टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नित्यानंद राय
  • Tue , 21 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नित्यानंद राय Nityanand Rai आधार Aadhaar मानुषी छिल्लर Manushi Chhillar शशी थरूर Shashi Tharoor विश्व हिंदू परिषद Vishwa Hindu Parishad सुरेंद्र जैन Surendra Jain

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील खासदार नित्यानंद राय यांनी केलं आहे. असंख्य अडथळे पार करून मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींकडे बोट दाखवणाऱ्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप समर्थकांना केलं आहे. उजियारपूरमधून लोकसभेत निवडून गेलेले नित्यानंद राय म्हणाले की, मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजेत किंवा थेट कापले पाहिजेत.

घ्या आता, आणखी किती अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवं आहे या देशातल्या पुरोगाम्यांना? इथे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या चमचेगिरीमध्ये तिसऱ्या माणसाचे हात तोडण्याची भाषा करतो, त्याला कोणी अडवत नाही. एका प्रदर्शित न झालेल्या सिनेमात एका काल्पनिक व्यक्तिरेखेची बदनामी झालीच आहे, असं एकतर्फी ठरवून टाकून लोकांची डोकी छाटण्याचे, नाक कापण्याचे फतवे निघतात, त्याला सत्ताधारी समर्थन देतात, हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा परमोच्च आविष्कार नाही का? की एखाद्याचा हात, डोकं, नाक खरोखरच कापलं गेल्याशिवाय अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास बसणार नाही या पुरोगाम्यांचा?

.............................................................................................................................................

२. २१० सरकारी वेबसाइट्सवरून आधार कार्डांचा डेटा सार्वजनिक झाल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्य केलं आहे. विशेष म्हणजे या २१० वेबसाईट केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा त्यांच्याशीच संबंधित आहेत. त्यांच्याद्वारे आधारधारकांचं नाव, पत्ता, शहर यांसारख्या गोष्टींची माहिती लीक झाली आहे. माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आधार कार्डामधील माहिती किती सुरक्षित राहू शकते, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या बँक खाते, मोबाईल नंबर किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख ठरली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं सक्तीचं झालं आहे. अशात ही घटना घडल्यानं आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आधार कार्डासाठी दिलेली माहिती सुरक्षित नाही, हे समजून घ्यायला माहिती अधिकार कशाला वापरायला हवा? पानटपरीसारखी गचाळ आधार सेवा केंद्रं, ती चालवणाऱ्या मंडळींचे झोलर व्यवहार, आधार कार्डासाठी आकारली जाणारी अव्वाच्या सव्वा रक्कम आणि आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेतला भोंगळपणा पाहता आपली माहिती, अगदी बायोमेट्रिक ठशापासून सगळं काही, जग मुठीत घ्यायला निघालेल्या महत्त्वाकांक्षी कंपन्यांकडे ‘सुरक्षित’ पोहोचत असेल, यात शंका नाही. म्हणूनच तर सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं असतानाही बँका आणि मोबाइल कंपन्या आधार लिंकिंगचे बेकायदा संदेश पाठवून लोकांना घाबरवून सोडतायत.

.............................................................................................................................................

३. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. शनिवारीच मानुषीनं ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. मात्र शशी थरूर यांनी मानुषीच्या आडनावाची खिल्ली उडवली. छिल्लर हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडलं. ‘मोदी सरकारनं आमच्या काळात सुरू असलेलं चलन बंद केलं. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली,’ या आशयाचं ट्विट शशी थरूर यांनी केलं.

मिस वर्ल्ड किंवा अन्य सौंदर्यस्पर्धांच्या बाबतीत कोणाचंही काहीही मत असलं तरी त्यासाठी तयारी करणाऱ्या स्पर्धक अनेक प्रकारची तयारी करत असतात, मेहनत घेत असतात. मिस वर्ल्डचा किताब देशाला आणि त्या सुंदरीला अनेक नव्या क्षेत्रांची कवाडं उघडून देत असतो. थरूर यांच्या पक्षाच्या राजवटीच्या काळातच या स्पर्धांचा भारतातला दबदबा वाढलेला आहे. अशा वेळी आधीच गुलछबू आणि गुलहौशी अशी प्रतिमा असलेल्या थरूर यांनी इतकी थिल्लर प्रतिक्रिया देऊन चिल्लर पुढाऱ्यांशी बरोबरी करून दाखवण्याची गरज नव्हती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. लव्ह-जिहाद देशाच्या सुरक्षेपुढचे सर्वांत मोठं संकट आहे, असं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केलं आहे. पश्चिमेकडच्या देशात ‘लव्ह जिहाद’ला ‘रोमिओ जिहाद’ असं संबोधलं जातं. आपल्या देशात हा प्रकार वाढीला लागला आहे. लव्ह जिहादची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अनेक मुलींनी माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली आहे, असंही जैन यांनी स्पष्ट केलं. लव्ह जिहाद हे एक षडयंत्र आहे, वाममार्गाला गेलेल्या लोकांना यातून पैसा मिळतो असाही आरोप त्यांनी केला. देशात स्वतःला सेक्युलर मानणारा समाज लव्ह जिहादवर मूग गिळून गप्प आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका आध्यात्मिक परिषदेत लव्ह जिहादशी संबंधित काही पत्रकं वाटली गेली. हिंदू मुलींनी लव्ह जिहादच्या आहारी जाऊन त्यांचं आयुष्य पणाला लावू नये, अशा आशयाचा मजकूर या पत्रकांमध्ये होता. जे लोक शांतताप्रिय आहेत आणि गुण्यागोविंदानं राहतात, त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे संकट आहेच, मात्र यामुळे देशासमोरही मोठं संकट निर्माण झालं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जैन जागे झाले की कोणी कळवेल का? इतकी प्रत्ययकारी स्वप्नं त्यांना कशी पडतात, याचं संशोधन स्वदेशी वैज्ञानिकांनी करणं गरजेचं आहे. देशात लव्ह जिहाद म्हणण्यासारखी किती प्रकरणं घडली? दहशतवादी बनणारा मुसलमान मुलगा एक हिंदू मुलीशी लग्न करून नेमकं काय साध्य करतो? हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलं की, डायरेक्ट देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचतो, असं सांगण्याला काही आकडेवारीचा आधार आहे का? एकदा या तथाकथित लव्ह जिहादला आळा घातला की, ही मंडळी आंतरजातीय विवाहांकडे वळतील आणि उच्चजातीच्या मुलींनी मागासवर्गीय मुलांबरोबर लग्न करणं हा जातीय जिहाद म्हणून सांगू लागतील.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......