अजूनकाही
१. ‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित होईलच, असं ठणकावून सांगणाऱ्या दीपिका पडुकोणला राजपूत करणी सेनेनं नाक कापण्याची धमकी दिली आहे. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी म्हटलं. दीपिकानं म्हटलं होतं की, ‘आम्ही ज्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहोत ते फक्त सेन्सॉर बोर्ड आहे. मला माहीत आहे आणि ठाम विश्वासही आहे की, या सिनेमाचं प्रदर्शन कोणीही अडवू शकत नाही.’ सिनेमाबद्दल बोलताना दीपिका हेही म्हणाली की, ‘हे फक्त पद्मावती सिनेमापुरतं मर्यादित नाहीये. आम्ही सिनेमाहून अधिक मोठी लढाई सध्या लढत आहोत.’ सिनेमा प्रदर्शित झाल्यास एक डिसेंबर रोजी भारत बंदचा इशाराही या सेनेनं दिला असून फक्त राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं.
जैसी करणी वैसी भरणी, हे या सेनेच्या धुरीणांना माहिती नसावं बहुतेक. ‘पद्मावती’ सुपरहिट झाल्यावर ही मंडळी नाकाला बँडेज लावून फिरणार आहेत का? एका स्त्रीला नाक कापण्याची धमकी देऊन त्यांनी आपले अत्युच्च संस्कार दाखवून दिले आहेत. ही मंडळी एका काल्पनिक स्त्री व्यक्तिरेखेची पूजक आहेत आणि हाडामांसाच्या, समोर असलेल्या स्त्रीला धमक्या देत आहेत, हे करुण आहे. असल्या भंपक अस्मिताबाजांचा देश कोणत्या गौरवशाली इतिहासाच्या कहाण्या सांगत असतो, ते विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या शूर्पणखेचं नाक कापणारे राम-लक्ष्मणच जाणोत.
.............................................................................................................................................
२. देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असताना अनेक जण तोंडाला मास्क लावून बाहेर पडताना दिसत आहेत. हे दिल्लीतल्या सत्ताधारी आम आदमी पक्षाचंच अपयश आहे, हे अधोरेखित करण्यासाठी या पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे.
यानिमित्तानं सिरसा यांना महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाण्याची प्रेरणा झाली, हे सुचिन्हच. मात्र, तो म्हातारा फारच खमक्या आहे, त्याला असल्या मास्कची गरज नाही. सिरसा आणि कंपनीच्या वैचारिक प्रदूषणातही त्याची मूल्यं तगून आहेत आणि नाव टिकून आहे, तिथं किरकोळ वायूप्रदूषणाची काय कथा? बापू फोटो आणि पुतळ्यांमध्ये असते तर त्यांच्या प्रतिमांखाली लोक जे दिव्य उद्योग करतात, ते पाहता गांधीजींनी कानात बोळे घातली असती आणि डोळ्यांवरूनही मास्क ओढून घेतला असता.
.............................................................................................................................................
३. भ्रष्टाचाराला आळा न घातल्यास चीनदेखील सोव्हिएत संघासारखा उद्ध्वस्त होईल, चीनचेही सोव्हिएत संघासारखे तुकडे पडतील, असा इशारा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य यांग शिआओडू यांनी दिला. विशेष म्हणजे शिआओडू चीन सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी संबंधित अधिकारी आहेत. ‘भ्रष्टाचारविरोधी अभियानात अयशस्वी ठरणं चीनसाठी घातक असेल,’ असा धोक्याचा इशारा शिआओडू यांनी दिला. भ्रष्टाचारविरोधी अभियानातील अधिकाऱ्यांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ‘आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कमी पडले. त्या काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम आधीच्या सरकारनं केलं. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे दोषींवर कोणती कारवाईदेखील झाली नाही,’ असं शिआओडू यांनी म्हटलं.
शिआओडू हे भारतातूनच प्रशिक्षण घेऊन गेलेले दिसतायत. रोजच्या दिवसातले आठ तास रात्र असते, त्यालाही आधीचं सरकार जबाबदार आहे, असं जबरदस्त युक्तिवाद आणखी कुठे शिकायला मिळणार? बाकी चीनमध्ये कोणी सत्ताधारी शहेनशहा भ्रष्टाचारावर बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ मर्जीतून उतरलेल्या एखाद्या नेत्याचा लवकरच भुजबळ होणार, एवढाच असतो अनेकदा.
.............................................................................................................................................
४. तेलंगणा सरकारनं राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी एक अनोखी योजना प्रत्यक्षात आणली असून भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सरकारतर्फे ५०० रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना एक डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं. ग्रेटर हैदराबाद महापालिका व राज्य सुधारात्मक प्रशासन संस्था यासाठी एकत्रितरीत्या काम करणार आहेत. सध्या राज्यात बेघर असलेल्या असंख्य भिकाऱ्यांना सरकारी आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. तेलंगणातील चंचलगुडा तुरुंग व चेरलापाली तुरुंगाजवळील आनंद आश्रमात रस्त्यावर भीक मागणाऱ्यांपैकी १११ पुरुष, ९१ महिला आणि १० चिमुकल्यांना आतापर्यंत या आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या अंगठ्याचे ठसे व फोटो घेण्यात आले आहेत. हैदराबादेतील बेगिंग अॅक्ट १९७७ अंतर्गत भीक मागताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. परंतु भिकाऱ्यांवरील ही बंदी केवळ दोन महिन्यांसाठीच मर्यादित आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हैदराबाद दौऱ्यावेळीही अशाच प्रकारे भीक मागण्यास बंदी घातली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या हैदराबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी उपाययोजना करण्यात येत आहे.
अच्छा, म्हणजे कुरूप डागांवरचा हा उपाय नाही, ते लपवण्यासाठी हा वरवरचा मेकअपच आहे म्हणा ना. बाकी जो उदरनिर्वाहासाठी भीक मागायला उतरतो, त्याला सहा महिने ते पाच वर्षं कारावास म्हणजे उदरनिर्वाहाची सोयच झाली म्हणायची. शिवाय भिकारी कळवा, ५०० रुपये मिळवा, या योजनेचा लाभ भिकारी आळीपाळीनं एकमेकांची नावं कळवून एकमेकांमध्येच घेतील आणि त्यात सरकारी अधिकाऱ्यांनाही हप्त्याहप्त्यानं सहभागी करून घेतील, अशी दाट शक्यता आहे.
.............................................................................................................................................
५. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे कथित सेक्स व्हिडिओज व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, भाजपकडे पाटीदार नेत्यांच्या अशा आणखी ५२ सीडीज आहेत, असा आरोप दिनेश बांभानिया यांनी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांना हार्दिक पटेल यांना बलात्कार प्रकरणात अडकवायचं आहे. हार्दिक यांची अवस्था नारायण साई यांच्यासारखी व्हावी, असं भाजपला वाटतं, असं ते म्हणाले. या सीडी पाहता राजकारण आणि राजकारणी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हे दिसून येतं. गुजरातमधील संपूर्ण यंत्रणा एका नेत्याचा आवाज दाबून टाकण्यासाठी कार्यरत आहे. भाजपनं या निवडणुकीत सेक्स व्हिडिओजकडे नव्हे तर २०१२ मध्ये दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्ती झाली, यावर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित होतं, असं जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं होतं.
एकमेकांच्या सीडी काढण्याचा जुना अनुभव आहे या मंडळींना. हवं तर संजय जोशी यांना विचारून पाहा. यांच्या कुसंस्कारी पायाखालची जमीन सरकू लागली की, त्यांची मूळ वृत्ती बाहेर येते. बायदवे, हार्दिकसारख्या नेत्याच्या ५२ सीडी निघत असतील, तर त्याची सदादमित आणि त्यामुळे सदाबुभुक्षित संस्कारी तरुणाईमध्ये वेगळीच क्रेझ निर्माण व्हायची शक्यता आहे. मग, हे सीडींचं अस्त्र त्या काढणाऱ्यांवरच उलटेल.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment