अजूनकाही
आज १४ नोव्हेंबर. बालदिन. या निमित्तानं इयत्ता सातवीतला मुलीचा हा खास लेख. ही मुलगी हायपर ॲक्टिव्ह आहे. तिला एकच गोष्ट एका जागी शांतपणे बसवू शकते. ती म्हणजे पुस्तकं. तिला वाचायला प्रचंड आवडतं. पुस्तक वाचताना तिला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. पुस्तकातल्या तिच्या आवडत्या व्यक्तिरेखेविषयी तिच्याच शब्दांत.
.............................................................................................................................................
माझी आवडती व्यक्तिरेखा म्हणजे रिक रिओरडॅन यांनी लिहिलेल्या 'पर्सी जॅक्सन आणि ऑलिम्पियन्स', 'द हिरोज ऑफ ऑलिम्पस' या पुस्तकांच्या मालिकेतील ॲनाबेथ चेस. ‘द ट्रायल्स ऑफ अपोलो : द हिडन ओरॅकल’, ‘मॅग्नस चेस’ या पुस्तकांच्या मालिकेत मॅग्नस चेसची चुलत बहीण म्हणून, तसंच केन क्रोनिकल्स पुस्तकांमधूनही ॲनाबेथ चेस आपल्या भेटीला येते.
वडील आणि सावत्र आई यांना आपली काळजी वाटत नाही, असा समज करून घेत वयाच्या सातव्या वर्षी ती घरून पळून जाते. आपली आई कोण हे खरं तर तिला माहीत नसतं, पण जेव्हा तिला हे कळतं की, युद्ध, बुद्धी आणि कला यांची देवता, तसंच अथेन्सची आश्रयदाता असणारी अथेना ही आपली आई आहे, जेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो.
अथेना ही झीयस आणि मेटिस यांची कन्या असते. झीयसच्या डोक्यातून जन्मलेली ही व्यक्तिरेखा. अथेनाची माया आपल्या या लेकीला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. अथेनाचा आवाज ॲनाबेथला कॅम्प हाफ ब्लड (डायनोसिस या ग्रीक देवतेच्या मार्गदर्शनाखाली एका दूरच्या बेटावर देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी ) पोहोचण्यासाठी मदत करत असतो. घरातून पळून गेल्यावर काही दिवसांनी ॲनाबेथची गाठ पडते, ती तिच्यासारख्याच एका दैवी शक्तीपासून जन्माला आलेल्या मुलाशी- ल्युकशी. हा हर्मीस आणि थालिया यांचा मुलगा. हर्मीस म्हणजे प्रवास, गायी-गुरं, दूत, चोर यांचा देव; तर थालिया म्हणजे झीयसची मुलगी. स्वर्ग, वीज यांचा देव म्हणून झीयस ओळखला जातो. पसायडन आणि हेडीस या ग्रीक देवतांच्या बरोबरीनंच झीयस या देवतेलाही मान दिला जातो.
ल्युक १४ वर्षांचा, तर त्याची मैत्रीण थालिया अवघ्या १२ वर्षांची. हे दोघेही त्यांचा पाठलाग करणाऱ्या राक्षसापासून दूर पाळण्याच्या प्रयत्नात असतात. राक्षसांपासून दूर पळत असताना त्यांची गाठ पडते, ती ॲनाबेथशी. ती एका खोक्यात लपून बसलेली असते. ल्युक व थालिया त्या खोक्यातून येणारा आवाज ऐकून तिथं कोण लपलं आहे, हे जाणून घ्यायचं ठरवतात. ते खोका उघडतात तेव्हा ॲनाबेथ खोक्यातून बाहेर उडी मारते आणि तो राक्षस आहे असं समजून ल्यूकच्या डोक्यात हातोडा घालू पाहते. ॲनाबेथपासून ते दोघेही कशीबशी सुटका करून घेतात आणि तिला आपण राक्षस नसून देवतांपासून जन्मलेले आणि राक्षसांपासून आपली सुटका करू इच्छिणारे मनुष्यप्राणी असल्याचं पटवून देण्यात यशस्वी होतात. एवढंच नाही, तर ते एकाच कुटुंबातील सदस्य असून तो तिला आणि थालियाला एकटं सोडणार नाही, असं ल्युक तिला सांगतो. हेलसिओन ग्रीन या अर्ध दैवी शक्ती लाभलेल्या देवतांकडून मिळालेला एक दिव्य कांस्य चाकूही ल्युक ॲनाबेथला देतो. ॲनाबेथ त्यानंतर सायक्लोपच्या पायाला इजा करून आणि थालियाला बांधलेला दोर कापून त्या दोघांची सुटका करते.
त्यानंतर त्यांची गाठ पडते, ती ग्रोव्हर अंडरवूड या व्यंगात्मक व्यक्तिरेखेशी. ग्रोव्हर त्यांना हाफ ब्लड शिबिराच्या ठिकाणी पोहोचताना पुढच्या वाटचालीसाठी मदत करतो. हाफ ब्लड टेकडीवर जेव्हा ते पोहोचतात, तेव्हा त्यांचा पाठलाग करणाऱ्या राक्षसांना रोखून धरणं थालियाला कठीण होतं. त्यांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत थालिया जबर जखमी होते. जखमी झालेल्या थालियाची अवस्था न पाहवल्यानं तिचे वडील झीयस तिचं रूपांतर एका पाईन वृक्षात करतात. हा वृक्ष नंतर थालियाचा पाइन वृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागतो. शिबिराच्या ठिकाणी सगळीकडे पाइन वृक्षांचं कुंपण असल्यामुळे राक्षस या ठिकाणापासून दूर राहतात.
शिबिराच्या ठिकाणी पोहोचल्यावर ॲनाबेथ प्रचंड कठीण असं सर्व प्रशिक्षण घेते आणि अथेना केबिनची मुख्य नगरसेवक बनते. त्यानंतर थोड्याच काळात ती एक मोठी भविष्यवाणी ऐकते, ज्यात तिचीही मुख्य भूमिका असणार असते.
मोठ्या तिघांचं म्हणजे झीयस, पसायडन आणि हेडीस यांपैकी एकाचं मोठं मूल सर्वांत धोकादायक शस्त्र बनेल आणि त्याच्या किंवा तिच्या हाती ओलिम्पिसचं भविष्य असणार आहे. ते मूल- सर्वांत धोकादायक शस्त्र येण्याची ती वाट पाहू लागते. पुढच्या तीन वर्षांत सागरी देवता पसायडनचा मुलगा पर्सी जॅक्सनही शिबिराच्या ठिकाणी येतो. भविष्यवाणीतील सर्वांत मोठा धोका असणारा हाच तो मुलगा आहे, हे तिच्या लक्षात येतं. झीयसच्या मेघगर्जनेसह ग्रोव्हर अंडरवूडचा शोध घेण्याच्या कामात ती पर्सीची मदत करते. त्यांना प्रकाश/विजेची चमक सापडते. नंतर त्यांच्या लक्षात येतं की, ल्यूकनेच यांची चोरी केली होती. ल्युक त्यांना सांगतो की, त्यांच्या आई-वडिलांना त्यांची काहीच काळजी वाटत नाही आणि म्हणून तो आता उदय होत असणाऱ्या क्रोनॉसला सामील होत आहे.
पुढच्या वर्षी पर्सी आणि ॲनाबेथ ग्रोव्हरचा शोध घेण्यासाठी निघतात. जेव्हा ती १३ वर्षांची होते तेव्हा ती आर्टेमिस देवतेची (जंगली प्राणी, शिकारी यांची देवता आणि मुलींची रक्षणकर्ती. अपोलोची जुळी बहीण आणि झीयस व लेटोची मुलगी. १२ ओलिम्पिअन्सपैकी ती एक.) सुटका करण्यासाठी आर्टेमिसच्या शिकाऱ्यांना मदत करते. आकाशाला धरून ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आलेली असते, मात्र ती पकडली जाते आणि मग ती स्वतःहून ॲनाबेथला जाळ्यात अडकवण्यासाठी आकाश धरून ठेवणाऱ्या ल्यूकला मदत करते. त्यानंतर पुढच्या वर्षी ती डिडोल्स या ग्रीक पुराणातील कारागिराचा शोध घेताना मोठ्या चक्रव्यूहात अडकते. मग तिला त्याचा लॅपटॉप मिळतो, ज्यात त्याचे वास्तुस्थापत्यशात्राचे अनेक नमुने सापडतात.
शेवटच्या पुस्तकात क्रोनोस आणि पर्सीकडे ल्यूकचा देह असतो. तेव्हा ती डिडोल्सनं बनवलेले सर्व पुतळे जागृत करते आणि त्यांच्या मदतीनं सर्व राक्षसांना मारते. क्रोनोस् आणि पर्सीच्या शेवटच्या लढाईत ती ल्यूकला तो कोण आहे याची जाणीव करून देते आणि त्यानं आपल्या कुटुंबाला दिलेल्या वचनाची आठवण करून देते.
अशा पद्धतीनं ती क्रोनोस आपलं शरीर तयार करण्यापूर्वीच ल्यूकला त्याच्याशी लढण्याची प्रेरणा देते. पर्सी ल्यूकला मागून धक्का देतो, जेणेकरून स्वतःला (ल्यूकला) व क्रोनोसला एकाच वेळी मारणं त्याला शक्य होतं. त्यानंतर ती ओलिम्पसची अधिकृत शिल्पकार बनते आणि क्रोनॉसनं केलेलं नुकसान भरून काढते.
ॲनाबेथ चेस ही माझी आवडती व्यक्तिरेखा आहे, कारण ती जगाला दाखवून देते की, मुलीसुद्धा मुलांएवढ्याच सशक्त असतात. ती पर्सीच्या खांद्याला खांदा लावून लढते आणि कोणत्याही टप्प्यावर हार मानत नाही. मागे फिरण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. हुशारी, सौंदर्य आणि धडाडी यांसारख्या गुणांचं दर्शन तिच्या व्यक्तिमत्त्वातून घडतं. आपल्याला हवं ते मिळवल्याशिवाय आपण थांबणार नाही, हे ती जगाला दाखवून देते.
.............................................................................................................................................
इंग्रजीतून मराठी अनुवाद - मिताली तवसाळकर
.............................................................................................................................................
याच लेखिकेनं गेल्या १४ नोव्हेंबर रोजी लिहिलेला लेख. लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
मला पुस्तकं वाचायला का आवडतात?
.............................................................................................................................................
लेखिका तनया टेंबे इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे.
twinklingtanaya@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment