अजूनकाही
१. अण्वस्त्राचा प्रथम वापर न करण्याचं भारताचं धोरण आहे. पण, वेळ पडली तर भारतही प्रथम अण्वस्त्र वापरू शकतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
संरक्षणमंत्र्यांचं हे मत व्यक्तिगत आहे, संरक्षणखात्याचं हे मत नाही, असं स्पष्टीकरण त्या खात्याने दिलं आहे. आपल्याच खात्याकडून टपली खायची हौस तरी किती पर्रीकरांना! संरक्षण मुख्यालय नागपूरला हललेलं नाहीये नाना.
..........
२. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत, तर अमेरिकी जनता त्यांच्या ५६ इंच छातीचे माप काढेल : शिवसेनेचा चिमटा
कुठूनही जाता जाता मोदी आणि भाजप यांचा मुखभंग करण्याची उबळ काही शिवसेना रोखू शकत नाही. पण, ट्रम्पतात्यांनी हा सल्ला मनावर घ्यायचं काही कारण नाही. शिवसेनेने मुंबईचा एवढा सत्यानाश केल्यानंतरही भूमिपुत्रवादाची भूल चढलेली भयभीत जनता इमानेइतबारे निवडून देतेच की शिवसेनेला.
..........
३. भारतात पतीकडून पत्नीवर बलात्कार, ही संकल्पनाच अस्तित्वात नाही; कारण लग्न हे पवित्र बंधन आहे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या सचिव सीता आनंदम यांचं मत
काकू, परस्परआदरावर आणि समानतेच्या तत्त्वावर उभ्या असलेल्या या नात्यात जेव्हा एकतर्फी सुखाची जबरदस्ती होते, तेव्हाच या पवित्र बंधनाचं पावित्र्य नष्ट होतं आणि कायद्याच्या भाषेत त्याला बलात्कार म्हणतात. आणि हो, आपल्याकडे लग्न अजूनही कायदेशीर करारच आहे, बरं का!
..........
४. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांत केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या कैलाश रूग्णालयाचाही समावेश.
‘दिव्याखाली अंधार आणि लोका सांगे ब्रम्हज्ञान’ यांसारख्या म्हणी अजरामर ठेवण्यात महेश शर्मांसारख्या महानुभावांचा मोठा वाटा आहे. अर्थात निर्लज्जाच्या बुडावर घातला पाला, गार लागतंय, अजून घाला, ही म्हणही तेच जिवंत ठेवतील, यात शंका नाही.
..........
५. ट्रम्प यांनी अमेरिकेत असं सांगितलं की मी अमेरिकेचा राष्ट्रपती बनलो, तर अमेरिकेत श्री. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनुसार काम करीन, त्यामुळेच ट्रम्प यांना विजय मिळाला : उत्तर प्रदेशातल्या सभेत राजनाथ सिंह
काही तांत्रिक अडचणी नसत्या आणि मोदी निवडणुकीला उभे राहू शकले असते, तर ते भारतात राहूनही निव्वळ थ्री डी प्रोजेक्शनच्या साह्याने अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूकही जिंकू शकले असते आणि त्यांनी व्हाइट हाऊसमधून चीन आणि रशिया यांचाही कारभार हाकला असता, यात मुळातच कुणाला काही संशय नाही.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment