अजूनकाही
(रशियन कॅलेंडरनुसार) २५ ऑक्टोबर २०१७ला बोल्शेविक क्रांतीला १०० वर्षं झाली. (ग्रेगेरीयन कॅलेंडर नुसार ७ नोव्हेंबरला १०० वर्षं होतील.) शोषणाविरुद्ध कामगारांनी, तरुणांनी आवाज उठवत ही क्रांती घडवून आणली होती. तिचं आज, उद्या काय महत्त्व आहे, असायला हवं, याची दिशा दाखवणारा हा लेख. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा नसा. तुम्ही डावी विचारसरणी मानत असा किंवा नसा. तुम्ही जर स्वप्न पाहणारे असाल तर २५ ऑक्टोबरच्या निमित्तानं स्वप्ने पाहण्याची सवय, मोठी स्वप्नं पाहण्याची सवय जिवंत ठेवण्याचा, तरुणांना स्वप्नं पाहताना ‘आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ असं आश्वस्त करण्याचा संकल्प करायला हवा.
.............................................................................................................................................
शंभर वर्षांपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबर १९१७ या दिवशी रशियामध्ये बोल्शेव्हिक कम्युनिस्ट पक्षानं सशस्त्र समाजवादी क्रांतीस सुरुवात केली आणि ‘जगाला हादरवून टाकणाऱ्या’ त्या दहा दिवसाच्या संघर्षानंतर प्रत्यक्ष सत्ता ताब्यात घेतली. सोव्हिएत रशियानं नंतर काही दशकं सर्व जगात दरारा उत्पन्न केला होता. अनेक अर्थाने. तंत्रज्ञानात, आर्थिक प्रगतीत, सामाजिक व सांस्कृतिक अंगानं, लष्करी ताकदीत! समाजवादी समाजरचना भांडवलशाही समाजरचनेला तोडीस तोड पर्याय होऊ शकते, असा विश्वास जगभरच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना दिला होता.
तोपर्यंत कष्टकरी व शोषितांवर हेच संस्कार केले गेले होते की, ‘तुमचा जन्मच मुळात शोषण करून घेण्यासाठी आहे’. (आठवा भारतातील जातिव्यवस्थेचं तत्त्वज्ञान). आपण सामुदायिकपणे सत्ता ताब्यात घेऊ शकतो, हा कष्टकऱ्यांच्या मनातील ‘युटोपिया’ होता. त्या आपल्या ‘अमूर्त’ स्वप्नांना आपण ‘मूर्तरूप’ देऊ शकतो, हा विश्वास रशियातीलच नाही तर जगभरच्या कष्टकऱ्यांना देण्याचं काम ऑक्टोबर क्रांतीनं केलं होतं.
ऑक्टोबर क्रांतीचं हे महात्म्य आहे. नंतर सोव्हिएत युनियन कोसळल्यामुळे ते माहात्म्य कमी होत नाही.
१९८० च्या दशकात सोव्हियत युनियनचं काय झालं, हा आता इतिहासाचा भाग झाला आहे. युनियनची शकलं झाली. खुद्द रशियात समाजवाद संपुष्टात आला. त्याहीपेक्षा नुकसान झालं समाजवादी विचारसरणीचं. त्या काळाच्या पुढे-मागे जन्माला आलेले तरुण समाजवादी विचाराबरोबर फटकून वागू लागले. दोष तरुणांचा नव्हता. समाजवादी विचार प्रत्यक्षात आणू पाहणारं नाट्य पूर्णरीत्या अपयशी ठरलं होतं. (चीनचा अपवाद). आधीच्या व आमच्या पिढीनं अपयशाची ती जबाबदारी कोणतीही कारणं न देता स्वीकारली पाहिजे.
पण मुद्दा ‘रशियन समजावाद’ खरा की ‘अमेरिकन भांडवलशाही’ हा नव्हता. रशिया जिंकली की, अमेरिका हा नव्हता. तर जगभरच्या कोट्यवधी कष्टकऱ्यांची पिढ्यानपिढ्या अपुरी राहिलेली साधीसाधी स्वप्नं पुरी करण्यासाठी कोणत्या अर्थव्यवस्थेचं मॉडेल उपयुक्त असेल, कोणती समाजरचना उपयुक्त असेल हा होता? कष्टकऱ्यांची ती स्वप्नंदेखील थोडा वेळ बाजूला ठेवूया. जागतिक भांडवलशाहीनं जी काही सामाजिक, आर्थिक, वित्तीय पर्यावरणीय अरिष्टसदृश्य परिस्थिती तयार केली आहे, ज्यातून बाहेर कसं निघायचं हे तिचं तिलाच कळेनासं झालं आहे, त्याला पर्यायी प्रणाली काय असू शकेल हा मुद्दा आहे.
परत एकदा मॅक्रो इकॉनॉमीचे मुद्दे बाजूला ठेवूया. कोट्यवधी तरुणांच्या हाताला, आजच्या रोबोटिक्सच्या जमान्यात, आपण काय काम देणार आहोत? इलेक्ट्रॉनिक मीडिया व जाहिरात उद्योगानं तरुण पिढीच्या भौतिक आकांक्षांना जी आग लावली आहे, ती शमली नाही तर हे कोट्यवधी तरुण काय करतील? सतत वाढत जाणाऱ्या असमानतेमधून या असंतोषाच्या आगीत तेल ओतलं जात आहे कि नाही? प्रत्येक विचारी व संवेदनशील प्रौढ व्यक्तीनं स्वतःशी प्रामाणिकपणे उत्तर द्यावं की, हे जग त्यांना सुरक्षित वाटतं का? ज्यांच्यावर ते अतोनात प्रेम करतात, त्या त्यांच्या पोटच्या मुलांसाठी, नातवंडांसाठी आणि त्यांच्या अजूनही न जन्मलेल्या पिढ्यांसाठी काय जग व पृथ्वी ते मागे सोडून जाणार आहेत? त्यांना खरंच असं वाटतं का कि, पोलीस व सैन्याच्या आधारे समाजातील कोणत्याही प्रकारचे असंतोष कायमसाठी थंड करता येतात का? पोलीस आणि सैन्यातदेखील विचारी व संवेदना असणारी माणसंच असतात.
तर हे सारे मुद्दे आज, सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर तीस वर्षं होतानादेखील, जिवंत आहेतच. उद्या, परवा, पुढच्या वर्षी, पुढच्या दशकात .....आणि त्यावर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर २११७ मध्येदेखील ते तेवढेच ज्वलंत असतील हे नक्की.
चला समाजवादाची चर्चा बंद करू या. चला मार्क्सची व सर्व समाजाबद्दल चिंतन करणाऱ्या विचारवंतांची पुस्तकं माळ्यावर फेकून देऊ या. सगळी डावी परिभाषा वापरणं बंद करू या. मोर्चे, आंदोलनं सगळं तहकूब करू या. पण समाजवादी विचार, व्यक्ती, पक्ष, संघटना जे प्रश्न उपस्थित करू पाहत आहेत, त्यांचं काय करायचं? ते प्रश्न कोठे जाणार? हवेत विरून? खोल समुद्रात? इस्त्रोच्या एखाद्या उपग्रहात पॅक करून अंतराळात कायमचे भिरकावून देता येतील ते प्रश्न? प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज बंद करणं ताकदवर प्रस्थापित व्यवस्थेला कठीण नाही. पण त्यानं प्रश्न थोडेच नाहीसे होतात
१९८९ साली इतिहासाचा अंत झाला, आता जगात एकच एक राजकीय अर्थव्यवस्था. म्हणजे भांडवलशाही, नांदेल अशी भाकितं केली गेली. २००८ च्या जागतिक वित्तीय व आर्थिक मंदीनंतर जगात सर्वांत जास्त पुस्तकं मार्क्स व डाव्या विचारांची खपली. अनेक दशकानंतर अमेरिकेत बर्नी सँडर्सनी ‘समाजवाद’ हा शब्द अध्यक्षपदाच्या प्रचारात घराघरांत पोचवला. जेरेमी कॉर्बिन यांनी ब्रिटनमधील तरुणांमध्ये पोचवला. युरोपात ग्रीस, पोर्तुगाल, इटलीमध्ये तरुण पिढी फिरून एकदा डावा विचार हाताळू पाहत आहे. लॅटिन अमेरिकेतेतील अनेक राष्ट्रांत लंबक उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे हलत आहे.
समाजवादी विचारांचा प्रसार अभ्यास वर्गांतून, पुस्तकांतून, भाषणांतून होतो. नाही असं नाही. पण त्याला मर्यादा असतात. समाजवादी विचारांचं जनमानसांत अपिल तेव्हाच वाढतं, ज्या वेळी भांडवलशाहीमधील अरिष्ट तीव्र होतं. समाजवादाला स्वयंभू अस्तित्व नाही. समाजवाद भांडवलशाहीच्या तुलनेमध्ये\संदर्भामध्येच अधिक चांगला आकळतो. अधिक चांगला पटतो. भांडवलशाहीच्या पलीकडील अवस्था समाजवाद असणार आहे.
समाजवादी विचारांचे वाहक तरुण पिढीच असते. असणार. तरुण पिढी तिचा स्वतःचा वेळ घेत आहे समाजवाद समजून घेण्यासाठी. डावा विचार पटवून घेण्यासाठी. त्यांना वेळ घेऊ दे. मागच्या शतकात साठी-सत्तरीमध्ये तरुण पिढी जगभर आणि भारतात डाव्या विचारांकडे वळली होती, ती काय त्यांचा डीएनए वेगळा होता म्हणून? नाही. तर त्या दशकात सर्वत्र खूप मोठी अस्थिरता होती. त्याला प्रतिसाद देत तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर डाव्या विचारांकडे वळली होती. डाव्या विचारांच्या प्रसाराचा व भांडवलशाही अरिष्टांचा खूप जैव संबंध आहे. आणि भांडवलशाही समाजवादी विचारांना आकर्षक बनवण्याचं काम स्वतःच करत आहे. अगदी होमवर्क करून, मन लावून काम करत आहे.
पण या काही अशा उद्या, परवा होणाऱ्या गोष्टी नव्हेत. पिढ्यान पिढ्या जातात, मूलभूत सामाजिक, राजकीय बदल होण्यास. त्याला काही गणितदेखील नाही. मग तोपर्यंत काय करायचं?
तोपर्यंत ‘मनुष्यकेंद्री’ समाज निर्मितीची स्वप्नं पाहण्याची माणसांची, विशेषत: तरुणांची सवय तगवून ठेवली पाहीजे. त्या स्वप्नांच्या ज्योती, कितीही क्षीण झालेल्या वाटल्या तरी, तशाच तेवत ठेवत मागच्या पिढयांनी पुढच्या पिढ्यांच्या हातात सोपवल्या पाहिजेत. पुढच्या पिढ्या आपले मार्ग स्वतः शोधतील. आपले मार्ग स्वत: शोधून काढण्याच्या तरुणांच्या कुवतीवर मोठ्यांनी विश्वास दाखवला पाहिजे.
‘ऑक्टोबर क्रांती’चं नक्की काय झालं? कोठे चुकले? त्यातून काय शिकता येईल याचा अभ्यास जरूर केला पाहिजे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे ऑक्टोबर क्रांतीमागचं स्पिरीट जिवंत ठेवणं. त्यासाठी ‘युटोपिया’ जिवंत ठेवला पाहिजे! युटोपिया = आज अशक्यप्राय व स्वप्नील वाटणाऱ्या कल्पनांचं बोट न सोडणं. मग कालांतरानं त्या कल्पनाच आपल्या हाताला घेऊन त्या मार्गावरून चालवतात.
स्वप्नं बघणं ही मानवी जीवनाच्या प्रगतीची ढकलशक्ती आहे. नाहीतर खाणं-पिणं, शरीरधर्म उरकणं, पिल्लांना जन्माला घालणं हे तर कीडा-मुंगीपासून सर्वच प्राणी जगत लाखो वर्षं करतच आहेत की!
तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा नसा. तुम्ही डावी विचारसरणी मानत असा किंवा नसा. तुम्ही जर स्वप्न पाहणारे असाल तर २५ ऑक्टोबरच्या निमित्तानं स्वप्ने पाहण्याची सवय, मोठी स्वप्नं पाहण्याची सवय जिवंत ठेवण्याचा, तरुणांना स्वप्नं पाहताना ‘आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ असं आश्वस्त करण्याचा संकल्प करू या!
.............................................................................................................................................
लेखक संजीव चांदोरकर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.
chandorkar.sanjeev@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 04 November 2017
मार्क्सला भारत नामे देशाची अखंडता मान्य नाही. म्हणूनंच डावा विचार हे एक थोतांड आहे. -गामा पैलवान
Amol Yadav
Tue , 31 October 2017
लेख छान पण क्रांती ही रशियन कॅलेंडरनुसार 25 ऑक्टोबर 1917 ला झाली असली तरी ग्रेगेरीयन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर 1917 ला झाली त्यामुळे 7 नोव्हेंबर 2017 रोजी तिला 100 वर्ष पूर्ण होतील..