अजूनकाही
सध्या देशात जो जे वांछिल ते तो लाहो असा माहोल आहे. प्रत्येकालाच काहीतरी म्हणायचंय. ऐकायचं कुणालाच नाही. त्यामुळे एक अभूतपूर्व असा गलबला देशात सुरू आहे.
डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे एक सुलभ चित्र शालेय पुस्तकात असायचं- माकडाचा माणूस होण्याचं. सध्याच वातावारण बघता त्या चित्राचं उलट क्रमानं वाचन चालू आहे असं वाटतं. ‘आपलं माकड झालं’ हा विनोदानं वापरायचा वाक्प्रचार आता बोधवाक्याइतका गंभीर बनलाय.
२०१४नंतर देशात राष्ट्रप्रेमाची साथ आली. ती इतकी जबरदस्त आली की, १८५७ किंवा १९४२ मध्येही तेवढी धग जाणवली नव्हती. त्यातून मग राष्ट्रगीत, गान म्हणणं न म्हणणं, तिरंगा ध्वजदंड काहीशे फूट उंचीचा उभारणं असे प्रकार सुरू झाले. साथीच्या रोगासारखा त्याचा प्रादूर्भाव झाला. तसं राष्ट्रप्रेम वाईट नाही, उलट ती प्राथमिकताच असायला हवी, कुणाही नागरिकाच्या आचारविचारात. पण त्याच्या जाहीर प्रदर्शनाची सक्ती, आदेश याचा जो काही धुरळा उडवला गेला, की वाटावं ‘जगावं की मरावं’ या धर्तीवर ‘राष्ट्रप्रेम की राष्ट्रद्रोह?’ एवढा एकच सवाल उरला.
त्यानंतर आता अनेक नागरिकांना, नागरी समूहांना अस्मितेची एक अधिकची ग्रंथी अक्कल दाढेसारखी प्रौढ वयात आलीय. जठरात जसा जठराग्नि पेटतो, तसा या अस्मितेच्या ग्रंथीत अस्मितेचा लाव्हा असा उसळतो की, संपूर्ण रक्तच अस्मितेनं रंगून जातं. आणि मग अस्मितेसमोर सगळंच फिकं पडत जातं असं वाटतं. अखंड विश्वात, अंतराळात आता फक्त अमुक एक अस्मिताच व्यापून राहिली आहे. आणि मग माझी अस्मिता की तुझं अस्तित्व, या सवालातून निर्माण होणारी युद्धसदृश्य परिस्थिती पुढच्या सेकंदात सर्वनाश होईल की काय अशी स्थिती.
साधारण विवेक जागृत असलेल्या, पंचेंद्रिये मेंदूसकट शाबूत असलेल्या आणि त्याच्या सकारात्मक मानवी जीवनाप्रती वापर करण्याची जिगिषा असलेल्या कुणाही मनुष्याला आपल्याच मेंदूत काही बिघाड झालाय का, हे तपासून बघायची वेळ यावी असा हा सध्याचा काळ.
पृथ्वीवर घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीमागे काही कार्यकारणभाव असतो असं विज्ञान म्हणतं. तर ती सगळी निर्गुण निराकाराची सदिच्छा असं धर्म म्हणतो. तत्त्वज्ञान विज्ञानाची कास धरतानाच, त्याला अध्यात्मातही बुडवून काढतं. सध्या जे वातावरण निर्माण झालंय, त्याची सुस्पष्ट कारणं किमान विचार करणाऱ्या माणसाच्या सहज लक्षात यावीत.
एकविसावं शतक सुरू झालं आणि विज्ञान-तंत्रज्ञानानं दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती केली. नवी माध्यमं जन्माला आली. म्हणजे त्यातली अनेक या जगात आधीच आली होती. भारतात ती या कालखंडात आली. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमं. सध्या देशात जे वातावरण आहे, त्याची निर्मिती करण्यात, त्याला खतपाणी घालण्यात आणि त्याचा विधिनिषेधशून्य वापर या दोन माध्यमांतून केला जातोय. या दोनपैकी एका माध्यमावर सरकारचा मर्यादित अंकुश आहे. ते माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं. त्यातही वृत्तवाहिन्या, ज्या चोवीस तास चालतात. दुसरं माध्यम जे सध्या ‘सोशल मीडिया’ नावानं ओळखलं जातं. आणि संगणकापासून मोबाईल फोनपर्यंत क्षेत्र असलेलं आणि त्या अर्थानं कुणाचंच नियंत्रण नसलेलं असं हे माध्यम. त्याला आता सायबर क्राईम या व्याख्येत बसवून नियंत्रणात आणण्याचा खटाटोप सुरू आहे. पण या माध्यमाची अंगभूत वैशिष्ट्यं पाहता, तो यशस्वी होण्याची शक्यता जवळपास शून्य.
काय केलंय या दोन माध्यमांनी की, ज्यामुळे आजचं हे वातावरण तयार झालं असं म्हणता येईल? यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे, त्यातल्या वृत्तवाहिन्या वा वर्तमानपत्रं या प्रसारमाध्यमांचं आधुनिक तंत्रदृष्ट्या प्रगत रूप म्हणता येईल. छापील बातमी रेडिओच्या माध्यमातून श्रवण स्वरूपात प्रसारित होऊ लागली तर वृत्तवाहिन्यांमुळे ती दृक-श्राव्य स्वरूपात प्रक्षेपित होऊ लागली. वर्तमानपत्राचा कालावधी (आजही) जवळपास २४ तासांचा आहे. म्हणजे आवृत्ती, नवा अंक निघण्याची वेळ. तर रेडिओवर ती सुरुवातीला दिवसातून (२४ तासांचा दिवस असं धरून) दोन-तीन बुलेटिन प्रसारित होत. त्यातूनही सकाळ व संध्याकाळच्या बातम्या या (आजही) लोकप्रिय आहेत. वृत्तवाहिन्या आल्या आणि त्यांनी २४ तास अखंड बातमी दाखवायला सुरुवात केली. हे मूळ वर्तमानपत्राच्या अगदी उलट होतं.
संगणक आणि मोबाईल फोनच्या वाढच्या प्रचार\प्रसारानंतर ‘सोशल मीडिया’ नावाचा एक वेगळाच अक्राळविक्राळ, ऑक्टोपसारखा आणि अमिबासारखा मीडिया तयार झाला. यावर कुणाचंच नियंत्रण नसल्यानं तो वृत्तवाहिन्यांसारखाच २४\७चालू राहतो, पण वृत्तवाहिन्या आज किमान दोन-चारशे भरल्यावर शक्यतो घरच्या दूरचित्रवाणी संचावर बघायची सवय आहे, ८०-९० टक्के लोकांना. पण सोशल मीडिया मोबाईल फोनमुळे श्वास किंवा नाडीच्या ठोक्याप्रमाणे अविरत चालू राहतो. ब्रिदिंग आणि पल्स इतकाच तो अविभाज्य झालाय.
या दोन माध्यमांच्या या ज्या अफाट तांत्रिक क्षमता आहेत, तेच त्यांचं सामर्थ्य ठरलं आणि त्यांना अध:पतित करणारंही.
२४ तास वृत्तवाहिन्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा, सुरुवातीला सगळ्यांनाच हे नवीन माध्यम पसंत पडलं. दिवसभरात कुठेही, कहीही घडलं किंवा एखाद्या घटनेची तासागणिक, मिनिटागणिक, सेकंदागणिक जी नवनवी माहिती मिळत होती, त्यामुळे खूपच अपडेट वाटायला लागलं सर्वांना. पण सर्वच मास मीडियाचं एक अर्थकारण असतं. आणि ते जाहिरातींवर अवलंबून असतं. त्यावर त्या माध्यमाची वाचक\दर्शकाला जी किंमत मोजावी लागते ती ठरते. वर्तमानपत्राच्या मानानं वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाला येणारा खर्च हा काहीशे कोटीत असल्यानं त्यांना उत्पन्नाचं साधन जाहिरातीतूनच वाढवायला लागलं आणि जाहिरातासाठी दर्शक संख्या वाढवणं हेही आलंच. दिवसाला वाचक मिळवणं या तुलनेत प्रत्येक सेकंदाला दर्शक मिळवणं, हे अधिक कठीण पण अत्यावश्यक.
आणि इथूनच मग आपण आजच्या स्थितीला येऊन पोहचलोय. आज या वृत्तवाहिन्यांना १० ते १५ वर्षं झाली. या वाहिन्या वर्तमानपत्रं बंद पाडतील अशी भाकितं होती. पण झालं उलटंच. वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या वाढल्या, तर वाहिन्यांचा उद्योग आतबट्ट्याचा होऊ लागला. खर्च आणि उत्पन्न यांचं प्रमाण व्यस्त होत गेलं आणि मग बातमी जन्माला घालणं, वेळ विकणं, यासोबतच ब्रेकिंग न्यूज खाली किंवा ‘आमच्या वाहिनीवर प्रथम’ या स्पर्धेतून वाहिन्या विकावू झाल्या. नंतर स्पर्धेत त्यांचा बाजार इतका गडगडला की, फाके पडायची वेळ आली आणि इथेच ‘अस्मितावाले’ त्यांच्या मदतीला धावून आले!
यातून सुरू झालं मग विकृत राजकारण, समाजकारण, संस्कृतिकरण. जोडीला नुरा कुस्तीसारखा रोज एक विषय घेऊन त्यावर वाद घालायचा. विवादास्पद विषय निवडायचा किंवा निवडलेला विषय विवादास्पद करायचा! आम्हा भारतीयांना बोलण्याची, ऐकवण्याची अथवा सदेह दिसण्याची फार हौस. नाटक विशेषत: सिनेमातल्या नटनट्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आमची हौस आजही दांडगी. आपण टीव्हीवर दिसू या इच्छेनं अनेक आंदोलनांनी जन्म घेतला. सुरुवातीला घटनास्थळी कॅमेरा पोहचायचा, नंतर कॅमेरा घटनास्थळ तयार करू लागला. पुढे दिसायचं तर मग साधंसुधं का दिसा? यातून मग फोटोंना जोडे मारणं, त्यावर थुंकणं असे प्रकार सुरू झाले. झाडावर, टाकीवर चढणं, मुंडण करणं, जाळून घेणं, कपडे काढणं असा कल्पकतेतून विकृतीकडे प्रवास सुरू झाला. सुरुवातीला घटना, प्रतिक्रिया याबाबत तारतम्य होतं. नंतर मग बातमीसाठी कायपण आणि कोणीपण सुरू झालं. याचं टोक म्हणजे दीपिकाचं नाक कापा, भन्साळीचा गळा चिरा, चित्रपटाचीच दशक्रिया उरका… धर्म, जात, लिंग, प्रदेश, भाषा यांपैकी कुठलीही अस्मिता या ग्रंथीला जन्म देत्या झाल्या आणि या ग्रंथी वृत्तवाहिन्या व सोशल मीडियानं गजकर्णासारख्या खाजवून वाढवत ठेवल्या.
आज कुठलीच वाहिनी या पापातून मुक्त नाही. व्यावसायिक नीतिमत्ता तर लिलावातच काढलीय, पण विवेकबुद्धीही खुंटीला टांगलीय. पत्रकारितेचा बँड वाजवत, भाडोत्री बाजावादन आणि ‘बेगानी शादी में बाराती...’ ही अवस्था आणलीय.
सध्याच्या ताज्या वादात ‘सिनेमावाले’ सापडलेत. ‘पद्मावती’वरून रजपूत भडकले, ‘दशक्रिया’वरून ब्राह्मण संतापले; ‘न्यूड’, ‘सेक्सी दुर्गा’ वगळले म्हणून सिनेमावाले हातघाईवर आले. हे सर्व चर्वितचर्वण वृत्तवाहिन्यांनी नेहमीप्रमाणे रवंथ केलं.
वर्तमानपत्र रंगीत झाली नव्हती, त्या काळ्या शाईच्या काळात पत्रकारितेत येणाऱ्या नव्या उमेदवारास पहिला धडा शिकवला जाई तो असा की, ‘कुत्रा माणासाला चावला तर बातमी नाही, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी!’ बातमीचं मूल्य किती अमूल्य आहे हे सांगणारं हे एक टोकाचं उदाहरण आहे. पण वृत्तवाहिन्यांनी ते शब्दश: खरं मानलं. त्यांनी कुत्रा माणसाला चावला याची बातमी केलीच, पण प्रसंगी माणूस कुत्र्याला चावून बातमी देईल अशीही व्यवस्था केली! जेवढं विकृत तेवढी मोठी बातमी. अंधश्रद्धा, भूतप्रेत, जारणमारण… काहीच शिल्लक ठेवलं नाही यांनी. आणि सोशल मीडियाच्या हातात हात घालूनच चालण्याचा पणच केलाय या वृत्तवाहिन्यांनी.
आता तुम्ही एखादी वृत्तवाहिनी २४ तास नीट पाहिली तर त्या २४ तासात नव्या बातमीचे दोन तासही भरणार नाहीत. बाकी सगळं रिपीटेशन! पुन्हा प्रायोजित कार्यक्रम. टॉक टाईम किंवा आरोग्य कर, कायदा, वास्तूसल्ला वगैरे तर ७०-७५ हजार मोजून डॉक्टर, सीए, वास्तुतज्ज्ञ अर्धा तास विकत घेतात. नाव मात्र आरोग्य सल्ला! याशिवाय टेलिशॉपिंग, प्रायोजित कार्यक्रम असतातच.
दृश्य माध्यमात काम करणाऱ्या या लोकांकडे धड ताजी फुटेज नसतात. नेत्यांच्या बातम्या देताना, चित्र मात्र गाडीतून उतरताना वगैरेचे, तेही पुन्हा पुन्हा तेच. शिवाय त्यावर संग्रहित असं दाखवण्याची नैतिकता जवळपास नाहीच. वृत्तवाहिन्यांना सोशल मीडियाची कळा-अवकळा आलेली आहे. त्यांचे बाजारूपण आता सर्वसामान्य दर्शकाच्याही सहज लक्षात येऊ लागलं आहे. पत्रकारितेची खरी शपथ जनाची नाही, पण मनाची म्हणून तरी अधूनमधून आठवावी एवढी सुबुद्धी त्यांना लाभो.
आजवर या देशाला हिंदी सिनेमा वा क्रिकेट जोडून ठेवणारे दुवे समजले जायचे. सिनेमाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात अनेक सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक विषयावर चित्रपट आले गेले. हिंदू-मुस्लिम, स्पृश्य-अस्पृश्य, वेश्या-परित्यक्त्या, पोलिस-गुन्हेगार असे असंख्य विषय पडद्यावर येऊन गेले. पण ना कुणाची अस्मिता दुखावली, ना इतिहासाची मोडतोड झाली, ना जातीचा अपमान वाटला, ना कुणाला व्यावसायिक शिंतोडे वाटले. ‘संत तुकाराम’मधल्या मंबाजीने ना ब्राह्मण दुखावले की ‘ताजमहाल’मधली अवीट गाणी ऐकताना कुणाला त्यात ‘तेजोमहाल’ दिसला नाही. मुघल आझममध्ये इतिहासाची मोडतोड झाली हे कुणी तपासलं नाही. असंख्य उदाहरणं देता येतील. पण कुणी ही उठावं आणि टपली मारून जावं आणि सोशल मीडियासह वृत्तवाहिन्यांनीही २४ तास दाखवावं, यातून आजहा हा काळ झालाय!
परवा मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी अर्धी दाढी करून ठेवतात, असा नेहमीचा वाक्प्रचार कम प्रघात बोलून दाखवला तर नाभिक संघटनेनं निषेध करून माफी मागा म्हटलं. मुख्यमंत्र्यांनीही ती लेखी मागावी लागली. ते पत्र वृत्तवाहिन्यांवर झळकलं. स्वत: गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांची ही गत, तर मग इतरांची काय कथा!
सबंध देशात पत्रकारितेचा वसा, कठोर व्रतासारखा उपयोगात आणणारा ‘एनडीटीव्ही इंडिया’चा एकमेव रवीशकुमार म्हणतो ते सगळ्यांनीच गंभीरपणे घ्यायला हवं.
रवीश म्हणतो – ‘बातों को बारिकी से समझो, सोचो और जितना हो सके टीव्ही कम देखा करो.’
.............................................................................................................................................
संजय पवार यांच्या ‘चोख्याच्या पायरीवरून’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4203
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Tue , 21 November 2017
सबंध देशात पत्रकारितेचा वसा, कठोर व्रतासारखा उपयोगात आणणारा ‘एनडीटीव्ही इंडिया’चा एकमेव रवीशकुमार म्हणतो ते सगळ्यांनीच गंभीरपणे घ्यायला हवं. हे लय भारी होतं....That was Epic...