अजूनकाही
‘झी मराठी’ ही मराठीतील एक प्रमुख वाहिनी. तिला सतरा-अठरा वर्षे पूर्ण झाली. या वर्षी वाहिनीने प्रथमच दिवाळी अंक प्रकाशित केला. ‘उत्सव नात्यांचा’ या नावाने हा अंक ग्रंथालीच्या साहाय्याने निघाला. नाटककार व कथा-पटकथाकार प्रशांत दळवी हे या अंकाचे संपादक आहेत. ही बातमी पहिल्यांदा वाचली तेव्हा कुतूहल वाटले. नंतर बातमी आली, अंकावर लोकांच्या उड्या पडत आहेत आणि त्याची तडाखेबंद विक्री होत आहे. तीन दिवसांतच पन्नास हजार प्रतींची विक्री झाली.
मी इतर दिवाळी अंक घ्यायला दुकानात गेलो, तेव्हा चौकशी केली तर कळले ‘झी मराठी’चा अंक संपला आणि आला की लगेच संपतो, अशीही माहिती दुकानदाराने उत्साहाने दिली. पण नंतर फेसबुकवर हळूहळू या अंकावर टीका यायला लागली की, ‘वाहिनीच्या स्वत:च्या जाहिरातीच अंकात जास्त आहेत. पैसे देऊन आम्ही जाहिराती का विकत घ्यायच्या?’ एका मान्यवरांनी ‘अंकात जयदेव डोळे यांचा लेख आणि दोन-तीन लेख या शिवाय काही विशेष नसल्याचे’ लिहिले. नाटककार प्रशांत दळवी संपादक म्हणून मला अपेक्षा होत्या, पण प्रतिक्रिया वाचून मीही संभ्रमात होतो. वाचनालयातून दिवाळी अंक मागवताना एकदा इतर कोणताच मिळाला नाही आणि हा अंक उपलब्ध होता, म्हणून मी मागवला. तेव्हाही विचार होता, चाळून बघू आणि बाजूला ठेवू.
प्रत्यक्षात अंक वाचला, तेव्हा तो चांगला आहे असे लक्षात आले आणि जवळपास सर्व लेख वाचून झाले. झीच्या मालिकांमध्ये काम केलेले लेखक, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इत्यादींनी या अंकात आपल्या आठवणी जागवल्या आहेत, पण त्याचबरोबर स्वत:च्या वाटचालीबद्दलही मोकळेपणाने लिहिलेले आहे.
आपल्याकडे दस्ताऐवजीकरणाच्या कामाला महत्त्व दिले जात नाही, पण या अंकातून ते काम झालेले आहे. ‘झी मराठी’ या वाहिनीची सुरुवात १९९९ला झाली. आधी एक मराठी वृत्तवाहिनी त्यांनी सुरू केली आणि ती चालू शकते हे लक्षात आल्यावर ‘अल्फा मराठी’ नावाने करमणुकीची वाहिनी सुरू केली. खाजगी क्षेत्रात सहसा अतिशय नियोजनपूर्वक काम होते. पुढील वर्षा-दोन वर्षाचा आराखडा निश्चित केलेला असतो. पण झीने मात्र असे काही केले नव्हते. आधी मराठी वाहिनी सुरू करू, हिंदी मालिकाच डब करून दाखवू, पुढचे पुढे असे त्यांनी ठरवले. हा खरे तर जोखमीचा निर्णय होता, कारण डब मालिका दाखवणारी वाहिनी असा प्रेक्षकांचा ग्रह झाला असता, तर ते कायमचे दुरावले असते. पण सुदैवाने वाहिनीला हात मिळाला तो ‘आभाळमाया’ या मालिकेचा. मॅजिक बॉक्स कंपनीची निर्मिती, त्याचबरोबर अच्युत वझे हेही निर्माते व संकल्पना, कथा त्यांची आणि दिग्दर्शक विनय आपटे. त्यांनी या मालिकेचे काही पायलट भाग बनवले, तेव्हा ती सरकारी दूरदर्शन चॅनेलला द्यायचा त्यांचा विचार होता. कारण तेव्हा ते एकच चॅनेल होते. तिथे उशीर होत आहे म्हणून त्यांनी ही मालिका ‘झी मराठी’ (तेव्हाचे ‘अल्फा मराठी’) ला दिली.
वाहिनी सुरू झाल्यावर काही कालावधीतच ही मालिका प्रक्षेपित व्हायला सुरुवात झाली. आणि ती अफाट लोकप्रिय झाली. या एकाच मालिकेने अक्षरश: इतिहास घडवला. तिने झीला प्रस्थापित केले, त्याचसह अनेक कलाकार, निर्माते यांना पुढे आणले. या मालिकेबरोबरच इतरही मालिका सुरू झाल्या. त्यावेळेस मराठी चित्रपटात काम करणारे कलाकार मालिकांमध्ये काम करायला तयार नव्हते. (आता मात्र करतात!) त्यामुळे वाहिनीने नाटकात काम करत असलेल्या कलाकारांना घेतले. त्यात नामवंत व ज्येष्ठ कलाकार होते, तसेच नुकतीच सुरुवात करणारे होते, विद्यापीठातून रंगभूमीची पदवी घेऊन आलेले होते. म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, सुकन्या मोने ते नुकतीच सुरुवात करणारे सुबोध भावे, हर्षदा खानविलकर यांना मालिकेत काम मिळाले. कलाकारांबरोबरच तंत्रज्ञांनाही संधी मिळाली. संजय जाधव यांना ‘आभाळमाया’चे छायाचित्रकार म्हणून संधी मिळाली, आज ते प्रसिद्ध छायाचित्रकार व दिग्दर्शक आहेत. बरेचसे नाट्यकर्मी तेव्हा बॅंकेत वगैरे नोकरी करून नाटक करत. मालिकेत काम मिळाल्यामुळे त्यांना पूर्णवेळ अभिनयात करिअर करता आले.
‘झी मराठी’ने अनेक कलाकारांना संपन्नता दिली आणि त्यांच्याबरोबरच बॅकस्टेज काम करणारे तंत्रज्ञ आणि इतर कामगार यांनाही सुस्थिती\संपन्नता दिली. झीचे प्रमुख म्हणून सुरुवातीला नितीन वैद्य, माधवी मुटाटकर आणि भारतकुमार राऊत यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. त्याचवेळेस लेखक अभय परांजपे हे जाहिरात क्षेत्र सोडून झीमध्ये रुजू झाले. ‘आभाळमाया’ झीवर सुरू असताना ते तिचे कार्यकारी निर्माता होते. त्यांनी काही कलाकार आणि निर्मात्यांना प्रोत्साहन दिले. त्या व्यक्तींनी आपापल्या लेखांत आवर्जून त्यांची आठवण काढली आहे व त्यांना श्रेय दिले आहे. शंशाक सोळंकींना अभय परांजपे यांनी निर्माता बनण्यासाठी प्रोत्साहित केले. अभय परांजपे यांनी नंतर झीची नोकरी सोडून मालिका लिहिणे सुरू केले. २००३ला झीवर त्यांची ‘वादळवाट’ ही मालिका सुरू झाली. तीसुद्धा खूप लोकप्रिय झाली आणि चार वर्षे चालली होती. या मालिकेचे लेखन करताना अभय परांजपे यांनी चिन्मय मांडलेकर यांना सहाय्यक म्हणून बोलावले. पुढे चिन्मय मांडलेकर हे एक प्रथितयश लेखक म्हणून नावाजले गेले. चिन्मय मांडलेकर वेळोवेळी त्यांचे ऋण मान्य करत असतात. या अंकातही त्यांनी तसा उल्लेख केलेला आहेच.
झीने सुरुवातीला साहित्यावर आधारित मालिका दिल्या, कार्यक्रम दिले. ‘पिंपळपान’ नावाच्या मालिकेत वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यकृती पडद्यावर आणल्या. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकात कुलकर्णी यांनी त्यावेळेस मालिका केल्या होत्या. तसेच श्रीरंग गोडबोले यांनी ‘नक्षत्रांचे देणे’ हा गाण्यांच्या अप्रतिम कार्यक्रम दिला.
या अंकातील लेखांत ‘झी मराठी’ची केवळ प्रशंसा केलेली नाहीतर टीकाही केलेली आहे. उदा: सुहास जोशी यांनी मालिकांचा दर्जा घसरला आहे, त्या आता सासू-सून मालिका झालेल्या आहेत लिहिलेले आहे. इतरही काहींनीही तक्रार केलेली आहे. याला अंकात एक उत्तर वाचायला मिळाले की, वाहिनी सुरू झाली तेव्हा टीव्ही संचाच्या किमती जास्त होत्या आणि लोकांचे उत्पन्न कमी होते. आता टीव्ही संचाच्या किमती तेवढ्याच आहेत आणि लोकांचे उत्पन्न वाढलेले आहे. त्यामुळे सर्व थरातील लोक टीव्ही बघतात व त्यांच्या आवडीनुसार मालिका द्याव्या लागतात. हा युक्तिवाद मात्र साफ चुकीचा आहे. उच्च मध्यमवर्गाची अभिरूची चांगली असते, दर्जेदार मालिका तेच बघतात किंवा ते केवळ दर्जेदार कार्यक्रमच बघतात असा हा युक्तिवाद आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आजच्या मालिका या अनेक उच्चमध्यमवर्गीय घरातही अगदी आवडीने व नित्यनियमाने बघितल्या जातात. अभिरुचीसंपन्न प्रेक्षकवर्ग संख्यने कमी आहे, असे म्हणता येईल. मात्र मालिकांची गुणवत्ता वाढायला हवी, त्यासाठी प्रयत्न केले जावेत हे मान्यच आहे.
.............................................................................................................................................
निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283
.............................................................................................................................................
छोटी सुरुवात करून अठरा वर्षात ‘झी मराठी’ची उलाढाल आज चारशे कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे असे वाचायला मिळाले. हिंदी मालिका बघणारा मराठी प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचून ही उलाढाल त्यांनी साध्य केलेली आहे. या चारशे कोटींपैकी कंपनीचा नफा किती हे माहीत नाही. अगदी शंभर कोटी धरला तरी राहिलेले तीनशे कोटी मराठी कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांनी कमावलेले आहेत असे म्हणता येईल. एका वाहिनीने कलाक्षेत्रातील अनेकांना स्थैर्य, सुबत्ता, संपन्नता दिली, ही आर्थिक बाब इथे लक्षात घेतली पाहिजे. तसेच यानतर इतरही मराठी वाहिन्या सुरू झाल्या. त्यामुळेही मराठी कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांचा लाभच झाला.
मालिकांचा दर्जा ही वेगळी बाब आहे, पण करमणूक क्षेत्राकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघितले तर वाहिनीमुळे फायदा झालेला आहे हे निर्विवाद. हिंदी मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टी, विशेषत: हिंदी चित्रपटसृष्टीकडे बघितले तर आपल्याला काय दिसते? काही मोजके चित्रपट सोडले तर बाकी गाळच असतो, पण हा एक हजारो कोटींचा व्यवसाय आहे.
‘झी मराठी’च्या दिवाळी अंकात गॉसिप लेख नाहीत की, पेज थ्री टाईप लेख नाहीत. या वाहिनीची वाटचाल, कलाक्षेत्रातील व्यक्तींची वाटचाल यांचा आलेख या अंकातून वाचायला मिळतो. करमणूक क्षेत्राच्या वाटचालीकडे ज्यांना गांभीर्याने बघायचे आहे, त्यांच्यासाठी हा अंक संग्राह्य आहे. पुढील वर्षी यापेक्षा जास्त चांगला काय अंक काढायचा हे आव्हान मात्र ‘झी मराठी’समोर आहे. त्यासाठी शुभेच्छा.
.............................................................................................................................................
लेखक उदय कुलकर्णी नाट्य-सिने समीक्षक आहेत.
kuluday94@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment