अजूनकाही
कुठलीही क्रांती कालांतरानं अपयशी वाटली तरी जगावर आपला एक ठसा उमटवून जाते. १९१७ची रशियन\बोल्शेविक क्रांतीही त्यापैकीच एक होती. म्हणून तिचं स्मरण करणं अनिवार्य आहे. (रशियन कॅलेंडरनुसार) २५ ऑक्टोबर २०१७ला बोल्शेविक क्रांतीला १०० वर्षं झाली. (ग्रेगेरीयन कॅलेंडर नुसार ७ नोव्हेंबरला १०० वर्षं होतील.) शोषणाविरुद्ध कामगारांनी, तरुणांनी आवाज उठवत ही क्रांती घडवून आणली होती. तिचं आज, उद्या काय महत्त्व आहे, असायला हवं, याची दिशा दाखवणारा हा लेख...
.............................................................................................................................................
कुठलीही क्रांती कालांतरानं अपयशी वाटली तरी जगावर आपला एक ठसा उमटवून जाते. फ्रेंच राज्यक्रांतीनं समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा नारा दिला. आणि ही मूल्यं जगाला आकर्षित करून, आपला शिक्का कायमचा उमटवून गेली. लौकिकार्थानं, फारच लवकर फ्रेंच राज्यक्रांती असफल झाली. त्यामानानं रशियन राज्यक्रांती जवळ-जवळ ६० वर्षांवर टिकल्यासारखी वाटली. गोर्बाचेव्हनं पेरेस्त्रोईका व ग्लासनोस्त आणल्यापासून म्हणजे १९८५-८६ पासून तिला उतरती कळा लागली. त्याची चर्चा वेगळी करावी लागेल. पण ऑक्टोबर क्रांतीचं स्मरण करताना अनेक स्फूर्तीदायक गोष्टींची आठवण करावीशी वाटते.
मार्क्सनं म्हटलं आहे की, प्रश्न जग बदलण्याचा आहे. हे जग बदलण्यासाठी, मार्क्सनं सुरू केलेल्या ‘सोशालिस्ट इंटरनशनल’च्या झेंड्याखाली, युरोपात ‘सोशल डेमोक्रटिक’ या नावानं अनेक देशातील युवक एकत्र आले. या युरोपीय देशात लोकशाहीचं प्रमाण एकसारखं नव्हतं. इंग्लंडमध्ये लोकशाही मुरलेली होती, फ्रान्समध्ये त्याची वाटचाल सुरू झाली होती, बाकीच्या काही देशांमध्ये निवडक प्रमाणात होती. रशियात झारनं घाबरत-घाबरत प्रयत्न केला, पण तो अर्धवट सोडून राजेशाहीची पकड परत घट्ट केली होती.
मार्क्सनं म्हटलं आहे की, कामगार क्रांतीच्या आघाडीवर राहतील. कारण त्यांना गमावण्यासारखं काहीच नसतं. पण रशियातील शेतीची रचना अशी होती की, ‘झेमस्त्व’ म्हणजे ग्रामपंचायतीसारखी रचना, घरातल्या सदस्यांच्या संख्येप्रमाणे, घरांना शेती वाटून देई. शिवाय शेतकरी जमीनदारांशी बांधलेले असत. त्यामुळे त्यांनाही गमावण्यासारखं खूप काही नव्हतं. १९०५ची क्रांती असफल झाली, कारण शेतकऱ्यांना त्यात काही मिळवण्यासारखं वाटलं नाही. बहुसंख्य असूनही ते अलिप्त राहिले. त्याच वेळी उत्स्फूर्तपणे सोव्हिएतसारखी व्यवस्था मॉस्कोत जन्माला आली. झारचं साम्राज्य एव्हाना पूर्वेला पॅसिफिकचा किनारा ओलांडून अलास्कापर्यंत पोचलं होतं. त्यात अनेक भिन्न वंशांचे, भिन्न धर्माचे लोक होते. रशियन तुर्कस्तान हा एक मुस्लीम बहुल प्रदेश होता. त्यात काही प्रदेश, उझबेकिस्तान (हे नाव नंतर मिळालं.) सारखे, हे शेती करणारे, हस्तव्यवसाय असणारे आणि काही प्रमाणात विकसित असणारे होते. तर कझाक, तुर्कमन व ताजिक हे भटके होते. कॉकेशियातही आर्मेनियाचा स्वत:चा कॅथॉलिक धर्म, अझरबैजानी मुस्लीम, जॉर्जियन सनातनी ख्रिस्ती, तर काही मुस्लीम जमाती या आशियाच्या. तुर्कस्तानात तुर्की, तुर्को-मंगोल वंशाचे, मंगोल वगैरे. बाकूत-अझरबैजान इथं तेल सापडल्यानं इंग्लंड व फ्रान्सच्या मदतीनं रशियाची थोडी बहुत कारखानदारी या भागात विकसित होत होती.
रशियन, युक्रेन, बेलारूस, युरोप. असंख्य जमाती, अनेक धर्म व त्यांचे अंतर्विरोध या सगळ्यांचा अभ्यास लेनिननं केला. म्हणजेच आपल्या स्वत:च्या देशाचा सखोल अभ्यास त्यानं केला. त्यातून त्याचा राष्ट्रकांविषयीचा सिद्धान्त जन्माला आला. ज्यातून प्रत्येक राष्ट्र्काला समान संधी मिळण्याची आशा निर्माण झाली. उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली सोव्हिएत व्यवस्था फेब्रुवारी १९१७मध्ये क्रांतीनंतर परत अस्तित्वात आली आणि ऑक्टोबर क्रांतीनंतर कायम ठेवण्यात आली. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना स्वत:चं सोव्हिएत निर्मून जमीन वाटप करायला उत्तेजन देण्यात आलं. झारचा पाडाव करून जी मंडळी सत्तेवर आली होती, त्यांची विचारसरणी बरीचशी पुस्तकी होती. म्हणजे, आपली युती असल्यानं युद्ध चालू ठेवायला आपण बांधील आहोत, जमीन सुधारणा वगैरे युद्धानंतर बघता येईल इत्यादी. सैन्याधिकारी बहुदा जमीनदार वर्गातून होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘नंतर’चा भरवसा नव्हता. सोव्हिएतचे पुढारी मेन्शेविक असले तरी कामगार वर्गात बोल्शेविक बरेच होते. सैनिकांची स्थिती फार काही बरी नव्हती आणि त्यातून शेती वाटपाचे दिवस जवळ येताच, हरणाऱ्या लढाईत जीव देण्यापेक्षा, स्वत:च्या घराची सदस्य संख्या वाढवण्यात त्यांना स्वारस्य होतं. त्यामुळे सैनिकांनी रणभूमीवरून पळ काढला.
सर्व लेखकांनी लिहून ठेवलं आहे की, सामान्यातला सामान्य रशियन लेनिनला भेटू शकायचा आणि त्याच्याशी लेनिन घर, मुलंबाळं, शेती, गाई-बैल यांवर गप्पा मारायचा. त्यामुळे त्याला परिस्थितीचं भान इतरांपेक्षा अधिक होतं. परिणामी नुकसान सोसून व अपमानास्पद अटी मान्य करूनही त्यानं युद्धबंदी केली. त्याचं सामान्य लोकांशी गप्पा मारणं हे ऑक्टोबर क्रांतीनंतरही चालू राहिलं. मार्क्सचं तत्त्वज्ञान सामान्य जनतेला कळत नव्हतं, पण त्यांना एवढं कळत होतं की, बोल्शेविक जे करत आहेत ते माझ्या हिताचं आहे. म्हणून ते क्रांतीच्या बाजूने उभे राहिले.
राष्ट्रकाचा सिद्धान्त स्टालिनच्या नावावर १९१३ साली प्रसिद्ध झाला. त्याप्रमाणे १९१८ साली रशियन, युक्रेनिअन व बेलारूस संघ स्थापन होऊन त्यांचं संयुक्त राष्ट्र होण्याचे निर्देश देण्यात आले. यादवी अजून चालूच होती. लेनिनच्या आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना होत्या की, शेतकरी व सामान्य लोकांकडून फुकट काहीही घ्यायचं नाही. व्हाईट आर्मीत जुनी उतरंडीची रचना आणि रेड आर्मी ट्रोट्स्कीनं समानतेवर स्थापित केली होती. या दोघांच्या वर्तणुकीतील फरक प्रत्यक्ष अनुभवून, १९२४ पर्यंत तुर्कास्तानापर्यंत बोल्शेविकांच्या बाजूनं बहुसंख्य जनता वळली. १९२४ साली USSR (Union of Soviet Socialist Republics)चं संविधान अस्तित्वात आलं. त्यात व नंतरही १९३६ च्या संविधानात कुठल्याही घटक राज्याला हवं तेव्हा संघराज्यातून अलग होण्याचा अधिकार होता. त्यामुळे पुढे १९९१ साली सहजपणे सोव्हिएत संघाचा विलय झाला.
दुसरं महत्त्वाचं काम झालं ते स्त्रियांबाबत! क्रांती झाली तेव्हा स्त्रियांमध्ये युरोपीय भागात दोन टक्के साक्षरता होती, तर आशियात शून्य टक्के. कम्युनिस्ट पक्षाच्या स्त्रियांनी खूपच मोठं काम केलं. नवे कायदे स्त्रियांपर्यंत पोचवण्यासाठी सरळ त्यांच्या घरापर्यंत पोचता येत नसे, म्हणून त्यांच्यासाठी घर व्यवस्थापनासारखे क्लासेस काढले. सुरुवातीला पक्षाचे पुरुष, ‘माझी बायको साधी आहे हो!’, ‘तिला घराव्यतिरिक्त कशात रस नाही’ वगैरे कारणं द्यायचे. कधी स्वत:च येऊन बसायचे. तिथं खरोखरच उपयुक्त धडे मिळतात म्हटल्यावर स्त्रिया येऊ लागल्या आणि घर व्यवस्थापनाबरोबर नव्या कायद्यांचं ज्ञान मिळवू लागल्या.
मध्य आशियात बुरख्यामुळे प्रश्न थोडा आणखी अवघड होता. तिथं स्त्रियांनी बाजारात फक्त स्त्रियांसाठी स्त्रियांनी चालवलेला कॅफे काढला. कष्टकरी स्त्रियांना फार बरं वाटलं. बाजारातून येऊन बुरखे काढून सुख-दु:खाच्या गप्पा मारताना त्यांच्या फायद्याचं कायदे ज्ञानही त्यांना मिळालं. तिथं देज देण्याची प्रथा होती. त्यामुळे लहान मुलींना मोठ्या वयाच्या पुरुषांबरोबर लग्न करावं लागे. नव्या कायद्यानुसार लग्नाच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी वधूबरोबर, स्त्रियांच्या विभागाची (झेन्स्की अत्देल) प्रतिनिधी हजर असावी लागायची. या सगळ्यांमुळे स्त्री-पुरुष समानता आली नाही, पण स्त्री-साक्षरता १०० टक्के झाली आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेनं काही पावलं पुढे टाकली गेली.
मध्य आशियातील भटक्या जमातींना अक्षरओळख करून देण्यासाठी त्यांच्या फिरत्या तंबूंच्या बरोबर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा लाल तंबू असायचा आणि संध्याकाळी फावल्या वेळी त्यांना अक्षरओळख, त्यांचे हक्क अशा गप्पागोष्टी चालायच्या. कझाक, किरगीझ हा १०० टक्के फिरता समाज. तो आज १०० टक्के शिक्षित समाज, स्थिर आयुष्य जगणारा समाज या समर्पित कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमुळे झाला. या स्त्री-पुरुषांना आरोग्याचे धडेही या कार्यकर्त्यांनी दिले.
क्रांतीच्या घटना वाचताना रोमांचकारी वाटतात, पण त्यामागची समज व कष्ट, त्यानंतर केलेले अथक कष्ट, नव्या कल्पना लढवून घडवलेल्या सुधारणा याही तेवढ्याच मोलाच्या होत्या.
यादवी संपत आल्यावर अन्नाची वाढलेली गरज म्हणून नवं आर्थिक धोरण चर्चेअंती अमलात आणलं. त्यात शेतकऱ्यांना सर्व अधिकार दिले गेले. पण यातून गरीब- श्रीमंत भेद वाढू लागले. कुलाक-श्रीमंत शेतकरी वर्ग भ्रष्टाचाराचे उगमस्थान झाला. क्रांतीनंतर वेश्या दिसेनाशा झाल्या होत्या त्या परत दिसू लागल्या. गरिबी वाढते तशा वेश्या व भ्रष्टाचार वाढतो, तो कसा?, हे अलेक्झांड्रा कोलान्ताईनं स्वत:च्या लेखनातून दाखवलं. पक्षाचे लोकं चिंतित झाले. गंभीर चर्चेअंती सामूहिक शेतीचा निर्णय घेण्यात आला. १९२४ साली लेनिनचा मृत्यू झाला. नवीन आर्थिक धोरण अमलात आणताना झालेल्या चर्चेत आणि ते लागू करण्याच्या वेळी तो होता. पण त्याचे परिणाम दिसू लागण्याच्या काळी तो नव्हता. स्टालिनची पकड पक्षावर यानंतर मजबूत व्हायला लागली. यावेळी नेते स्टालिनपेक्षाही तगडे होते. परंतु विरोध म्हणजे क्रांतीत फूट पडणं अशा काहीशा समजुतीनं त्यांनी त्याला विरोध केला नाही. किरोवचा खून झाला. कृपस्कायानं लेनिनच्या शवाला प्रदर्शित करायला विरोध केला, पण ती एकटीच पडली. लेनिनच्या शवाचं दर्शन घेणं हा देशभक्तीचा उपचार ठरला.
पहिली दहा वर्षं सोव्हिएत संघ एक युटोपिया होता. लेनिननं म्हटलं आहे की, समाजवादी लोकशाही ही श्रेष्ठ लोकशाही आहे. पण हळूहळू क्रांतीला वाचवण्यासाठी लोकशाहीचाच बळी गेल्यावर समाजवादही भरकटला. आकारानं भल्यामोठ्या व लोकवैविध्य असणाऱ्या देशात लोकशाही मार्गानं बदल घडवण्याचा मार्ग धीमा असेल, पण लेनिननं ज्या कार्यकर्त्यांना प्रेरित केलं होतं, त्यांनी तुल्यबल फरक सोव्हिएत संघात घडवून आणला. त्यानंतर दैन्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार व दहशत यांनी समाजाचा ताबा घेतला. तरीही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोव्हिएत संघ एकसंधपणे उभा राहिला, पण समाजाला सतत प्रवाही राहायला लागतं. समाजाचे पुढारी कल्पक व नव्या बदलांना उत्सुक लागतात. एक साचलेपण त्या समाजात आलं होतं. १९९१ साली ते स्वप्न विखुरलं.
.............................................................................................................................................
लेखिका वासंती दामले मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.
vasdamle@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 04 November 2017
नमस्कार वासंती दामले! लेखावर थोडं भाष्य करेन म्हणतो. १. >> रशियात झारनं घाबरत-घाबरत प्रयत्न केला, पण तो अर्धवट सोडून राजेशाहीची पकड परत घट्ट केली होती. राजेशाहीची पकड घट्ट करायचं कारण म्हणजे १८८१ साली झालेली झार अलेक्झांडर द्वितीय याची हत्या. या झारने जमीनविषयक अनेक सुधारणा राबवल्या. गुलामांना कायदेशीर रीत्या मोकळं केलं. त्यामुळे हा झार लोकप्रिय होता. ही लोकप्रियता सहन न होऊन त्याचा खून करण्यात आला. रशियात साम्यवाद (म्हणजे राजद्वेष बरंका!) बराच आधीपासून कार्यरत होता. साहजिकच त्यानंतर गादीवर आलेल्या झार अलेक्झांडर तृतीयने सुधारणेची पावलं जपून टाकायला सुरुवात केली. २. >> १९०५ची क्रांती असफल झाली, कारण शेतकऱ्यांना त्यात काही मिळवण्यासारखं वाटलं नाही. बहुसंख्य असूनही ते अलिप्त राहिले. आजीबात नाही. १९०४-१९०५ साली रशिया जपान युद्ध झालं. ते रशिया हरला तरी ही हार आशियातली होती. युरोपशी हिचा फारसा संबंध आला नाही. झारच्या युरोपीय रशियात फारसा फरक पडला नाही. शेतकरी बितकरी परीकथा आहेत. ३. >> रशियन, युक्रेन, बेलारूस, युरोप. असंख्य जमाती, अनेक धर्म व त्यांचे अंतर्विरोध या सगळ्यांचा अभ्यास लेनिननं केला. लेनिनला रशियाच्या युरोपीय लोकसमूहांशी असलेल्या संबंधांची कितपत जाण होती याची जरा शंकाच आहे. असा अभ्यास झारच्या काळापासून चालू होता. ४. >> मध्य आशियात बुरख्यामुळे प्रश्न थोडा आणखी अवघड होता. मध्य आशियाई महिला कधीच बुरख्यात नसायच्या. ५. >> क्रांतीनंतर वेश्या दिसेनाशा झाल्या होत्या त्या परत दिसू लागल्या. साम्यवाद म्हणजे स्त्रीला गुलाम बनवून वेश्याव्यवसायात ढकलणे. खोटं वाटंत असेल तर युक्रेनकडे बघा. साम्यवाद कोसळल्यावर युक्रेनी महिलांचा 'बाजारात' सर्वात जास्त 'सप्लाय' होता. कारण की साम्यवादात माणसाला फक्त सरकारमान्य कौशल्यच शिकता यायचं. बिचाऱ्या युक्रेनी भगिनींकडे भांडवली बाजारात विकण्याजोगं कुठलंही कौशल्य नव्हतं. दुर्दैवाने त्यांना आपल्या देहाचं भांडवल करावं लागलं. आंध्रात नक्षल पट्ट्यात अशाच मुलीबाळी 'विकायला' काढल्या जातात. साम्यवाद = वेश्याव्यवसाय ६. >> पहिली दहा वर्षं सोव्हिएत संघ एक युटोपिया होता. हे कोणी सांगितलं तुम्हाला? भयंकर दुष्काळ पडले या काळांत. १९२२ च्या दुष्काळात लोकं अन्नाला मोताद होऊन भुकेने तडफडून मेली. पुढे १९३२-३३ च्या दुष्काळात दयाळू स्टालिनने भुकेलेल्यांना अन्नासाठी प्रवास नाकारून अंतर्गत पासपोर्ट पद्धत राबवली. कित्ती कित्ती सुंदर सोव्हियेत नाही? ७. >> १९१८ साली रशियन, युक्रेनिअन व बेलारूस संघ स्थापन होऊन त्यांचं संयुक्त राष्ट्र होण्याचे निर्देश देण्यात आले. याच तीन देशांनी १९९१ साली सोव्हियेत संघराज्य विलयास नेलं. नेमके हेच तिघे पूर्वीचे यशस्वी कलाकार परत हातचलाखीची कला सादर करावयास कसे उपटले बरे? लढवा पाहू डोकं. असो. सोव्हियेत क्रांती हे एक थोतांड आहे. इतकं कळलं तरी पुरे. आपला नम्र, -गामा पैलवान