अजूनकाही
'ओंकारा' या सिनेमात सैफ अली खानच्या लंगडा त्यागीच्या तोंडी एक संवाद आहे, 'सही कह रिया है तू रज्जो, तेरी और मेरी किस्मत गधे के लिंग से लिखी गई है.’ 'रंगुन' आणि 'शेफ'च्या दणदणीत अपयशानंतर सैफला राहून राहून हा संवाद आठवत असेल.
सैफच्या बाबतीत काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या फारशा सकारात्मक नाहीत. पहिली बातमी त्याच्या 'शेफ' या चित्रपटाची तिकीटखिडकीवर आपटण्याची आहे. चित्रपटाचं फ्लॉप होऊ शकणं समजू शकतो, पण 'शेफ' हा या वर्षीच्या सर्वांत कमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. असा निच्चांकी रेकॉर्ड सैफच्या नावावर जमा होणं त्याच्या स्टारडमवरच प्रश्नचिन्ह उमटवतं. दुसरी बातमीही तितकीशी चांगली नाही. अक्षत वर्माच्या 'कलाकांडी'ला, ज्यात सैफ मुख्य भूमिकेत आहेत, वितरक मिळत नसल्यानं तो बहुतेक नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित करण्यात येईल. सैफसारख्या स्टारच्या चित्रपटाला वितरक न मिळणं ही त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं गंभीर बाब आहे. सैफची कारकीर्द कड्याच्या टोकावर येऊन थांबली आहे का? त्याचा स्टारडम शेवटचे आचके देत आहे का? तो या सगळ्यातून मार्ग काढू शकेल का? अनेक प्रश्न सैफच्या चाहत्यांसमोर आहेत.
शर्मिला टागोर आणि नवाब टायगर पतौडीचा कुलदीपक असणारा हा मुलगा मुंबईमध्ये अभिनय करण्यासाठी आला, तेव्हा शब्दशः 'बिगडा हुआ नवाब' होता. आता जशी सैफची धीरगंभीर, कुल, सहसा ताळतंत्र न सोडणारा अशी प्रतिमा आहे, त्याच्या एकदम उलट. सैफचे मुंबईमधले सुरुवातीचे दिवस खऱ्या अर्थानं वादळी होते. आई शर्मिलानं आपल्या पोराच्या रागीट स्वभावाला मुरड पडावी आणि त्याच्या टाळक्यात जरा चांगले विचार यावेत, यासाठी त्याला गुलज़ार यांच्या घरी राहायला ठेवलं होतं. त्यांच्या चांगल्या संबंधांची भीड राखून गुलज़ार तयार झाले. पण गुलज़ार यांचे बरेचसे केस पांढरे होण्याचं श्रेय तरुण सैफला जातं. गुलज़ार यांना रात्री दहाच्या आत दिवा मालवून झोपण्याची सवय. सैफचा दिवसच रात्री दहाला सुरू व्हायचा. लेट नाईट पार्ट्या करून तो रात्री-अपरात्री घरी यायचा. एकदा भिंतीमध्येच गाडी घुसवली. मवाळ, सात्त्विक गुलज़ार आणि बिगडा नवाब, सैफ यांचं गोत्र जुळेना. इंग्लंडमध्ये शिकलेल्या या पोरामध्ये तिथलं 'जेंटलमॅन'पण औषधालाही नव्हतं.
दिग्दर्शक राहुल रवेलनं आपल्या 'बेखुदी' नावाच्या सिनेमात त्याला पहिली संधी दिली. त्याच्यासोबत कास्ट केलं होत काजोलला. तिचाही तो पहिलाच सिनेमा. पण सैफच्या बेशिस्त स्वभावामुळे कडक 'टास्कमास्टर' असणाऱ्या राहुलशी त्याचं जमेना. रोजच्या कटकटींना वैतागून राहुलनं सैफची 'बेखुदी'मधून उचलबांगडी केली.
सैफला वयानं मोठ्या असणाऱ्या स्त्रियांचं आकर्षण पहिल्यापासूनच असावं. तो तेव्हा मुनमुन सेनला (रिया आणि रायमा सेनची आई) डेट करायचा. नंतर त्यानं त्याच्यापेक्षा वयानं खूप मोठ्या असणाऱ्या अमृता सिंगशीच लग्न केलं. तेही घरच्यांपासून लपवून. दरम्यानच्या काळात आईच्या पूर्वपुण्याईमुळे त्याला पहिला चित्रपट चक्क यश चोप्रांसोबत मिळाला. सिनेमाचं नाव 'परंपरा'. चोप्रांचा असूनही सिनेमा आपटला. मग 'आशिक आवारा'सारखे अजून काही सिनेमे आले आणि आपटले. ‘या बेजबाबदार पोराचं काहीच होऊ शकणार नाही’, असं आईला वाटू लागलं होतं. त्यातच त्या काळी सैफबद्दल अनेक प्रवाद पसरायला लागले होते. ‘सैफला दाढीमिशा येत नाहीत आणि तो 'बायल्या' आहे’, अशी बातमी त्या काळी अनेक लोकांनी ऐकली असेल किंवा वाचली असेल. ‘तो गुलाबी रंगाची नाइटी घालून अमृता सिंगच्या कुत्र्याला फिरवायला घेऊन जातो’, असं काही लोक शपथेवर सांगायचे. त्यातच त्याने अक्षय कुमारसोबत जोडी जमवून सिनेमे करायला सुरुवात केली आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं यशाची चव चाखली. या चित्रपटांमध्ये सैफ हा घाबरट, वेंधळा आणि विनोदी पात्र करायचा, ज्याला नेहमी अक्षयचा 'मर्दाना' हिरो गुंडांपासून किंवा संकटांपासून वाचवायचा. 'मैं खिलाडी तू अनाडी', 'तू चोर मैं सिपाही', 'ये दिल्लगी', 'किमत' आणि काही चित्रपट या दोघांनी केले. या चित्रपटांमधून अक्षयची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा बनत होती. त्याच वेळेस सैफची दुय्यम अभिनेत्याची प्रतिमा ठळक होत चालली होती. हे दुय्यमपण सैफला खटकत असावं. कारण अक्षयसोबत इतके चित्रपट करूनही त्यांची मैत्री काही जुळली नाही. ‘बरोबरीच्या लोकांमशीच मैत्री जुळते’ असं म्हणतात ना! नंतरपण 'कच्चे धागे', 'हम साथ साथ है', 'बीवी नंबर वन' अशा चित्रपटांमध्ये सैफचा दुय्यम भूमिकांचा सिलसिला चालूच राहिला.
राकेश रोशन या दिग्दर्शकाचे सगळे सिनेमे बघितले, तर एक पॅटर्न लक्षात येतो. त्यांच्या सिनेमातला मध्यंतरापूर्वी नायक वेगळा असतो आणि मध्यंतरानंतरचा नायक पूर्ण वेगळा असतो. 'करण अर्जुन', 'कोयला', 'कहो ना प्यार है' आणि अजून कितीतरी चित्रपट उदाहरणादाखल देता येतील. प्रत्यक्षात सैफनं राकेश रोशनच्या सिनेमात कधी काम केलं नसलं, तरी त्याच्या आयुष्यात असाच पॅटर्न दिसून आला. कारकिर्दीचं एक दशक पूर्ण झाल्यावर आणि लोकांनी ‘याचं काही होऊ शकतं’, ही अपेक्षा सोडून दिल्यावर सैफनं कात टाकली. २००१मध्ये आलेल्या फरहानच्या 'दिल चाहता है'नं सैफच्या कारकिर्दीला नवसंजीवनी दिली. त्यातला प्रेमाच्या बाबतीत अतिशय कन्फ्युज्ड असणारा, कुठल्याही मुलीच्या लगेच प्रेमात पडणारा आणि त्याची किंमत चुकवणारा, आणि आकाशकडून एक्स्प्लॉईट होणारा सैफचा समीर हा एक सुखद धक्का होता. 'दिल चाहता है'मधला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, सिड आणि आकाशमधल्या भांडणाचा प्रसंग. समीरची त्या भांडणातली भूमिका जवळपास बघ्याची, पण त्या प्रसंगातपण ‘आपल्या आयुष्यातले जवळचे दोन लोक भांडत आहेत आणि आपण ते थांबवण्यास असमर्थ आहोत’, ही तगमग चेहऱ्यावर दिसणारा समीर त्या फ्रेममध्ये आमिर आणि अक्षय खन्नासारखे दिग्गज असूनही भाव खाऊन जातो. दुसऱ्या दिवशी दोन्ही मित्रांच्या घरी जाऊन आल्यावर जेव्हा त्याला कळतं की, ‘सगळं काही संपलं आहे’, तेव्हा तो प्रचंड हताश होतो.
समीरचा हा रोल जणू सैफसाठीच बनला होता. सैफनं भूमिकेचं सोन केलं. इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर प्रेक्षकांनी आणि फिल्म इंडस्ट्रीवाल्यांनी पहिल्यांदाच सैफची नोंद घेतली. नंतर आलेल्या 'कल हो ना हो'मधला त्याचा रोहित पटेल शाहरूखच्या भावखाऊ भूमिकेसमोरही पाय रोवून उभा राहिला आणि प्रेक्षक हळूहळू सैफच्या प्रेमात पडू लागले. २००४ साली आलेल्या 'हम तुम' या रॉमकॉमनं सैफला त्याचा पहिला सोलो हिट मिळवून दिला. मल्टिस्टारर आणि एकापेक्षा अधिक नायक असणाऱ्या चित्रपटांमध्ये इतकी वर्षं काम करत आलेल्या सैफला ‘आपण एकट्याच्या बळावर सिनेमा चालवू शकतो’, हा आत्मविश्वास 'हम तुम'नं दिला. आता सैफची पडद्यावरची इमेज ‘गुलछबू लवर बॉय’ अशी झाली होती. २००३मध्ये आलेल्या श्रीराम राघवनच्या 'एक हसीना थी' या चित्रपटातून सैफनं आपल्या 'सेफ झोन'च्या बाहेर जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अतिशय थंडगार डोक्यानं प्लॅनिंग करणारा, भावनांचा स्पर्श होऊ न देणारा अतिशय ‘कूल खलनायक’ सैफनं यात साकारला होता.
सैफच्या कारकिर्दीमध्ये 'एक हसीना थी'चं महत्त्व 'दिल चाहता है'इतकंच आहे. सैफ अतिशय चांगल्या प्रतीच्या, वेगळ्या भूमिका करू शकतो, हे पुन्हा सिद्ध झालं; पण सैफच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ट भूमिका अजून यायच्या होत्या.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
२००६ हे वर्ष सैफ अली खान वर्ष म्हणून घोषित करायला हरकत नाही. याच वर्षी सैफच्या आयुष्यातले दोन सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स लोकांना बघायला मिळाले. 'बीइंग सायरस' हा सिनेमा म्हणजे एकूण भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे. तो इंग्रजी भाषेत असल्यामुळे बहुतेक भारतीय लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं असावं. एका अस्थिर आणि अंतर्गत कलहाने गांजलेल्या परिवारात सायरस मिस्त्रीचा (सैफ) प्रवेश होतो आणि त्या परिवारातल्या लोकांची आयुष्यं चांगल्या-वाईट पद्धतीनं पूर्ण बदलून जातात. 'बीइंग सायरस'ची पटकथा ही गेल्या दशकातली सगळ्यात घट्ट, बांधीव आणि एका सेकंदासाठीपण पकड न सोडणारी सर्वोत्कृष्ट पटकथा असावी. सिनेमात अतिशय ऑथेंटिक पारशी वातावरण दाखवलेलं आहे. हळूहळू मानसिक संतुलन ढासळत असणाऱ्या दिनशॉ सेठना (नसिरुद्दीन शाह), त्याच्या लहरीपणाला वैतागलेली केटी सेठना (डिंपल कपाडिया), दिनशॉच्या मुळावर उठलेला त्याचा भाऊ फारोख (बोमन इराणी), फारोखची बाहुलीसारखी असणारी बायको टीना (सिमॉन सिंग) आणि या सगळ्यांमध्ये अडकलेला सैफचा सायरस ही रोचक पात्रं सिनेमाला अतिशय उत्कंठावर्धक बनवतात. हळूहळू लयाला जाणाऱ्या एकूणच पारशी जीवनपद्धतीवर हा सिनेमा सुरेख भाष्य करतो.
जर तुम्ही स्वतःला ‘सिनेहॉलिक’ म्हणवून घेत असाल आणि तुम्ही 'बीइंग सायरस' बघितला नसेल, तर तुम्ही खरंच सिनेहॉलिक आहात का, याचा पुनर्विचार करायला हवा. सैफचा सर्वोत्कृष्ट अभिनय म्हटलं की, लोक 'ओंकारा'च्या लंगडा त्यागीचं नाव घेतात. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की, ‘सायरस मिस्त्री’ची भूमिका हीच निर्विवादपणे सैफची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. शेक्सपियरच्या 'ऑथेल्लो'मध्ये इयागो होता, तर विशाल भारद्वाजच्या ‘ओंकारा'मध्ये’ सैफचा लंगडा त्यागी होता. 'ओंकारा' येण्याच्या अगोदर सैफची इमेज शहरी आणि मेट्रो पार्श्वभूमी असणाऱ्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्याची होती, पण 'ओंकारा' मधला लंगडा त्यागी अतिशय रस्टिक, पिवळे दात असणारा आणि क्रूर होता. स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मित्रांच्या पाठीत सुरा खुपसायला मागेपुढे न पाहणारा त्यागी हा एक आदर्श खलनायक होता. याशिवाय 'परिणिता', 'सलाम नमस्ते', 'रेस' सीरिज, 'कॉकटेल', 'लव आज कल', ‘गो गोआ गॉन' (भारतातला पहिला झोंबीपट ), 'हॅपी एंडिंग' हे सैफच्या कारकिर्दीतले इतर उल्लेखनीय चित्रपट.
सैफचं पडद्याबाहेरचं आयुष्यपण नेहमी चर्चेत असतं. कधी वाईट कारणांमुळे, तर कधी विनाकारण. मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये सैफ आणि त्याच्या मित्रांनी एका एनआरआय वृद्ध माणसाशी मारामारी केली होती. त्याला मिळालेला 'पदमश्री' पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी त्या वेळेस जोरदारपणे झाली होती. 'स्वदेस'मधल्या शाहरूखच्या मोहन भार्गवला डावलून सैफला 'हम तुम'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा सैफच्या घराण्याचे तत्कालीन राजवटीशी असणारे जवळचे संबंध प्रकाशझोतात आले. सैफशी लग्न केल्यानंतर करिनानं तिचा धर्म बदलावा की नाही, या मुद्द्यावर अनेक अतिरेकी धार्मिक संघटनांनी चर्वितचर्वण केलं. या सगळ्यावर कडी म्हणजे, सैफ आणि करिनानं आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावर चर्चेचा एकच आगडोंब उसळला. असं एक निरीक्षण आहे की, हिंदू आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांचा सैफवर दात आहे. मागे काही मुस्लिम अतिरेकी संघटनांनी ‘सैफ फारच 'हिंदू' बनत चालला आहे’, म्हणून त्याची हत्या करण्यात यावी, असा फतवा काढला होता. सैफ पडद्यावर हिंदू पात्र करतो, टिळा लावतो, मूर्तिपूजा करतो याचा त्यांना प्रचंड राग होता. कडव्या हिंदुत्ववाद्यांना त्याच्या ‘खान’ या आडनावावरच आक्षेप आहे. सैफ हा खऱ्या आयुष्यात सुधारक मुस्लिम आहे आणि तो एक प्रकारे त्याच्या गुणदोषांसकट भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं प्रतिनिधित्व करतो, याचा त्रास दोन्ही बाजूच्या कडव्यांना होत असावा.
सैफची मुलगी आता पुढच्या वर्षी नायिका म्हणून पदार्पण करेल आणि सैफच्या नायक म्हणून असणाऱ्या कारकिर्दीला अजूनच मर्यादा पडतील. बदलत्या काळाची पावलं ओळखून सैफ नेटफ्लिक्सवर एका वेबसिरीजमध्ये काम करतो आहे. भारंभार चित्रपट करण्यापेक्षा नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमसारख्या प्लॅटफॉर्मवरच आपल्याला चांगलं भवितव्य असल्याचं सैफनं ओळखलं आहे. तसा तो नवदीप सिंगसोबत (एन एच १० आणि मनोरमा सिक्स फिट अंडर) एक सिनेमा करतो आहे, पण ‘आपले पर्याय मर्यादित आहेत’, हे सैफच्या लक्षात आलं असावं. बायल्या म्हणवल्या जाणाऱ्या सैफनं कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात दाढीमिशा असणारी पात्रं जवळपास साकारलीच नाहीत. मात्र २००१नंतर सैफनं अभिनेता म्हणून कात टाकताच त्याच्या चेहऱ्यावर दाढीमिशांचं साम्राज्य आलं. त्याच्या बहुतेक रोल्समध्ये त्याच्या दाढीमिशा त्याच्यासोबत होत्याच. ‘सैफ’ नावाच्या अभिनेत्यामधल्या ड्रास्टिक बदलांचं हे एका अर्थानं प्रतीक आहे. 'नो शेव्ह नोव्हेंबर'चा ट्रेंड चालू असताना सैफ अली खान नावाच्या माणसावर लिहिणं यथोचितच ठरावं.
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment