अजूनकाही
१. वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता ‘पद्मावती’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हिंदू आणि शेतकऱ्यांची मस्करी केली जात आहे. हे चुकीचं होत आहे, हे सरकार आणि प्रशासनाला समजलं पाहिजे. पद्मावती चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले. चित्रपटसृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे ते म्हणाले. या चित्रपटात कोणतेही वादग्रस्त दृश्य नाही. हा चित्रपट राणी पद्मावतीचे साहस, धाडसावर आधारित आहे. त्यांच्या बलिदानाला आम्ही नमन करतो, अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.
साक्षी महाराजांच्या पक्षाने अनेक चित्रपट कलावंतांना खासदारकी आणि मंत्रिपदंही दिली आहेत. त्याबद्दल या तथाकथित महाराजांचं हेच विश्लेषण असेल काय? सिनेमा न पाहता त्यातून हिंदूंचा अवमान झाला, हे या गृहस्थांना अंतर्दृष्टीनं दिसलं काय? भगवे कपडे घातले की त्रिकालज्ञान प्राप्त होतं आणि इतिहासातल्या दंतकथाही ऐतिहासिक तथ्यं भासू लागतात, असा काही प्रकार आहे की, त्यासाठी विशेष पदार्थांचं सेवन करावं लागतं? या देशात ‘अस्मिता’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांचा इतका शिसारी येण्याजोगा बाजार मांडला गेला आहे की, चित्रपटसृष्टीला त्याविषयी काही देणं घेणं नसेल, तर त्यांचं कौतुकच करायला हवं.
.............................................................................................................................................
२. गुन्हे शाखेनं डोंगरी येथून दोन तरुणांना अटक करून त्यांच्याकडील तब्बल चार लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. उच्च दर्जाचा कागद, हुबेहूब छपाई आणि पश्चिम बंगालमधून पुरवठा या समीकरणामुळे सीमेपलिकडे बनावट नोटांचे छापखाने सुरू झाले की, काय अशी भीती व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या सुलेमान शेख आणि सनाउल शेख यांना खंडणी विरोधी पथकानं डोंगरी परिसरातून अटक केली. झाडाझडतीत त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या २४० नोटा सापडल्या. उत्कृष्ट छपाईमुळे या नोटा खऱ्या की, खोट्या हे सुरुवातीला समजत नव्हते. मात्र या नोटांवर एकच अनुक्रमांक असल्यानं त्या बनावट असल्याची खात्री पटली, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. मालदा येथील एका व्यक्तीनं या नोटा देऊन त्या मुंबईत चलनात आणण्यास सांगितलं होतं. याबदल्यात या दोघांना कमिशन मिळणार होतं, अशी माहिती अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत दिली.
कितीही चांगला कागद वापरून कितीही हुबेहूब छपाई केली तरी पाणी पडताच धुतला जाणारा ओरिजिनल रंग कुठून आणतील बनावट नोटा बनवणारे? हे अद्भुत मेक इन इंडिया तंत्रज्ञान मेड इन बांगलादेश नोटांमध्ये सापडूच शकत नाही. बनावट नोटांच्या विरोधातील महायुद्धच असलेल्या प्रचंड यशस्वी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला ही बातमी यावी, हा योगायोग मात्र विलक्षण आहे.
.............................................................................................................................................
३. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आम आदमी पक्षाची राज्यसभेची ऑफर नाकारली आहे. आपण सध्या शिक्षणाशी संबंधित कामात व्यग्र असल्याचं सांगत त्यांनी ही ऑफर नाकारली आहे. ‘सध्या राजन भारतातील अनेक शैक्षणिक कार्यांमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय ते शिकागो विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापनाचे काम करतात,’ असे राजन यांच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
रघुराम राजन यांनी अर्धवटच माहिती दिली आहे. ते शिक्षणकार्यात म्हणजे ज्ञानदानात व्यग्र आहेतच. पण, ही अर्धीच बाजू आहे. त्यांचं राजकारणासंदर्भातलं ज्ञानसंपादनही पूर्ण झालं आहे. भारतातील एकंदर राजकारण, त्याचा आवाका आणि त्याचं स्वरूप याविषयीचं त्यांचं पदव्युत्तर शिक्षणही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या कारकीर्दीत पूर्ण झालं आहे. स्वतंत्र विचाराच्या, झुंडमुक्त शहाण्या माणसानं संसदेची पायरी चढण्याच्या फंदात पडू नये, अशी त्यांची त्यातून समजूत झाली असल्यास त्यात नवल नाही.
.............................................................................................................................................
४. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली. बीजिंगमधील टेंसेंट वी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हॉकिंग म्हणाले, ‘जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे आपण या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती करत आहोत. या अति ऊर्जानिर्मितीमुळे पृथ्वीचं तापमान वाढते आहे. याचा मोठा फटका भविष्यात मानवजातीला बसणार आहे.’ माणसाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वस्ती करण्यायोग्य ग्रहाचा शोध आत्तापासूनच घ्यावा लागेल, असं हॉकिंग यापूर्वी म्हणाले होते.
हॉकिंग यांनी त्यांच्याही नकळत केवढा मोठा दिलासा दिला आहे, याची त्यांना कल्पना नसेल. डोनाल्ड ट्रम्प, किम जोंग ऊन यांच्यासारख्या नररत्नांना मानवजातीनं आपल्या डोसक्यावर बसवून घेतलेलं असताना २६०० सालापर्यंत पृथ्वी टिकणार आहे, मानवजात टिकणार आहे, असं या द्रष्ट्या वैज्ञानिकाला वाटावं, हेच किती मोलाचं आहे. हे दोन सद्गृहस्थ आणि देशोदेशीचे त्यांचे भाऊबंद मिळून त्याआधीच एखाद्या दिवशी एकदमच सगळी ऊर्जानिर्मिती करून मोकळे नाही झाले म्हणजे मिळवली!!
.............................................................................................................................................
५. गेल्या काही निवडणुकांमध्ये बसलेले पराभवाचे धक्के आणि पक्षाच्या शिलेदारांनी दिलेले 'नाराजी'नामे याची गंभीर दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज यांनी नाशिकमधील मनसैनिकांशी चक्क जमिनीवर बसून चर्चा केली. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यातील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. अलीकडेच मुंबईतील नगरसेवकांनीही मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. एकामागून एक शिलेदार 'साथ' सोडून गेले. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाला आलेली मरगळ झटकून नवी उभारी देण्यासाठी राज येत्या काळात राज्यभर दौरे करणार आहेत.
राज यांचा हेतू चांगलाच आहे. ते आपल्या पक्षाला संजीवनी देण्यासाठी मनापासून झटताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या राजकारणाचा आणि पक्षाचा जन्म ज्या धारेतून झाला आहे, ती दरबारी छापाची राजकारण-परंपरा आहे. पक्षाचे प्रमुख हे कोणी राजेमहाराजे आहेत, अशा थाटात रणशिंग फुंकून, फटाक्यांचा कडकडाट करून स्वागत करायचं, मंचावर सिंहासनासारखी खुर्ची ठेवायची, बसता उठता आईभवानीच्या आशीर्वादाचा उल्लेख करायचा, शोभेच्या म्यानांमधून शोभेच्या तलवारी बाहेर काढायच्या, अशा प्रकारच्या प्रतीकात्मकतेची सवय झालेल्या कार्यकर्त्यांना शिलेदारांबरोबर जमिनीवर बसून त्यांच्यातलाच भाकरतुकडा खाणारे महाराज आठवतील का? चालतील का?
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment