नोटरंग : दोन कविता
पडघम - साहित्यिक
मुग्धा कर्णिक
  • दोन हजार रुपयांची नवी नोट.
  • Sat , 12 November 2016
  • नोटरंग मुग्धा कर्णिक Mugdha Karnik Note

१.

एक नोट डिझाइन करावी म्हणते...

कुणाची स्टाईल कॉपी करू?

साल्वादोर दालीची बरी राहील?

ओघळलेल्या घड्याळांप्रमाणे वितळून ओघळलेला गांधी नोटेवर पसरेल

की गांधीऐवजी टाकून द्यावा दालीच्या मनातला

युद्धाचा चेहरा?

आणि व्हॅन गॉगच्या गव्हाच्या शेतीतली काही कणसे फराट्यांसारखी मधेमधे

किंवा बटाटे खाणारे काळेपांढरे हात!

की पिकासोच्या आसवं ढाळणाऱ्या स्त्रीप्रमाणे रंगीबेरंगी चिमटलेला

दुभंग गांधी असू दे मध्यभागी?

आणि ग्युएर्निकाचे भस्मरंगी नाझीयुद्धदृश्य पार्श्वभूमीवर?

गाय नि गाढवंही असतील त्यात...

की उण्यापुऱ्या शतकापूर्वी काझिमिर मालेविचने काढलेल्या

काळ्या चौरसासारखी असू दे नोट...

शतवाटांनी तडकलेला

शून्यातून शून्याकडचा प्रवास...

मग एक की दोन अंकावर असू देत कितीही शून्ये

कदाचित् सोपी जाईल छपाईला...

दालीचं ओघळणारं घड्याळ, व्हॅन गॉगचे बटाटे खाणारे काळे पाढंरे हात आणि पिकासोची आसवं ढाळणारी स्त्री

२.

रियाझ म्हणाला

तुमची नोटेवरची कविता वाचून

मला गांधी एडवर्ड मंचच्या ‘स्क्रीम’मधल्या रंगरेषेसारखे किंचाळताना दिसले.

बरोबर आहे.

व्याकूळ वेदना उमटू शकते कुठल्याही मनातून

 

पण कदाचित् नाही किंचाळणार कुणीही...

गांधीसुद्धा...

आताशा किंचाळणारे रंग आणि गोडगुलाबी रंग

सरमिसळ होत राहते...

सोपे नसते रंगरेषांतून असे किंचाळी फोडणे

मृत्यूनंतरही जगाला हादरवत रहाणारी किंचाळी की किंकाळी?

तशा तर कितीएक किंकाळ्या जिरवल्यात आम्ही.

पशूंच्या शिंगामागून डोकावणारे परशू

होतात कुंचले रक्तरंगात भिजून कॅन्वास चिताडणारे...

त्या रंगरेषांतून ऐकू येतात ते जयजयकार.

 

Not a SCREAM, Riyaz, No scream...

शिवाय एडवर्ड मंच होता स्वदुःखमग्न चित्रकार

इथे जमतात सारे दुसऱ्यांची दुःखे 'साजरी' करणारे रंगविक्ये

इथे किंकाळी नाही, रियाझ...

इथे डीज्जे! ढोलही...

 

लेखिका मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक आहेत.

mugdhadkarnik@gmail.com

Post Comment

Arhna Pendse

Fri , 18 November 2016

सणसणीत भाष्य!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......