अजूनकाही
१. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला भारतीय गुप्तचर यंत्रणेची भीती वाटते, हे ऐकून अतिशय चांगलं वाटलं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. हाफिजची सुरक्षा वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पत्र दिल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. परदेशी गुप्तचर यंत्रणेनं हाफिजच्या हत्येचा कट आखल्याचा संशय पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा इशारा रॉकडेच होता, असं मानलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असलेला हाफिज सईद सध्या लाहोरमधील जोहर टाऊनमध्ये वास्तव्यास आहे.
हाफिज सईदला एवढं घाबरण्याचं काही कारण नाही. भारताला पंचवीसेक वर्षांपासून हवा असलेला गुन्हेगार त्याच्या जवळच्याच शहरात राहतो, अधूनमधून दुबईला जातो; पाकिस्तानातून भारतातलाही ‘कारभार’ सांभाळतो. भारतीय गुप्तचर संस्था त्याचा खात्मा करताना दिसतात, पण फक्त हिंदी सिनेमात. आमच्या गुप्तचर संस्थांचे तुमच्या देशातले एजंट दिलेर आहेत, देशासाठी जीव पणाला लावणारे आहेत. त्यांच्या डोक्यावरचे इथं बसलेले उच्चाधिकारी मात्र देशहितापेक्षा राजकारण्यांच्या हिताहिताला अधिक बांधील आहेत.
.............................................................................................................................................
२. भारतात बदल घडवण्याचं काम वेगात सुरू असून, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतात नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. फिलिपीन्सची राजधानी मनिला इथं तीन दिवसीय आसिआन आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला सोमवारपासून सुरुवात झाली असून या परिषदेसाठी नरेंद्र मोदी फिलिपीन्समध्ये आहेत. तिथं त्यांनी ही माहिती दिली.
विलक्षण पारदर्शक कारभार हो. कंपनी हा शब्द उच्चारायच्या आत ती सुरू होते, १६०० पट फायदा मिळवते आणि बंदही होते. खुद्द पंतप्रधानच त्यांच्या कारभारातून पारदर्शकतेची ग्वाही देताना दिसतात. ते कोणत्याही पक्षाला पारदर्शक कररचनेत आणत नाहीत. आपल्याला कोणी अडचणीचे प्रश्न विचारू नयेत म्हणून पत्रकार परिषद घेत नाहीत. संसदेत भाषण ठोकायला जातात. आपल्या मनानं नोटबंदीसारख्या घोषणा करून मोकळे होतात. सहकारी मंत्री आणि अधिकारी आपल्या ‘हाताखाली’ असल्यासारखे उत्तरदायी असावेत, त्यांचा सगळा कारभार आपल्याला पारदर्शकपणे दिसेल, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांचा कारभार मात्र मनातल्या मनात पारदर्शक असावा. अर्थात, त्यांना कुठे कंपनी काढायची गरज आहे?
.............................................................................................................................................
३. दिल्लीच्या प्रदूषणावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सीने में जलन, आँखों मे तूफान सा क्यूँ है’ या सुप्रसिद्ध गज़लेच्या आधारे शायरीच्या माध्यमातून तिखट भाष्य केलं आहे. दिल्लीत प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडूनही सर्व यंत्रणा शांत का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे. ‘गमन’ या सिनेमातील जयदेव यांच्या संगीतातल्या या गाण्यानं सुरेश वाडकर यांचं हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायनात पदार्पण झालं होतं.
राहुल यांनी ‘पप्पू’ इमेज झटकून गंभीर राजकारणी म्हणून खेळी खेळायला सुरुवात केली आहे आणि त्यांना चांगले स्क्रिप्टरायटर मिळाले आहेत, हे स्पष्टच आहे. पण, दिल्लीची काय किंवा देशाची काय, जी काही अवस्था झाली असेल, त्याला आपण म्हणजे आपला पक्षही जबाबदार आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. दिल्लीवर आणि देशावर तीनच वर्षांपूर्वीपर्यंत आपण सत्ता गाजवत होतो आणि ती प्रदीर्घ काळ हातात होती. तो सगळा कालखंड निष्क्रियतेचा नसला, तरी त्यात दिल्लीच्या तथाकथित विकासाला चालना देण्यापलीकडे आपणही काही केलेलं नाही, ही त्याचीच फळं आहेत, हे लक्षात ठेवलेलं बरं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285
.............................................................................................................................................
४. वस्तू आणि सेवा करांतर्गत २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये गेल्याच आठवड्यात मोठे बदल करण्यात आले. यानंतर आता कमी कर असलेल्या स्लॅबमध्ये पुढील बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीएसटीच्या अंतर्गत दोन ते तीन स्लॅब येऊ शकतात. जीएसटी यंत्रणेत थोडी स्थिरता आल्यावर आणि मागील आठवड्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे महसुलावर होणाऱ्या परिणामाचे चित्र स्पष्ट झाल्यावर पुढील बदल करण्यात येतील, असं ‘इकॉनॉमिक टाईम्स’नं म्हटलं आहे. उद्योगविश्वातून मिळणाऱ्या अभिप्रायांच्या आधारे कायदे, नियम आणि प्रक्रिया सोप्या करण्याचं काम जीएसटी परिषदेच्या अजेंड्यावर असणार आहे. पुढील काही बैठकांमध्ये याचा प्रामुख्यानं विचार केला जाणार आहे.
काही म्हणा, इतकं प्रयोगशील सरकार देशानं याआधी पाहिलं नसेल. हे प्रयोग करताना देशातल्या जनतेला आपण गिनीपिगप्रमाणे वापरतो आहोत, याबद्दल कोणाला काही खेद-खंत वगैरे वाटताना दिसत नाही. काही गोष्टींचे अभ्यास आधी करायचे असतात आणि नंतर त्या लागू करायच्या असतात, हे या अनुभवशिक्षणवाद्यांना पटत नसावं बहुतेक. कारण, त्यांना याचे अनुभव अजून भोगायला लागलेले नाहीत. आधी जे भोगावं लागलं होतं, त्यातून त्यांनी काहीही शिक्षण घेतल्याचं दिसत नाही.
.............................................................................................................................................
५. गुजरात निवडणूक जिंकण्याचं स्वप्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुळीच पाहू नये. राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून अमेठी या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात. अमेठी हा गांधी आणि नेहरू परिवाराचा ५० वर्षांपासूनचा मतदारसंघ आहे. मात्र इतक्या वर्षांत राहुल किंवा त्यांच्या कुटुंबापैकी इतर कोणालाही अमेठीचा विकास करता आला नाही तर ते देशाचा विकास कसा करतील? गुजरातमध्ये निवडणूक कशी जिंकतील? असे प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केले. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून राहुल यांनी धडा घ्यावा, असंही इराणी यांनी स्पष्ट केलं.
गुजरातमध्ये इतकी विकासगंगा वाहवल्यानंतर राहुल यांनी खरं तर निवडणुकांसाठी तिकडे फिरकायलाच नको होतं. पण गुजरातमध्येच ग्रामपंचायतीही आहेत आणि त्यांचे निकाल काही वेगळंच सांगणारे आहेत. राहुल यांच्याबरोबर हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना मिळणारा प्रतिसादही काही वेगळंच सांगणारा आहे. पंतप्रधानांचा गड असलेलं राज्य भाजपच्या हातातून जाणार नाही, याबद्दल कोणालाच शंका नाही. मात्र, त्यासाठी स्मृतीताईंच्या तोंडपाटीलकीबरोबरच अन्य अनेक नेत्यांना तळागाळात उतरून काम करायला लागतंय, हेही विसरून चालणार नाही. खासदार देशाचा विचार करायला पाठवायचा असतो, स्थानिक कामं करायला पालिका संस्था, राज्य सरकारं आणि आमदार असतात, हे आता लोकसभेचेही बहुतेक पेव्हर ब्लॉकबहाद्दर खासदार विसरले असतील; बिना-मतदारसंघांच्या राज्यसभा खासदारांना ती जाण असण्याची अपेक्षा व्यर्थच आहे!
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment