अजूनकाही
एखादा माणूस आयुष्यातील समस्यांना कंटाळतो आणि आपलं जिणं स्वतःच हराम करून सोडतो. आपल्याच आयुष्यात अशा समस्या का, असा त्याला प्रश्न पडतो. त्यामुळे तो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघतो आणि त्याला वाटतं दुसरे किती आनंदानं व सुखी-समाधानानं जगत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते. 'त्या' दुसऱ्या माणसांनाही तशाच किंबहुना, त्यापेक्षाही मोठ्या समस्या असतात. मात्र त्या पहिल्या माणसाला 'दुरून डोंगर साजरे' या उक्तीप्रमाणे त्या दिसत नसतात. त्यामुळे आपणास हा जन्म उगाचच मिळाला, दुसरा मिळाला असता तर आपण फार सुखी झालो असतो, असं त्याला सारखं वाटत असतं. याशिवाय भरपूर पैसे असले की, भरपूर सुख मिळतं अशीही त्याची धारणा होते. त्यामुळे तो पैशाच्या मागे धावत सुटतो आणि चालत आलेल्या अनेक सुखांना लाथाडतो.
अर्थातच विशिष्ट घरात जन्म घेतला असता तर आपल्याला सुख मिळालं असतं, असं त्याला वाटत असलं तरी शेवटी असा 'जन्म घेणं' हे कोणाच्याही हातात नसतं. ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणेच जन्म मिळतो, परंतु हेही तेवढंच खरं असतं की, एखादा मोठा उद्योगपती होण्यासाठी उद्योगपतीच्याच घरात जन्म घेणं आवश्यक असतं असं मुळीच नाही. एखादा गरीब घरात जन्मलेला मुलगा स्वतःच्या कर्तबगारीवर मोठा उद्योगपती होऊ शकतो. परंतु आपल्या कर्तृत्वावर विश्वास नसलेली माणसं आपल्या नशिबाला, नियतीला किंवा देवाला दोष देतात.
देव जर खराच अस्तित्वात असेल तर त्यानं सुख-दुःखांच्या बाबतीत एवढी विषमता निर्माण का केली, असा त्याचा मूलभूत प्रश्न असतो. हा प्रश्न जर थेट देवाला विचारला तर देव त्यावर नेमके उत्तर कसे देईल, या संकल्पनेतून 'थँक्यू विठ्ठला' या नवीन मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यादृष्टीनं विचार करता चित्रपटाची संकल्पना खूप चांगली असली तरी ती प्रत्यक्ष पडद्यावर साकारताना दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याचं जाणवत राहतं. विसविशीत पटकथा आणि विषयाची नेमकी हाताळणी करण्याकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर 'विठ्ठला! विठ्ठला!!' म्हणण्याची वेळ येते!
या चित्रपटात मुंबईत डबेवाल्याचे काम करणाऱ्या हरी (मकरंद अनासपुरे) नावाच्या माणसाच्या आयुष्याची कहाणी सांगण्यात आली आहे. पत्नी आणि शाळेत जाणारा मुलगा असा छोटासा संसार असलेला हरी, आहे त्या पैशात भागत नाही म्हणून वैतागलेला असतो. त्याच्या पत्नीची विठ्ठलावर श्रद्धा असते, मात्र गरिबीला तीही कंटाळलेली असते. म्हणून ती हरीलाच सतत दूषणे देते. त्यामुळे श्रीमंत लोकांना पाहून हरीच्या मनात असूया उत्पन्न होते आणि त्याला आपल्या आयुष्याची लाज वाटू लागते. त्याभरातच तो विठ्ठलाच्या देवळात जाऊन प्रत्यक्ष देवाला असा भेदभाव का केलास, असा जाब विचारतो. त्यावर प्रत्यक्ष विठ्ठल (महेश मांजरेकर) प्रकट होऊन त्याला प्रत्येकाचे आयुष्य हे त्याच्या त्याच्या प्राक्तनामुळे मिळाले आहे, असे सांगतो. मात्र त्यावर हरीचा विश्वास बसत नाही. म्हणून विठ्ठल त्याला श्रीमंत उद्योगपती वर्देचे रूप बहाल करतो.
.............................................................................................................................................
निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283
.............................................................................................................................................
उद्योगपती वर्दे म्हणून वावरताना तो श्रीमंत असूनही त्याला किती समस्या आहेत, हे हरीला कळून चुकते. त्यामुळे केवळ श्रीमंत असून चालत नाही, तर त्याला सत्तेचीही जोड असावी लागते, हे तो विठ्ठलाला सांगतो. त्याच्या सांगण्यावरून विठ्ठल त्याला कृषिमंत्री करतो. मात्र सत्ता आणि संपत्ती असूनही कृषिमंत्री जाधव यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याचाही हरी अनुभव घेतो. शेवटी हरीला यमराज सर्वश्रेष्ठ वाटू लागतो. त्यामुळे विठ्ठल त्याला यमराजही करतो. मात्र जेव्हा स्वतःच्याच मुलावर मृत्युपाश टाकण्याची वेळ येते, त्यावेळी हरीचे डोळे उघडतात आणि त्याला आपलं म्हणजे हरीचंच आयुष्य चांगलं आहे, याची जाणीव होते आणि त्याप्रमाणे त्याला पुन्हा त्याचं आयुष्य परत मिळतं.
कथेची संकल्पना चांगली असली तरी त्यासाठी बांधण्यात आलेली पटकथा खूपच उथळ आणि पोरकट वाटते. उद्योगपती वर्दे म्हणून आधी अभिजित सावंत यांना दाखवण्यात आलेलं असताना एकदम त्यांच्याजागी मकरंद अनासपुरे ही गृहित कल्पना फार पचनी पडत नाही. तसंच हरीला एकदम यमराज का व्हावंसं वाटतं याचाही स्पष्ट उलगडा होत नाही. मूळ यमराज आणि यमराजाच्या रूपातील हरी यांचे काही प्रसंग मारूनमुटकून हसवण्यासाठी केले असल्यानं हास्यास्पद झाले आहेत.
मुख्य म्हणजे कथेला विनोदाची डूब देण्याच्या नादात आणि हरीच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे काम करत असल्यामुळे खास त्यांच्यासाठी 'इनोदी' संवाद लिहिले आहेत की, काय असं वाटू लागतं. अनासपुरे यांचे हे संवादही त्यांच्या खास एकसुरी स्टाईलमध्ये ऐकायला मिळतात. त्यामुळे चित्रपट रंगत नाही. शिवाय श्री विठ्ठल हा देव 'निर्गुण', 'निराकार' असला तरी त्याची भूमिका केवळ महेश मांजरेकर करतात म्हणून त्याला दाढीधारी दाखवायचा अट्टहास केला असावा का असाही प्रश्न निर्माण होतो. चित्रपटात कमलेश सावंत, अभिजित सावंत, दीपक शिर्के, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर आदी कलाकारही आहेत, मात्र त्यांना फारसं काम नाही. चित्रपटात केवळ मालमसाला हवा यासाठी श्रीविठ्ठलाच्या गाण्याबरोबरच तेजा देवकरचं एक आयटम साँगही 'टाकण्यात' आलं आहे.
थोडक्यात हा विठ्ठल सर्वसामान्य आहे आणि तो पाहिल्यावर 'विठ्ठला! विठ्ठला!!' असे हताश उदगार काढण्याची वेळ येते.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment