साहित्य, सिनेमा आणि सत्यजित राय
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जयंत राळेरासकर
  • ‘गगन समुद्री बिंबले’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama गगन समुद्री बिंबले Gagan Samudri Bimbale विजय पाडळकर Vijay Padalkar राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan

साहित्यकृतीवर आधारित चित्रपटांचा रसास्वाद घेत आणि देत विजय पाडळकर यांनी ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक सिद्ध केले आहे. साहित्य आणि चित्रपट यांचे परस्पर नाते तपासण्याचा हा प्रयत्न अतिशय प्रसन्न झाला आहे. चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी प्रगल्भ असणाऱ्या आणि साहित्यकृतीकडे ममतेने पाहणाऱ्या रसिकांना हे पुस्तक खूप काही देऊन जाईल. हा विषय मांडताना पाडळकर यांनी साहजिकपणे सत्यजित राय यांच्या चित्रपटाची निवड केली आहे. ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ ही सत्यजित राय यांची त्रिवेणी (Apu Triology), ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, ‘शतरंज के खिलाडी’ आणि ‘गणशत्रू’ हे इतर चित्रपट (आणि त्यांच्या साहित्यकृती) अशी ही चर्चा या पुस्तकातून केली गेली आहे. विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्यांवर सत्यजित यांनी तीन चित्रपट केले. ते म्हणजे ही सुप्रसिद्ध अपू-त्रिवेणी.

‘तीन कन्या’ आणि ‘चारुलता’ हे रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांवरील आधारित होते. ‘शतरंज के खिलाडी’ हा प्रेमचंद यांच्या छोट्या कथेवरील तर ‘गणशत्रू’ इब्सेनच्या ‘Enemy of the People’वर आधारित होता. या साहित्यकृतीची ( आणि लेखकांची सुद्धा) ओळख, दिग्दर्शकाने घेतलेले स्वातंत्र्य, केलेले बदल यांची चर्चा ‘गगन समुद्री बिंबले’ या पुस्तकात आलेली आहे. लेखणी आणि कमेरा यांचे विनाकारण, तर-तम न करता, बाजू न घेता दोन्ही माध्यमाची ताकद (आणि मर्यादादेखील) पाडळकर आपल्या पुढे मांडतात.

या अशा मांडणीमुळे आपल्या जाणीवांना एक वेगळीच मिती प्राप्त होते आणि चित्रपट पाहण्यासाठी आपण अधिक प्रगल्भ होण्याची गरज अधिक सहजपणे निर्माण होते. पाडळकर यांनी सोपेपणाने हे लिहिताना त्याचा ‘नेमका अर्थ’ वाचकाच्या मनात झिरपण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. एरव्ही साहित्य आणि चित्रपट ही चर्चा अवघड झाली असती.

प्रत्यक्ष साहित्यकृती आणि चित्रपट या चर्चेच्या आधी पुस्तकात एक प्रदीर्घ विवेचन येते. कारण आजही सत्यजित राय यांची पूर्ण ओळख नसलेले अनेक रसिक आहेत. विशेष म्हणजे ही चर्चा ‘त्यांना’ माहिती असू शकतील अशा इतर कलाकृतींच्या संदर्भात आहे. ही कल्पना मला आवश्यक वाटते, कारण ओळखीचा ‘प्रसंग’ आणि ‘व्यक्तिरेखा’ सामोरी आली नाही तर थेट काळजाला भिडणारी ‘ओळख’देखील निर्माण होत नाही. मी म्हणतो तसे पाडळकर यांना अभिप्रेत होते की, नाही माहिती नाही. पण त्यामुळे सत्यजित राय यांच्या प्रांगणात शिरण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते.

याच चर्चेतून सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. दिग्दर्शकाचे विचार चित्रित करणाऱ्या कॅमेऱ्याच्या मर्यादा आणि शक्ती दोन्हीचा अंदाज देखील येतो. सिनेमा कसा पाहिला जावा याचे भान देखील येते. पुस्तक वाचताना आपण कथेशी तद्रूप होतो (त्याच्या अनेक छटा आहेत) आणि तीच आणि तशीच प्रक्रिया चित्रपट पहाताना देखील घडावी असे नाही, पण एक ‘स्वतंत्र कलाकृती’ म्हणून तिचा आस्वाद घेता आला पाहिजे हे नक्की. विजय पाडळकर या पुस्तकातून ते भान देतात.

“I do not want to make films for people who do not read” असे फ्रांझ त्रुफां या फ्रेंच दिग्दर्शकाचे एक वाक्य प्रस्तावनेत पाडळकर उधृत करतात. सर्व सिनेमे हे साहित्यकृतीवर आधारितच असावेत असे नाही. मात्र एक खरे की, दोघांची अकारण फारकत करणाऱ्या मंडळींनी सिनेमाचे एक भीषण स्वरूप आणि संस्कृती निर्माण केली आहे. सिनेमाच्या जन्मजात दोषात व्यापारीकरणाचा अंश आहे हे खरे. त्याच्या लोकप्रियतेमुळे चांगला सिनेमादेखील हकनाक बळी होण्याचे नशीब घेऊनच कित्येक वेळा जन्मतो, हे आपण अनेक वेळा पहिले आहे! पण हा विषय खूप वेगळा आहे आणि इथे अप्रस्तुत आहे.

गुलजार यांनी ‘कोशिश’ केला, त्यावेळी सिप्पींना ते फारच absurd वाटले होते. शब्द नाहीत, संवाद नाहीत, तर मग सिनेमा कसा करणार? त्यावर गुलजार म्हणाले होते, “माझ्यापाशी चार कला आहेत. संगीत, अभिनय, छायाचित्रण आणि संकलन. या चार माध्यमांतून मी जर लोकांपर्यंत पोहोचू शकत नसेन तर मी दिग्दर्शकच नाही.” गुलजार यांनी त्यांचे म्हणणे ‘कोशिश’मधून सिद्ध केले. सिनेमाला हीच तर मोठी देणगी आहे. पाडळकर यांनी चित्रपट आणि साहित्य यांचे ‘सहजीवन’ असा शब्द-प्रयोग वापरला आहे. आणि तो खूप सार्थ आहे. प्रास्ताविकातील या चिंतनाचा उपयोग होतो तो असा.

‘पाथेर’ त्रिपदी आणि ‘चारुलता’ या दोन कलाकृती (साहित्य आणि चित्रपट) संदर्भात चर्चा अधिक विस्ताराने आल्या आहेत, आणि तसे  असणे साहजिक आहे. याच दोन कलाकृतींतून त्यांनी उलगडलेले क्षण आपण पाहणारच आहोत. पुस्तकातील चर्चा ही फक्त एकांगी नाही तर, त्यातील फरक स्पष्ट करणारी आहे. शब्दांतून व्यक्त झालेली एखादी भावना किंवा प्रसंग दिग्दर्शकाला जाणवते आणि तो ती कॅमेऱ्यातून सांगू शकतो. यात कमी-जास्तपणा कुठे येतो? लेखकाच्या मनात नेमके जे असेल तेच कॅमेऱ्यातून पडद्यावर आले तर लेखकाला गौणत्व यायचे काहीच कारण नाही. अर्थात काही वेळा कदाचित हे फसूदेखील शकते. शब्द अधिक प्रभावी होते, अधिक भिडणारे होते असेही वाटू शकते!

विभितीभूषण यांचा दोन कादंबऱ्या, त्यावरील सत्यजित यांचे तीन चित्रपट, रवींद्रनाथ टागोर यांची ‘नष्टनीड’ आणि सत्यजित यांचा चित्रपट ‘चारुलता’ या अधिक संवेदनशील चर्चेच्या आधी आपण पुस्तकातील इतर भागाबद्दल पाहूया.

‘तीन कन्या’ या रवींद्रनाथ टागोर यांच्या तीन कथा आहेत. त्यावर या तीन स्वतंत्र कलाकृती आहेत. मात्र त्या सत्यजित यांनी एकत्रित सादर केल्या आहेत. तीन कन्या आणि त्यांचे भावविश्व आपल्यापुढे येते. मोनिहारा ही एक लोभी, हव्यासी मुलगी आहे. दुसरी ‘समाप्ति’ एका उच्छृंखल मुलीची कथा आहे. तिच्यात होणारे बदल हा त्याचा विषय आहे. तर तिसरी कथा एका लहान मुलीची आहे. खेड्यातील आयुष्याशी जुळवून घेत असताना ही अनाथ मुलगी पोस्टमास्तरच्या आयुष्यात येते. पण खेड्यातले आयुष्य न रुचलेला हा पोस्टमास्तर अखेर गाव सोडून जातो. मात्र त्या मुलीच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी त्याला जाणवतदेखील नाही. उलट या घटनेची अनिवार्यता त्या मुलीला मात्र कळली आहे. नव्याने बदलून आलेला पोस्टमास्तर हेच आपले भागध्येय आहे, हे तिने स्वीकारलेले आहे.

सत्यजित राय यांचा ‘चारुलता’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनीड’ या कथेवर आहे. चारुलतामध्ये माधवी मुखर्जी-सौमित्र चटर्जी (चारुलता आणि भूपती) यांच्या भूमिका एक शिल्प बनून गेले आहे, हे प्रथम स्पष्ट केले पाहिजे. किती चित्रपटांतून हे असे ‘नाते’ स्मरणात कायम कोरले गेले आहे, हे खरे तर एकदा बघायला हवे.

चारुलताबद्दल पाडळकर अधिक विस्ताराने लिहितात. मुळात ही कथा साकार करताना रवींद्रनाथ यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक गुंफा उघडणे अटळ आहे. ‘तो’ संदर्भ ते टाळत नाहीत, पण काही बारकावे स्पष्ट करतात. हे सोपे नक्की नव्हते. चित्रपट कसा पहावा, याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे लेखक सांगत नाही, तर आपल्याला तिथे घेऊन जातात. एकदा चारुलताच्या हातातील दुर्बिणीचे प्रयोजन कळले की (एरव्ही ते एखाद्या रईस बंगाली स्त्रीचे खेळणे फक्त वाटेल), मग चारुलताचे एकटेपण आपल्याला उमगते. अशा अनेक जागा पाडळकर दाखवतात. अर्थात ते मुळातूनच अनुभवावे. ‘अपू त्रिवेणी’ आणि ‘चारुलता’ यांची चर्चा इतर चित्रपटांच्या तुलनेत प्रदीर्घ आहे, कारण त्यांचा पट मोठा आहे.

.............................................................................................................................................

निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283

.............................................................................................................................................

‘शतरंज के खिलाडी’ (प्रेमचंद) आणि ‘गणशत्रू’ (इब्सेन) अशी अखेरची दोन प्रकरणे आहेत. पैकी इब्सेन हे भारतीय नव्हेत. त्यांच्या कथेला जी भारतीय पार्श्वभूमी सत्यजित यांनी दिलेली आहे, ती अफलातूनच आहे. सहजपणे केले गेलेले लोकशाहीवरील भाष्य देखील विचार करायला लावणारे आहे. ‘शतरंज के खिलाडी’ हा चित्रपट फारसा जमलेला नाही, आणि सत्यजित यांचा पहिला हिंदी चित्रपट इतकेच त्याचे वेगळेपण असे मत पाडळकर नोंदवतात. त्याची कारणे देखील देतात.

सत्यजित यांच्या अपू-त्रिवेणीवर आधारित ‘नाव आहे चाललेली’ (राजहंस प्रकाशन, पुणे) हे पुस्तक पाडळकर यांनी २००४ मध्ये लिहिले होते. त्यालाच नवीन कलाकृतींची जोड देऊन ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक सिद्ध केले आहे.

साहित्य कृतींचा स्वतंत्र मागोवा घेताना सत्यजित यांच्या इतर चित्रपटांचा आणि मुळातील कथा/कादंबरी यांचा अभ्यास एकत्रित मिळतो. ‘चित्रपट आणि साहित्य - काल आणि आज’ दीर्घ चर्चादेखील ते या पुस्तकात करतात. साहित्य आणि चित्रपट यांची बलस्थाने, दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य, आणि माध्यमाच्या मर्यादा या आपण समजू घेतल्या पाहिजेत हे तर खरेच. संपूर्ण चित्रपटभर सातत्याने वापरलेली एखादी धून एरव्ही कदाचित लक्षात देखील येणार नाही, पण लक्षात आणल्यावर त्याची परिणामकारकता किती आहे हे जाणवते. रेल्वेचा दुरून येणारा आवाज, अपुचे आणि त्याच्या बहिणीचे त्याच्याशी असलेले भावनिक नाते, पुस्तक फेकण्यातून व्यक्त होणारा चारुलताचा एकाकीपणा, हे दृश्य माध्यमातून सुरेख स्पष्ट होते. चित्रपटाच्या अखेरीस चारुलता आणि भूपती यांचे हात एकमेकासाठी पुढे येतात, पण ते जुळत नाहीत. एक विशिष्ठ अंतर त्यात राहते आणि चित्रपट संपतो.

एका प्रसंगात अपू कोलकात्याला जाताना त्याला मिळालेला पृथ्वीचा गोल हुडकत आहे. तो आईला विचारतो, त्यावेळी आई त्याला सांगते, ‘तो तू हातातच घेऊन जा. पेटीत तो मावला नाही.” खरेच! अपुचे विश्व आता मोठे झाले आहे. ते छोट्या जागेत ते मावणारे नाही! मुळात कादंबरीत देखील अपुचे विश्व खूप विस्ताराने आले आहे, त्याचे असे परिणामकारक चित्र सत्यजित उभे करतात. पाडळकर अशी अनेक उदाहरणे देतात. आणि म्हणूच हे पुस्तक संग्राह्य वाटते. कारण हे वाचल्यानंतर त्या कलाकृती वाचणे किंवा बघणे नक्कीच अधिक समृद्ध अनुभव देतील असे वाटते. हा रसास्वाद त्यासाठी महत्त्वाचा आहे.

प्रेमचंद यांच्या कथेवरील ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाबद्दल लिहिताना त्यात केलेल्या बदलाबद्दल लिहिताना पाडळकर लिहितात, “बदल हे करावेच लागतात. मुख्य मुद्दा म्हणजे या बदलाबद्दल काय साधले, नवे काय मिळाले आणि जुने काय हरवले आणि त्याचा एकत्रित परिणाम काय झाला हा आहे...” पुढे ते म्हणतात, कथेत बदल झाले म्हणून केवळ टीका करू नये हे जितके खरे तितकेच कथेत बदल करणे हा आपला हक्कच आहे असेही दिग्दर्शकाने म्हणू नये. याचे कारण म्हणजे प्रेमचंदांच्या कथेत सत्यजित यांनी खूप बदल केले. हा तपशील वाढवताना त्यांनी चित्रपट पूर्ण लांबीचा व्हावा म्हणून ते केले गेले.

‘शतरंज के खिलाडी’च्या निमित्ताने पाडळकर यांनी इतरही चर्चा, समीक्षक-मंडळी आणि राय-चाहते यांचे दृष्टिकोनदेखील चर्चेत घेतले आहेत. ते मुळातून वाचताना सत्यजित राय यांच्या दिग्दर्शकीय मतांचाही उहापोह पाडळकर करतात. ‘गणशात्रू’ ही इब्सेन यांचे नाटक भारतीय करताना सत्यजित राय यांनी केलेला शेवट हा आशावादी आहे. नाटकात तसे नाही. त्यामुळे सिनेमातील ‘नायक-डॉक्टर’ त्या उंचीवर जात नाही. विचारी माणसाच्या बाजूने चार लोक अजूनदेखील उभी राहतात असे सत्यजित यांनी दाखवले आहे. मात्र हे इब्सेनच्या कलाकृतीशी अगदी विरुद्ध आहे. सत्यजित यांनी दूषित पाण्याचा संदर्भ ठेवताना त्याला धार्मिक उपकथा दिली आहे. हे सगळे भारतीय समाज जीवन, श्रद्धा या संदर्भात योग्य होते.

प्रत्यक्ष चित्रपट आणि मूळ साहित्य असे एकसंघ समोर आल्यामुळे आपण एका वेगळ्या पद्धतीने त्याचा रसास्वाद घेऊ शकतो हे महत्त्वाचे आहेच. इतके सर्व तपशील सोप्या पद्धतीने समोर आल्यामुळे वाचताना देखील आपण गुंतून जातो. बरेच आपण देखील आठवू शकतो. आणि जर पूर्वी काहीच वाचले/पाहिले नसेल तर नक्कीच त्यासाठी प्रवृत्त होतो. आणि म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

हा लेख वाचणारी मंडळी मूळ कथा/कादंबरी आणि चित्रपट यांचा एकत्रित आस्वाद घेतील, यासाठी मी  थोडी पुनरुक्ती केली आहे. केवळ याच साठी, की साहित्य श्रेष्ठ की सिनेमा हा वाद अनेक वेळा घातला जातो. अनेक मतप्रवाह चर्चेत घेत पाडळकर आपल्याला अखेर प्रत्यक्ष त्या कलाकृतीची भेट घडवतात. आणि म्हणूनच कुठल्याही अंतिम मताच्या आधी हे पुस्तक आणि ते सिनेमे अनुभवावे असे वाटते.

गगन समुद्री बिंबले - विजय पाडळकर

राजहंस प्रकाशन, पुणे

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4282

.............................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......