एका बुटक्या माणसाच्या प्रेमाची गोष्ट 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • 'मैं, मेरी पत्नी और वो'चं पोस्टर
  • Sat , 11 November 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar मैं मेरी पत्नी और वो Main Meri Patni Aur Woh ‎राजपाल यादव Rajpal Yadav‎ रितुपर्ण सेनगुप्ता Rituparna Sengupta

काही चित्रपट एका विशिष्ट मौसमातच बघावे लागतात. 'मैं, मेरी पत्नी और वो' हा पावसाळ्यात बघण्याचा पिक्चर आहे. बाहेर दुपारीच अंधार झालेला असावा. मुसळधार पाऊस सुरू असावा आणि हातात वाफाळत्या कॉफीचा मग असावा. आणि समोर 'मैं, मेरी पत्नी और वो' चालू असावा. तो पावसाळी दिवस सार्थकी लागतो!

सुंदर बायको आणि सामान्य नवरा हा तसा आपल्याकडचा विनोदाचा विषय. विशेषतः पुरुषांच्या म्हणून ज्या गप्पा असतात, त्यामध्ये हा नवरा एकाच वेळेस टवाळीचा आणि जेलसीचा विषय असतो. 'लंगूर के हाथ मे अंगूर' ही म्हण अशाच गप्पांमधून प्रसवली असावी. अजूनही इथं न सांगता येण्यासारख्या बऱ्याच म्हणी आहेत. गोरा रंग, चांगली उंची, प्रमाणबद्ध शरीर अशा गोष्टींचं प्रमाणाबाहेर उदात्तीकरण झालेल्या समाजात या गोष्टी अंगी नसलेल्या लोकांची हेटाळणी होणं हे तसं स्वाभाविकच. 

पुरुष जमातीचं एक गुपित आहे. बहुतेक पुरुषांना आपली बायको/ प्रेयसी/गर्लफ्रेंड ही आपल्यापेक्षा सुपीरियर असल्याचा गंड असतो. आपली लायकी नसताना इतकी चांगली मुलगी आपल्याला कशी मिळाली, असा विचार हटकून त्यांच्या डोक्यात दिवसात एकदा तरी येत असतोच. हा गंड किंवा कॉम्प्लेक्स पुरुषांच्या वागणुकीतून वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत असतो. काही जण आपल्या आयुष्यात असलेल्या स्त्रीवर विविध मार्गांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतात, तर  काहीजण तिच्यासमोर सपशेल शरणागती पत्करतात. काही जणांची तऱ्हा वेगळी असते. अनेक कारणांनी आलेला एकलकोंडेपणा त्यांना आपल्या भावना व्यक्त करू देत नाहीत. मग आजन्म कुढत राहणं हा एकच पर्याय उरतो.

सुंदर बायको आणि अतिसामान्य नवरा या सिनारियोमधला नवरा जर या तिसऱ्या श्रेणीतला असेल तर मग विचारूच नका. त्याला एकाच वेळेस समाज, आजूबाजूच्या लोकांचे टोमणे आणि सगळ्यात भयानक म्हणजे आपण कमी आहोत, या भावनेतून आलेलं अंतर्द्वंद्व कोणत्याही माणसाचा कणा मोडण्यास समर्थ आहे. 'मैं, मेरी पत्नी और वो' हा अप्रतिम चित्रपट अशाच एका बुजऱ्या, बुटक्या सुंदर स्त्रीच्या नवऱ्याची गोष्ट सांगतो.

'मैं, मेरी पत्नी और वो'मधला मिथिलेश शुक्ला हा एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन लाजाळू माणूस. लखनौ विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून कामाला असतो. कामात एकदम चोख आणि तत्त्वांचा माणूस. वडिलांच्या अकाली जाण्यामुळे लहान वयातच खांद्यावर जबाबदाऱ्या पडलेल्या. स्वतःच्या भावा बहिणीचे संसार उभे करताना याचा स्वतःचा संसार उभा राहायचा राहून गेला असतो. शिवाय आपल्या कमी उंचीचा मिथिलेशला कॉम्प्लेक्स असतो. पंचक्रोशीत मिथिलेशची ओळख 'छोटे बाबू' या थोड्या प्रेमळ आणि थोड्या टोमणेबाज नावानं असते. या सगळ्या कारणांमुळे मिथिलेश एकलकोंडा बनला असतो. नाही म्हणायला विद्यापीठाच्या हॉकी टीमचा कोच असणारा धसमुसळा आणि अतिउत्साही सलीम (वरुण बडोला) हा मिथिलेशचा मित्र असतो. पण गर्दीत राहूनही एकटा राहणारा मिथिलेश सलिमसमोर पूर्णपणे व्यक्त होत नसतो. त्याची व्यक्त होण्याची एकमेव जागा असते. गोमती किनारी असणाऱ्या मंदिरात शंकरासमोर पिंडीवर दूध चढवता चढवता मिथिलेश आपलं मन मोकळं करत असतो.

मिथिलेशची घडीघडी डोळ्यात पाणी आणणारी आई त्याच्यामागे 'लग्न कर' अशी भुणभुण लावत असते. तिच्या सततच्या तगाद्याला कंटाळून मिथिलेश आपल्या मामासोबत बरेलीला एक मुलगी बघायला जातो. आता वयाच्या या टप्प्यावर लग्न करण्यात मिथिलेशला रस नसतो. जायच्या अगोदरच आपल्याला नकार मिळेल आणि नाही मिळाला तर आपणच नकार देऊ अशी खूणगाठ बांधूनच मिथिलेश बरेलीला जाणाऱ्या बसमध्ये चढतो. पण वीणाला (रितुपर्णा सेनगुप्ता ) बघताच त्याचा निर्धार ढासळतो. सुंदर, उच्चशिक्षित वीणा पत्रिकेत असणाऱ्या काही दोषांमुळे अविवाहित राहिलेली असते. आपल्याला वीणा कितीही आवडली तरी उपयोग नाही. इतकी सुंदर आणि मुख्य म्हणजे उंच मुलगी आपल्यासारख्या माणसाला ‘हो कशाला म्हणेल?’ याची वास्तववादी जाणीव मिथिलेशला असते. पण कधीकधी नियतीच्या मनात वेगळंच असतं.

मिथिलेशमध्ये आणि वीणामध्ये खूप चांगल्या गप्पा होतात. दोघांनाही हिंदी साहित्य आवडत असतं. दोघांनाही पत्रं लिहायला आवडत असतं. दोघांनाही क्रिकेट आवडत असतं. मिथिलेशला सचिन तेंडुलकर आवडत असतो आणि वीणाला गांगुली. फक्त 'दिसण्यावरून 'जज होत राहिलेल्या वीणाला मिथिलेशच तिला दिसण्यापलीकडे जाऊन समजून घेणं भावतं. अनपेक्षितरीत्या ती मिथिलेशला होकार देते. मिथिलेशला आभाळ ठेंगणं होतं. पण लग्नाच्या मांडवातच या बेमेल जोडप्याबद्दल असणारी कुजबुज मिथिलेशच्या कानावर पडू लागते. बायको एवढी सुंदर आणि नवरा असा, या चर्चा ऐकूनच मिथिलेशच्या मनाला जखमा व्हायला लागतात. पण लग्नानंतर खरी समस्या सुरू होणार असते. नवविवाहित दाम्पत्य जिथं जिथं फिरायला जातं, तिथं लोकांच्या नजरा मिथिलेशला टोचायला लागतात. सगळेच पुरुष आपल्या बायकोकडे अभिलाषेच्या नजरेनं बघत आहेत असं त्याला वाटायला लागतं. त्याचा संशय बायकोवर मुळीच नसतो. आपण वीणाला अनुरूप नसल्यामुळे इतर पुरुषांना वीणा 'रिचेबल' वाटत असावी, असा त्याचा समज असतो. दूध टाकायला येणारा भैय्या, नेहमीचा ऑटोवाला, भाजीवाला या सगळ्यांकडे तो संशयानं बघायला लागतो. इतकंच काय ज्याला तो छोटा भावासारखा मानत असतो, त्या सलीमबद्दलही त्याला संशय वाटायला लागतो.

त्याची एक जुनी स्कुटर असते. त्याच्या उंचीनुसार सीट बनवून घेतलेली. पण उंच वीणा या स्कुटरवर आपल्या मागे बसली तर लोक आपल्याला हसतील ही काळजी मिथिलेशला पोखरायला लागते. मिथिलेश मग हे आव्हान स्वीकारतो. दूध टाकायला येणाऱ्या भैय्याला काढून टाकतो. नेहमीचा भाजीवाला बदलला जातो. स्कुटरची सीट उंच करून घेतली जाते. खालपर्यंत पाय पोहोचत नसतात, पण ठीक आहे. एक शक्कल लढवून मिथिलेश वीणाला सलीमला राखी बांधायला लावतो. ती आघाडीही निर्वेध होते. आता सगळं सुरळीत होईल असं मिथिलेशला वाटायला लागतं. पण तो भ्रम असतो.

लवकरच या फ्रेममध्ये 'वो'चं आगमन होतं. 'वो' म्हणजे आकाश (के. के. मेनन ). काही कामासाठी आकाश मिथिलेश वीणाच्या बाजूला राहायला आलेला असतो. आकाशकडे ते ते सगळं असतं, जे मिथिलेशकडे नसतं. उंची, रुबाबदारपणा, आत्मविश्वास, गप्पिष्ट स्वभाव आणि मेहफिल जिंकण्याची क्षमता. भरीस भर म्हणजे तो वीणाचा एकेकाळचा जवळचा मित्र असतो. आकाश आणि वीणाला एकत्र बघून मिथिलेशला स्वतःमधलं न्यूनत्व अजूनच जाणवायला लागतं. वीणा ही आकाशसोबत असताना जास्त खुश असते असं त्याला वाटायला लागतं. लग्न करून  वीणावर  आपण अन्यायच केला आहे, ही अपराधीभावना त्याला छळू लागते. दरम्यान अशा काही घटना घडत जातात की, वीणालाही आपल्यापासून सुटका हवी आहे की काय असं मिथिलेशला वाटायला लागतं. मिथिलेश वीणाला मुक्त करतो का? आकाश आणि वीणामध्ये खरच काही असतं का? चित्रपटाचा एंडिंग हॅपी आहे का दुःखद या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तरी हा सिनेमा आवर्जून बघाच.

.............................................................................................................................................

निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283

.............................................................................................................................................

दोन टोकांवरची लोक प्रेमात पडतात या विषयावर अनेक सिनेमे बनले आहेत. पण बहुतेक भारतीय स्त्री-पुरुषांमध्ये त्यांच्या दिसण्यावरून असलेला 'इंफेयॉरिटी कॉम्प्लेक्स' हा विषय या चित्रपटामध्ये अप्रतिमपणे हाताळला गेला आहे. अनेक योग्यता अंगी असूनही अनेक भारतीय विनाकारण हा 'इंफेयॉरिटी कॉम्प्लेक्स'चं ओझं आयुष्यभर बाळगतात. त्याची जबरी किंमत चुकवतात. राजपाल यादवचा मिथिलेश मोठ्या पदावर काम करतोय, विनम्र स्वभावाचा आहे, अभ्यासू आहे. पण आपली उंची कमी आहे, त्यामुळे आपल्यात काहीतरी उणीव आहे असं त्याला सतत वाटत असतं. आपल्यातले परफेक्ट नसणारे अनेक जण मिथिलेशमध्ये स्वतः पाहतील हे नक्की.

चित्रपटाचा प्लॉट अतिशय सोपा आहे आणि त्यात गुंतागुंतीचं असं काहीही नाही. तो पडद्यावर अगदी तसाच उतरला आहे. साधेपणा आणि कुठलाही उपदेशात्मक आव न आणणं ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी बाजू. सिनेमातली पात्रंही खरीखुरी आणि आपल्या आजूबाजूला जशी लोक असतात तशी. या चित्रपटात काळ्या-पांढऱ्या रंगातली पात्रं नाहीत. खलनायक नाहीत. मोठ्या आवाजातले संवाद नाहीत. हे वाचून चित्रपट न बघितलेल्याना 'मैं, मेरी पत्नी और वो' हा फ्लॅट चित्रपट वाटण्याची शक्यता आहे, पण तसं नाहीये. पूर्वार्धात हलकाफुलका विनोद आणि उत्तरार्धात पटकथेतला कॉन्फ्लिक्ट हा एकदम जमून आला आहे. बॉलिवुडमध्ये ऑथेंटिक उत्तर भारतीय शहरातलं वातावरण दाखवणारा हा पहिला चित्रपट. 'तनु वेड्स मनू'चे दोन्ही भाग आणि 'रांझना'सारख्या चित्रपटांमधून आनंद रायने हा ट्रेंड पुढे नेला आणि आता तर ही एक सामान्य बाब बनली आहे. 'मैं, मेरी पत्नी और वो' मध्ये दाखवलेलं लखनौ प्रेक्षकांच्या मनात भिनायला लागतं. लखनौ विद्यापीठ, लखनौमधल्या हिवाळ्यातल्या त्या उबदार सकाळ, गोमती नदीच्या किनारी जमणाऱ्या त्या मैफली दिग्दर्शक चंदन अरोरानं फार छान चित्रित केल्या आहेत. 

राजपाल यादव म्हटलं की, प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर त्याच्या विनोदी भूमिका उभ्या राहतात. हे दुर्दैवी आहे. राजपाल यादव हा एक महान अभिनेता आहे याची खात्री हा सिनेमा बघितला की पटते. मिथिलेशचं अवघडलेपण त्यानं त्याच्या बॉडी लँग्वेजमधून अप्रतिमपणे दाखवलं आहे. लोकांशी नजरानजर टाळणारा, मान खाली घालून बोलणारा आणि चाचरणारा मिथिलेश अप्रतिमपणे उभा करणारा राजपाल यादव हा दुसऱ्या कुठल्याच सिनेमात दिसत नाही. वीणासोबतच्या पहिल्या भेटीतलं अवघडलेपण राजपाल यादवनं फार छान दाखवलं आहे. उत्तरार्धात आपण जिच्यावर प्रेम करतो, ती आपल्यापासून दूर जात आहे अशी भावना झालेला आणि त्यामुळे कोसळत चाललेला नवरा हुबेहूब पडद्यावर उभा केला आहे. खरं तर या सिनेमात वीणाची भूमिका नीतू चंद्रा करणार होती. पण काही कारणांनी ते जमलं नाही. पण जे झालं ते चांगलंच झालं. पडद्यावरची रितुपर्णा सेनगुप्ता ही प्रत्येक भारतीय पुरुषाची फँटसी असावी इतकी सुंदर दिसली आहे. तिनं कामही चांगलं केलं आहे. आकाशच्या भूमिकेत के. के. मेनन थोडा वाया घातल्यासारखा वाटतो. चित्रपटाचं संगीत ही एक मोठी जमेची बाजू आहे. मोहित चौहानच 'गुंचा कोई' गाणं चित्रपटात वापरलं आहे. सोनू निगमच 'आज मैंने तुमसे' गाणंही सुंदर. चित्रपटात आपल्या आवाजातून निवेदन नसिरुद्दीन शहाने केलं आहे. 'मैं ये मानता हू की' या तकिया कलामनं सुरू होणाऱ्या वाक्यांनी नसीरनं हे निवेदन खुसखुशीतपणे केलं आहे. 

'मैं, मेरी पत्नी और वो' २००५ साली प्रदर्शित झाला. याआधीचे बहुतेक चित्रपट लार्जर दॅन लाईफ पात्रांना पडद्यावर दाखवण्यात धन्यता मानत होते. 'मैं, मेरी पत्नी और वो'नं हा ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्या लोकांच्या आयुष्यातल्या कथाही पडद्यावर येऊ शकतात याची जाणीव प्रेक्षकांना होण्याची प्रक्रिया गतिमान होऊ लागली. दुर्दैवानं चित्रपट तिकीटखिडकीवर फारसा चालला नाही. पण टीव्हीवर या चित्रपटाचं प्रक्षेपण होऊ लागल्यावर याची फॅन फॉलोइंग वाढत गेलं. ज्यांना हा चित्रपट बघायचा आहे ते 'हॉटस्टार'वर हा सिनेमा बघू शकतात. हा चित्रपट बघून मिथिलेशसारखा 'इंफेयॉरिटी कॉम्प्लेक्स' घेऊन जगणाऱ्या एखाद्याच आयुष्य बदललं तरी कमी आहे का? चित्रपटाचं निवेदन करताना नसीर म्हणतोच की, 'मैं ये मानता हू की एक पल में जिंदगी बदलने की ताकत होती है.'

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......