मोदी, गुजरात आणि हिंदी चित्रपट
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 07 November 2017
  • देशकारण नरेंद्मोर दी Narendra Modi गुजरात Gujratसिक्रेट सुपरस्टार Secret Superstar रईस Raees गोरी तेरे प्यार में Gori Tere Pyaar Mein

‘सिक्रेट सुपरस्टार’ हा अवघा चित्रपट घडतो वडोदरा अर्थात बडोदा या शहरात. कशामुळे? आमीर खान-किरण राव यांना का म्हणून गुजरात राज्य या चित्रपटाची कथाभूमी म्हणून ठरवावीशी वाटली? नक्कीच त्यांना आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांना काही सुचवायचं आहे. एका मुस्लिम कुटुंबात पुरुषाची असलेली दहशत आणि त्याचा परंपरांचा, पुरुष वर्चस्वाचा आग्रह गुजराती शहरात दाखवून मिळवायचं काय होतं खान-राव यांना? की एक पुरुष म्हणजे कुटुंबप्रमुख स्त्रीचं स्वातंत्र्य, कलाविष्कार आणि तिची स्वमत्ता मानतच नाही, हे मांडत असताना नरेंद्र मोदी यांची अंधुक, पुसट आणि त्यांचं एकचालकानुवर्तित्व अशी प्रतिमा मांडायचीय? एरवी त्या चित्रपटात गुजराती भाषा एक-दोन वाक्यांखेरीज ऐकू येत नाही. उजव्या खांद्यावर पदर पांघरलेल्या स्त्रियाही दिसत नाहीत. ना गुजराती व्यापारी दिसले.

नायिकेची शाळा इंग्रजी माध्यमाची. ती लिहितेही इंग्रजीत. तिचा एक मित्र चिंतन पारेख या नावाचा असून तो तिच्यावरच्या प्रेमाखातर खूप मदत करत राहतो. तीही त्याच्या प्रेमात असते. म्हणजे इन्सिया मलिक एका हिंदू मुलावर जीव लावते, हे तर हा चित्रपट दाखवतोच, शिवाय केवळ आवाज ऐकून बुरख्यातील मुलीला एक संगीतकार बोलावतो आणि तिला संधी देतो. तोही हिंदूच. शक्तीकुमाराच्या रूपात आमीर खान स्वत:!

एका हिंस्र, क्रूर, कलाशत्रू व सनातनी विचारांच्या मुसलमान पतीपासून पत्नीला व बापापासून लेकीला मुक्त होण्याची प्रक्रिया दाखवणारा तरी हा चित्रपट आहे का? असा माणूस मग गुजरातीच का? अन्य कोणत्याही राज्यांत तो सापडला असताच की!

.............................................................................................................................................

‘दंशकाल’ या चर्चित कादंबरीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

एक संदर्भ सांगतो. आमीर खानचं पात्र नायिकेला विचारतं, ‘तुझं वय काय?’ ती सांगते, ‘१५’. इथं आपल्याला तर्क लावता येती की, सदर मुलगी २००२ साली जन्मली. म्हणजे गोध्राचा बदला म्हणून गुजरातनं मुस्लिमांची कत्तल केली ते वर्ष. २००२नंतरही मुसलमान पुरुष असेल तर तो फारुखसारखा म्हणजे त्या कुटुंबप्रमुखासारखा वागतो. मात्र त्या वर्षी जन्मलेली मुलगी मात्र त्या जुन्या, अन्यायी, धर्मांध इतिहासापासून सुटी व्हायची धडपड करते आहे, असं बहुधा दिग्दर्शकाला सुचवायचं आहे.

मुस्लिमांच्या दोन पिढ्या कशा वेगळ्या आहेत, हे बडोद्यातून सांगायचं धाडस तर आहेच, पण ते प्रेक्षकांना थेट सांगितलं असतं, तर पटलं असतं. एरवी या चित्रपटात विद्यमान राजकीय संदर्भ चुकूनही दिसणार नाही याची इतकी काळजी घेतली गेलीय की, आउटडोअरचे सारे शॉटस क्षणार्धात नाहीसे होत जातात. ना पोस्टर्स, ना बॅनर्स, ना कटआऊटस, ना बांग, ना घंटानाद, ना मुस्लिम मोहल्ला ना शेजारपाजार. फक्त एकदा पत्नी नमाज पढताना दाखवलेली. घरातही मक्केचं कॅलेंडर नाही की आयत.

सबंध चित्रपट इस्लाम, रूढी, ईश्वर, याविरुद्ध काही भाष्य करत नाही. मग कुटुंब मुस्लिम का दाखवलं? राजपूत, जाट, ब्राह्मण यांचा प्रतिगामी अवतार दाखवून वीट आला म्हणून? बंड केवळ जुलमी पुरुषाविरुद्ध करून चालत नाही. ज्या धर्मव्यवस्थेनं त्याला सत्ता बहाल केली, तीवरही आघात केले पाहिजेत. गंमत म्हणजे नायिकेचा मित्र चिंतन याच्याही आई-वडिलांचा घटस्फोट झालेलाय. पण तो सांगतो की, सारेच पुरुष वाईट नसतात. शक्तीकुमार दोन वेळा घटस्फोटीत आहे. तरीही कलेखातर व प्रेमाखातर तो इन्सियाला त्याला हरवणारी वकीलबाई मिळवून देतो. म्हणजे गुजरातची असो की आणखी कोणी, घटस्फोट तीन पात्रांना एकत्र आणण्याची प्रक्रिया म्हणावी की अनिवार्यता? मुलगी आईला घटस्फोट घ्यायला लावते, हा संदेश देण्यासाठी गुजरात व मुस्लिम यांचा संदर्भ ओढूनताणून आणलेला वाटतो. उत्तरार्धात सारं कथानक फिल्मी होऊन वास्तवापासून पळ काढतं.

याच वर्षी जानेवारीत आलेला शाहरूख खानचा ‘रईस’ गुजराती असूनही काही प्रसंगांमधून राजकीय भाष्य करतो. एका राजकीय मिरवणुकीत मोठ्या चलाखीनं भाजपच्या ध्वजातील दोन्ही रंग झेंड्यांना लावलेले दिसतात. गुजरात दा‌खवतं तेवढं सोज्वळ, अहिंसक, सरळ राज्य नाही हे ‘रईस’ स्पष्टपणे मांडत जातो. हे राज्य गुन्हेगारी जन्माला घालतं, गांधीलाच नव्हे, असे तर शाहरुखला सुचवायचं नव्हतं? संदर्भ अर्थातच गोध्राचा. पण रईस पडला, पाडला किंवा लोळवला. सिनेमा म्हणून तर तो वाईटच होता.

२०१३ साली ‘गोरी तेरे प्यार में’ नावाचा करीना कपूर-इमरान खान यांचा एक चित्रपट येऊन गेला. तो मात्र गुजराती भाषा, माणसं, गाव यांनी समृद्ध होता. मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते आणि अनुपम खेरचं पात्र सरपंच बनून गावाचा पाण्याचा प्रश्न कसा चिघळेल हे पाहतं, हे या चित्रपटाचं कथानक होतं. गुजराती राजकारणही खुनशी, सुडानं पेटलेलं, स्वार्थी आहे हे दिग्दर्शक मल्होत्रा यानं दाखवलं होतं. एक पुढारी विरुद्ध दोन आदर्शवादी तरुण आणि हतबल गावकरी यांची ही गुजराती कथा अर्थातच पडली, पाडली किंवा लोळवली. करण जोहर निर्माता असूनही!

सारखे उत्तर भारतीय राजकारण आणि हिंसा पाहून आपल्याला गुजराती कथा सपक वाटत असतील तर तो धोकाय. हे तिन्ही चित्रपट म्हणूनच ग्रेट नसावेत काय?

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......