खूप लोक ‘नोटा’कुटीला आले!
संपादकीय - संतापकीय
संपादक अक्षरनामा
  • दै. सामनाची १० नोव्हेंबरची हेडलाइन
  • Sat , 12 November 2016
  • काळा पैसा पाचशे हजार नोटा Kala Paisa ५००-१००० Nota

- नोटा बदलण्यासाठी बँकाबाहेर रांगाच रांगा

- नोटा बाद करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

- २ हजाराच्या नोटेसोबत सेल्फी काढण्याचं वेड

- मथुरा-वृंदावनमधील मंदिरात नोटा दानपेटीत न टाकण्याचं भाविकांना आवाहन

- तिरुपती बालाजी मंदिरात दानशूर भक्तांसाठी क्रेडिट-डेबिट कार्ड मशीन्स उपलब्ध

- नव्या नोटांची नक्कल करणं पाकला अशक्य

- पाचशेच आहेत, दंड घ्याच, पुणेकरांची वाहतूक पोलिसांशी हुज्जत

- कोर्टानेही हजाराची नोट नाकारली, जामीन मिळूनही आरोपी जेलमध्येच

- चोरलेल्या पाकिटात ५००च्या नोटा, शंभरची नोट नसल्याने मालकाला मारहाण

- पाचशे-हजाराच्या नोटा रद्द झाल्याचा धसका, हार्ट अटॅकने एकाचा मृत्यू

- मुख्यमंत्र्यांच्या ‘झटक्या’नंतर महावितरणही स्वीकारणार ५००, १००० रुपयांच्या नोटा

- देशाच्या भल्यासाठीच पाचशे, हजारच्या नोटांवर बंदी – मद्रास हायकोर्ट

- ५०० आणि १०००च्या नोटा देऊ भरा शासकीय कर

- सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे साईभक्तांना मोफत जेवण

- ५००-१०००च्या नोटा रद्द केल्याने नाट्यगृहे-थिएटरही ‘व्हेटिंलेटर’वर

- कार्तिकी सोहळ्यातील भाविकांना नोटा बदलून द्या : जिल्हाधिकारी

- मोदींच्या आर्थिक सर्जिकल स्ट्राईकमुळे तब्बल ३ लाख कोटींचा काळा पैसा नष्ट

- रद्द नोटा खड्डे भरण्यासाठी वापरल्या जाणार

- २.५० लाखापेक्षा जास्त डिपॉझिटवर टॅक्स आणि बेहिशोबी आढळल्यास २०० टक्के दंड

- फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरही नोटबंदी

- भारतीय नोटा बंद, पाकवर संक्रांत

- पाचशे, हजार रुपयांच्या नोटांसंदर्भातील याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली

- पाणी, वीज, मालमत्ता करासह इतर देयकांसाठी ५००, १०००च्या नोटा स्वीकारणार

- नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

- ५००-१०००च्या नोटांवरील बंदीमुळे महिलेची आत्महत्या

- नोटारांगेचे दोन बळी

गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांचे हे काही मथळे. या मथळ्यांतून सध्या देशभर कशाची चर्चा सुरू आहे आणि देशातील सर्वसामान्य नागरिक कशाला तोंड देत आहेत, याचा अंदाज येतो.

मंगळवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनातून ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा अचानक बाद ठरवल्या. रात्री नऊच्या सुमाराला त्यासंदर्भातील मोदींचे देशाला उद्देशून भाषण सुरू झाले. तेव्हा सोशल मीडियावर त्याचे स्वागत केले गेले. भाजप सत्तेत आल्यापासून स्वीस बँकेतील काळा पैसा परत आणण्याविषयी सातत्याने प्रयत्नशील होते, पण एका मर्यादेबाहेर त्यात त्यांना फारसे यश आले नाही. मात्र देशामध्येही मोठ्या प्रमाणावर काळा पैसा असून तो भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. सोने-चांदी खरेदी, बांधकाम व्यवसाय आणि शेअर मार्केट यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जातो. काळ्या पैशाची निर्मिती ही बहुतांश धनावन वर्गच करत असल्यामुळे ५००-१०००च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभर आनंदाची लाट पसरली. तसेही सध्या देशात राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित यांचा ज्वर चढत असल्यामुळे अनेकांना या निर्णयाने मोदी यांच्या धाडसीपणाचे कौतुकच वाटले. निर्णय जाहीर झाल्या झाल्या लोकांनी एटीएमसमोर रांगा लावल्या. पण पाचशेच्या नोटा रद्द केल्याने एका वेळी ५०० रुपये काढले तरच शंभराच्या पाच नोटा येत होत्या. त्यामुशे प्रत्येक जण दोन वेळा पाचशे रुपये काढत होता. रांगेत उभ्या राहिल्या राहिल्या लोक जर्मनीत १९२० साली असाच निर्णय जाहीर झाला, तेव्हा कशी गडबड उडाली हे चवीचवीने सांगत होते. कुणी १९७८मध्ये मोरारजी देसाई यांनी एक हजार, पाच हजार आणि दहा हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्या आठवणी सांगत होते. एकंदर लोकांच्या प्रतिक्रिया फारशा नापसंतीच्या नव्हत्या.

मात्र गेल्या तीन दिवसांत या निर्णयाचे कौडकौतुक ओसरत चालले आहे. कारण गेले तीन दिवस लोकांना सकाळपासून बँकेसमोर रांग लावावी लागत आहे. एटीएम बंद आहेत. शनिवार-रविवार बँका सुरू राहणार असल्यातरी बँकेतील कर्मचारी वर्ग तेवढाच आणि बँकेत येणाऱ्यांची संख्या मात्र नेहमीपेक्षा कैक पट अशी अवस्था आहे.

या परिस्थितीचे अचूक वर्णन दै. सामनाने ‘लोक ‘नोटा’कुटीला आले!’ आणि ‘आर्थिकी एकादशी’ अशी अतिशय समर्पक शीर्षकांतून व्यक्त केले. केवळ मराठीमध्येच नाहीतर इंग्रजी वर्तमानपत्रांच्याही तुलनेत ‘सामना’च्या दोन्ही दिवशीच्या पहिल्या पानावरील बातम्यांची ही शीर्षके सर्वोत्तम म्हणावी अशी आहेत. सतत शाब्दिक कसरती करत राहिल्याने अनावश्यक इतका सराव होऊन आणीबाणीच्या वेळी शब्दच सुचेनासे होऊ शकतात, हा धडा यातून घेता येण्यासारखा आहे. असो.

मोदींनी नोटा रद्द करण्याचा निर्णय कमालीच्या गुप्तरीतीने घेतला असे सांगितले जात असले तरी आता त्यातील बिंग फुटू लागले आहे. भाजपच्या काही नेत्यांकडे नव्या नोटा मोदींनी रद्द करण्याच्या आधीच पोहचल्या असल्याची छायाचित्रे जाहीर झाली आहेत.

‘अकिला’ या गुजराती वर्तमानपत्राने तर १ एप्रिल २०१६ रोजीच ५००-१००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्या असल्याची बातमी ‘एप्रिल फूल’ म्हणून छापली होती. अवघ्या आठ महिन्यातच प्रत्यक्षात येणारी घटना एखाद्या वर्तमानपत्राला विनोदाने सूचावी आणि असे वर्तमानपत्र गुजरातमधीलच असावे, हा योगायोग ‘योगायोग’ वाटू नये!

मोदींनी निर्णय तर जाहीर झाला पण नवे चलन बँकाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते हेही आता उघड झाले आहे. कुठल्याही बँकेच्या एटीएममध्ये काल संध्याकाळपर्यंत ५००-२०००च्या नव्या नोटा आलेल्या नव्हत्या. त्यामुळे ती बंदच आहेत. आता अशी बातमी आहे की, नव्या नोटांचा आकार आधीच्या नोटांपेक्षा वेगळा असल्याने त्या एटीएममध्ये बसण्यासाठी त्यात काही बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी अजून काही वेळ जावा लागणार आहे. म्हणजे या संभाव्य संकटाचाही विचार केला गेला नव्हता. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, बँकांसमोर लागणाऱ्या रांगा अजून काही दिवस थांबवण्याची शक्यता नाही.

आता या धाडसी निर्णयातील उणिवा समोर येऊ लागल्या आहेत. नोटांच्या रद्दीकरणाचा निर्णय मंगळवारी रात्री मोदींनी जाहीर केल्याबरोबर सोन्याच्या भावामध्ये वाढ झाली. काळा पैसा बाहेर येण्याऐवजी सोन्यामध्ये जाऊन बसू लागला. कुठल्याही व्यापारात बनावट ग्राहक दाखवता येणे कठीण नसते. आणि सोन्याला भारतीय परंपरेमध्ये मोठे स्थान असल्याने ‘सोना हे सदा के लिए’ म्हणत सोनेखरेदीने जोर पकडला. साईबाबा-तिरुपती बालाजी यांच्याविषयीचे प्रेमही त्यांच्या दानशूरभक्तांमध्ये वाढीला लागले आहे. बिल्डरलॉबी धास्तावली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडील काळा पैसा सरकारजमा व बँकेमध्ये जमा करून, टॅक्स भरून तो पांढरा करण्यासाठी फारसे कुणी पुढे आलेले नाही, हे लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजे मोदींच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ला काळापैसेवाले ‘मॅजिकल स्ट्राईक’ने उत्तर देण्याच्या मागे लागले आहेत. या दोन्हींशी जनसामान्यांना फारसे देणे-घेणे नाही. सरकार आणि काळापैसेवाले यांच्यामध्ये जनसामान्यांचे जगणे मात्र त्राहीमाम होत चालले आहे. लोक खरोखरच ‘नोटा’कुटीला येत चालले आहेत! दरम्यान सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले गेले आहे. तेही दोन वकिलांनीच दिले आहे. जनहितयाचिका नावाच्या उपयुक्त साधनाचा हल्ली अनेक जण हत्यार म्हणूनच वापर करू लागले आहेत. त्याचा हा अजून एक पुरावा. सरकारने त्यावर घाईघाईने कॅव्हेट दाखल केले असले तरी जनसामान्यांतला असंतोष सरकारविरोधात जाऊ लागला आहे. कुठलाही धाडसी निर्णय वा कृती ही बूमरँग होणार नाही ना याचीही शक्यता विचारात घ्यावी लागते. ती घेतली तर आपल्या निर्णयावरून हात-पाय पोळण्याची शक्यता कमी असते. मोदी सरकारच्या निर्णय स्तुत्य असला तरी तो फारसा व्यवहार्य नव्हता, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. आणि व्यवहार्य नसलेले निर्णय न्याय्यही नसतात.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......