गांधी आणि आंबेडकर (उत्तरार्ध)
सदर - गांधी @ १५०
वसंत पळशीकर
  • गांधी आणि आंबेडकर
  • Thu , 02 November 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi आंबेडकर Ambedkar

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा अठरावा लेख आहे.

.............................................................................................................................................

गांधी आणि आंबेडकर (पूर्वार्ध)

.............................................................................................................................................

५.

१९३२ साली ब्रिटिश पंतप्रधान यांनी अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ देणारा निवाडा जाहीर केला. गांधी येरवडा तुरुंगात बंदी होते. गोलमेज परिषदेतच (दुसरी फेरी) त्यांनी त्यांच्या भाषणाच्या अखेरीस असे म्हटले होते की, हिंदू समाज व अस्पृश्य दोघांचेही अकल्याण करणारी विभक्त मतदारसंघ ही गोष्ट जर अमलात आणण्याचा प्रयत्न केला तर मी ती गोष्ट कदापिही सहन करू शकणार नाही, मी प्राणांची बाजी लावून तिचा विरोध करीन; असा विरोध करणारा मी एकटाच असलो तरी. (“…if I was the only person to resist the thing, I would resist it with my life.” संदर्भ – कित्ता, पृ. २९८.)

गांधींनी स्वत:च्या शब्दास जागून जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले. अस्पृश्यांचे पुढारी व हिंदू समाजाचे पुढारी यांच्यात समझोता झाला तर आपण तो स्वीकारू अशी ब्रिटिश सरकाराने भूमिका घेतली. आरंभी बाबासाहेब वाटाघाटी करण्यास अजिबात तयार नव्हते. आपण फार मोठा लाभ पदरात पाडून घेतला आहे अशी त्यांची पक्की धारणा असल्याने ते लाभ गमविण्यास तयार नसले तरी ती गोष्ट स्वाभाविक होती. पण अस्पृश्यांच्या इतर अनेक पुढाऱ्यांना समझोत्याने प्रश्न सोडवावा हे अधिक इष्ट वाटत होते. विभक्त मतदारसंघ व विधिमंडळात राखीव जागा या दोन गोष्टींपैकी राखीव जागा तडजोडीत मान्य होणार होत्या. तेव्हा विभक्त मतदारसंघ हा मुद्दा एवढा अटीतटीने लढविण्याचा आहे असे त्यांना वाटत नव्हते. पण एकट्या आंबेडकरांचा विरोध समझोता न होण्यासाठी पुरेसा होता. त्यांचा होकार नसेल तो समझोता मानावयास गांधी तयार नव्हते. अन्य अस्पृश्य नेत्यांपेक्षा बाबासाहेब वेगळ्या कोटीतले आहेत याची गांधींनी ही अशी दखल घेतली होती. आपण वाटाघाटी न करण्याचा आपला आग्रह कायम ठेवू शकतो, पण त्यामुळे गांधींच्या मरणानंतर जी काही स्थिती उदभवेल त्याची पूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर असेल हे बाबासाहेबांच्या ध्यानात आले. वाटाघाटीस तयार होण्यात त्यांचे राजकारणी मुरब्बीपण व राजकारणाविषयीची प्रौढ समज प्रकट होते. ताणल्याने जर तुटत असेल, आणि सगळेच गमावण्याची पाळी येणार असेल, तर तुटण्याइतके ताणायचे नसते.

येरवडा जेलमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या त्याविषयी चां. भ. खैरमोडे यांच्या आंबेडकर चरित्राच्या संबंधित पाचव्या खंडात पुरेशा तपशीलाने (पृ. १ ते ८२) माहिती दिलेली आहे. बाबासाहेबांची त्या वेळची वक्तव्ये दिली आहेत. १९ सप्टेंबरच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात बाबासाहेब म्हणतात की, तर मि. गांधींना अॅवॉर्ड बदलून हवा असेल तर अॅवॉर्डने जे लाभ आमच्या पदरात टाकले आहेत. ते लाभ मिळत राहतील याची अधिक चांगली हमी ज्यात आहे असा प्रस्ताव समोर ठेवावा. अशा ठोस प्रस्तावावर बोलणी होऊ शकतात. निवेदनाच्या अखेरीस ते म्हणतात – “I however trust the Mahatma would not drive me to the necessity of making a choice between his life and the rights of my people. For I can never consent to deliver my people bound hand and foot to the caste Hindus for generations to come.” (डॉ. भी. रा. आंबेडकर, खंड ५, पृ. ४८)

गांधीजींचे चिटणीस प्यारेलाल यांनी या प्रसंगीच्या उपोषण व करार यावर पुढे ‘एपिक फास्ट’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात सवर्ण हिंदू व अस्पृश्य पुढारी यांच्यात सर्वसंमत करार झाल्यानंतर मुंबईस २५ सप्टेंबर १९३२ रोजी इंडियन मर्चंटस चेंबरच्या हॉलमध्ये झालेल्या सभेत बाबासाहेबांनी भाषण केले, त्याचा वृत्तांत आहे. खैरमाडे यांनी त्यांच्या पुस्तकात काही भाग उदधृत केला आहे. भाषणाच्या ओघात बाबासाहेब म्हणाले – “I am happy to be able to say that it has become possible through the co-operation of all of us to find a solution so as to save the life of the Mahatma and consistent with such protection as is necessary for the interst of the Depressed classes in the future.”  पुणे कराराने जे लाभ पदरात पडले, व त्यांच्यासाठी जी हमी देण्यात आली त्याने बाबासाहेबांचे पूर्ण समाधान झाले. विभक्त मतदारसंघाची मागणी करण्यात आपले काही चुकले असे आपणास वाटत नाही, असेही ते म्हणाले. ज्या लाभांसाठी व संरक्षणासाठी त्यांना विभक्त मतदारसंघ हवे होते ते लाभ व संरक्षण त्यांनी मिळवले. (संदर्भ – कित्ता, पृ. ५९.)

या वाटाघाटींच्या वेळी त्यांना गांधींचा जो अनुभव आला, त्यासंबंधी त्यांनी भाषणात म्हटले – “I must confess that I was surprised, immensely surprised, when I met him, that there was so much in common between him and me. In fact whenever any disputes were carried to him--- I was astounded to see that the man who held such divergent views at the Round Table conference came immediately to my rescue and not to the rescue of the other side.” (संदर्भ – कित्ता, पृ. ५९-६०) त्या काळी ‘विविधवृत्त’ हे मुंबईहून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक गांधींच्या कट्टर विरोधकांपैकी एक होते. या वृत्तपत्रातील काही मजकूर खैरमोडे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यावरूनही (पृ. ६३ व पृ. ७१) बाबासाहेबांच्या वरील म्हणण्यास पुष्टी मिळते.

‘पुणे करारा’ची सविस्तर माहिती देण्यासाठी मुंबईच्या वरळी येथील सुप्रसिद्ध बीडीडी चाळीच्या पटांगणात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत बाबासाहेबांचे जे भाषण झाले त्याचा वृत्तांत बाबासाहेबांच्या ‘जनता’ या वृत्तपत्रातून खैरमोडे यांनी उदधृत केला आहे. बाबासाहेब म्हणतात – “अस्पृश्यांच्या सुदैवाने या वेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यांस महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळा उपयोगच झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळते घेतले व हिंदु पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला.” ब्रिटिश पंतप्रधानांनी दिलेल्या निवाड्यानुसार सर्व सवलती आपोआप २० वर्षांनंतर नाहीशा होणार होत्या. हे एक किल्मिष राहून गेले होते असे म्हणून, बाबासाहेब भाषणात पुढे म्हणाले – “नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे. आता असे ठरले आहे की, हिंदू समाज व अस्पृश्य यांच्या परस्पर संमतीनेच या सवलती दूर होतील. हिंदू समाजाने आपल्या प्रत्यक्ष कृतीने अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपण होऊन सोडतील, नाहीतर ही व्यवस्था चालू राहील----हे सर्व ठीक झाले.”

‘पुणे करारा’ने घात झाला नाही; फायदाच झाला. काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्यांचे हा करार लादून अहित केले असे म्हणणे म्हणून गैर आहे. हा करार लादला गेला नाही. स्वत:च्या लोकांचा जास्त फायदा करून देणारा करार आपण केला हे विजयी समाधान बाबासाहेबांच्या वक्तव्यांवरून दिसून येते.

६.

अशी वस्तुस्थिती असताना आज ‘पुणे करारा’बद्दल इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया का व्यक्त केल्या जातात? अजूनही गांधींना व काँग्रेसला शत्रू नं. १ का मानले जाते?

याचे तिहेरी स्पष्टीकरण आहे असे मला दिसते –

अस्पृश्यता-निवारणाचे जे कार्य यानंतर गांधींनी ‘हरिजन सेवक संघा’ची स्थापना करून सुरू केले, त्याबाबत गांधी व आंबेडकर यांचे जुळले नही. अस्पृश्यांमध्ये विधायक स्वरूपाची कार्ये स्पृश्यांनी सेवकाच्या भूमिकेतून करून अस्पृश्यांना सक्षम बनविण्याची गांधींची दृष्टी होती. सवर्णांनी केलेल्या पापाचे क्षालन सेवेद्वारा करणे हे त्यांचे कर्तव्य होते, असे गांधींचे म्हणणे. अस्पृश्यांना काही बाबतीत सुधारण्याचीही भूमिका त्यांची होती. अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, त्यांच्यावरील आर्थिक-सामाजिक बहिष्कार यांच्या निवारणार्थही हरिजन-सेवकांनी अहिंसक सत्याग्रही मार्गाने काम करावयाचे होते. आंबेडकरांची भूमिका राजकारणावर भर देणारी होती. सत्तेचा वापर करून सवर्णांना बदलणे भाग पाडण्याच्या आकांक्षा त्यांच्या ठायी आढळतात. भाग पाडल्याखेरीज सवर्ण हिंदू समाज आपली वर्तणूक सुधारणार नाही, न्याय देणार नाही, सत्तेत वाटा देणार नाही, असे त्यांचे स्वत:चे ठाम मत होते. जागोजाग सवर्णांशी झगडा करून त्यांच्याकडून गोष्टी पदरात पाडून घेणे, त्यांच्यावर मात करणे, त्यांना नमविणे ही ईर्ष्या त्यांच्या ठायी प्रबल होती. असे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेतन द्यावे, त्यांना संघटन-बांधणीसाठी पैसा पुरवावा, या प्रकारच्या त्यांच्या कल्पना होत्या. दृष्टी, भूमिका व कार्यक्रम या तिन्ही बाबतीत गांधी व आंबेडकर यांच्यात मूलभूत भेद होता. ते दोघे एकत्र काम करू शकले नाहीत तर काही आश्चर्य नाही. गांधींचे व आपले मतभेद आहेत, व गांधी जो निधी उभारीत आहेत त्याचा वापर त्यांच्या कल्पनेनुसार व्हावा हे स्वाभाविक आहे असे म्हणून, कडवटपणा व राग न बाळगता, आंबेडकर आपल्या मार्गाने जाऊ शकले नाहीत. त्यांनी वेडेवाकडे आरोप केले असे आढळते. त्यात हेतूंविषयी, प्रामाणिकपणाविषयी संशयही घेतलेला दिसतो.

२) गांधींच्या प्राणांतिक उपोषणाच्या दबावामुळे सवर्ण हिंदू पुढाऱ्यांनी हिंदूंसाठी म्हणून ज्या सर्वसाधारण जागा ठेवल्या होत्या, त्यापैकी ब्रिटिश पंतप्रधानांच्या मूळ अॅवॉर्डपेक्षा पुष्कळ जास्त जागा पुणे करारानुसार सोडल्या होत्या. दबावामुळे प्रकट केले असले तरी हे औदार्य होते. हिंदू समाज व धर्म यांच्याविषयी बाबासाहेब यापुढे अधिक स्वागतशील भूमिका घेतील, धार्मिक-सामाजिक सुधारणेच्या कार्यात सहकारी बनतील अशी अपेक्षा होती. राजकारणात ते ब्रिटिशांची साथ करणे सोडतील असे वाटत होते. पण चार-दोन वर्षांमध्येच, आपण हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, या प्रकारची घोषणा त्यांनी केली. सवर्ण हिंदू हा सुधारण्यापलीकडे गेलेला समाज आहे, हिंदू धर्माचा उच्छेद केल्याखेरीज जातपात व स्पृश्यास्पृश्यता नष्ट होणार नाही अशा आशयाची वक्तव्ये बाबासाहेब करू लागले. त्यामुळे येरवडा करारावर हिंदू पुढारी टीका करू लागले, व आपण गांधींमुळे करार करून फसलो असे म्हणू लागले. आंबेडकर व सवर्ण हिंदू समाज आणि आंबेडकरी चळवळीत नसलेले अस्पृश्यजातीय यांच्यातले अंतर वाढत गेले.

३) पुणे करार केल्यावर काँग्रेसशी जुळवून घेऊन आंबेडकर निवडणुकांचे व सांसदीय राजकारण करते तर त्यांच्या पक्षाची माणसे ते बऱ्यापैकी निवडून आणू शकले असते. 

सामंजस्य प्रस्थापित झाले होते, त्याचा त्यांना फायदा मिळाला असता. पण काँग्रेसविरोधी भूमिका त्यांनी चालूच ठेवली, व लौकरच ते काँग्रेस व गांधी यांच्याबद्दल अतिशय जहरी भाषा वापरू लागले. त्यामुळे निवडणुकांच्या राजकारणात राखीव जागांमधूनही त्यांची माणसे त्यांना अपेक्षित संख्येने निवडून आणता येईनात. अस्पृश्यांचे राजकारण आंबेडकरांकरता काँग्रेसने सोडून दिले नाही. स्वत:चे अस्पृश्य जोपासले. हे आंबेडकरांना खपले नाही. आंबेडकरांच्या पक्षाचा जो नाही तो भाडोत्री, विकला गेलेला, चमचा, हस्तक अशी व्याख्याच जणू काही केली गेली. विभक्त मतदारसंघ असत तर आपण जवळपास सर्व जागांवर आपली माणसे निवडून आणू शकलो असतो असे त्यांच्या मनाने घेतले. म्हणून मग बाबासाहेबही पुणे कराराने घात झाला असे बोलू लागले.

केवळ अस्पृश्यांचा आपला पक्ष नाही; व्यापक विचारप्रणालीधिष्ठित राजकारण करण्याची आपली पात्रता व कर्तृत्व आहे अशी त्यांची धारणा होती. त्या उद्देशाने त्यांनी ‘इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापन केली. पण काही निष्ठावंत सहकारी\अनुयायी सोडले तर, त्यांना घोर अपयश आले. बाबासाहेब अस्पृश्य जातीतून आलेले होते, म्हणून त्यांना अपयश आले का? हे काही पुरेसे स्पष्टीकरण नाही. सवर्ण हिंदू समाजाचा विश्वास त्यांनी त्यांच्या भूमिकांमुळे गमावला होता. वक्तव्यांमुळे, लेखनामुळेही त्यांनी दुखावण्याचेच काम केले होते. दुसरी गोष्ट अशी की, राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यापासून बाबासाहेबांनी सतत एक अंतर राखले होते. सवर्ण हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्यावर तोंडसुख घेणारी आणि कमी राजकीय स्वातंत्र्य लांबणीवर पडले तरी चालेल अशी भूमिका घेऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांची साथ करणारी कोणतीही व्यक्ती जनसामान्यांच्या राजकीय पक्षाचे पुढारीपण करू शकली नसती.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

गोलमेज परिषद व पुणे करार\येरवडा करार यांचा हा इतिहास ध्यानात घेता काँग्रेस व गांधी हे अस्पृश्यांचे एक नंबरचे शत्रू होते, त्यांनी अस्पृश्यांचा घात केला, ही बाबासाहेबांची टीका अयोग्य होती असेच आज म्हणावे लागेल.

विभक्त मतदारसंघ अस्पृश्यांना मिळाले असते तर राजकारणातली त्यांची शक्ती वाढली असती का? ब्रिटिश राजवटीच्या पाठिंब्यामुळेच मुस्लिम लीग आपले पाय रोवू शकली. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व समाज भारतात अस्पृश्यांना अस्पृश्य म्हणूनच विषम वागणूक देत होते हे लक्षात घेतले तर, विभक्त मतदारसंघामुळे सवर्ण हिंदू समाजाचे वैर गावागावांमधून ओढवून घेण्यापलीकडे खरोखरी काय पदरात पडले असते? ब्रिटिश राजवटीचा काही काळ त्यांना फायदा मिळाला असता, पण काही काळच. हे पुढे दिसून आलेच.

१९३३ नंतरच्या काळात बाबासाहेबांनी काँग्रेस व गांधी यांच्यावर जहरी टीका सुरू केल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांनी आणखीनच जवळ केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे सभासद म्हणून नेमले गेले. हा फार मोठा मान होता.

पण १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर, इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. ब्रिटिश सरकारने भारतात सत्तांतर करण्याचा निर्णय केला. या निर्णयानंतर ज्या वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळी लोकांमधले विभिन्न पक्षाचे बलाबल ब्रिटिशांनी ध्यानात घेऊन काँग्रेस व लीग यांना सोडून इतरांना महत्त्व देण्याचे नाटक थांबवले. बाबासाहेबांची त्यांनी घोर निरासा केली. ज्या काँग्रेसवर व गांधींवर हवे तसे तोंडसुख घेतले होते, त्या काँग्रेसच्या हाती स्वतंत्र भारतात सत्ता जाणार ही गोष्ट स्पष्ट होती. अस्पृश्यांना वाईट दिवस येणार असे त्यांच्या मनाने घेतले.

पूर्वास्पृश्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने केवळ आंबेडकरांच्या रेट्यामुळे घेतलेली नव्हती. ते काँग्रेसचे ध्येयधोरण होते. इतकेच नाही तर, महात्मा गांधींमुळे बाबासाहेबांचा समावेश पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात झाला. बाबासाहेबांच्या समावेशखेरीज राष्ट्रीय मंत्रिमंडळाची रचना पूर्ण होऊ शकत नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली अशी आठवण लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितली आहे. मंत्रिमंडळात समावेश करता यावा या दृष्टीने फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताच्या घटना समितीवर त्यांची निवड काँग्रेसश्रेष्ठींनी करवून घेतली. भारतीय राज्यघटना तयार करण्याच्या कार्यात त्यांना महत्त्वपूर्ण भूमिका प्रदान केली.

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

डॉ. आंबेडकरांचा खरा सन्मान ब्रिटिशांनी वा मुस्लीम लीगने केला नाही. त्यांनी फक्त बाबासाहेबांना वापरून घेतले. त्यांचा खरा सन्मान व आदर महात्मा गांधी व काँग्रेस यांनी केला, ही गोष्टही विसरता कामा नये. राज्यघटनेद्वारा अस्पृश्यांच्या पदरात जो न्याय टाकला गेला, त्यावेळी काँग्रेस व बाबासाहेहब यांची परस्परांना पूर्ण साथ होती.

१९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी बाबासाहेबांनी नवा पक्ष स्थापन करून परत एकदा काँग्रसेला नं. १ शत्रुस्थानी लेखले. पण त्यानंतरच्या आजपर्यंतच्या राजकारणाची वाटचाल आपण पाहिली तर असे दिसेल की, काँग्रेस, अन्य विरोधी पक्ष यांनी पूर्वास्पृश्यांविषयीच्या एका खोलवरच्या अपराधी भावनेमधूनच राजकारण केले आहे. अन्याय, अत्याचार, शोषण, विषमता यांचा अंत झालेला नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. पण समाजाची इतकी आमूलाग्र पुनर्घटना अशी थोडक्या काळात होत नाही. पण पावले सातत्याने त्या दिशेने पडत राहिली आहेत. याचे श्रेय केवळ एका आंबेडकरांना नाही, तर त्यांच्या बरोबरीने या समाजाच्या सवर्ण हिंदू नेत्यांच्या परंपरेला, व विशेषतकून महात्मा गांदींना पण द्यायला हवे, हे जाणणे, मोकळ्या मनाने स्वीकारणे अगत्याचे आहे.

(‘साम्ययोग’ या नियतकालिकाच्या १६ फेब्रुवारी १९९५च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखक (कै.) वसंत पळशीकर मराठीतील विचारवंत होत. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......