‘इत्तेफाक’ : नॉन लिनियरपणे मांडायच्या प्रयत्नात फसलेली पटकथा 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘इत्तेफाक’चं पोस्टर
  • Sat , 04 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie इत्तेफाक Ittefaq सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinha सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra

हिंदी चित्रपटांत कुठलीही मर्डर मिस्ट्री हाताळताना त्यातील मिस्ट्री दरवेळी का हरवत जाते, ते कळत नाही. जर आपण एखाद्या चित्रपटाला मिस्ट्री म्हणून सादर करत असू, तर साहजिकच त्याच्या शेवटी काहीतरी अफाट फ्लिप येणार असतो किंवा तो यावा अशी किमान अपेक्षा असते. असं असताना शेवटपर्यंत खिळवून ठेवता येण्याइतपत तगडी पटकथा असावी लागते. शिवाय, यात संवाद महत्त्वाचा भाग असतात. या दोन्ही मुद्द्यांकडे सरसकट दुर्लक्ष का केलं जातं, हे काही उमगत नाही. 

१९६९ च्या यश चोप्राच्या 'इत्तेफाक'चा बी. आर. चोप्रांच्या नातवानं, अभय चोप्रानं दिग्दर्शित केलेला हा रिमेक. मुळात हा चित्रपट आज का बनवावासा वाटला, हे कळणं अवघड आहे. कारण यातील कथेतील प्रत्येक भाग आपण याआधी इतर कुठेतरी पाहिलेला आहे. रटाळ आणि काही ठिकाणी तर स्वतःच यापूर्वी मांडलेल्या सीनपासून फारकत घेणारी पटकथा, ठिकठिकाणी घातलेले तथाकथित विनोदी संवाद, अभिनयात अक्षय खन्ना वगळता इतर सर्वांचं ठीकठाक काम, या सर्वांमुळे हा चित्रपट काही फार विशेष ठरत नाही. 

कथा म्हणाल तर एकीकडे विक्रम सेठीच्या (सिद्धार्थ मल्होत्रा) मागे पोलिस लागलेले असतात. पोलिस त्याचा पाठलाग करत असतानाच त्याच्या कारचा अॅक्सिडेंट होतो आणि तो त्यांच्यापासून वाचण्यासाठी मुंबईतील रस्त्यावरून पळत असतो. तर दुसरीकडे पोलिस त्याला शोधत असतानाच त्यांच्या गाडीसमोर अचानक माया सिन्हा (सोनाक्षी सिन्हा) येते. ती पोलिसांना आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन जाते. तिथं विक्रम सेठी उभा असतो आणि त्याच फ्लॅटमध्ये मायाचा पती शेखरचा मृतदेह असतो. साहजिकच सर्व परिस्थिती पाहून विक्रमला अटक होते. 

ही केस मग देवकडे (अक्षय खन्ना) येते. विक्रमवर त्याच्या पत्नीच्या आणि शेखरच्या डबल मर्डर केसचे चार्जेस असतात. पण मायावरही पोलिसांचा संशय असतो. दोघांचंही इन्टरॉगेशन होतं. आणि अर्थातच दोघेही मी निर्दोष आहे वगैरे सांगत असतात. पण दोघंही हे सांगताना दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्यामुळे गुन्हेगार नक्की कोण हे कळत नाही. खरी बाजू कुणाची याचा शोध म्हणजे यातील मिस्ट्री. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

कथा नॉन लिनियर पद्धतीनं मांडली आहे. पण यात अगदी टाइमलाइनपासून ते समोर फ्लिप करून मांडलेल्या कथेपर्यंत अनेक घोळ आहेत. उदाहरणार्थ, जर पोलिसांना सत्याची बाजू शोधायची आहे, आणि दोन्ही संशयित वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत तर एकानं सांगितलेली गोष्ट पोलिसांनी दुसऱ्याला सांगायची गरज काय? उलट यामुळेच ते त्यांच्या कथेत आणखी बदल करत आहेत, हे लक्षात न येण्याइतके पोलिस मूर्ख असावेत? या गोष्टी अगदी फार मोठ्या नसल्या तरी कथेत जर रहस्य आहे, तर लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं. 

काही लोक संवादांना चित्रपटातील घटक समजत नाहीत. किंवा फारसं महत्त्वाचं समजत नाहीत. बहुतेक या चित्रपटाचे संवादलेखकदेखील त्याच गटातील असावेत. कारण नको त्या ठिकाणी, नको ते संवाद का घातले आहेत, असं प्रत्येक दुसऱ्या दृश्यात वाटत राहतं. अगदी महत्त्वाच्या पात्रांच्या तोंडीही द्विअर्थी संवाद घातल्यानं आधीच फारशी प्रभावी पात्रं अजूनच वाईट दिसू लागतात.  

बरं चित्रपटात अगदीच विनोद नसावा असं नाही. कारण असे विनोद टॅरंटिनो ते विशाल भारद्वाज या सर्वांच्या चित्रपटात आढळतात. पण इथं मात्र विनोद करताना केवळ 'सेक्स' हा एकच विषय दिसतो. अगदी इन्टरॉगेशन सीनपासून ते क्राइम सीनवरील संवाद, सर्वत्र त्याची भरमार आहे. त्याचा वीट येतो. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

या सर्वांमुळे आणि ताणलेल्या आणि अनावश्यक दृश्यांमुळे चित्रपट कमालीचा संथ झालाय. संकलनात यातील किमान वीसेक मिनिटांची कात्री लावता आली असती. शिवाय, ही जास्तीची दृश्यं 'तलवार'सारख्या प्रसिद्ध चित्रपटातील रिप ऑफ असल्याचं स्पष्ट दिसत असल्यानं त्यांचा प्रभाव आणखी कमी होतो. 

अभिनयाबाबत अक्षय खन्ना वगळता इतर सर्व मुख्य भूमिकेतील कलाकारही फक्त ठीकठाकच म्हणावे लागतील. सिद्धार्थ मल्होत्रा कधीच टाइपकास्ट झालाय, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. अक्षय खन्नाचा स्क्रीन प्रेझन्स यात दाखवलेल्या इन्टरॉगेशन रूममधील ट्यूबलाइटसारखा आहे. दर थोड्या वेळानं त्याचा प्रभाव कधी कमी तर कधी जास्त होत राहतो. 

मध्यंतरापूर्वीच सिनेमा कमालीचा संथ होतो. क्लायमॅक्स येतच नाही. नाही म्हणायला शेवटच्या पाचेक मिनिटांमध्ये चित्रपट पार्श्वसंगीताच्या जोरावर आणि रहस्याच्या खुलाशादरम्यान जरासा पकड घेतो. पण तेही काही उपयोगाचं ठरत नाही. कारण एकतर अर्धेअधिक प्रेक्षक कधी संपतोय, याची वाट पाहत असतात. 

ट्रेलरमधून फार काहीतरी वेगळं दाखवणार आहोत अशी उत्सुकता निर्माण करत, प्रत्यक्षात मात्र त्यातील अर्धाही मिस्ट्री फॅक्टर दिसून येत नाही. जर फारशा अपेक्षा ठेवून जाल तर अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता जास्त आहे. पात्र, कथा, अभिनय या सर्वच बाबतीत निराशा होते. अक्षय खन्नाचा अधूनमधून आवडणारा परफॉर्मन्स आणि शेवटची पाच मिनिटं वगळता फार काही हाती लागेल अशी अपेक्षा नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख