आमचं क्रिकेट
पडघम - बालदिन विशेष
दिलीप प्रभावळकर
  • ‘कॉलनीतल्या गोष्टी’चं मुखपृष्ठ
  • Tue , 14 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी कॉलनीतल्या गोष्टी Colonytalya Goshti दिलीप प्रभावळकर Dilip Prabhavalkar

आज १४ नोव्हेंबर. बालदिन. या निमित्तानं ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर लिखित ‘कॉलनीतल्या गोष्टी’ हे कुमारकथांचं ताजंतवानं पुस्तक आज ‘माऊस मल्टिमीडिया’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होतंय. त्यातील एक कथेचा अंश...

.............................................................................................................................................

आमच्या कॉलनीतला सगळ्यात प्रिय खेळ क्रिकेट. खरं म्हणजे त्यावेळी क्रिकेट खेळायला आमच्या कॉलनीत बंदी होती बरं का! खिडक्यांच्या काचा फुटतात म्हणून अगदी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरच्या रहिवाशांनीही सोसायटीच्या ऑफिसात तक्रारी केल्या होत्या. आमच्यातले काहीजण सिक्सर्स मारायचे. किती सांगितलं तरी ऐकायचे नाहीत. त्यांच्या आक्रमक टोलेबाजीमुळे मग अशा काचा फुटत. म्हणून खेळावरच बंदी आणली गेली. तशी खाली नोटीसच लागली. पण मुलांना क्रिकेट खेळल्याशिवाय अगदी राहवत नसे. त्यावेळी ऑस्ट्रेलिया किंवा वेस्ट इंडिजची टीम भारताविरुद्ध खेळायला इथं दौऱ्यावर आली, की आम्हाला अगदी चेव चढे. सगळं वातावरण क्रिकेटमय झालेलं असे. बंदी असली तरी आम्ही गनिमी काव्यानं खेळत असू. सोसायटीच्या कमिटी मेंबर्सच्या नकळत, म्हणजे ते कामावरून परत येईपर्यंत आमची मॅच चालायची.

सावधगिरीचा उपाय म्हणून आमच्यातल्या एकाला- बहुतेक वेळा बाळू सामंतला- आम्ही सहनिवासाच्या फाटकाबाहेर उभा केलेला असे. कमिटीतलं कुणी येताना दिसलं की, तो तोंडात दोन हातांची दोन दोन बोटं घालून (इशाऱ्याची) कर्कश शिट्टी वाजवू शके. मग लगेच आम्ही खेळ थांबवून पळत असू. पण आम्हा मुलांना सोसायटीचे चेअरमन असलेल्या भाईसाहेब कर्णिकांचीच जास्त भीती वाटायची. ते गुलाबी गोरे होते आणि संतापले की लाल व्हायचे. नियम मोडून ही पोरं क्रिकेट खेळतायत असं त्यांना कळलं तर काय होईल, ते किती लाल होतील, या कल्पनेनेच आम्हा मुलांना घाम फुटायचा.

एकदा असंच झालं. ते अचानक कारमधून आले. क्रिकेट चालू असलेलं पाहून भडकले. आम्हाला (बॅट, बॉल, स्टंप्स उचलून) पळता पळता घाम फुटला!

बाळू पहाऱ्याला असताना भाईसाहेबांची गाडी सोसायटीच्या आवारात घुसली, हे आम्हाला कळलं कसं नाही? खरं म्हणजे, बाळू सामंतनं गाडी येताना पाहिली होती. पण झालं असं की, तो पहाऱ्याच्या ड्युटीवर असताना रस्त्यावर चाललेला डोंबाऱ्याचा खेळ पाहत होता. तेवढ्यात तिथं (किसलेल्या) बर्फाचे रंगीत गोळे विकणारा आला. खूप उकडत असल्यामुळे बाळूनं एक बर्फाचा गोळा विकत घेतला. तो चवीनं, मिटक्या मारत खात असतानाच त्याला भाईसाहेबांची गाडी येताना दिसली. बाळूनं घाईघाईनं अर्धा गोळा खाल्ला, अर्धा टाकून दिला आणि तो तोंडात बोटं खुपसून शिटी वाजवू लागला. तर नुसताच ‘फुर्र फुर्र’ आवाज येऊ लागला. (वितळलेल्या बर्फाचा परिणाम!)

भाईसाहेब कर्णिकांना राग अनावर झाला. खेळू नका सांगितलं तरी खेळतात म्हणजे काय? ते रागानं तांबडेलाल झाले! पळणाऱ्या पोरांवर हातातली पाण्याची बाटली (प्लॅस्टिकची) त्यांनी फेकून मारली. एक पोरगं (जयू बुधले) धडपडलं, पडलं, त्याला कॉलरला धरून उठवून, तणतणत त्याच्याच हातातली बॅट घेऊन त्याला ढुंगणावर त्यांनी फटके दिले. (जयू बुधले गुबगुबीत होता म्हणून बरं!)

झालं! पुन्हा क्रिकेटवर अधिक कडक बंदी! तर, असं आमचं लपूनछपून, चोरट्यासारखं क्रिकेट चाललं होतं. आम्हाला खूप वाटे, मोकळेपणानं, मनसोक्त खेळावं; पण सोसायटीची कमिटी- विशेषतः भाईसाहेब कर्णिक खेळू देत नव्हते. आमची घुसमट होई. चिडचिड होई. आम्हाला कॉलनीत क्रिकेट खेळायला मिळत नाही म्हणजे काय? आमचा हक्क आहे आमच्या आवडीचा खेळ- अर्थात क्रिकेट- खेळणं. दमदाटी करून आणि बंदी आणून आमच्यावर अन्याय केला जातोय. आम्हाला खेळायचंय म्हणजे खेळायचंय... अर्थात हे आम्ही आपापसात किंवा मनातल्या मनात बोलत असू. भाईसाहेबांना विरोध करणं किंवा त्यांचं मन वळवणं कुणालाच शक्य नव्हतं! आमच्या क्रिकेटला ग्रहण लागलं होतं.

एकदा वेस्ट इंडिजची बलाढ्य टीम भारताचा दौरा करायला आली. मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताच्या टीमविरुद्ध त्यांची टेस्ट मॅच होती. आम्हा मुलांना फार वाटलं की, आपण टेस्ट मॅच बघायला जायला हवं. आपण सोसायटीत खेळतो ते ठीकच आहे, पण खरे क्रिकेटर्स, खऱ्या स्टेडियममध्ये, खरी टेस्ट मॅच कशी खेळतात ते पाहायलाच हवं

वेस्ट इंडिजच्या टीममध्ये जगातला सर्वांत वेगवान बोलर गिलख्रिस्ट होता. राक्षसासारखा दांडगा, धिप्पाड, काळाकभिन्न वेस्ली हॉल हा आणखी एक फास्ट बोलर होता. जगातला सर्वांत श्रेष्ठ ऑल राऊंडर गारफील्ड सोबर्स, त्यांचा गोरा कॅप्टन- विकेटकीपर अलेक्झांडर, शिवाय कन्हाय, बुचर, रामाधीन... एकसे एक प्लेअर्स!

आम्हा मुलांच्या बोलण्यात दुसरा विषयच नव्हता! सारखं तेच. वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया मॅच बघायलाच हवी असं आम्ही ठरवूनच टाकलं होतं. “एक दिवस तरी जाऊ या रे,” रमेश म्हणाला. सोसायटीच्या आवारात आम्ही जमलो होतो.

“हो. आपण एवढं क्रिकेट खेळतो, भाईसाहेबांचा धोका पत्करून. पण खरं टेस्ट क्रिकेट कसं असतं ते बघायला नको?” विनयनं पुष्टी दिली.

“तिकिटं मिळतील का पण? अख्खी मुंबई लोटेल मॅच बघायला!” जवाहरनं शंका काढली.

“तिकिटांची काही काळजी नाही. प्रकाशचे वडील बॉम्बे जिमखान्यात आहेत. कितीही तिकिटं आणू शकतात.’

“किंवा सुरेशदादाला सांगू. त्याच्या ओळखी आहेत.’

“किंवा नानाचे मेहुणे. ते तर राजकारणात आहेत.’

टेस्ट मॅचच्या तिकिटांसाठी तसे भरपूर वशिले होते आमच्या सोसायटीत.

कुमार सगळे दिवस जाणार होता टेस्ट मॅच बघायला. त्याचे वडील ऑफिसच्या कामासाठी जमशेदपूरला गेले होते. आईची परवानगी (आणि तिकिटाला पैसे) काढणं त्याला फारसं कठीण गेलं नाही. ती कुमारला कशालाही ‘नाही’ म्हणायची नाही. आम्हाला हेवा वाटायचा त्याचा.

आणि विनय तर काय, आणखी नशीबवान! त्याचे वडील डॉ. ढोलेकर त्यांचा दवाखाना बंद ठेवून अख्ख्या कुटुंबाला घेऊन टेस्ट मॅच बघायला जाणार होते. ते लहर आली की अधूनमधून दवाखाना बंद ठेवायचे. त्यांच्या पेशंट्सनाही सवय झाली होती. कंपाऊंडर प्रामाणिकपणे बाहेर बोर्ड लावायचा- ‘आज डॉक्टर सिनेमाला जाणार आहेत (किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला जाणार आहेत) म्हणून दवाखाना बंद राहील.’ पेशंट्स बोर्ड वाचून, आपापले आजार घेऊन घरी परत जायचे.

विनय, त्याच्या दोन मोठ्या बहिणी, आई आणि डॉक्टर ढोलेकर असे पाचही जण जाणार होते. ते सोसायटीत आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायचे. त्यांची गाडी होती. प्रकाशचे वडील माझ्या बाबांचे चांगले मित्र होते. त्यांनी बाबांना मॅचच्या एका दिवसाची दोन तिकिटं आणून दिली. एकच दिवस मॅच बघायला जायचं होतं तरी मला खूप आनंद झाला.

मला वाटलं होतं, मी बाबांबरोबर जाणार आहे. पण बाबा म्हणाले, “राणूला घेऊन जा.’

“पण बाबा, तो किती लहान आहे. त्याला कशाला न्यायचं?” मी कुरकूर केली.

“तुझ्याएवढीच क्रिकेटची आवड आहे त्याला. लहान असला म्हणून काय झालं?” बाबा म्हणाले.

“पण जाणार कसं दोघं? ट्रेननं की बसनं?” आईची काळजी सुरू झाली.

आम्ही दोघंच असे कधी बाहेर गेलो नव्हतो. नेहमी आई-बाबा असायचे बरोबर, किंवा कोणीतरी मोठं माणूस; नात्यातलं किंवा सोसायटीतलं.

बाबांनी शेजारच्या बिल्डिंगमधल्या डॉ. ढोलेकरांच्या घरची बेल दाबली. बाबांबरोबर आईही गेली होती. आईच्या मागे मी.

“आमच्या मुलांनाही टेस्ट मॅच बघायला जायचं आहे,” ढोलेकर बाबांना आत घेऊन गेल्यावर बाबांनी विषय काढलाच.

“अरे वा!” ढोलेकरांना आनंद वाटला.

“दोघांनाही क्रिकेटची आवड आहे.’

“अरे वा!’

“राणू तर एवढा लहान असून घरच्या घरीसुद्धा क्रिकेट खेळतो. बॉल नाही मिळाला तर बटाटे वापरून बोलिंग करतो.’

“किंवा पेरू-” आईनं अधिक माहिती पुरवली.

“अरे वा!”

“त्यांना दोघांनाच पाठवायचं म्हणजे भीती वाटते. तुम्ही गाडी नेणार आहात, तेव्हा म्हटलं तुमच्याबरोबर पाठवावं,” आईनं सांगून टाकलं.

इथं ढोलेकर ‘अरे वा’ म्हणायचे थांबले. विनयची आई म्हणाली, “अहो, पण बरं का, गाडी एकदम फुल आहे आमची. फियाटमध्ये पाचजण म्हणजे अगदी फिट्ट बसतात.”

“असं करा वेणूताई, तुम्ही आणि डॉक्टर पुढे बसा. विनय, वनिता आणि वेदान्ती मागे एकमेकांना चिकटून बसतील आणि...” आईनं पुढाकार घेऊन त्यांच्या गाडीतली बसण्याची व्यवस्था सांगायला सुरुवात केली. “ह्याला जागा कमी लागते-” ती माझ्या दंडाला धरून म्हणाली.

“राणू माझ्या मांडीवर बसू शकेल,” मीही चर्चेत सामील झालो.

त्यांना शेवटी ‘हो’ म्हणावंच लागलं!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285

.............................................................................................................................................

ढोलेकर काकांच्या गाडीतून जायला मिळणार या कल्पनेनेच मी खूश झालो होतो. त्यावेळी ते अप्रूप होतं. आमच्या एकशे चाळीस बिऱ्हाडांच्या सोसायटीत फक्त तीन की चार गाड्या होत्या! एखाद्या गाडीत बसायला मिळणं ही आम्हाला पर्वणी वाटायची. पाटीलकाका त्यांच्या छोट्या हिलमन गाडीतून आम्हाला २६ जानेवारीची रोषणाई बघायला न्यायचे, तेव्हा गाडीत अकरा मुलं कोंबून बसलेली असायची. दरवाजा उघडल्याबरोबर दोन-तीन मुलं फुटपाथवर पडायची.

टेस्ट मॅचच्या दिवशी मी आणि राणू लवकर उठून, तयार होऊन, सणासुदीला घालतात तसे कपडे घालून डॉ. ढोलेकरांच्या गाडीजवळ जाऊन उभे राहिलो. हो, आम्हाला उशीर झाला म्हणून त्यांनी निघून जायला नको. काही वेळानं विनय, त्याच्या बहिणी, आई आणि वडील खाली उतरले आणि उशीर झाल्यामुळे घाईघाईत गाडीकडे आले. विनयच्या आईनं बिल्डिंगच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरच्या बाल्कन्यांमध्ये उभ्या असलेल्या बायकांना- ‘टेस्ट मॅच बघायला चाललोय- वेस्ट इंडिज-इंडिया, ब्रेबॉर्न स्टेडियम-’ असं ओरडून सांगितलं. विनयच्या बहिणींनीही वर बघून हात हलवला. मी आणि राणूनंही हात हलवला; पण तो आईकडे बघून होता. ती स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहत होती आणि ‘जपून जा’, ‘डब्यात दिलंय ते खा’, ‘राणूचा हात सोडू नको’ अशा सूचना खुणा करून सांगत होती.

डॉ. ढोलेकरांनी गाडी सुरू केली आणि उशीर झाल्यामुळे वेगात हाणली. वाटेतले लाल सिग्नलही त्यांनी जुमानले नाहीत.

ब्रेबॉर्न स्टेडियम जवळ आल्याचं किलोमीटरवरून कळलं. इतका माणसांचा आवाज घुमल्यासारखा येत होता. ‘इथंच ये मॅच संपल्यावर,’ डॉ. ढोलेकरांनी गाडी पार्क केल्यावर दरवाजा लॉक करता करता सांगितलं. आमची तिकिटं वेगवेगळ्या ठिकाणांची होती. त्यांचा नॉर्थ स्टँड होता. मी आणि राणू ईस्ट स्टँडमध्ये होतो. मी ढोलेकरांच्या गाडीकडे विनासायास येता यावं म्हणून ‘के. रुस्तुम आईस्क्रिम’च्या दुकानाची खूण लक्षात ठेवली.

लोकांचा प्रचंड लोंढा स्टेडियमच्या दिशेनं चालला होता. एवढी गर्दी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. घाबरायलाच झालं. विचारत विचारत मी ईस्ट स्टँडच्या गेटकडे आलो. माझा हात धरून राणू. आपोआप ढकलला जात मी स्टँडमध्ये पोचलो. अंपायर्स हिरव्यागार मैदानावर पॅव्हेलियनमधून हळूहळू चालत येताना दिसले. खेळ सुरू होत होता. आमच्या जागांवर एक जाडीजुडी फॅमिली आरामात बसलेली दिसली. मी त्यांना तिकिटं दाखवली. पण ते काही दाद देईनात. ‘दुसरी जगह बैठो ना बेटा’ असं म्हणू लागले. आता काय करावं...

उर्वरित कथा थेट पुस्तकात वाचा.

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4286

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......