अजूनकाही
अनिकेत कोथळे (वय वर्ष २६) या सांगलीच्या तरुणाचा पोलिसांनी खून केला. का झाला हा खून? सांगलीत बॅगेच्या दुकानात तो काम करायचा. आई-वडील, भाऊ, बायको आणि तीन वर्षांची छोटी मुलगी, असं त्याचं कुटुंब त्याच्या नोकरीतून आलेल्या पैशातून चाले. सर्वसामान्य तरुणांसारखंच त्याचं आयुष्य चाललं होतं. खुशी होती घरात. अनिकेत ज्या बॅगेच्या दुकानात काम करी, त्या दुकानात चालणाऱ्या अश्लील चित्रफितीच्या रॅकेटविषयी त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमोल भंडारेला कळलं. मालकाला संशय आला की, या दोघांनी आपलं बिंग फोडलं तर… बरबाद होण्याच्या भीतीनं मालक बिथरला. या घटनेनं अनिकेतचं आयुष्य क्षणार्धात बदललं. अनिकेत-अमोल यांच्यावर चोरीचा आळ ठेवून पोलिसांनी पकडून नेलं. गडाआज केलं. त्यांना कायमचं गप्प करायचा चंग पोलिसांनी बांधला. मालक आणि पोलीस यांची एकमेकांना साथ होती. पोलीस स्टेशनात बेदम मारहाण, पंख्याला उलटं टांगून तोंड पाण्याच्या बादलीत बुडवणं, लोखंडी पाइपनं जीवघेणे फटके, क्रुरतेनं शिखर गाठलं…
पोलिसी क्रौर्यानं अनिकेतचं शरीर थंड पडलं. हे थंड, मृत शरीर पोलिसांनी आंबोलीच्या घाटात जाळण्याचा प्रयत्न केला. मृतदेह नीट जळाला नाही म्हणून खोल, निर्जन दरीत फेकला. या कृत्यानं झाडं, वेलीसुद्धा हादरल्या असतील!
खाकी वेशात पोलिसांनी हे कृत्य केलं. अमोल कसाबसा वाचला. दुसऱ्या दिवशी खऱ्याला कंठ फुटला. अन अनिकेत पळून गेल्याचा बनाव रचणाऱ्या पीएसआय युवराज कामठेसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या.
ही घटना काही साधीसुधी नाही. ज्या पोलिसांकडे सुरक्षेचे रखलवालदार म्हणून सामान्य माणूस पाहतो, त्यांनी हैवान बनावं? हे असं कृत्य करावं? खून करून मृतदेहाची विटंबना करावी आणि तो पळून गेला हे खोटं सांगावं, नोंदवावं?
महाराष्ट्रासारख्या तुलनेनं पोलीस दलाची इभ्रत तुलनेनं जास्त असणाऱ्या राज्यात हे घडावं, हे जास्त चिंताजनक आहे. आणि तेही सांगलीसारख्या तुलनेनं पुढारलेल्या शहरात? बॅगेच्या दुकानात काय बेकायदा, अश्लील उद्योग चालायचे? त्या अशा कोणत्या गुपितांची अनिकेत-अमोलला माहिती झाल्यानं घाबरून त्यांच्या जीवावर बॅगमालक उठला? त्याचे आणि पोलीस पीएसआयचे संबंध काय आहेत? कामठे आणि इतर कोण धेंडं या प्रकरणात सामील आहेत? हे चौकशीअंती समोर येईलच. त्यातून या प्रकरणातले आतले पदर कळतील. ही घटना समजून घ्यायला त्याची मदत होईल.
आता कामठेंबद्दल माहिती बाहेर येऊ लागली आहे. पूर्वीपासूनच त्याच्याबद्दल सांगलीकरांच्या गंभीर तक्रारी होत्या. या तक्रारी कोल्हापूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कानावरही घातल्या गेल्या होत्या. सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनाही कामठेचे कारनामे माहीत होते. त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं. कामठेवर जर पूर्वीच कारवाई झाली असती तर अनिकेत वाचला असता, असं गाऱ्हाणं गृहराज्यमंत्री दीपक कोसरकर यांच्यापुढे सांगलीकरांनी मांडलंय.
नांगरे पाटील-दत्ता शिंदे हे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास आणि हे प्रकरण हाताळण्यात कमी पडले, हे आता सांगलीकर उघड बोलत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी मनात चीड निर्माण झाली आहे. ही चीड सांगलीकरांनी शहर बंद करून आणि कारवाईची मागणी करून व्यक्त केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. ते अद्याप पीडित कोथळे कुटुंबास भेट द्यायला गेलेले नाहीत. नागपुरात हिवाळी अधिवेशनात पुढच्या महिन्यात आहे. या अधिवेशनात कोथळे हत्याकांडाचा मुद्दा विरोधक तापवतील असं दिसतंय.
पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारी ही घटना विश्वास नांगरे पाटील यांच्या अधिकार क्षेत्रात घडावी याचं जास्त आश्चर्य वाटतं. त्यांचं ‘मन में है विश्वास’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक गेले काही महिने गाजतंय. ते प्रेरणादायी पुस्तक आहे असं सांगितलं जातं. तरुण पिढीच्या ते पसंतीला उतरतंय असंही बोललं जातंय. नांगरे पाटील उत्तम वक्ते आहेत. त्यांनी स्वत:ची प्रतिमा एक कर्तबगार पोलीस अधिकारी अशी निर्माण केलीय. अनेक ठिकाणी लोक त्यांना भाषणं करण्यासाठी बोलावत असतात. त्या अर्थानं ते सेलिब्रेटी पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या टीव्हीवर सातत्यानं मुलाखतीही होतात.
अशा कर्तबगार प्रतिमा असणाऱ्या नांगरे पाटलांकडून कामठेसारख्या हैवानाची कृत्यं सुटतात कशी? यापूर्वीच कामठेंवर कारवाई का होऊन शकली नाही? आपल्या हाताखालच्या लोकांना हाताळण्यात वरिष्ठ म्हणून नांगरे पाटील अपयशी ठरले, असं सांगलीकरांना वाटत असेल तर त्याचं काय उत्तर नांगरे पाटील यांच्याकडे असेल?
‘मम्मी, पप्पाला मारून आले का?’ अनिकेतच्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे हे बोल आहेत. काळीज थरथरतं ते ऐकून. शेजाऱ्यांच्या कुजबुजी, घरातल्यांचं बोलणं, टीव्हीच्या बातम्या यातून जेवढं समजायचं ते समजून ही चिमुरडी आईला हा प्रश्न विचारतेय. या निरागस चिमुरडीच्या प्रश्नाला नांगरे पाटील पोलीस दलाचे वरिष्ठ म्हणून काय उत्तर देणार? या मुलीच्या मनात पोलिसांची पुढे काय प्रतिमा तयार होईल?
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या चिमुरडीचा काय गुन्हा?
तिचा बाप हिसकावून घेतला गेलाय. तिच्या आयुष्यातली ही उणीव कशी भरून निघणार?
लाखोंच्या सरकारी मदतीनं अनिकेतच्या मुलीचा, आईचा, पत्नीचा वनवास कसा संपेल?
या प्रकरणात पुन्हा एकदा पोलीस दलाच्या सुधारणेचा, त्याला अधिक मानवी चेहरा देण्याच्या प्रक्रियेची चर्चा, कृती व्हायला हवी. यापूर्वी निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, अरविंद इनामदार अशा मोजक्या लोकांनी पोलीस खात्यातल्या सुधारणा, वागणं या मुद्द्यांवर भर दिला होता. पण त्याला सरकारी पातळीवर अल्प प्रतिसाद मिळाला. काही सुधारणा झाल्या जरूर, पण खूप सुधारणा तशाच धूळ खात पडून आहेत.
पोलीस दल हा काही फक्त हैवानांचाच अड्डा आहे असं नव्हे. आपलं पोलीस खातं चांगलं आहे, पण त्यात कामठेसारख्या प्रवृत्तीही शिरजोर आहेत. या प्रवृत्ती समाजकंटकांशी हात मिळवणी करून त्या त्या परिसरात स्वत:ची मुजोरी चालवतात. शहरातल्या अवैध धंद्यांना पोसतात. विकृतीला खतपाणी घालतात. त्यात कामठेसारख्यांना पैसा, संपत्ती मिळते. समाजकंटकांना पोलिसांपासून संरक्षण मिळतं. शहरात अशी पोलीस आणि समाजकंटकांची मिलिभगत खुलेआम पाहायला मिळते. त्यातूनच अनिकेतचाही जीव गेला. त्याच्या चिमुरडीवर अनाथपण लादलं गेलं. सांगली काही अपवाद नाही, इतर शहरांतही असे ‘कामठे’ आहेत.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285
.............................................................................................................................................
आपल्या साऱ्याच सरकारी यंत्रणांना इंग्रजांचा बरा-वाईट वारसा चिकटलेला आहे. पोलीस दलही त्याला अपवाद नाही. इंग्रजांच्या काळात पोलीस दलाची सामान्य लोकांवर खूप दहशत होती. पोलीस बघितला की, लोक गावातून पळून जात. रानावनात लपत. एवढा त्यांचा दरारा, भीती होती. त्या भीतीच्या जोरावर मूठभर इंग्रजांनी भारत ताब्यात ठेवला. नागरिक घाबरले तर सत्ता चालते, टिकते. इंग्रजांची ती गरज होती. पण आताही पोलिसांनी इंग्रजांसारखंच नागरिकांना घाबरवायचं, दाबात ठेवायचं? इंग्रजी सत्तेत पोलीस ही दमन यंत्रणा होती. दडपशाहीचं दुसरं रूप होती. पण आज पोलीस दलानं इंग्रजांसारखीच दमन यंत्रणा म्हणून, नागरिकांना घाबरवणारी, त्यांना चळाचळा कापायला लावणारी यंत्रणा म्हणून काम करावं? कायदा, पोलीस संरक्षणासाठी असतात. घाबरवण्यासाठी नाही.
खुद्द इंग्रजांच्या देशात आणि इतरही देशांत पोलीस खात्याला मानवी चेहरा देणारे नवनवे प्रयोग सुरू आहेत. कैदी, आरोपी, सामान्य नागरिक यांच्याशी कसं बोलावं याविषयीच्या आचारसंहितेत आमूलाग्र बदल होत आहेत. आणि आपल्या पोलीस दलामध्ये मात्र अजूनही चोरीचा आळ असणाऱ्या तरुणाला थर्ड डिग्री लावली जाते? केवढं हे क्रौर्य!
कामठेच्या क्रूर गँगमधल्या चौदा संशयित पोलिसांपैकी एकही पोलीस ‘हे कृत्य मी करणार नाही’ असं म्हणू शकला नाही? हे असं का व्हावं? खाकी वर्दी घातलेली ही माणसं मुलंबाळं असणारी नाहीत का? त्यांना घर-संसार नाही? नातीगोती नाहीत? मग ती एवढं क्रूर कसं काय वागू शकली? विश्वास नांगरे पाटील हे विद्वान पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी जर या दिशेनं विचार केला तर आणखी ‘अनिकेत’ बळी जाणार नाहीत.
.....................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gaurav Sudake
Mon , 26 August 2019
छान माहिती आहे
Prabhakar Nanawaty
Thu , 16 November 2017
जरी आताच्या घटकेला अनिकेत कोथळेच्या तुरुंगातील मारहाणीमुळे झालेल्या मृत्युच्या संदर्भात काही पोलीसांना कस्टडीत टाकले असले तरी यांची रीतसर चौकशी करून आरोपपत्र ठेवण्यापर्यंतच्या दरम्यान काहीही होऊ शकते; पुरावे नष्ट होऊ शकतात, आरोपपत्रात कच्चे दुवे ठेवल्या जातात. व हा खटला सुदीर्घ काळ चालेल अशी व्यवस्था केली जाऊ शकते. तपास यंत्रणेला फक्त ‘झिरो पोलीस’च खरा आरोपी असून इतर सर्व निर्दोष आहेत असा ‘साक्षात्कार’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तपास यंत्रणा ‘होत्याचे नव्हते करण्यात’ फार वाकबगार आहे. त्यामुळे धडधडीत समोर पुरावे असले तरी न्यायदेवता आंधळी (किंवा आंधळेपणाची सोंग वठवणारी) असल्यामुळे आरुषी तलवार वा सलमानखान यांच्या प्रकरणाप्रमाणे खाकी वर्दीतील सर्व गुंड सहीसलामत सुटतील ही शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात विशेष पोलीस पथक वा CBI सारखी तपास यंत्रणा आपली विश्वासार्हता केंव्हाच हरवून बसली आहे. आणि याला लठ्ठ लठ्ठ पगार व सर्व सोईसुविधा उपभोगणाऱ्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत ठरत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासंदर्भात 15 नोव्हेंबरच्या इंडियन एक्सप्रेसमधील अभिनव कुमार या पोलीस अधिकाऱ्याचा With Fear and Favour हा लेख वाचल्यास परिस्थती किती विदारक आहे याची कल्पना येईल. आपले भूतपूर्व प्रधान मंत्री, लाल बहादूर शास्त्री एके काळी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाल्यामुळे राजिनामा दिले होते, याचे अनेकांना स्मरत असेल. या अनिकेत कोथळेच्या मृत्यु प्रकरणात स्वतः जबाबदारी घेत जिल्ह्यातील व विभागातील किती वरिष्ठ IPS अधिकारी राजिनामा सादर करतील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण पोलीस ठाणे गैरकृत्यांचे व सुपारी घेवून काटा काढण्याचे अड्डे झालेले आहेत हे सर्वश्रुत आहे. या प्रकरणात खाकी वर्दीतील गुंडानी टोकाची भूमिका घेतल्यामुळे हे प्रकरण माध्यमांमध्ये इतके गाजत आहे. नाहीतर ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ असे म्हणत प्रकरण दडपलेही गेले असते. त्यामुळे वरिष्ठांच्या आशिर्वादाशिवाय अशा गोष्टी घडू शकतात, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. हे सर्व पाहता अनिकेत कोथळेच्या तीन वर्षाच्या चिमुरडीचे अरण्यरुदनच ठरू शकेल की काय अशी भीती वाटते.
Yogesh Deore
Thu , 16 November 2017
‘मन मै है विश्वास’. तुमच्या मनावरच विश्वास ठेवून चालत नाही तर लोकांच्याही मनात विश्वास निर्माण करायला हवा.