अजूनकाही
माणसाचा इतिहास म्हणजे बंडखोरांचा इतिहास. ज्यांनी ज्यांनी व्यवस्थेला नकार दिला, प्रस्थापित मूल्य व्यवस्थेला आव्हान दिलं, प्रश्न विचारले; त्यांचा अनन्वित छळ झाला, प्रसंगी त्यांना प्राणास मुकावे लागले. त्यांनी केलेल्या बलिदानावर माणसाची प्रगती होत आलेली आहे. भारताच्या संदर्भात ही परंपरा चार्वाकापासून अलिकडच्या कन्हैयाकुमारपर्यंत दाखवता येते. यांनी आपापल्या परीनं मूलभूत प्रश्न उपस्थित केले व समाज पुढे नेला. विचारस्वातंत्र्याची अशीच भव्य आणि वैभवशाली परंपरा पाश्चात्य जगतात आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानभाग यांनी दोन्ही परंपरांतील अशा बंडखोरांचा अभ्यास केला आणि एक आगळावेगळा नाट्यप्रयोग सादर केला. ज्याचं नाव आहे- ‘वर्डस हॅव बीन अटर्ड’.
या प्रयोगात हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषा वापरल्या आहेत आणि जिथं या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांतील साहित्य वापरलं आहे, त्यांचा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे. आजच्या अदृश्यपणे व अनेकदा उघडपणे वावरत असलेल्या सेन्सॉरशिपच्या वातावरणात शानबाग सादर करत असलेल्या प्रयोगाचं खूपच महत्त्व आहे. माणसाच्या मुक्त आविष्काराला बंधनांत अडकवणाऱ्या दोन सत्ता म्हणजे राजसत्ता व धर्मसत्ता. या दोन्ही सत्तांच्या विरोधात जगभर वारंवार बंड झालेलं आहे, आजही होत आहे.
या प्रयोगाची सुरुवात गॅलिलीओच्या जीवनातील प्रसंगापासून होते. हा प्रसंग जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्तच्या ‘द लार्इफ ऑफ गॅलिलीओ’ या नाटकातून घेतला आहे. आपल्याला गॅलिलीओ (१५६४-१६४२) या इटालियन शास्त्रज्ञाची कथा माहिती असते. त्या काळी ‘बायबल’मध्ये असं लिहिलेलं होतं की, पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतो. गॅलिलीओनं दुर्बिण बनवून शास्त्रीय पुरावे गोळा केले आणि असं सिद्ध केलं की सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. तेव्हा ‘‘बायबल’सारखा धर्मग्रंथ विरुद्ध शास्त्रीय पुरावा’ असं द्वंद्व उभं राहिलं. धर्ममार्तंडांनी गॅलिलीओचा छळ केला, त्याला पाखंडी ठरवलं. एवढंच नव्हे तर त्याच्याकडून जाहीरपणे वदवून घेतलं की, त्याचे शोध चुकीचे आहेत. यथावकाश गॅलिलीओचं म्हणणं जगभर मान्य झालं. सुनील शानबाग यांनी ‘वर्डस’ची सुरुवात गॅलिलीओच्या जीवनातील या प्रसंगाने करावी यात वेगळंच औचित्य आहे. परिणामी अशा सादरीकरणासाठी योग्य ते वातावरण निर्माण होतं.
या नाटकात नाट्यपूर्ण सादरीकरणं आहेत, तसंच साधं वाचन आहे, गाणी आहेत, संवाद आहेत. थोडक्यात शानबाग यांनी रंगमंच आविष्कारासाठी जे जे शक्य आहे, ते ते सर्व वापरलं आहे.
पुढचं सादरीकरण इराकी लेखक हसान ब्लासिम (जन्म - १९७३) याच्या कथासंग्रहातील एका कथेवर आधारित आहे. या तरुण लेखकानं १९७९ ते १९८९ दरम्यान झालेलं इराण-इराक युद्ध बघितलं, १९९० सालचं आखाती युद्ध बघितलं आणि नंतर २००३ साली अमेरिकेनं कसं अगदी फालतू कारण देत इराकवर अमानुष हल्ला केला व देश बेचिराख केला, हेही बघितलं. या पार्श्वभूमीवर लेखकानं युद्ध कोण करतं, युद्धामुळे कोणत्या शक्तींचा फायदा होतो वगैरे प्रश्नांना हात घातला आहे. ब्लासिम यांचा ‘द कॉपर्स एग्झिबिशन’ हा कथासंग्रह २०१४ साली पेंग्विनतर्फे प्रकाशित झाला. त्यातील एक कथा म्हणजे ‘अॅन आर्मी न्युजपेपर’. युद्धाचे भयानक परिणाम दाखवणारी ही कथा अंतर्मुख करते.
या नाटकामध्ये २१ विविध सादरीकरणं आहेत. यात कविता आहेत, पत्रं आहेत, गाणी आहेत, नाटकातील तुकडे आहेत. यात मराठी संत कवयित्री जनाबार्इ व सोयराबाईंचे अभंगही आहेत. मराठीतील तुकाराम आद्य बंडखोर. या नाटकात तुकारामाचे काही अभंग आहेत. गो.पु. देशपांडे यांच्या गाजलेल्या ‘उदध्वस्त धर्मशाळा’ या नाटकातील तसंच प्रेमानंद गज्वी यांच्या ‘आंबेडकर विरुद्ध गांधी’ नाटकांतील प्रसंग आहेत.
मध्ययुगीन व आधुनिक जग व भारतातील बंडखोर लेखक-कवींचा आविष्कार ‘बंड’ या सूत्रात गुंफून हा आगळावेगळा प्रयोग सिद्ध झाला आहे. यामागे सुनील शानबाग, इरावती कर्णिक व सपन सरन यांची सर्जनशीलता व अभ्यास आहे.
या नाटकाचा प्रयोग अंधेरी (पश्चिम) येथे सुरू झालेल्या व झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टुटिओ तमाशा’ या छोटेखानी पण असे प्रयोग करण्यास आदर्श अशा रंगमंचावर झाला. हा प्रयोग सुमारे दोन तास चालतो. यात दहा मिनिटांचं मध्यांतर आहे. जशी नाटकाची सुरुवात गॅलिलीओने होते, तसंच मध्यंतराआधी सुनील शानबाग स्वतः पंजाबी कवी लालसिंग दिल यांची कविता सादर करतात. या कवितेचं पंजाबीतून निरुपमा दत्त यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आहे. ही कविता अशी-
Words have been uttered
Long before us
And will be
Long after we are gone
Chop off every tongue
If you can
But the words will still
Have been uttered.
या नाटकात इस्मत चुगतार्इच्या लेखनाचा संदर्भ न येणं केवळ अशक्य आहे. त्यांची स्त्रियांमधील समलिंगी संबंधांचं चित्रण करणारी ‘लिहाफ’ कथा १९४२ मध्ये प्रकाशित झाली होती. तेव्हा त्यांच्यावर लाहोर उच्च न्यायालयात तक्रार गुदरण्यात आली होती. चुगताईंच्या कथेनं तत्कालिन समाज कसा हादरला होता आणि त्यांना कशी धमक्या देणारी पत्रं आली होती, हा सर्व किस्सा यात आहे. आज चुगतार्इ असत्या तर त्यांच्यावर ट्रोल्सनी हल्ला केला असता.
यात पाकिस्तानी बंडखोर कवी हबीब जलिब यांची मुस्लिम धर्मगुरूला उद्देशून लिहिलेली कविता आहे. यात कवी मौलानाला विचारतो- ‘बहुत मैंने सुनी है आपकी तकरीर मौलाना/ मगर बदली नहीं अब तक मेरी तकदीर मौलाना’. या कवितेत कवी धर्मगुरूला अडचणीत आणणारे अनेक प्रश्न विचारतो.
.............................................................................................................................................
निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283
.............................................................................................................................................
उर्दू/ हिंदीतील बंडखोरी साहिर लुधियानवीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या प्रयोगात साहिरची ‘जश्न-ए-गालिब’ ही कविता सादर करतात. या कवितेत साहिर समाजात पसरलेल्या दांभिकतेवर प्रकाश टाकतो. तो म्हणतो-
इक्वीस बरस गुजरे आजादी-ए-कामिल को
तब जाके कही हम को गालिब का ख्याल आया
यह जश्न मुबारक हो, पर यह भी सदाकत है
हम लोग हकीकत के अहसास से आरी है
गांधी हो की गालिब हो, इन्साफ की नजरो में
हम दोनो के कातिल है, दोनो के पुजारी है
मराठी साहित्यात विद्रोही आविष्काराची भव्य परंपरा आहेत. या नाटकात नामदेव ढसाळांची ‘नवी दिल्ली १९८५’ ही कविता आहे. याचं भाषांतर दिलीप चित्रेंनी केलं आहे. ही कविता इंग्रजीत ऐकण्यात वेगळीच गंमत आहे. नामदेव ढसाळ म्हणतात-
The needle probes for the artery
Enemies of poetry gather in your city
Your town is cursed with power
Roses flow in this stream of blood
The waters of your Yamuna stand exposed.
ढसाळांच्या जोडीला जनाबार्इचे अभंग आहेत, ज्यांचं इंग्रजी भाषांतर जेरी पिंटो व नीला भागवत यांनी केलं. या दोघांनी सोयराबाईंच्या अभंगांचंही भाषांतर केलं आहे. जनाबार्इ पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे वाभाडे काढताना म्हणते-
I have let my veil drop to my shoulders
Bare-headed, I shall walk through the market
In my hands the cymbals, on my shoulder the veena
Let who will try and stop me now
Come wish me well, anoint my wrists with oil
Jani says: I have become your whore, Keshava
I have come now to wreck your home.
सोयराबार्इचे अभंगसुद्धा तितकेच दाहक आहेत. त्या म्हणतात-
You say some bodies are untouchable
Tell me what you say of the soul
You say defilement is born in the body
If menstrual blood makes me impure
Tell me who was not born of that blood
…. That’s why I praise only Panduranga
Who lives in everybody, pure, impure.
या सादरीकरणात मला स्वतःला आवडलेला भाग म्हणजे मागच्या वर्षी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले बॉब डिलन यांचं अजरामर गाणं. नव्या विचारांचं, नव्या मूल्यांचं स्वागत जर करता येत नसेल तर बाजूला व्हा असं खडसावून सांगणारे डिलन फार जवळचे वाटतात. त्यांच्या या गाजलेल्या गाण्याचं शीर्षक आहे- Times they are a changing’.
यातील महत्त्वाचं कडवं-
Come gather ‘round people
wherever you roam
And admit that the waters
Around you have grown
And accept that soon
You’ll be drenched to the bone
….. Please get out the new one
If you can’t lend your hand
For the times they are a-changing
हे सादरीकरण बघणं हा आगळा अनुभव होता. यात मानवी इतिहासात बंडखोरांनी केलेल्या योगदानाचा अंदाज येतो आणि अभिमानानं उर भरून येतो. या दरम्यान जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे विचारस्वातंत्र्य-आविष्कारस्वातंत्र्याची लढार्इ ही कधीही न संपणारी लढार्इ आहे. प्रत्येक पिढीत, प्रत्येक समाजात, प्रत्येक देशांत स्वातंत्र्यावर बंधनं आणणाऱ्या शक्ती असतात. त्याचप्रमाणे त्यांच्याविरुद्ध प्रसंगी प्राण पणाला लावणाऱ्या शक्तीही असतात. आपण कोणत्याही बाजूने उभे आहोत आणि प्रसंग आला तर कोणाच्या बाजूनं उभे राहणार आहोत, याची प्रत्येकाला सतत निवड करावी लागते.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 12 November 2017
जनाबाई आणि सोयराबाईंना अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बैलघाण्यास फुकटचं जुंपलय. च्यायला त्यांची साधना होती म्हणून त्या देहभान विसरून ईश्वरभक्ती करायच्या. त्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं प्रदर्शन मांडायचं नव्हतं. संतांची भक्ती नाकारायची आणि उन्मनी वृत्तीस आपल्या दावणीला बांधायचं. कल्पना नामी आहे. पण माझ्यासारखे धर्माभिमानी ती हाणून पाडतात. -गामा पैलवान