अजूनकाही
कर्नाटकातील हम्पी इथं एकेकाळी विजयनगरचं फार मोठं साम्राज्य होतं. राजा कृष्णदेवराय यांच्या राजवटीत या साम्राज्याची एवढी भरभराट झाली होती की, त्याची कीर्ती जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचली होती. मात्र कालांतरानं परकीय आक्रमणाच्या लाटेत या साम्राज्याची धूळधाण झाली. आज त्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात. हम्पी या राजधानीच्या शहरातील हे भग्नावशेष पाहायला आजही हजारो पर्यटक दरवर्षी येतात.
या शहराच्या पार्श्वभूमीवर भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सांगड घालणारी एक प्रेमकथा लेखिका अदिती मोघे यांना सुचली आणि ती दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी 'हम्पी' याच नावानं मोठ्या पडद्यावर आणली आहे.
'हम्पी' या चित्रपटातील प्रेमकथेत फार मोठं नाट्य नाही, मात्र भूतकाळाच्या साक्षीनं सादर केलेली वर्तमानातील ही प्रेमकथा हम्पी शहराच्या पार्श्वभूमीवर दाखवण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा हेतू बऱ्याच प्रमाणात सफल झाला आहे. किंबहुना या प्रेमकथेला ही पार्श्वभूमी असल्यामुळेच हा चित्रपट बराच सुसह्य झाला आहे असं म्हणावं लागेल. अर्थात ही प्रेमकथा 'भग्न' नाही, तर सकारात्मक विचारांना चालना देणारी आहे.
या चित्रपटात 'इशा' (सोनाली) या मॉड तरुणीची कहाणी चित्रित करण्यात आली आहे. ती आणि तिची मैत्रीण गिरीजा (प्राजक्ता माळी) या दोघी खास पर्यटन करण्याच्या हेतूनं 'हम्पी'ची निवड करतात. मात्र ऐनवेळी गिरिजा येतच नाही. त्यामुळे इशा एकटीच हम्पीला येते. ती ज्या हॉटेलमध्ये उतरलेली असते, तिथंच तिची ओळख कबीर (ललित प्रभाकर) या तरुणाशी होते. कबीर हा उच्चशिक्षित असून चांगला फोटोग्राफर असतो. हम्पीला आलेल्या इशाची मानसिक अवस्था मात्र वाईट आहे. कारण तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असतो. २८ वर्षाच्या संसारानंतर तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्या इशाचा मानवी नात्यांवरचा विश्वास उडालेला असतो. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा अधिक लबाड आणि क्रूर आहे असं तिचं मत बनलेलं असतं. भूतकाळातील काही गोष्टी विसरायला इशा अजिबात तयार होत नाही.
याउलट, कबीर भूतकाळातील काही गोष्टी विसरून वर्तमानकाळातील घटनांचा आनंद घे, असं तिला सारखं सांगत असतो. मात्र ते तिला फारसं रुचत नाही. तरीही कबीरच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी होतं, हे तिलाच कळत होत नाही. त्याच वेळी गिरीजा हम्पीला येते. त्यामुळे कथेत प्रेमाचा त्रिकोण निर्माण होतो की, काय अशी शंका येऊ लागते. पण तसं न होता कथेला वेगळी कलाटणी मिळते. भूतकाळ आणि वर्तमानकाळावरून एके दिवशी इशा-कबीर यांच्यात वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक कबीर हॉटेल सोडून गेल्याचं कळतं. त्यामुळे इशाची शोधाशोध सुरू होते. तिला कबीर पुन्हा मिळतो की नाही हे पाहण्यासाठी 'हम्पी' पाहायला हवा.
मात्र या प्रेमकथेत थोडं तरी नाट्य हवं होतं. इशाच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचं कारण तरी कोणतं आणि त्यामुळे तिचा मनुष्यजातीवर एवढा रोष का, हे पाहिजे तेवढं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. नुसत्या संवादातून ते पुरेसं स्पष्ट होत नाही.
.............................................................................................................................................
‘हाऊ द बीजेपी विन्स’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285
.............................................................................................................................................
मध्यंतरापर्यंत तर कथेत कोणतंच नाट्य घडत नाही. इशा-कबीरचा केवळ संवादातून लपंडाव चालू होतो. त्यामुळे चित्रपट खूप संथ वाटतो. मध्यंतरानंतर कथेत गिरिजाचं आगमन होतं आणि कथेला थोडा वेग येतो, मात्र कथेला प्रेमाच्या त्रिकोणाची कलाटणी मिळते की काय अशी शंका येत असतानाच कबीरचं अचानक बेपत्ता होणं कथेची उत्कंठता वाढवतं, पण तेवढ्यापुरतीच. त्यातला त्यात संपूर्ण चित्रपटात हम्पी शहराच्या भग्नावस्थेचं का होईना, पण सुंदर दर्शन घडवण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपट पाहणं खूपच सुसह्य होतं. त्यासाठी छायादिग्दर्शक अमलेंदू चौधरी यांचं खास कौतुक करायला हवं.
या चित्रपटात शंकर नावाचं एक बहुरुप्यासारखं पात्र आहे. तेही इशाला विनोदी पद्धतीनं का होईना, पण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतं. शिवाय केवळ संवादातून इशाचं मानसिक परिवर्तन करून भूतकाळ विसरून वर्तमान जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करणं, यासाठी कबीर हा मानववंश शास्त्राचा पदवीधर दाखवणं हे कथेशी सुसंगत वाटतं.
सोनाली कुलकर्णी (इशा), प्राजक्ता माळी (गिरीजा) आणि ललित प्रभाकर (कबीर) या तिघांचीही कामं चांगली झाली आहेत. विजय निकम (शंकर), प्रियदर्शन जाधव (रिक्षावाला कम गाईड) यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. थोडक्यात कथेपेक्षा कॅमेऱ्यातून टिपलेलं हम्पीचं सौंदर्यच अधिक खुलून दिसलं आहे. त्यासाठी तरी हा चित्रपट पाहायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment