भारतीय सिरिअल किलर्स : सिनेमॅटिक क्षमता असणारा पण नीट हाताळला न गेलेला विषय 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • नेटफ्लिक्सवरच्या 'माइंडहंटर' या टीव्ही सिरीजचे पोस्टर
  • Sat , 18 November 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar नेटफ्लिक्स Netflix माइंडहंटर Mindhunter सिरिअल किलर serial killer

नेटफ्लिक्सवरची 'माइंडहंटर' ही टीव्ही सिरीज सध्या खूप लोकप्रिय आहे. सिरिअल किलर्सशी बोलून, त्यांच्या मनाचा धांडोळा घेऊन त्यांच्या वर्तणुकीमागच्या प्रेरणा काय आहेत, यावर संशोधन करणाऱ्या एका स्पेशल एफबीआय युनिटची कथा यात दाखवली आहे. सिरिअल किलर्स हा विषय संशोधनाचा वाटावा इतका रोचक नक्कीच आहे. कारण लूटमार, बलात्कार असा हेतू बहुतेक सिरिअल किलर्स जे खून करत असतात त्यामागे नसतो.

क्रिमिनल सायकॉलॉजि नावाची मानसशास्त्राची एक शाखा आहे. गुन्हेगारांच्या वर्तणुकीमागच्या मानसशास्त्राचा अभ्यास ही शाखा करते. त्या शाखेमध्ये जे संशोधन झालं आहे, त्यानुसार सिरिअल किलर्स हे 'गॉड कॉम्प्लेक्स'नं पछाडलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की, सर्वसामान्य माणसाला लागू असणारे नियम त्यांना लागू पडत नाहीत. अनेक सिरिअल किलर्सनी आपल्या कृष्णकृत्यांचा कबुलीजबाब देताना पोलिसांना असं सांगितलं होतं की, देवच त्यांना असं काम करण्याच्या सूचना देत होता. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य आपल्या कृत्यावर निर्भर आहे याची जाणीव त्यांना 'कीक' देते.  

निरपराध अनोळखी माणसांना मारण्यामागे अशा प्रकारे अधिभौतिक नव्हे, तर मानसिक प्रेरणा कार्यरत असतात. आपण काही निष्पाप लोकांचा जीव घेतला आहे, या पश्चातापाचा लवलेशही त्यांच्या वागण्याबोलण्यात नसतो, असा त्यांची उलटतपासणी करणाऱ्या पोलिसांचा अनुभव आहे. डेनिस रेडर उर्फ बीटीके या सिरिअल किलरचं उदाहरण बघण्यासारखं आहे. तो आपल्या बळींना बांधायचा आणि त्यांना हालहाल करून मारायचा. या त्याच्या मोडस ऑपरेंडीमुळे त्याला बीटीके (BTK –Bind,Torture, Kill) असं नाव पडलं होतं. तर या बीटीकेनं तब्बल दहा लोकांचा अतिशय निर्घृण छळ करून त्यांचा खून केला. पण जेव्हा तो पकडला गेला, तेव्हा त्याला आपल्या कृत्यांचा काहीही पश्चाताप नव्हता असं पोलिसांना आढळलं. 

'माइंडहंटर'च्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या सीझनमध्ये या बीटीकेचे संदर्भ वारंवार येतात. या सिरीजचा दुसरा भाग हा बहुतेक बीटीकेच्या आजूबाजूलाच फिरण्याची दाट शक्यता सध्या तरी वाटत आहे. पण सिरिअल किलर्स हा काही या लेखाचा विषय नाही. तो अभ्यास करून डिटेल लिखाण करण्याचा विषय आहे. या लेखाचा विषय आहे, तो सिनेमानं या सिरिअल किलर्सची दखल कशी घेतली आहे हा. 

तर हा सिरिअल किलरचा विषय हॉलिवुडच्या अनेक निर्मात्यांना सिनेमॅटिकली अतिशय रोचक वाटला यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हॉलिवुडमध्ये सिरिअल किलर्सवर अनेक चित्रपट बनले आहेत. आल्फ्रेड हिचकॉकचा 'सायको', डेव्हिड फिंचरचा कधीच पकडल्या न गेलेल्या झोडियाक किलर या सिरिअल किलरवरचा 'झोडियाक' (बहुतेक हा चित्रपट करत असतानाच, सिरिअल किलर या विषयाचं आकर्षण फिंचरच्या मनात निर्माण झालं असावं आणि त्याची परिणती 'माइंडहंटर' या अफलातून कलाकृतीत झाली असावी. ), 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज', 'बोन कलेक्टर', 'सेव्हन', 'मिस्टर ब्रूक्स' असे अनेक चित्रपट बनले आहेत. यातले काही चित्रपट काल्पनिक होते, तर काही खऱ्याखुऱ्या सिरिअल किलरवर आधारित होते. अतिशय नावाजलेल्या दिग्दर्शकांनी सिरिअल किलर हा विषय हॉलिवुडमध्ये हाताळला आहे. आपल्या चित्रपटांमधून त्यांनी सिरिअल किलर्सच मानसशास्त्र, त्यांची मोडस ऑपरेंडी याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. शिवाय 'सॉ' सिरीज, 'द टेकसास चेन सॉ' अशा चित्रपटांनी सिरिअल किलिंगचा एक वेगळाच पैलू समोर आणला. 

सिरिअल किलर म्हणजे काही तरी विदेशी फॅड आहे असा समज अनेक भारतीयांचा असतो. रामन राघव सोडून आपल्याकडे सिरिअल किलर झालेच नाहीत, असं आपल्याला वाटत असतं. पण तसं नाहीये. आपल्याकडे अनेक सिरिअल किलर होऊन गेले आहेत. बीयर मॅन, निठारी हत्याकांडातला पंधेर, ऑटो शंकर, सायनाईड मोहन आणि असे कित्येक सिरिअल किलर भारतात होऊन गेले आहेत. गुप्तधनाच्या हव्यासातून घडलेलं मानवत हत्याकांडही गाजलं होतं. 

बॉलिवुडनेही सिरिअल किलरवर सिनेमा निर्मिती केली असली तरी दर्जात्मदृष्ट्या त्यातले फार कमी चित्रपट चांगले होते. 'रेड रोज' नावाच्या एका सिनेमात राजेश खन्नानं सिरिअल किलरची भूमिका केली होती. हा चित्रपट ज्या सुपरहिट तमिळ चित्रपटावरून घेतला होता. त्यात ही भूमिका कमल हसननं केली होती. चित्रपट यथातथाच होता आणि अगोदरच उतरणीला लागलेल्या राजेश खन्नाच्या करिअरला या चित्रपटामुळे मदत होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला. तनुजा चंद्राच्या 'दुश्मन' आणि 'संघर्ष'मधला आशुतोष राणानं केलेला विकृत सिरिअल किलर गाजला. यातला 'संघर्ष' हा उघडच 'सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज'वर बेतलेला होता.

भारतीय लेखक -दिग्दर्शक सिरिअल किलरवरचे चित्रपट बनवताना हॉलिवुड आणि कोरियन सिनेमाकडून उधार उसनवारी करतात असं दिसून येतं. सुश्मिता सेननं एका सिरिअल किलरचा माग काढणाऱ्या पोलीस ऑफिसरचा रोल केलेला 'समय' हा एक चांगला प्रयत्न होता. पण तो उघडच 'सेव्हन' या सिनेमावरून प्रेरित होता. भारतीय दिग्दर्शकांमध्ये मोहित सुरीला सिरिअल किलर या विषयाचं आकर्षण दिसतं. पण आकर्षण आहे म्हणून तो स्वतःचं ओरिजनल वगैरे काही करण्याच्या फंदात पडत नाही. त्याच्या प्रेरणा हॉलिवुड सिनेमात न सापडता कोरियन सिनेमात सापडतात हाच फरक. त्याचा 'मर्डर २' हा 'द चेसर' या कोरियन सिनेमाची भ्रष्ट आवृत्ती होता. त्याचाच 'एक व्हिलन' ज्यात रितेश देशमुखनं एका स्त्रीद्वेष्ट्या सिरिअल किलरचा रोल केला होता, तो 'आय सॉ द डेव्हील'ची अतिशय वाईट कॉपी होता. चोऱ्या करायलाही अक्कल लागते, हे विधान किती खोटं आहे हे मोहित सुरीच्या आणि एकूणच भट्ट कॅम्पच्या ढापूगिरीकडे बघितलं की, कळायला लागतं.

मनीष गुप्ताचा 'द स्टोनमॅन मर्डर्स' हा एक बऱ्यापैकी प्रयत्न होता. मुंबईमध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांच्या डोक्यावर आघात करून त्यांचा जीव घेणाऱ्या खऱ्या आयुष्यातल्या सिरिअल किलरवर हा सिनेमा आधारित होता. तो सिरिअल किलर पोलिसांना कधीच सापडला नाही. मनीष गुप्तानं भारतीय सिरिअल किलर घेऊन त्याभोवती स्वतःचं कथानक घेऊन स्वतःचं असं काहीतरी (विशेषतः चित्रपटाच्या शेवटी येणारा ट्विस्ट) करण्याचा केलेला प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. रामगोपाल वर्माच्या 'कौन'ला सिरिअल किलर मुव्ही म्हणावं का याबद्दल मला शंका आहेत. कारण चित्रपटाच्या सुरुवातीला सिरिअल किलरचा उल्लेख असला तरी मूलतः चित्रपट थ्रिलर आहे. त्यातल सिरिअल किलर कोण आहे हे चित्रपटाच्या शेवटी कळणं हे शेवटी अनपेक्षित धक्का देत खरं, पण मुळात तो तीन पात्रांमध्ये रंगलेला 'टॉम अँड जेरी'चा खेळ जास्त आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या मुरुगोदास दिग्दर्शित 'स्पायडर' सिनेमातला लोकांच्या मृत्यूमध्ये आनंद शोधणारा सिरिअल किलर वेगळा होता. सुजॉय घोषच्या 'कहानी'मधला सास्वता चटर्जीनं केलेला बॉब विस्वास हा सिरिअल किलरही हटके होता. तो सुपारी घेऊन खून करत असतो. बॉब विस्वास म्हणजे दहा-पाचमधला अतिशय निरुपद्रवी जॉब करत असतो. बॉसच्या शिव्या खात असतो. जगातले अनेक गाजलेले सिरिअल किलर्स हे वरकरणी निरुपद्रवी आयुष्य जगत होते. एक सुरक्षित नोकरी, सुखी वैवाहिक आयुष्य आणि चांगले बाप असणाऱ्या या लोकांचं एक 'सिक्रेट आयुष्य' होतं. ज्यात ते निर्घृण खुनी होते. त्यांच्या या बाजूची त्यांच्या घरच्यांनाही कल्पना नसायची. सुपरहिरोंना जसा एक आल्टर इगो असतो, तसाच या सिरिअल किलर्सनाही असतो. बॉब विस्वास या पात्रात याचं प्रतिबिंब पडल्याचं दिसतं.

हिंदी सिनेमानं सिरिअल किलर या विषयाचं बऱ्यापैकी उथळीकरण केलं आहे. दक्षिणेकडचा एक गाजलेला सिरिअल किलर होता ऑटो शंकर. तो व्यवसायानं ऑटो चालक होता. आपल्या ऑटोमध्ये बसलेल्या लोकांचा विशेषतः स्त्रियांचा खून करणं हा त्याचा आवडता छंद होता. अनेक खून केल्यावर तो पकडला गेला. ऑटो शंकरची पाळंमुळं अनेक प्रभावी राजकारण्यांपर्यंत होती असं म्हणतात. तर टी . रामाराव दिग्दर्शित 'रावण राज' या सिनेमात या ऑटो शंकरचं कॅरिकेचर टाईप पात्र रंगवलं होतं. ते पात्र शक्ती कपूरनं रंगवलं होतं यावरून काय ते समजून घ्या.

सिरिअल किलर आणि भारतीय कलाकृती असा विषय आहे तर श्रीराम राघवनचं नाव आवर्जून घ्यायला हवा. मुंबईमध्ये त्या काळी धुमाकूळ घातलेल्या रामन राघवन या खतरनाक सिरिअल किलरवर त्यानं 'डॉक्युफिक्शन' बनवली होती. त्यात रामनची भूमिका अष्टपैलू अभिनेता रघुवीर यादवनं केली होती. त्या कोवळ्या वयात श्रीरामला एका खतरनाक सिरिअल किलरच्या मनोव्यापाराचा वेध घ्यावासा वाटला यातच त्याचं वेगळंपण आहे.

रामन राघवन हा गुन्हेगार नाही तर मानसिक रुग्ण आहे, अशी एक प्रगल्भ भूमिका श्रीरामनं त्या 'डॉक्युफिक्शन'मधून मांडली होती. त्यावेळी सिनेमाचं डिजिटल प्रारूप अस्तित्वात नव्हतं. ती फिल्म व्हीएचएसवर होती. ती 'डॉक्युफिक्शन' त्यावेळेस बरीच गाजली. त्या काळी ती पाहणाऱ्यांमध्ये दोन लोक होते. पहिला, अनुराग कश्यप, जो त्यावेळेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये उमेदवारी करत होता. दुसरा, नवाजुद्दीन सिद्दीकी. त्या काळी त्या दोघांना कल्पना तरी असेल का अजून तीस वर्षांनी आपण रामन राघवनवर आधारित सिनेमावर काम करणार आहोत म्हणून? फिल्म इंडस्ट्रीमधले काही योगायोग अनाकलनीय असतात हेच खरं.

अनुरागच्या ‘रामन राघवन २.०’ वर श्रीरामच्या 'डॉक्युफिक्शन'चा खूप प्रभाव आहे. तो त्याच्या सिनेमातल्या लोकेशनवर आणि कॅमेरा अँगल्समध्येही दिसून येतो. अनुराग कश्यप श्रीरामाचा 'फॅनबॉय' बनला तो तेव्हापासून. अनुराग कश्यपचा ‘रामन राघवन २.०’ बहुतेकांनी बघितला असेलच. 

'माइंडहंटर'च्या धर्तीवर फँटम फिल्म्सही भारतीय सिरिअल किलरवर वेब सिरीज बनवत असल्याचं कानावर आलं होतं. रिसर्चचं काम जोरात चालू होतं. सध्या ते कुठल्या स्टेजला आहे, याची कल्पना नाही. 

पण भारतीय सिरिअल किलर या विषयावर बरंच सिनेमॅटिक काम होण्यास भरपूर वाव आहे. अजूनही हा जॉनर आपल्या लेखक दिग्दर्शकांनी पाहिजे तसा एक्स्प्लोर केलेला नाही. अजूनही कित्येक भयानक आणि फक्त कल्पनेतच अस्तित्वात असतील असं वाटू शकणारे सिरिअल किलर लोकांना माहीत नाहीयेत.

एक उदाहरण देतो. बेगुसराय या बिहारमधल्या जिल्ह्यात अमरदीप सादा नावाच्या सिरिअल किलरनं तीन तान्ह्या मुलांचा अतिशय निर्घृण खून केला होता. त्यात त्याची सहा महिन्यांची चुलत बहीण आणि आठ महिन्यांची सख्खी बहीण यांचा समावेश होता. असं म्हणतात की, अमरदीपच्या घरच्यांना अमरदीपनेच हे खून केले आहेत हे माहीत होतं, पण त्याला वाचवण्यासाठी त्यांनी प्रकरण दाबून टाकलं. पण अमरदीपनं शेजाऱ्यांच्या मुलीचा निर्घृण खून केला आणि तो पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि विचारणा केली की, तू असं का केलंस तर अमरदीप फक्त हसला.

आता तुम्ही म्हणाल की, हे खून खूप निर्घृण होते पण खुनी पकडला गेला ना? यात जगावेगळं काय आहे. तर जगावेगळं हे की अमरदीप सादाचं वय होत अवघं आठ वर्ष. तो भारतातला सगळ्यात लहान सिरिअल किलर आहे. बघू कुणाला यामध्ये फिल्मचं बीज दिसतं का!

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......