प्रसिद्ध तमीळ कादंबरीकार पेरुमल मुरुगन यांच्या ‘माधोरुबागन’ या कादंबरीनं भारतीय साहित्यात खळबळ माजवली. ही मूळ तमिळ कादंबरी त्यांना परत घेऊन माफीही मागावी लागली. गेल्या वर्षी या कादंबरीच्या ‘वन पार्ट वुमन’ इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावरून तरुण कवी-कथाकार प्रणव सखदेव यानं या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. नाशिकच्या शब्दमल्हार प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या कादंबरीतील एक प्रकरण…
.............................................................................................................................................
कालि आणि पोण्णा यांनी सगळ्या देवांच्या पूजाअर्चा-प्रार्थना केल्या. नवस-सायास केले, साकडं घातलं. लहान असो किंवा मोठं, त्यांनी कोणत्याही देवळात भेदभाव केला नाही. जंगलामध्ये वसलेल्या देवतांसाठी बोकडाचा बळी दिला, तर देवळातल्या देवांसाठी पोंगलचा नैवेद्य दाखवला. काही देवांसाठी तर याहीपेक्षा दुप्पट गोष्टींचे नवस बोलावे लागले. जर समजा त्यांना मूल झालं असतं, तर त्यानंतर त्यांचं सगळं आयुष्य नवस पूर्ण करण्यातच गेलं असतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांच्या प्रार्थनांना फळ मिळाल्यास, त्यासाठी कालि त्याच्या गायीगुरांचा आणि काटकसर-कष्ट करून, पै-पै जमवलेल्या पैशाअडक्याचा असा सगळ्याचा त्याग करायला तयार होता. पण कोणताही देव त्यांच्यावर प्रसन्न व्हायला तयार नव्हता, कोणीही त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवत नव्हता.
एकट्या खरटूरमध्येच त्यांनी कितीतरी देवांना साकडं घालून नवस केले होते. जंगलात त्या मातीच्या देवतेचं पवित्र स्थळ जिथं होतं, तिथून आणखी वर चढत गेल्यास, डोंगरमाथ्यावर दंडीश्वराचं देऊळ होतं. ते त्याला डोंगरावरचा पिल्यार म्हणजे गणेश असं म्हणायचे. तो म्हणे त्याच्यापासून जवळच असलेल्या एका ओसाड कातळसुळक्याची - मलडिक्कलची राखण करतो असं म्हटलं जायचं. तिथं जाणं हे कोण्या ऐऱ्यागैऱ्याचं काम नव्हतं. त्यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक शक्ती असणं आवश्यक होतं.
कुमारवयात, कालि आणि मुथू तिथं आपल्या सवंगड्यांसोबत न चुकता प्रत्येक अमावस्येनंतरच्या पहिल्या दिवशी जात असत. लोक तिथं आपल्या बैलगाड्या घेऊन येत. वृद्ध आणि आजारी माणसं पहिल्या पायरीला आपलं डोकं टेकवून प्रार्थना करत आणि मग आपापल्या बैलगाड्यांमध्ये बसून राहत.
चढावर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायला मंडप बांधलेले होतं. मुथू, कालि आणि त्यांचे सवंगडी तिथं उभं राहून, थांबून विश्रांती घेणाऱ्यांवर हसायचे. त्यांच्यात भराभर पायऱ्या चढून जाण्याची स्पर्धाही लागायची. ते जणू काही सपाट मैदानावरूनच धावत असल्यागत तिथून धावत जायचे. पांबार प्रमपाशी खोलगट भाग यायचा आणि त्यानंतर मात्र खरोखरच तीव्र चढण लागायची. त्यामुळे तिथून परत येताना उतरताना फार काळजी घ्यावी लागायची. नाहीतर, डोंगरावरून गडगडत खाली जाण्याचा धोका असायचा आणि जिवावर बेतू शकायचं. या मुलांचा गोतावळा भल्या पहाटेच घरातून निघायचा आणि धावत-पळत सहा-सात मैलांचं अंतर पार करत डोंगरापाशी पोचायचा. अशा प्रकारे अंतर पार करणं हा त्यांच्यासाठी एक खेळच होता. त्यातून त्यांना फार मजा येत असे.
चढणीवरच्या मंडपांमध्ये लोक ज्वारी-बाजरीची पेज विकायचे. त्यात घट्ट दही घातलेलं असायचं आणि त्याला ज्वारी-बाजरीचा छानसा गंध यायचा. त्या पोरांना भूक भागवायला दोन भांडी पेज भरपूर व्हायची. शिवाय, ते तेव्हा अशा वयाचे होते की, त्या वेळी त्यांना पोटातल्या भुकेची फारशी चिंता नसायची. खरं तर, देवाच्या दर्शनाला जाणं हे या प्रवासासाठीचं फक्त एक निमित्त असायचं. देवळातल्या गाभाऱ्यात जाऊन उभं राहिलं, पेटत्या कापराभोवती हात फिरवून आरती घेतली, नमस्कार केला आणि कपाळावर अंगारा लागला की झालं - ते कारण पूर्ण व्हायचं!
जंगलातल्या त्या देवतेच्या पवित्र स्थळापाशी तेव्हा कधीही कोणी गेलं नव्हतं. कारण त्या वेळी प्रत्येकालाच त्या जंगलाची भीती वाटायची. ज्या वेळी देवळात जायला खूप गर्दी लोटायची त्यावेळी कोणी चुकूनमाकून जंगलात वाट भरकटलेलं नाहीये ना याची तपासणी करण्यासाठी ते गटागटाने उभे राहायचे. जंगलाच्या बाजूनं पलीकडे गेल्यानंतर, ते एका खडकाळ जागी यायचे. तिथं खडकांच्या फटींमधून लहान-लहान झाडं उगवून आलेली होती. त्या खडकांमधल्या फटी इतक्या बारीक बारीक होत्या की, त्यातून कोणीही चालू शकायचं नाही. म्हणून मग ते एका खडकावरून दुसऱ्यावर उड्या मारत वर चढायचे. असं करताना त्यांचा एवढा गोंगाट चालायचा की, त्यानं तिथली माकडंही दूर पळून जायची.
त्यानंतर सपाटी लागायची. त्यावरून पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला एक मोठ्ठा विळ्याच्या आकाराचा कातळसुळका उभा होता. जणू काही तो आपलं टोक आकाशातच खुपसायला निघालाय असं वाटायचं. ते या सुळक्याच्या कपारींमध्ये पाय रोवून त्यावरही चढायचे. त्या सुळक्याच्या खाली एक गुहा होती. तिथं थंडगार वाटायचं. तिथं ते आडवे व्हायचे. आणि कोणी बडबड करणारं नसेल, तर तिथंच झोपी जायचे. त्या गुहेच्या तोंडापाशी जाऊन खाली वाकून पाहिल्यास, त्यांना खाली गावाचा विस्तारलेला परिसर दिसायचा. तसंच त्यांना डोंगरपायथ्याशी असलेली इतर देवळं आणि उभ्या करून ठेवलेल्या रथांची छपरं दिसायची. ते गाव म्हणजे पाच-सहा रस्त्यांच्या अवतीभवती वसलेली देवळातल्या पुजाऱ्यांची आणि इतर लोकांची घरं होती. देवळांची टाकी मोठी आणि पसरट भासायची. ती दोन्ही टाकी वाळू भरलेल्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यासारखी दिसायची. पायथ्याशी असलेल्या देवळाच्या बरोब्बर समोर देवदासींची गल्ली होती. त्या गल्लीत कोणालाही मुक्तप्रवेश होता.
गुहेच्या बाहेरचा बराचसा भाग थंडगार सावलीचा होता. तिथं ते अखंड बोलत बसायचे. आता खूप प्रयत्न केला तरी कालिला ते काय बोलायचं ते काहीही आठवत नाही. कदाचित अशी अखंड बडबड करणं हा तारुण्याचाच गुण असावा. तो मोठा झाल्यावर, त्याच्या मेंदूनं त्या सगळ्या गप्पागोष्टी वायफळ होत्या, असं ठरवून त्याच्या स्मरणकोषातून खोडून टाकल्या असाव्यात. पण त्या वेळच्या आठवणी त्याला जो प्रचंड आनंद देत, तो आनंद मात्र त्याच्या मेंदूला पुसता आला नव्हता. तेव्हा ते किती मुक्त, मोकळेढाकळे होते! एखाद्या विस्तीर्ण पसरलेल्या मोकळ्या जागेसारखे...
ऊन थोडं कमी झाल्यावर, ते तिथून निघायचे आणि पुढच्या सुळक्यापाशी जायचे. त्या डोंगरावर कितीतरी सुळके होते! गुहेच्या मुखासमोर असलेल्या खडकावरून त्यांना खाली उतरावं लागायचं. त्यातली एक मोठी फट मगरीच्या उघड्या तोंडासारखी वाटायची. त्यात एक झरा होता. पावसाळ्यात ते झऱ्यात मनसोक्त भिजायचे. उड्या मारायचे. लंगडत, थरथरत कापत कशाबशा चढून तिथपर्यंत आलेल्या वृद्ध लोकांसाठी तो झरा पवित्र होता. त्यामुळे ते या मुलांवर ओरडायचे, “अरे! त्या पाण्यात जाऊ नका.” या सुळक्याच्या आणखी वर एक ओसाड सुळका चढून जावं लागायचं. त्याच्या पृष्ठभागावर एकही झाड झुडूप किंवा वेल उगवलेली नव्हती. तिथं त्यांना वाऱ्याचा प्रचंड वेग समजून यायचा. वाऱ्याची ताकद प्रचंड असते. त्यानं जर मनात आणलं, तर तो क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतो. म्हणून मग, आम्हाला पुढे जाऊ दे अशी वाऱ्याला नम्र विनंती करूनच त्यांना चढून जावं लागायचं. त्यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागायचं, प्रत्येक कपारीत घोरपडीसारखी पकड घ्यावी लागायची. वर चढताना प्रत्येक पावलावर काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करावं लागायचं. काही ठिकाणी तर खडकांवरून पालीसारखं सरपटत जावं लागायचं. पण त्या वेळच्या त्यांच्या सळसळत्या तारुण्याला कोणतीच गोष्ट आडकाठी घालू शकली नसती!
त्या ठिकाणाहून, डोंगरमाथ्यावर असलेलं दंडीश्वराचं मंदिर खुणावू लागायचं. तिथून ते अगदी लहानसं दिसायचं. त्याच्या शेजारीच एका माणसाच्या उंचीएवढा एक कातळसुळका उभा होता. हाच तो मलाडिक्कल - तो ओसाड खडक. त्या सुळक्याच्या दुसऱ्या बाजूला, कोणीतरी डोंगरात कोरून काढल्यासरखा एक अर्धवर्तुळाकार मार्ग होता. त्या अर्धवर्तुळाकार मार्गावरून पलीकडे हे एक मोठं आव्हानच असे. तुम्ही जरादेखील एका बाजूला झुकलात, तरी भीतीनं घाबरगुंडी उडायची, तळपायाला घाम यायचा आणि तुम्ही खोल दरीत पडण्याची शक्यता असायची. तिथं आपलं धाडस दाखवून तो मार्ग पार करणं हा त्यांच्यासाठी एक खेळच होता. आपली इच्छा पूर्ण होईल या आशेनं आलेल्यांपैकी किंवा बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी आलेल्यांपैकी अनेक जण मलाडिक्कल पार करताना दरीत पडून मेल्याची उदाहरणं होती. मृत्यूचं हे वाढतं प्रमाण पाहून कोण्या ब्रिटिश माणसानं त्या मार्गाभोवती एक भिंत बांधली होती. पण इतक्या वर्षांपासूनची लोकांची श्रद्धा आणि विश्वास त्यामुळे थोडाच बदलणार होता?
खरं तर, त्या भिंतीमुळे तो सुळका पार करणं जास्त सोपं झालं होतं. त्या भिंतीच्या कडांना पकडून झटकन दुसऱ्या बाजूला जाता यायचं. मग, सुळक्याच्या खडबडीत पृष्ठभागावर रेलून, तो खडक पार करता यायचा. त्यानंतर खडकाच्या कडेकडेनं पुढे जाणं शक्य व्हायचं. ज्यांना याची सवय असे, ते क्षणार्धात तो खडक पार करत. कालि आणि मुथूनं कितीतरी वेळा तसं केलं होतं.
हे सगळं पार करून देवाचं दर्शन घेतलं, प्रार्थना केली, तर तो प्रसन्न होतो आणि मनातली इच्छा पूर्ण करतो असा समज होता. पण या प्रार्थनांचा फायदा पुरुषांना होत नसे, तर फक्त बायकांनाच होत असे.
एकदा त्यांच्या भुईमुगाच्या शेतातलं तण काढून टाकायला आलेल्या एका ठेंगण्या म्हाताऱ्या बाईनं पोण्णाला तसं सांगितलं होतं. तिच्या मते, कोणतीही बाई जर तो खडक पार करून गेली, तर तिला मुलाचा कृपाशीर्वाद लाभतोच. असं सांगितल्यावर तर पोण्णाला ते पूर्णतया पटलं. मग पोण्णानं त्या देवळात जाण्याचा निश्चय केला. देवाला नैवेद्य म्हणून ती पोंगल करू लागली. तिनं याबाबत कालिचं काहीही ऐकलं नाही. ते कुठे जाणार आहेत याबद्दलही तिला कोणलाही, काहीही कळू द्यायचं नव्हतं. कोणालाही सोबत घ्यायचं नव्हतं. कदाचित लोकांनी त्यांना तिथं जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता. अशा बाबतीत प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतंच. तो सुळका पार करत असताना, जर समजा कोणी काळजी घे असं म्हणून तिला सावध जरी केलं असतं, तरी त्यानं तिचं लक्ष विचलित होऊ शकलं असतं. आणि समजा, पोण्णाला त्या सुळक्यापाशी गेल्यावर भीती वाटली असती, तर कदाचित ती पुढे न जाता परतही आली असती. त्यामुळे जर समजा त्यांच्यासोबत कोणी आलं असतं, तर त्यामुळे त्यांना मानहानीकारक चर्चा करायला आणखी एक विषयच मिळाला असता. ती म्हणाली खरी मोठ्या तोऱ्यात की, ‘मी पार करेन तो.’ पण तिथं गेली आणि गर्भगळीत झाली. आली मग मान खाली घालून तशीच. नंतर मग कितीतरी दिवस, नव्हे वर्षं ते तिच्याविषयी कुचेष्टेनं बोलत राहिले असते. लोकांना सतत कुचाळक्या करायला काहीतरी हवं असतंच.
भक्तांची गर्दी नसलेल्या दिवशी ते डोंगर चढायला लागले. पोण्णा मलाडिक्कलच्या ठिकाणापाशी यापूर्वी कधीही गेली नव्हती. दंडीश्वरच्या देवळाकडे निर्देश केल्यावर, तो खडक आपला हात वर करून जणू काही आपलं अस्तित्व दाखवून देतो आहे, असं तिला वाटलं. तिला शेतात फिरायची सवय होती. पायऱ्याही नसलेल्या तो ओसाड खडक पार करताना एकच गोष्ट अडचणीची होती. ती म्हणजे तिची साडी. पण आता आजूबाजूला फार कोणी नसल्यानं तिनं साडी गुडघ्यापर्यंत वर घेऊन कंबरेशी खोचली आणि मग ती सहजतेनं चढू लागली. त्या गुहेपाशी पोचल्यावर कालिनं तिला तो खडक दाखवला. कोणीतरी प्रचंड मोठ्ठा सपाट कातळ उभा करून त्याच्या डोक्यावर केसांचा बुचडा बांधल्यासारखा तिला तो ओसाड सुळका भासला. कालिनं पोण्णाला घट्ट मिठी मारली. ती आरामात बसून त्या खडकाकडे पाहत होती. त्यानं तिच्या साडीचा पदर बाजूला सारला आणि तिच्या अधरांवर बकरीच्या पिलाप्रमाणे आपलं डोकं घुसळलं. तिला घट्ट धरून तिच्या छातीवर डोकं घुसळताना, तिनं खाली झुकून त्याला विचारलं, “मामा, तो पार करताना मी पडेन असं वाटतंय का तुम्हाला? म्हणून तुम्ही आपली ही शेवटची भेट असावी असं वागताहात का?”
त्या वाक्यानं कालि धक्का बसून मिठी सोडवून तिच्याकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तो उंच डोंगर, झाडांची सावली, सपाट मैदान आणि आजूबाजूचा निसर्ग यांमुळे त्याच्या मनात कामना जागृत झाल्या होत्या. गुडघ्यापर्यंत वर गेलेली तिची साडी, वाऱ्यामुळे अस्ताव्यस्त झालेला पदर या सगळ्यामुळे त्याच्या उत्कट इच्छेत भरच पडली होती. मंगळसूत्राचा काळा धागा तिच्या मानेवर रुळत होता आणि त्यात लटकावलेलं तालि म्हणजे मंगळसूत्र मोहकपणे चकाकत होतं. चार भिंतींच्या बंदिस्तपणात त्याची विषयवासना कधीच पूर्ण होत नसे. त्याला त्यात समाधान मिळत नसे. त्याला मोकळ्या जागा आवडत. त्याला डोक्यावर खुलं आकाश दिसलेलं आवडे. आजूबाजूला पक्षी असतील तर फारच छान! म्हणूनच तो तिला तेवढ्यासाठीच शेतात घेऊन जायचा.
त्यांच्या दोन एकर शेताला कुंपण घातलेलं असलं, तरी छप्पर नव्हतं. मध्यभागी एकदा का खाट टाकली की, तो भरात यायचा. ती कधीकधी तक्रार करायची किंवा काहीतरी खुसपटं काढायची, “ती बकरी पाहतेय... बघा आता गायही बघतीय...” तिलाही खरं तर तिथं आवडायचं; पण ती मुद्दामच लटका नकार द्यायची; कारण आपण निर्लज्ज स्त्री आहोत, असा त्याचा समज होऊ नये असं तिला वाटायचं.
तो त्यावर म्हणायचा, “त्या बकऱ्या-गायी करतात, तेव्हा आपण नाही का पाहत? आता त्यांना आपल्याला पाहू दे.”
“तुम्ही अगदीच निर्लज्ज आहात, बाबा!” ती म्हणायची.
जेव्हा जेव्हा त्याला चांगली अरॅक मिळायची, तेव्हा तो न चुकता तिला शेतावर घेऊन जायचाच. तिला ताडी आवडायची नाही. ताडीची आंबट ढेकर कितीतरी दिवस येत राहते, अशी तिची तक्रार असायची. हां, पण तिला अर्धा पेला अरॅक मात्र चालायची. त्याचा तिच्या जिभेवर बसणारा तीक्ष्ण डंख तिला फार आवडायचा.
आता, डोंगरावरही अशीच कामना कालिच्या मनात जागी झाली होती. पण तिच्या एका वाक्यानं त्याची आग पार विझवून टाकली. तिनं त्वरित त्याला समजवायचा प्रयत्न केला. “आपण इथं पूजेला आलोय की नाही? म्हणून मी चुकून असं बोलून गेले...”
“ते जे काय असेल ते असेल, पण असं वेड्यासारखं पुन्हा कधीही बोलू नकोस.” तो म्हणाला.
त्यांच्यात समेट झाला आणि मग ते सुळक्यापाशी जाण्यासाठी चढू लागले. सुळक्याच्या बाजूचा जेमतेम फूटभर रुंदीचा तो मार्ग पाहताक्षणीच तिला भीती वाटली.
“तुला भीती वाटत असेल, तर तू तो ओलांडायलाच हवास असं काही नाही बरं.” तो म्हणाला.
ती म्हातारी पोण्णाला म्हणाली होती, “अजिबात दरीत वाकून पाहू नकोस. जोवर तू त्या सुळक्याकडेच पाहत राहशील, तोवर काही होणार नाही. तू सहज पार जाशील. शेताच्या बांधावरून चालत जाण्यासारखंच आहे हे. फरक एवढाच, बांधावरनं तुझा पाय सटकला, तर तू चिखलात पडशील. आणि इथं आहेत ते सगळे खडक. खाली पडून त्यांच्यावर डोकं आपटलं तर नारळासारखी त्याची शकलं होऊ शकतात. पण पोण्णा, माझं ऐक, तुझ्यासारख्या जंगलात आणि शेतात फिरण्याची सवय असणाऱ्यांसाठी ते काही फार अवघड नाही.”
दंडीश्वराला नैवेद्य दाखवायला म्हणून तिनं पोंगल तयार करण्यासाठीचं सगळं सामान सोबत आणलं होतं. फक्त सुळका पार करणारेच पोंगल तयार करून देवाला नैवेद्य दाखवू शकतात, असा नियम होता. इतरांनी फक्त कापूर जाळून प्रार्थना करायची अशी प्रथा होती. एकदा का पोण्णानं तो सुळका पार केला की, ती पोंगल तयार करेल या उद्देशानं त्यांनी सगळी सामग्री आणली होती. पण आता कालिला चिंता वाटत होती, तिला हे जमेल की नाही? त्याचं मन साशंक झालं होतं. जरा जरी इकडेतिकडे झालं, तरी तो शेवट ठरला असता. असं काही झालं असतं तर? तर आपल्या बायकोला कड्यावरून ढकलून मारून टाकल्याबद्दल त्याला दोषी धरण्यात आलं असतं. कारण ही जागा खून आणि आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होती. पण मुलासाठी नवस करायला आलेली कोणतीही व्यक्ती आजपर्यंत खाली पडून मेलेली नव्हती. तरी पोण्णाच्याच बाबतीत असं काही झालं तर? त्याचं हृदय धडधडू लागलं. ती पडली, तर तोही तिच्या मागोमाग जीव देईल. तिच्याशिवाय त्याला कदाचित जगता येईलही, पण लोकांचे दोषारोप माथ्यावर घेऊन जगणं मात्र अशक्य होतं.
“मी आता सुळका पार करायला लागते. जर मला काही झालं, तर फार त्रास नका करून घेऊ. नीट रहा. दुसरं लग्न करा. तिला तरी मुलाचा कृपाशीर्वाद लाभू देत.” अश्रूभरल्या डोळ्यांनी पोण्णानं सांगितलं.
“चल, काहीतरीच काय!” त्याने तिचे खिन्न शब्द उडवून लावले. तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसत तो तिला समजावू लागला, “आपल्याला कशाचीही कमरता नाहीये. आपण आनंदी राहू शकतो. आपल्याला मूल नसल्यानं काही फरक नाही पडत. गावातले हे मूर्ख लोक किती काळ आपल्याला त्रास देत राहतील? कदाचित अजून दहा-बारा वर्षं. तोवर आपण वयस्कर होऊ. हे बघ, आपल्याला मूल नसलं तरी काय फरक पडतो? आपण मजेत राहू. आपली जमीन आपण कोणत्या तरी देवळाला दान करून टाकू किंवा कोण्या गरजूला देऊन टाकू. त्याला तरी जगायला आधार मिळेल.”
त्यानं तिला जवळ घेतलं. त्याच्या मनात आज अचानक स्पष्टता आली असल्याचं त्याला जाणवलं. पण ती मात्र तो सुळका पार करून जाण्यावर ठाम होती. तिला तसा आत्मविश्वासही वाटत होता. तोवर तिनं केवढेतरी नवस-सायास-प्रार्थना केल्या होत्या. आताही तिनं हे आव्हान स्वीकारलं होतं. जर तिनं ही सर्वाधिक कठीण परीक्षा पास केली, तर कदाचित देवाला तिची दया येऊ शकते आणि तो आपला कृपालाभ तिच्या ओटीत टाकू शकतो, असा यामागचा तर्क होता. तिने पुढे जाण्याचा निश्चय केल्यानं कालिनं तिला कसं जायचं हे सांगितलं. तो सुळका कसा पार करायचा, हे प्रात्यक्षिक दाखवण्याबद्दल जर कालि काही बोलला असता तर कदाचित पोण्णानं भयंकर भीती वाटून आरडाओरडा केला असता. म्हणून त्यानं तिला काहीच पूर्वसूचना न देता थेट प्रात्यक्षिकच करून दाखवलं. तो भिंतीच्या कडेपाशी गेला आणि तिला म्हणाला, “हे पहा,” आणि क्षणात दोन ढांगांत सुळका पार करून दुसरीकडच्या भिंतीवरती चढून गेला. जेव्हा ती घाबरून किंचाळली, “अहो!” तोवर तो परत येऊन तिच्यासमोर उभा ठाकला होता आणि हसत होता.
.............................................................................................................................................
नवनवीन मराठी पुस्तकांसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
.............................................................................................................................................
तो सगळा एक भासच होता की काय, असं तिला वाटलं. एवढ्या साध्या गोष्टीची आपल्याला एवढी का भीती वाटतेय, अशा प्रश्न तिला पडला. कालिला नक्कीच तो सुळका पार करून जाण्याची सवय होती. तिचा भाऊ, मुथूही अनेकदा तिथून गेला होता. पण घरी याची कोणालाही कल्पना नव्हती. ही तरुण मुलं आपली गुपितं राखण्यात माहीर होती. दुसऱ्यांदा, माझ्याकडे नीट पहा, असं म्हणून त्यानं तिच्या परवानगीनं परत एकदा तसंच करून दाखवलं. तिथं कठड्यावर हात धरून ठेवायला किती जागा आहे हे तिनं नीट पाहिलं. तसंच खाली पाय ठेवायला किती जागा आहे, याचीही तिनं मनात नोंद केली. त्यावरून तिला घोरपडीची आठवण झाली. ज्या प्रकारे तो हात पसरवून सुळक्याला कवेत घेऊन पकडत होता, पाय टाकत होता ते पाहून तिला तो घोरपडच आहे असं वाटलं.
तू एकदा प्रदक्षिणा घालू शकतेस किंवा तीन वेळा जाऊन शकतेस, त्यानं तिला सांगितलं. मग पुढे होऊन त्यानं स्वतः तीन वेळा त्या सुळक्याला फेऱ्या मारल्या. ते पाहून पोण्णाची सगळी भीती पळून गेली. असंही तिला ती म्हातारी म्हणालीच होती की, रानावनात फिरणाऱ्यासाठी ते सहज शक्य आहे. मग कालिनं तिला तिची साडी वर घेऊन घट्ट बांधण्यासाठी मदत केली.
आकाशात डोक्यावर दोन गिधाडं घिरट्या घालत होती. ती एकलयीत, स्थिर तरंगत होती. त्यांच्या पसरलेल्या पंखांची जराही हालचाल किंवा फडफड होत नव्हती. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. तिनं आपले हात जोडून वर पाहत नमस्कार केला आणि प्रार्थना केली, “परमपित्या, परमेश्वरा, मला अशी वांझोटीच मरू देऊ नकोस रे. माझी सगळी इज्जत आता तुझ्या हातात.” आणि मग तिनं त्याच्याप्रमाणेच तो मार्ग पार केला आणि घोरपडीप्रमाणे कड्याचा आधार घेत पलीकडे गेली. जेव्हा ती अखेरच्या टप्प्यात पोचली, तेव्हा कालिनं आपला हात पुढे करून भिंत पार करायला तिला मदत केली. मग त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं आणि भावनारितेकानं तिच्या गालांवर, ओठांवर आणि मग कपाळावर आपले ओठ टेकवले. जेव्हा ते देवळात दंडीश्वराच्या समोर बसले, तेव्हा तिचा बांध फुटला.
“नव्या जिवासाठी, आम्ही आमचा जीव पणाला लावला देवा, आता आम्हाला फसवू नकोस,” ती रडत रडत मोठ्यानं म्हणाली. त्याच्या छातीवर डोकं टेकवल्यावर, तिला गरगरल्यासारखं वाटू लागलं. डोळे मिटून ती पडून राहिली. तिला जमिनीवर झोपवून कालिनं तिच्या तोंडावर थोडं पाणी मारलं. मग तिला जरा तरतरी आली. “मामा, मी अजून दोन फेऱ्या मारू का?” तिनं विचारलं. त्यावर त्यानं ठामपणे नकार दिला. तुम्ही एकदा फेरी मारली काय किंवा हजारदा मारल्या काय, त्याचा परिणाम सारखाच असतो.
.............................................................................................................................................
दिवाळी अंक पाहण्यासाठी क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016
.............................................................................................................................................
दांडीश्वराच्या देवळासमोर तिनं पोंगल तयार करायला सुरुवात केली. त्या देवळात वेगवेगळे पुजारी होते. पण ते फक्त गर्दीच्या दिवसांतच तिथं असायचे, जसं की अमावस्येनंतरचा दिवस. इतर दिवशी त्यांना कोणी मुद्दाम बोलावून आणलं तरच ते यायचे. कालि वेगानं डोंगर उतरून खाली गेला आणि तिचं पोंगल तयार होईस्तोवर पुन्हा परतलादेखील. त्याचा हा वेग पाहून तिला आश्चर्य आणि कौतुक वाटलं. जेव्हा मन उत्साहित होतं, तेव्हा शरीर जणू भरारीच घेतं. तोवर पुजारी आला आणि त्यानं पूजा केली. मग ते दोघं खाली उतरू लागले. अंधार पडायला लागला होता आणि त्याच्या साम्राज्यात आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी गुडूप होऊन जायला लागल्या होत्या.
त्या दिवशीची रात्र ते कधीही विसरू शकले नाहीत. त्या रात्री सगळ्या गोष्टी अगदी अत्यानंदानं जुळून आल्या. त्या रात्री ते शांत झोपले. यावेळी आपण जे पेरलं आहे, त्याला नक्की अंकुर फुटेल असा त्यांना विश्वास वाटत होता. त्या दिवशी डोंगरावर तिनं आपल्या शाब्दिक बाणांनी त्याला घायाळ केलं होतं, त्याचं प्रायश्चित्त म्हणूनही ती या गोष्टीकडे पाहत होती. कालिला तिच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता पूर्णपणे व्यक्त करताच आली नसती, असा एक विश्वास त्याचं शरीर आणि मन अभिव्यक्त करत होतं. कारण, सगळ्या बायका जे कृत्य करायला चळचळा कापतात, ते तिनं आपला जीव धोक्यात टाकून पार पाडलं होतं. त्या दोघांनी एकमेकांबद्दलच्या भावनांची देवाणघेवाण केल्यावर रात्र तृप्ततेत, समाधानात सरली. शेताच्या मधोमध ठेवलेल्या खाटेवर, ती त्याच्या छातीवर विसावलेला फुलांचा हार असल्यागत झोपली होती. त्यांना खूप समाधानी वाटत होतं. त्या क्षणी त्यांना आणखी काहीही नको होतं, ते संपृक्त झाले होते आणि अशाच एखाद्या आनंदी, तृप्त क्षणी मरण यावं असं त्यांना वाटलं.
या महिन्यात आपली मासिक पाळी चुकणार याची तिला खात्री होती. म्हणजे मग एकदाचा सगळ्या चर्चा-कुचाळक्यांना पूर्णविराम मिळाला असता.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4265
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment