अजूनकाही
आज आपण स्पर्धात्मक संघर्षाच्या शर्यतीत इतके गुरफटले गेलो आहोत की, आपल्या आयुष्याचा आणि निसर्गाचा समतोल राखण्याची शिकवण पूर्णपणे विसरलो आहोत. आपल्या प्रत्येक क्रियेचा आपल्या आयुष्यावर आणि निसर्गावर काय परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवं. निसर्गाचा समतोल राखणं हे आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग व्हायला हवा. आपण सर्वजण हवामानबदलाविषयी जाणून आहोत, पण त्याविषयी फारसं काही करायला प्रेरित झालेलो नाही.
निसर्ग स्वत:ही समतोल राखण्याचा प्रयत्न करतो, पण आपण भौतिक सुखामागे पळण्याच्या नादात त्या निसर्गचक्राचा स्वीकार व आदर करायला तयार नाही. म.गांधी म्हणाले होते, निसर्गात सर्वांच्या गरजा पुरतील इतकं आहे, पण त्यांच्या लोभास पूर्ण करेल इतकं नाही. माणूस हा असा प्राणी आहे, जो त्याच्यावर संकट येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. २१व्या शतकात आपण जी प्रगती करत आहोत, ती निसर्गाच्या संवर्धनाच्या संलग्न कशी राहील याचा विचार न करता करत गेलो. परिणाम त्याचे दुष्परिणाम आता आपण अनुभवतो आहोत. औद्योगिक क्रांती चालू झाल्यापासून आपण जी प्रगती केली आहे, त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गावर होत गेले आहे. पाश्चिमात्य देशांनी ज्या पद्धतीने प्रगती केली तोच मार्ग बरोबर आहे असं समजून अनेक प्रगतीशील देश आंधळेपणाने त्याच मार्गावरून चालत आहेत.
या अनियंत्रित प्रगतीचे दुष्परिणाम आपण हवामानबदलाच्या माध्यमातून अनुभवत आहोत.
हवामानबदल ही जरी पाश्चिमात्य देशांच्या अनियंत्रित व बेजबाबदारपणामुळे सर्वांना मिळालेली देण असली, तरी त्याचे परिणाम मात्र सर्वांना मोठ्या प्रमाणावर भोगावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांपासून होणारा अतिउष्ण व जास्त वेळ असणारा उन्हाळा, अवेळी व उशिरा चालू होणारा पावसाळा, असमान व अनियंत्रित पडणारा पाऊस, हिमालयीन भागात येणारे विनाशकारी पूर आणि अनेकदा पडणारा प्रखर दुष्काळ हे सर्व हवामान बदलाचे परिणाम आहेत. पर्यावरण समस्येला उच्च प्राधान्य देणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १५० आसपास आहे. जलद गतीने होणाऱ्या या हवामान बदलामुळे परिणामांना सामोरे जाण्यास आपण देश व व्यक्तिगत पातळीवर अजूनही तयार नाही आहोत. हवामान बदलामुळे भारतीय मान्सूनमध्ये होणारे बदल आणि त्यामुळे होणारा शेतीवरील व अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचा आपण विचार करण्याची नितांत गरज आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार भारतामध्ये येणाऱ्या दशकात १३ लाख लोक हवामान बदल व त्यामुळे होणाऱ्या परिणामांमुळे दगावणार आहेत. भारतीय माणसं वायूप्रदूषणाच्या पीएम लेवलनी त्रस्त असतानाच जागतिक बँकेच्या ‘द कॉस्ट ऑफ एअर पॉल्युशन’ या अहवालानुसार भारतामध्ये ओझानचे प्रमाण १९९० ते २०१३ दरम्यान १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे श्वसन, अस्थमांसारखे विविध आजार होऊ शकतात.
भारताची राजधानी दिल्ली ही जगात सर्वांत जास्त प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाली आहे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. २०१५मध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारताच्या दौऱ्यावर येणार होते, तेव्हा जागतिक स्तरावर दिल्लीचा ओबामा यांच्या स्वास्थ्यावर काय दुष्परिणाम होतील याची बरीच चर्चा झाली होती (“मिस्टर प्रेसिडेंट, वल्डर्स वर्स्ट एअर इज टेकिंग 6 अवर्स ऑफ युवर लाइफ”). तीच हवा आज आपली सर्व नेते मंडळी, दिल्लीकर घेत आहेत. वरचेवर ती अजूनच खराब होत चालली आहे.
आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासानुसार particulate matter (pm) हे दिल्लीच्या प्रदूषणाचं सर्वांत मुख्य कारण आहे. त्यावर मात करण्यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्या पुढील ग्राफिकमध्ये पाहता येतील.
त्या सूचनांच्या आधारावर दिल्ली सरकारने ऑड-इव्हनसारखे काही उपक्रम राबवले. त्यांना दिल्लीकरांनी चांगला प्रतिसादही दिला. परंतु हे उपक्रम काही दिवस राबवून नंतर त्यांची सक्ती थांबली की, त्याचा सर्वांना विसर पडतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285
.............................................................................................................................................
दिल्ली हे महानगर मुंबई, कोलकाता, मद्रास या शहरांसारखे समुद्रकिनारी नसून त्याच्या चहूबाजूंनी जमीन आहे. कारण ते देशाच्या मधोमध आहे. दिल्लीच्या या विशिष्ट परिस्थितीमुळे प्रदूषित हवा हटून त्याजागी नवीन शुद्ध हवा भरलं जाण्याचं प्रमाण कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीच्या सर्व बाजूंनी औद्योगिक वसाहती आहेत. त्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. वीटभट्ट्या, वीजप्रकल्प, वाहनांची मोठी संख्या ही प्रदूषणाची कारणं आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणात जाळण्यात येणारी शेतं, शहरातली वाहनं, कमी दर्जाच्या इंधनाचा होणारा वापर, मोठमोठ्या औद्योगिक पट्ट्यामध्ये होणारा डिझेलचा वापर आणि अनियंत्रित व बेकायदेशीरपणे होणारी बांधकामं अशी अनेक कारणं दिल्लीच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहेत. या सर्वांत भर टाकली ती दिवाळीच्या फटाक्यांनी. त्यामुळे ही समस्या इतकी उफाळून वर येण्याची.
आता दिल्ली सरकार पुन्हा ऑड-इव्हन पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे. पण त्यातून दुचाकी गाड्यांना सूट दिली जाते. परंतु आयआयटीच्या अभ्यासानुसार दुचाकी गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. ट्रक्समुळे होणारे प्रदूषण ४६ टक्के आहे, तर टु व्हिलरर्समुळे होणारं प्रदूषण ३३ टक्के आहे. याशिवाय कारमुळे १० टक्के तर बसेसमुळे पाच टक्के प्रदूषण होतं. म्हणजे प्रदूषणाचा एक महत्त्वाचा घटक या नियमांतूनच वगळला जातो आहे.
प्रदूषणाची कारणे, स्रोत आणि त्यांचा परिणाम हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत.
दिल्लीच्या दक्षिणेला बदरपूर थर्मल पॉवर प्लँट आहे. जो देशातील सर्वांत अकार्यक्षम प्लँटपैकी एक आहे. तसंच दुसरा जो दादरी येथील पॉवर प्लँट आहे तो दिल्लीच्या पूर्वेला ४८ किलोमीटरवर आहे. दिल्लीतील वीट भट्ट्या, अकार्यक्षम कारखाने बंद केले गेले असले तरी ते दिल्लीच्या सीमावर्ती भागात जाऊन स्थापन झाले आहेत. उत्तर व उत्तर-पश्चिम भागात (गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, हापूर इ.) या वीटभट्ट्या व कारखान्यांची मोठी संख्या आहे. जी प्रदूषणाला (PM 2.5) हातभार लावतात. वीजेच्या कमतरतेमुळे वीज भट्ट्या, छोटे-मोठे कारखाने, आयटी पार्क यांना डिझेल जनरेटरचा वापर करावा लागतो. शेजारच्या पंजाब व हरयाणामध्ये शेतातील पाला-पाचोळा जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.
सकाळ-संध्याकाळी होणारे ट्रॅफिक जॅम, अपुरी सार्वजनिक वाहनव्यवस्था, ती वापरण्याचं लोकांचं कमी प्रमाण, भ्रष्ट प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा, यांमुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढली आहे.
दिल्लीच्या आसपासचे वीजप्रकल्प आणि विटभट्ट्या
ज्या ज्या वेळी दिल्लीतील हवा बदलते, त्या त्या वेळी हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा जटील होतो. ऑक्टो-नोव्हेंबरच्या मध्यावर हवेची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे होते. याच काळात शेतातील पाला-पाचोळा जाळला जातो. दिल्लीतील २८ औद्योगिक प्रकल्पांपैकी केवळ १७ वेस्ट ट्रीटमेंट प्लँटशी जोडलेले आहेत. दीड लाख कारखान्यांपैकी ७५ टक्के कारखाने हे नॉन-इंडस्ट्रिअल क्षेत्रांतून काम करतात. ते आवाज, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण करतात. दिल्लीतील अर्ध्यापेक्षा जास्त घाण आणि प्रदूषित पाणी थेट यमुना नदीत सोडलं जातं. ही नदी यमुनोत्री ते वझिराबादपर्यंत स्वच्छ असते. ती नंतर इतकी प्रदूषित होत जाते की, दिल्लीबाहेर तिचा प्रवाह जवळ जवळ मृत होतो. तिच्या पाण्यात सोडण्यात येणारे विषारी व घाण पदार्थ जमिनीतील पाणीप्रवाहही दूषित करतात. दिल्लीतील जमिनीतील पाणीपातळीही अतिवापरामुळे कमी झाली आहे.
थोडक्यात दिल्लीमध्ये हवा आणि पाणी यांनी नैसर्गिक चक्र खंडीत केलं आहे. त्यामुळे वर्षांतील अनेक दिवस असे येतात की, त्या दिवशी दिल्लीतील जनजीवन ठप्प होतं. मागील पंधरवड्यात दिवाळी झाली. आजूबाजूच्या प्रदेशातील शेतांमध्ये जाळलेला कचरा, कारखाने-विटभट्ट्या,वीजप्रकल्प व वाहनांचे प्रदूषण या सर्व घटना आणि निसर्गातील बदल असा जुळून आल्या की, दिल्लीकरांना घरात बसूनही मोकळा श्वास घेणं अवघड होऊन बसलं.
वाढणाऱ्या शहरांच्या गरजा पुरवणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे नाहीत आणि ते निर्माण करण्याची राज्यकर्त्यांची दृष्टीही नाही. त्यामुळे आपण नागरिक म्हणून हवामान बदलाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. एकटं सरकार काही करू शकणार नाही. आज देशाच्या राजधानीत श्वास घेणं मुश्किल झालं आहे, तीच वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते.
आपण बाहेरील पाणी खराब आहे म्हणून मिनरल वॉटरची बाटली विकत घेतो. त्याचप्रमाणे उद्या बाहेरची संपूर्ण हवाच खराब झाली म्हणून शुद्ध हवेची बाटली विकत घेण्याचीही वेळ आपल्यावर येऊ शकते. आणि अजून तरी भारतात शुद्ध, स्वच्छ हवा विकत मिळत नाही.
.............................................................................................................................................
लेखक माधव लहाने व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.
madhav.lahane@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment