटेगावला जायला सांगितले. लोया यांचे शव तेथे पाठवण्यात येत आहे अशी माहिती दिली. याच व्यक्तीने या सर्वांनाच पोस्ट मॉर्टेम झाल्याचे कळवले आणि मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचेही सांगितले. 

लोयांचे वडील नेहमी गटेगाव येथेच असतात, पण त्या वेळी ते लातूरला एका मुलीच्या घरी होते. त्यांनाही फोन आला आणि शव गटेगावला जात असल्याचे सांगितले गेले.

“रा. स्व. संघाचे एक स्वयंसेवक ईश्वर बाहेती यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की, शव गटेगावला पोहोचवण्याची व्यवस्था ते करतील,” श्रीमती बियानी सांगत होत्या, “ब्रिज लोयांच्या मृत्यूबद्दल त्यांना का, कसं, कधी कळलं ते कुणालाही माहीत नाही.”

सरिता मांधणे, लोयांची आणखी एक बहीण, औरंगाबादला शिकवणीचे वर्ग चालवतात. त्या त्या वेळी लातूरला आल्या होत्या. त्या म्हणाल्या पहाटे पाच वाजता मला बर्डेंचा फोन आला आणि त्यांनी लोयांच्या मृत्यूची खबर दिली. “ते म्हणाले की ब्रिज यांचा नागपूरला मृत्यू झाला असून तुम्ही सगळे नागपूरला निघून या. लातूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या भाच्याला घेऊन आम्ही निघायची तयारी करत असताना हा ईश्वर बाहेती नावाचा माणूस आला. आम्ही सारडा हॉस्पिटलला असल्याचं त्याला कसं काय कळलं हे मला अजूनही कळत नाही.” मांधाणे सांगतात की बाहेती म्हणला की, तो रात्रभर नागपूरमधल्या लोकांशी बोलत होता आणि नागपूरला जाण्यात काहीच अर्थ नव्हता कारण शव आधीच गटेगावकडे अम्ब्युलन्समधून रवाना झालंय. “त्याने आम्हाला त्याच्या घरी नेलं, मी सगळी व्यवस्था करतो म्हणाला.” मांधाणे सांगत होत्या. हे प्रसिद्ध होईपर्यंत मी बाहेतींना लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. श्रीमती बानी गटेगावला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती, पण बाकी दोघी बहिणी तिथे पोहोचल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शव पोहोचले अशी नोंद श्रीमती बियानींच्या दैनंदिनीत आहे. नागपूरपासून शवाच्या सोबत लोयांचा एकही सहकारी आला नव्हता हे पाहून सगळ्या कुटुंबियांना धक्काच बसलेला. फक्त अँब्युलन्सचा ड्रायव्हर एकटाच ते घेऊन आलेला. श्रीमती बियानी म्हणाल्या, “ज्या दोन न्यायाधीशांनी त्यांना लग्नाला चलण्याचा आग्रह केला होता तेही नव्हते. ज्या बर्डेंनी मृत्यूची आणि पोस्टमार्टेमची बातमी कळवली तेही नव्हते. हे धक्कादायकच होतं. हा प्रश्न मला अजूनही छळतो. त्यांचं शव असं एकट्यानेच कसं पाठवलं गेलं?” त्यांच्या डायरीत आणखी एक नोंद आहे, “तो सीबीआयचा जज होता. त्याला सुरक्षा व्यवस्था होती. आणि कुणीतरी योग्य माणसं सोबत यावीत अशी त्याची योग्यता निश्चितच होती.”

लोयांची पत्नी, शर्मिला आणि पुत्र अपूर्व आणि अनुज मुंबईहून गटेगावला आले, तेव्हा त्यांच्याबरोबर काही न्यायाधीश होते. “त्यांच्यापैकी एकजण सतत अनुजला आणि इतरांना कुणाशीही काही बोलू नका अशा सूचना करत होते.” श्रीमती बियाणी सांगत होत्या. “अनुज दुःखात होता, घाबरून गेलेला. पण तो स्वतःला सावरून आईलाही सावरत होता.”

श्रीमती बियाणी सांगतात की, जेव्हा त्यांनी शव पाहिले तेव्हा त्यांना काहीतरी चुकतंय असं वाटलं. “शर्टाच्या मागे मानेच्या बाजूला रक्ताचे डाग होते. चष्मा मानेच्या खाली गेलेला.” मांधाणेही म्हणाल्या की, त्यांचा चष्मा त्यांच्या अंगाखाली आलेला.
त्या वेळची बियाणी डायरी म्हणते, “त्यांच्या कॉलरवर रक्त होतं. त्यांचा कंबरेचा पट्टा सरकून मागे गेलेला. पॅन्टची क्लिप मोडलेली. माझ्या काकांनाही हे सारे संशयास्पद वाटले होते.” हरकिशननीही मला सांगितलं, “त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.” मांधाणे म्हणाल्या, की त्यांनाही मानेवर रक्त दिसलं होतं. त्या म्हणाल्या “रक्त होतं आणि डोक्यावरही जखम होती- डोक्याच्या मागच्या बाजूला, आणि शर्टावर रक्ताचे डाग होते.” हरकिशन म्हणाले, “त्याच्या शर्टावर डाव्या खांद्यापासून कंबरेपर्यंत रक्ताचे डाग होते.”
पण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या पोस्टमार्टेमच्या अहवालात- कपड्यांची स्थितीमध्ये पाणी, रक्त याने भिजलेले की उलटी किंवा इतर उत्सर्जनाने भिजलेले होते काय या सदरात ‘कोरडे’ असा उल्लेख आहे.

बियाणींना डॉक्टर असल्यामुळे मृत देहाची अवस्था संशयास्पद वाटली कारण, “पोस्टमार्टेम करताना रक्त बाहेर पडत नाही, कारण हृदय आणि फुफ्फुसे काम करत नसतात.” त्या सांगतात की, “आम्ही दुसऱ्या पोस्टमार्टेमची मागणी केली होती. पण लोयांचे मित्र आणि सहकारी यांनी आम्हाला परावृत्त केले, उगाच गुंतागुंत कशाला वाढवायची असं सांगून.”

सारे कुटुंब तणावाखाली होते, घाबरले होते, पण लोयांचे अंत्यविधी पार पाडावेत यासाठी त्यांच्यावर सामाजिक दबाव आला असं हरकिशन म्हणाले.

कायदेतज्ज्ञ म्हणतात की लोयांचा मृत्यू संशयास्पद आहे असे वाटतेच कारण- पोस्टमार्टेम केले गेले याचा अर्थ पंचनामा तयार करायला हवा होता आणि मेडिको-लीगल केस दाखल करायला हवी होती. “कायदेशीर प्रक्रियांनुसार पोलीस विभागाने मृताच्या सर्व वस्तू, कपडे इत्यादी सील करायला हवे होते. पंचनाम्यात त्यांची यादी असायला हवी होती आणि त्याबरहुकूम सर्व वस्तू कुटुंबियांकडे सोपवायला हव्या होत्या.” पुण्याचे वकील असीम सरोदे यांनी मला सांगितले. बियाणी म्हणाल्या कुटुंबियांना पंचनाम्याची प्रत मिळालेली नाही.
लोयांचा मोबाईल फोन कुटुंबियांकडे पोलिसांनी नव्हे तर बाहेतींनी दिला असे बियाणी सांगतात. “तिसऱ्या-चौथ्या दिवशी तो आम्हाला मिळाला.” त्या म्हणाल्या, “मी तो ताबडतोब मागितला होता. कारण त्याला आलेले फोन्स, एसएमएस किंवा नक्की काय कधी झालं ते त्यातून समजलं असतं. सगळं समजू शकलं असतं. हे घडलं त्याच्या एक किंवा दोन दिवस आधी त्याला एक एसएमएस आला होता- “सर, या लोकांपासून सुरक्षितता बाळगा.” हा एसएमएस त्याच फोनमध्ये होता. त्यातून सारं काही डिलीट केलेलं होतं.”
लोयांच्या मृत्यूच्या रात्रीसंबंधी आणि पुढील सकाळीसंबंधी बियाणींना अनेक प्रश्न आहेत. “लोयांना ऑटोरिक्षाने कसे आणि का नेले गेले. रविभवनपासून रिक्षास्टँड दोन किलोमीटर अंतरावर आहे.” त्या विचारतात, “रविभवनजवळ रिक्षा स्टँड नाही, दिवसाही तिथे रिक्षा मिळत नाही. त्याच्याबरोबरच्या लोकांना मध्यरात्री रिक्षा कशी मिळाली?”

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यांना हॉस्पिटलला नेत असतानाच कुटुंबियांना का कळवले गेले नाही? ते मरण पावल्याबरोबर लगेच का कळवले गेले नाही? पोस्टमार्टेम करायचे की नाही यासाठी संमती का घेतली गेली नाही किंवा ते करण्यापूर्वी निदान कळवण्यात का आले नाही? पोस्टमार्टेम करावे हे कुणी सुचवले आणि का? दंडे हॉस्पिटलमध्ये काय औषधोपचार केले गेले? लोयांना हॉस्पटलमध्ये घेऊन जाण्यासाठी विशेष अतिथीभवन असलेल्या रविभवनमध्ये एकही मोटरकार नव्हती का? तिथे नेहमी महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी, मंत्री लोक रहात असतात? ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू व्हायचे होते आणि त्यासाठी शेकडो अधिकारी पूर्वतयारीसाठी तिथे आधीच डेरेदाखल होतात. रविभवनात ३० नोव्हेंबर, १ डिसेंबर रोजी राहणाऱ्या इतर महत्त्वाच्या व्यक्ती कोण होत्या?- “हे सारे प्रश्न योग्यच आहेत,” सरोदे म्हणतात, “दंडे हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचारांचा रिपोर्ट कुटुंबियांना का देण्यात आला नाही? या प्रश्नांच्या उत्तरांमुळे कुणी अडचणीत येणार आहे की काय?”

बियाणी म्हणतात, “हे आणि असे अनेक प्रश्न आम्हा कुटुंबियांना, आप्तमित्रांना सतावत आहेत.”

लोयांना आग्रहाने लग्नासाठी नागपूरला घेऊन जाणारे न्यायाधीश त्यांच्या मृत्यूनंतर एक दीड महिन्यांनंतरच कुटुंबियांना भेटायला आले, ही गोष्ट त्यांना अधिकच बुचकळ्यात टाकते. लोयांच्या मृत्यूपूर्वीच्या त्यांच्या शेवटच्या घटकांसंबंधीचे त्यांचे कथन त्यांना एवढ्या काळानंतरच ऐकायला मिळाले. बियाणी सांगतात की, हे दोन सद्गृहस्थ त्यांना सांगत होते की लोयांना साडेबारा वाजता छातीत दुखू लागले. तेव्हा त्यांनी त्यांना रिक्षाने दंडे हॉस्पटलला नेले. तिथे ते स्वतः पायऱ्या चढले आणि मग त्यांना काही औषधे देण्यात आली. तिथून त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे पोहोचण्यापूर्वीच ते मृत झाल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. “दंडे हॉस्पिटलमध्ये काय उपचार केले गेले याचे तपशील आम्ही मागितले, तेव्हा तेथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी तपशील देण्यास सपशेल नकार दिला.” बियाणी सांगतात.

जीएमसी हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल मी मिळवला. या अहवालातून अनेक नवे प्रश्न उभे राहतात.

सदर पोलिस स्टेशनच्या सिनियर पेलिस इन्स्पेक्टरची सही प्रत्येक पानावर आहे आणि त्यासोबत एक सही ‘मयताचा चुलतभाऊ’ म्हणून नमूद केलेल्या कुणीतरी केली आहे. या कुणा इसमाला मयताचे शव पोस्टमॉर्टेमनंतर देण्यात आले असे दिसते. “मला नागपुरात कुणीही भाऊ वा चुलतभाऊ नाही,” लोयांचे वडील सांगतात, “या अहवालावर कुणी सही केली हा आणखी एक अनुत्तरित प्रश्न आहे.”

अहवालात असेही म्हटले आहे की, हे शव मेडिट्रिना हॉस्पिटलमधून जीएसी हॉस्पिटलला सीताबर्डी पोलिस स्टेशन नागपूर यांच्यामार्फत आले. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पंकज नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने ते आणले, त्याचा बिल्ला क्रमांक ६२३८ होता. त्यात असेही म्हटले आहे की, १ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १०.५० वाजता शव आणण्यात आले आणि पोस्टमार्टेम १०.५५ ला सुरू झाले.
अहवालात असेही म्हटले होते, की पोलिसांच्या सांगण्यानुसार लोया यांचा मृत्यू “१-१२-१४ रोजी सकाळी ०६.१५ वाजता झाला. ०४.०० वाजता त्यांच्या छातीत दुखू लागले होते.” पुढे म्हटले आहे “प्रथम त्यांना दंडे हॉस्पिटलमध्ये आणि मग मेडिट्रिनामध्ये नेले गेले, जेथे ते नेण्यापूर्वीच मृत झाले होते.” 

अहवालात लिहिलेली मृत्यूची वेळ आधीच्या माहितीशी विसंगत आहे, कारण लोयांच्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार त्यांना पहाटे पाच नंतर फोन यायला सुरुवात झाली. मी शोध घेत असताना, जीएमसी हॉस्पिटलमधील दोघांकडून आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमधून मला असे सांगण्यात आले की, त्यांना लोयांच्या मृत्यूची माहिती मध्यरात्रीच मिळाली होती आणि त्यांनी त्यांचे कलेवर मध्यरात्रीच पाहिले होते. पोस्टमार्टेमही मध्यरात्रीनंतर लागलीच कधीतरी करण्यात आले होते. कुटुंबियांच्या माहितीबरोबरच या सूत्रांकडून मिळालेली माहितीही पोस्टमार्टेम अहवालात नमूद केलेल्या पहाटे ६.१५ या वेळासंबंधी प्रश्न उपस्थित करते.

जीएमसीमधील एका सूत्राचा सहभाग पोस्टमार्टेममध्ये होता, त्याने सांगितले की त्यांच्या वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना होत्या की, “पोस्टमार्टेम झाले असे दिसावे अशा तऱ्हेने चिरफाड करा आणि शिवून टाका.” अहवालात कॉरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी असे मृत्यूचे संभाव्य कारण लिहिले आहे. मुंबईचे ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हसमुख रावत म्हणतात, “वृद्धत्व, कुटुंबातील हृदयरोगाचा इतिहास, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह या कारणांमुळे धमनी अशा प्रकारे अपुरा रक्तपुरवठा करू शकेल.” डॉ. बियाणी सांगतात की यातले काहीही त्यांच्या भावाला लागू होत नव्हते. “ब्रिज अठ्ठेचाळीस वर्षांचा होता,” त्या सांगतात, “आमचे आईवडील आता अनुक्रमे ८० आणि ८५ वर्षांचे आहेत. निरोगी आहेत आणि त्यांना हृदयविकार नाही. तो स्वतः दारूला शिवतही नसे, रोज दोन तास टेबल टेनिस खेळण्याचा त्याचा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता होता, त्याला मधुमेह नव्हता आणि उच्च रक्तदाबही नव्हता.”
डॉ. बियाणी मला सांगतात की, त्यांच्या भावाच्या मृत्यूसंबंधीचे अधिकृत वैद्यकीय स्पष्टीकरण त्यांना विश्वास ठेवण्यासारखे वाटत नाही. “मी स्वतः डॉक्टर आहे, आणि बारीकसारीक पित्त, कफाच्या तक्रारींसाठीही ब्रिज माझा सल्ला घेत असे,” त्या म्हणतात, “त्याला कधीही हृदयविकाराचा त्रास नव्हता आणि कुटुंबातील कुणालाही हा त्रास नाही.”

.............................................................................................................................................

लेखक निरंजन टकले यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. त्यांनी ‘सीएनएन-आयबीएन’ आणि ‘द वीक’ यांसह इतरही अनेक ठिकाणी काम केलं आहे.

अनुवाद - मुग्धा कर्णिक

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख  http://www.caravanmagazine.in या वेबसाईटवर २० नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Wed , 29 November 2017

News in todays Times Of India, I think this clears all doubts... https://timesofindia.indiatimes.com/india/no-foul-play-in-justice-loyas-death-family/articleshow/61842131.cms?from=mdr


ADITYA KORDE

Mon , 27 November 2017

news in indian express.... http://indianexpress.com/article/india/cbi-judge-bh-loya-death-amit-shah-sohrabuddin-case-nothing-suspicious-say-two-bombay-hc-judges-4956115/


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......