अजूनकाही
मौज
‘मौज’चा दिवाळी अंक हा एका गंभीर वाड्मयीन परंपरेचा भाग म्हणून काढला जातो. त्यातलं कुठलंही लेखन फारसं चटपटीत, आकर्षक, चटकदार, खमंग स्वरूपाचं नसतं. वाचकांना आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार मौज अंक करत नाही. त्यामुळे हा अंक आवडतो किंवा आवडत नाही. हेही तितकंच खरं आहे की, मौजच्या दिवाळी अंकाचं संपादन जुनाट वाड्मयीन पद्धतीनेच केलं जातं. म्हणजे अंकामध्ये प्रस्थापित, मान्यवर साहित्यिकांच्या लेखनाचा समावेश हमखास करायचाच किंवा मान्यवरांच्या आठवणी सांगणारं (सामान्य स्वरूपाचं!) लेखन छापायचं. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या प्रक्रियेला फाटा देण्याचं काम हा दिवाळी अंक करतो आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा 'दे दान', रश्मी कशेळकर यांचा 'जत्रेक चला', श्रीरंग भागवत यांचा 'बगदाद पर्व', रवींद्र अभ्यंकर यांचा 'आप्पांच्या आठवणी' हे या अंकातले प्राधान्याने वाचावेत, असे ललित लेख आहेत. विनया जंगले यांचा फुलपाखरांविषयीचा, शुभदा चौकर यांचा अरुण टिकेकरांविषयीचा हे लेखही उत्तम म्हणावेत, असेच आहेत. अनिल अवचट मात्र नेहमीप्रमाणे ठाकठीक! ललित लेखांच्या विभागात इतका चांगला मजकूर आल्यानंतर लेख विभाग दुर्दैवाने कमी सरस ठरतो. अश्विन पुंडलीक या तरुण भूगर्भ शास्त्रज्ञाचा 'नरपति हयपति, गजपति गडपति' हा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यकलेची ओळख करून देणारा लेख उत्कृष्ट आहे. बाकी नरेंद्र चपळगावकर, निळू दामले, गोविंद तळवलकर यांचे लेख अपेक्षेबरहुकूम आहेत. कथा विभागात मोजून पाच कथा आहेत. त्यांच्यातल्या इरावती कर्णिक, शर्मिला फडके आणि कृष्णात खोत या तीन आश्वासक तरुणांच्या कथा आश्वासक आहेत. मिलिंद बोकील यांची 'सरोवर' ही कादंबरी मौजेच्या परंपरेला साजेशी आणि मौज प्रकाशन गृहाकडून पुस्तक स्वरूपात लवकरच प्रकाशित होईल अशी आहे. मौजेचा कविता विभाग नेहमीच भरगच्च असतो. त्यात किमान तीन पिढ्यांमधल्या कवींच्या कविता एकत्रित वाचायला मिळतात. मौजचा आणखी एक विशेष नोंदवायला हवा. तो म्हणजे पाच-सहा मान्यवर चित्रकारांच्या रेखाटनांचा किंवा छायाचित्रांचा समावेश आणि त्यांचा यथास्थित उल्लेख!
सर्वोत्तम - दे दान (चंद्रमोहन कुलकर्णी), नरपति हयपति, गजपति गडपति (अश्विन पुंडलीक)
उत्तम मध्यम - आप्पांच्या आठवणी (रवींद्र अभ्यंकर), बगदाद पर्व (श्रीरंग भागवत)
मध्यम मध्यम - जपानी नरभक्षक (गोविंद तळवलकर), जवाहरलाल आणि वल्लभभाई (नरेंद्र चपळगावकर)
‘मौज’, संपादक - मोनिका गजेंद्रगडकर, पाने २७२, मूल्य – २०० रुपये.
..........
मिळून साऱ्याजणी
'स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी' अशी टॅगलाइन असलेलं मिळून साऱ्याजणी हे एक प्रकारे स्त्रियांच्या चळवळीचं मुखपत्र म्हणून प्रकाशित होणारं मासिक आहे. त्यामुळे त्याच्या दिवाळी अंकातही मनोरंजन, मनाला-डोळ्याला सुखावणारं असं काहीही नसतं. मुखपृष्ठही त्या परंपरेला साजेसंच असतं. या वर्षीच्या अंकात 'लग्न - एक 'मंगल' गोंधळ अर्थात लग्नाचा परीघ आणि परिघावरच्या समाजातली लग्नं' अशा लांबलचक नावाचा आणि तब्ब्ल चौदा लेखांचा भरगच्च परिसंवाद आहे. त्यामुळेच मुखपृष्ठावर (दिवाळी अंकांच्या आकर्षक मुखपृष्ठांच्या -बाईचा सुंदर चेहरा- परंपरेला फाटा देत) नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांचं आकर्षक चित्र घेतलं आहे. या परिसंवादातला 'लग्नाची बेडी' हा पहिला लेख प्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बोकील यांनी लिहिला आहे. त्यांनी 'लग्न का करायचं?' या प्रश्नाचं सुसंगत आणि निसर्गशुद्ध विश्लेषण केलं आहे. इतर लेख स्त्री-पुरुष संघर्षाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचं काम करतात. कथाकार दि. बा. मोकाशींच्या कथांमधल्या स्त्री-पुरुष नात्यांपासून वेश्यांच्या मालकापर्यंत वेगवेगळे पैलू या लेखांमधून मांडले गेले आहेत. हे सर्व लेख चांगले असले तरी 'लग्नसंस्था असावी की नसावी?', 'ती चांगली की वाईट?' याबाबत मार्गदर्शन करण्यात मात्र हा परिसंवाद कमी पडतो. कदाचित म्हणूनच या परिसंवादाला 'एक मंगल गोंधळ' असं नाव दिलं असावं. याला अपवाद आहे तो फक्त मिलिंद बोकील यांच्या लेखाचा! बाकी या अंकात कथा, कविता यांचा समावेश आहेच, पण अंकाचं मुख्य आकर्षण मात्र हा परिसंवादच आहे.
सर्वोत्तम - उत्तम मध्यम - मध्यम मध्यम - या तीनही वर्गवार्या याच परिसंवाला लागू होतील.
‘मिळून साऱ्याजणी’, संपादक - गीताली वि. मं., पाने - २२२, मूल्य – १४० रुपये.
..........
कालनिर्णय
‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकाची चार वैशिष्ट्यं असतात. एक, हा अंक नियोजनपूर्वक काढला जात आसल्यामुळे अंकातले सगळे विषय संपादकाच्या विचारमंथनातून आलेले असतात. तरीही या विषयांमध्ये 'वाचकांना काय हवं?' आणि 'वाचकांना काय द्यायला हवं?' या दोन्हीही बाबींचा समतोल राखलेला असतो. दोन, कालनिर्णयच्या अंकात कुठल्याही विषयावरचा परिसंवाद कधीही नसतो. तीन, कविता विभागाचं संपादन काव्यक्षेत्रातल्या व्यक्तीकडे सोपवलेलं असतं. त्यामुळे त्या विभागाचा बरेवाईटपणा त्या विभागासाठी निवडलेल्या व्यक्तीवर अवलंबून असतो. चार, अंकाची निर्मिती अतिशय चांगली असते, त्यात भरपूर छायाचित्रांचा समावेश असतो, पण अंकाच्या मांडणीकडे मात्र फारसं लक्ष दिलेलं नसतं. या वर्षीचा अंकही या वैशिष्ट्यांना अपवाद ठरणारा नाही. ‘कट्ट्याचे (गेलेले) दिवस’ हा श्रीरंग गोडबोले यांचा विनोदी लेख फर्मास आहे. विसोबा खेचर यांचा 'दे. भ. धृष्ट्द्युम्नची डायरी' हा लेखही वाचनीय आहे, पण टोकदार नाही. अरविंद गणाचारी यांचा 'पहिले महायुद्ध आणि विस्मृतीत गेलेला इतिहास' हा लेख अभ्यासकाच्या काटेकोर शिस्तीने लिहिला असला तरी वेगळी माहिती देण्यात सरस ठरतो. संजय छाब्रिया या अमराठी माणसाने मराठी सिनेमांच्या निर्मितीत गेल्या काही वर्षांमध्ये भरघोस यश संपादित केल्यानंतर सांगितलेलं मराठी सिनेमांचं अर्थशास्त्र संदर्भांनी आणि उदाहरणांनी परिपूर्ण असणार, हे ओघाने आलंच! त्यापुढे अशोक राजवाडे यांचा एक पानी लेख अनावश्यक ठिगळासारखा वाटतो. नरेंद्र बंडबे यांचा 'स्टॅनली क्युब्रिक - अ व्हिज्युअल पोएट' हा लेख सिनेमा आणि सिनेमेटोग्राफीचं कुठलंच शिक्षण न घेतलेल्या 'स्टॅनली' या दिग्दर्शकाचा उत्तम परिचय करून देतो. आरती कुलकर्णी यांचा इजिप्तमधल्या नाईल नदीविषयीचा आणि आशुतोष जावडेकर यांचा रॉक अँड रोल या संगीतप्रकाराविषयीचा लेख शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. 'श्री मध्वाचार्य व त्यांचे तत्त्वज्ञान' हा डॉ. मीता शेणॉय यांचा लेख गंभीर आणि विशिष्ट वाचकवर्गापुरता मर्यादित असला तरी या विषयावरचा हा लेख अलीकडच्या काळातला मराठीतला बहुधा एकमेव लेख असावा. शिरीष पै यांच्या हायकूंमध्ये मात्र फारसं नाविन्य नाही.
सर्वोत्तम - पहिले महायुद्ध आणि विस्मृतीत गेलेला इतिहास (अरविंद गणाचारी)
उत्तम मध्यम - जन्नत-ए-नाईल (आरती कुलकर्णी), रॉक ऍंड रोल (आशुतोष जावडेकर), स्टॅनली क्युब्रिक - अ व्हिज्युअल पोएट (नरेंद्र बंडबे)
मध्यम मध्यम - अंकातील तीनही कथा
‘कालनिर्णय’, संपादक - जयराज साळगावकर, पाने - १९८, मूल्य – १२० रुपये.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment