अजूनकाही
‘करीब करीब सिंगल’ हा रोड ट्रिपचा समावेश असलेला रॉमकॉम चित्रपट आहे. यातील हलकेफुलके संवाद, इरफान खान व पार्वती यांच्यातील उत्तम केमिस्ट्री आणि गुंतवून ठेवणारी कथा यांमुळे हा चित्रपट खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. खासकरून बॉलिवुडमध्ये होत असणारे थोड्याशा वेगळ्या धाटणीचे प्रयोग पाहता, हा चित्रपटदेखील त्यास हातभार लावतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपली ओळख 'जया शशीधरन' (पार्वती) या साधारण पस्तिशीतील स्त्रीशी होते. जी खरं तर त्याच्या रोजच्या जीवनात, कामात व्यस्त आणि खुश आहे. पण तिच्या आयुष्यातील इतर लोकांचं वैवाहिक जीवन आणि तिलादेखील तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जवळपास दोनेक वर्षांनी आपल्या आयुष्याची पुन्हा नव्यानं सुरुवात करायचीय. या सर्वांमुळे ती एका डेटिंग साइटवर खातं उघडते. रोजच्या रोज येणाऱ्या चावट मॅसेजेसच्या गर्दीत तिला 'योगी'चा (इरफान खान) साधासोपा आणि प्रामाणिक मॅसेज आवडतो आणि ती त्याला भेटायचं ठरवते.
पहिल्या भेटीतच तिला कळून चुकतं की, योगी तिच्यासाठी जराशी डोकेदुखी ठरणार आहे. मात्र तिलाही त्याचं आपल्याला खुश करण्याचे प्रयत्न वगैरे गोष्टी कुठेतरी आवडत असतात आणि याच दरम्यान त्यांचं योगीच्या आयुष्यात आलेल्या तीन स्त्रियांबाबत बोलणं होतं आणि त्या आता काय करत असतील असा प्रश्न पडतो.
योगीला पूर्ण विश्वास असतो की, त्या तिघीही अजून त्याच्या प्रेमात असतील. आणि यातूनच योगीच्या सुपीक डोक्यातून कल्पना निघते. ती त्या तिघांनाही पुन्हा एकदा भेटायची. पण या प्रवासात जयानेही सोबत यावं असं ठरतं. तिनेही तिच्या रोजच्या आयुष्यातून एक सुट्टी घ्यावी असं योगी तिला पटवून सांगतो आणि सुरुवात होते ती या प्रवासाची.
या प्रवासात त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींच्या भेटी, जया आणि योगी यांच्यातील समज-गैरसमज, त्यांच्यातील हलकीफुलकी भांडणं, जयपूर-सिक्कीम वगैरे प्रवास या सर्व गोष्टी येतात. अपेक्षेप्रमाणे या प्रवासात त्यांच्यातील हळूहळू फुलणारं प्रेमही येतं.
कथा तशी जराशी अनपेक्षित आणि फिल्मी वाटत असली तरी त्यात तितकासा फिल्मीपणा जाणवत नाही. रोजच्या आयुष्याशी जोडता येणारे संवाद, नातेसंबंधांवर फारसं प्रवचन न देता केलेलं भाष्य, या सर्वांमुळे चित्रपटात एक ताजेपणा जाणवत राहतो.
जयाचं वेबसाईटवर अकाउंट ओपन करत असताना वय कमी सांगणं असो किंवा राधा या इरफानचं पहिलं प्रेम असणाऱ्या स्त्रीने तिच्या मुलांना इरफानची मामा म्हणून करून दिलेली ओळख असो, चित्रपट लहानसहान गोष्टींमधून भाष्य करतो.
अर्थात चित्रपटात काही गोष्टी खटकतात. म्हणजे जयाची कथा आपल्यासमोर थेट मांडलेली असली तरीही योगीबाबत तसं काहीच घडत नाही. खरं तर हा प्रवास त्याच्या भूतकाळात डोकावण्याचा आणि त्यातही काहीतरी नवीन शोधण्याचा आहे. मात्र त्याच्या प्रेयसींच्या भेटी वगळता त्याचा भूतकाळ नीट मांडला जात नाही.
.............................................................................................................................................
निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283
.............................................................................................................................................
हेदेखील इरफान आणि पार्वतीच्या चांगल्या केमिस्ट्रीपुढे आणि पडद्यावर दिसणाऱ्या उत्तम लोकेशन्स, टाळ्याखाऊ संवादांपुढे झाकलं जातं. शिवाय, इरफान आणि पार्वतीमधील चांगल्या बाँडिंगशिवाय सिद्धार्थ मेनन, नेहा धुपिया यांची पात्रंदेखील कथेत भर घालतात. इरफानचा स्क्रीन प्रेझेन्स सुखावणारा आहे. पार्वतीनं या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये केलेलं पदार्पण एका अर्थानं चांगलं आहे. कदाचित ती आणखीही काही सुंदर हिंदी चित्रपटांमध्ये दिसेल.
चित्रपटात काही ठिकाणी 'ब्रेकिंग द फोर्थ वॉल' म्हणून ओळखला जाणारा प्रकार वापरला जातो. ज्यात एखादं पात्र थेट प्रेक्षकांशी संवाद साधतं. इथंदेखील तो प्रकार आहे. पण त्याचं प्रयोजन काही फारसं साध्य होतं असं दिसत नाही. ती दृश्यं मुळात चित्रपटात का आहेत असं वाटत राहतं.
बाकी चित्रपटातील गाणी मात्र उत्तम आहेत. म्हणजे ती कुठेच अडथळा निर्माण करत नाहीत. तर पडद्यावर पात्रं वावरत असताना त्यांच्या मानसिकतेशी नातं सांगणारी ही गाणी पार्श्वभूमीवर वाजतात. यातील पात्रं हातातील काम सोडून रस्त्यावर नाचत सुटलीयंत असं कुठेच होत नाही.
गाण्यांचे बोल त्या त्या वेळच्या परिस्थितीशी सुसंगत वाटतात. खासकरून 'जाने दे' हे गाणं झीने युट्यूबवर रिलीज केलेल्या व्हिडिओहून वेगळं आहे. त्याचं चित्रण चित्रपटामधील इतर गाण्यांहून कैकपटीनं सुंदर झालेलं आहे. त्यामुळे हे गाणं मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक सुंदर अनुभव आहे.
दिग्दर्शिका तनुजा चंद्रा बऱ्याच दिवसांनी एक चांगली कथा तितक्याच चांगल्या प्रकारे घेऊन आली आहे. अर्थातच यातील काही खटकणाऱ्या आणि दुर्लक्ष करता येण्याजोग्या गोष्टी बाजूला ठेवता आला तर चित्रपट मनोरंजक आहे इतकं मात्र नक्की.
बाकी हा चित्रपट २०११ मध्ये आलेल्या 'चलो दिल्ली' या चित्रपटाची आठवण करून देतो, तो यातील हलक्याफुलक्या संवादांमुळे आणि दोन विरुद्ध टोकाच्या लोकांनी एकत्र येणाऱ्या कथानकामुळे. आणि हा चित्रपटदेखील त्याइतकाच चांगला आहे. त्यामुळे या आठवड्यात एखादा चांगला रॉमकॉम चित्रपट पाहायचा असल्यास याला संधी द्यायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment