अजूनकाही
परवा डोंबिवली मुक्कामी राज ठाकरे यांनी एक सार्वकालिक सत्य सांगितलं. ते म्हणाले, ‘विरोधी पक्ष कधीच जिंकत नसतो, तर सत्ताधारी पक्ष हरत असतो!’ (यात त्यांचा नाशिकचा स्वानुभवही असावा.)
राज ठाकरे यांचं हे विधान पटण्याजोगं आहे. त्यामुळे त्यांच्यासह, काँग्रेसनंही २०१४ला भाजपचा विजय नाही झाला, तर आपला पराभव झाला हा सिद्धान्त पकडून पराभवाकडे पाहायला हवं. शत्रूचा विजय मान्य करण्यापेक्षा स्वत:चा पाडाव कबूल करणं, स्वीकारणं अधिक सोपं व कमी मानहानीकारक असावं.
पण राज ठाकरे यांच्या चिंतनाचा धसका मोदी सरकार, भाजप आणि रा.स्व.संघ यांनी घेतलेला दिसतो. विशेषत: गुजरात निवडणुकीसाठी तरी. नेहमीप्रमाणे दोन-चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात, पण चर्चा फक्त गुजरातची!
त्याला कारणही तसंच! सलग १२ वर्षं एकहाती सत्ता राबवून नरेंद्र मोदी २०१४ साली देशभर न भूतो न भविष्यती असा विजय संपादन करून पंतप्रधान बनले. निवडणुका एनडीए म्हणून लढवल्या असल्या तरी दिल्लीत आलं ना एनडीएचं सरकार, ना भाजपचं सरकार, तर मोदी सरकार!
गेल्या तीन वर्षांत या आत्मकेंद्री नेतृत्वानं भारतीय राजकारणात नुस्ता धुमाकूळ घातला, काँग्रेससहित सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाचोळा केला. विक्रमी परदेश दौरे, परदेशातले प्रायोजित स्टेज शो, देशात जवळपास रोज नव्या योजनेची घोषणा, शिलान्यास, लोकार्पण, अगदीच नाही तर पाश्चात्य पद्धतीचे कसले ना कसले ‘डे’ज मोठ्या प्रमाणावर साजरं करणं. (पूर्वी हेच ‘डे’ज भाजपसहित रा.स्व.संघ व तत्सम हिंदुत्ववाद्यांना सांस्कृतिक आक्रमण वाटायचं! पण आता नवहिंदुत्ववाद्यांप्रमाणे तेही औक्षण करून केक कापायला शिकलेत!) आणि जोडीला निमित्त शोधून भाषण झोडणं. तेही नसेल तर रेडिओवर नियमित हजेरी लावणं!
गोबेल्स पद्धतीचा प्रपोगंडा हे रा.स्व.संघाचं लाडकं मॉडेल. मोदींनीही त्याचाच उपयोग केला. फरक इतकाच की, रा.स्व.संघ हा प्रपोगंडा अधिकतर कुजबूज आघाडी स्वरूपात किंवा फाजील विधानं करून ध्रुवीकरणावर भर देत करतो. मोदींनी त्याला उत्सवी स्वरूप दिलं. सामूहिक स्वच्छता, योग, राष्ट्रगान, रांगोळ्या, दिवे लावणं, पूजा आरत्या करणं, सांस्कृतिक मिरवणुका काढणं, हे सगळं याचाच भाग. हे करताना मोदी आणि कंपनीनं आणखी एक उद्योग केला.
तो असा की, जे यात सामील झाले नाही, किंवा ज्यांनी विकास कामं व याचा परस्पर अथवा पूरक संबंध काय, असे प्रश्न विचारले किंवा ज्यांनी त्याची निरुपयोगीता दाखवत थेट विरोध केला त्यांना टीकाकार, विरोधक न म्हणता थेट ‘देशद्रोही’ ठरवलं. त्यामुळे मग अनुपम खेरसारखे व्यावसायिक नटही ५२ सेकंदांची राष्ट्रभक्ती शिकवू लागले… जी आजवर त्यांनी कधीच शिकवली नव्हती अथवा त्यासाठी कुठले सांविधानिक प्रयत्न केले नव्हते.
पण शेवटी ढोल वाजवणार किती? ताशे तडतडणार किती वेळ? तुताऱ्या फुंकणार तरी किती दिवस? कारण ही सगळी वातावरण निर्मितीची साधनं! प्रत्यक्ष वातावरण नाही. ‘लग्न’ न लावताच दिवसभर सनई चौघडा वाजवला म्हणजे ‘लग्न झालं’ असं म्हणत नाहीत. प्रत्यक्ष लग्न लागायला लागतं. मोदी सरकारचं हेच झालं. वातावरण निर्मिती तर दमदार झाली. प्रसंगी कल्पकही. त्या भारलेल्या अवस्थेचं चेटूक एक, दोन नाही तर तब्बल तीन वर्षं टिकलं! पण तीन वर्षानंतर पिपाण्यांचा सूर पिचू लागला, ढोलांचं चामडं उतरलं, ताश्यांना थंडाईची जाणीव झाली. भव्य, नटलेला, थटलेला मांडव असला तरी त्यात कार्य न होता नुस्तंच ताटकळायला लागलं, तर मांडवाची शोभाही जाते आणि प्रयोजनही!
तीन वर्षानंतर इंजेक्ट केलेला राष्ट्रभक्तीचा ज्वर ओसरू लागला. खूप गोष्टी रोज सांगितल्या जात होत्या. आजही सांगितल्या जातात, पण त्याची सत्यता, वास्तविकता, सचोटीनं तपासली तर हाती शून्य लागतं. आणि ते शून्य जनतेला दिसू लागलं. विशेषत: नोटबंदीचा हडेलहप्पी निर्णय आणि जीएसटीची अपुऱ्या तयारीनिशी केलेली आत्मघातकी सुरुवात.
पैकी जवळपास वर्षभर कोंबडं झाकून ठेवल्यावर शेवटी रिझर्व्ह बँकेनं नोटाबंदीचा जो तपशील जाहीर केला, त्यातून ना काळा पैसा सापडला, ना बनावट नोटा बनायचं थांबलं, ना सीमेवरचे हल्ले थांबले, ना नक्षलवादी कारवाया. पण ‘गिर जाए तो भी टांग उपर’ या उक्तीनं आणि गोबेल्स नीतीनं, किती नवीन बँक खाती उघडली आणि किती नवीन कर भरणारे वाढले, यांच्या आकडेवारीच्या पताका फडकवल्या गेल्या. हे म्हणजे सामना हरला तरी शेवटच्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाली आणि हा एक रॅकॉर्ड आहे, असं सांगण्यासारखंच झालं!
हीच गोष्ट जीएसटीची. नेहरूंनी रात्री १२ वाजता ‘नियतीशी करार’ हे ऐतिहासिक भाषण केलं, त्याचा प्रभाव पुसण्याचा केविलवाणा प्रकार म्हणजे जीएसटी रात्री १२ वाजता समारंभपूर्वक लागू करण्याचा. तिथंही अर्थमंत्र्यांच्या ‘अर्थपूर्ण’ भाषणानंतर मोदींना स्वत:चं भाषण ठोकण्याचा आणि शाब्दिक कोट्या करण्याचा मोह आवरला नाही. मंत्रिमंडळात आपणच सर्वोच्च हे किती वेळा ठसवायचं? का सहकाऱ्यांचा उत्कर्ष, स्वतंत्र व्यक्तित्व सहन होत नाही? का हीच ती भाजपअंतर्गत लोकशाही? माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच!
या घिसाडघाईनं साधलं काय? तर नोटाबंदीत जसं रिझर्व्ह बँकेनं विक्रमी अध्यादेश काढले, तसेच जीएसटी कररचनेची दर महिन्यालाच पुनर्रचना होतेय. ते करूनही त्रुटी राहतात आणि मग त्रुटी दूर करायला पुन्हा फेररचना. ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे, ऑफ ऑफ ब्रॉडवे त्याप्रमाणे जीएसटीची फेररचना, फेर-फेररचना आणि फेर फेर–फेररचना चालूच आहे. तिला कधी पूर्णविराम मिळेल माहिती नाही. अशा प्रकारे दोन तुघलकी निर्णयांनी अर्थव्यवस्थेची वाट लागली आणि गर्भवतीचं पोट चार महिन्यानंतर जसं झाकलं जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे जीडीपी, गुंतवणूक, रोजगार यांची वजाबाकी त्या त्या संस्थांकडून झळकू लागली. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे त्याची तुलना मागच्या ६० वर्षांशी नाही, तर २०१४-१५, २०१५-१६ या वर्षांशीच केली तरी हाती काही लागत नाही.
तीन वर्षांत प्रसार-प्रचार माध्यमांना बटिक केलं होतं आणि सोशल मीडिया मोकाट सोडला होता. या आक्रमक सोशल मीडियानं विरोधक जवळपास जायबंदी झाले होते. पण तीन वर्षांनंतरही पारंपरिक माध्यमं बटिकपणातून बाहेर पडण्यास तयार होईनात, तेव्हा मग विरोधकांनी सोशल मीडियाच्या वळूलाच वठणीवर आणून, त्याला उलट दिशेनं पळवायचा शिकारी सावधपणा अंगी बाणवला. त्याचा फायदा होऊन ‘वळू’ हाताशी लागला. मग त्याला शिंगाला धरून असा फिरवला की, तो उलट्या दिशेनं पळत सुटला आणि मग गोबेल्सच्या चेल्यांची तंबूत घबराट झाली. वळू जितक्या वेगानं पुढे गेला होता, त्याच्या दसपट वेगानं उलटा यायला लागल्यावर आतापर्यंत टाळ्या पिटणाऱ्यांची फे फे झाली. आता वळूचे फुत्कार डसू लागले. उडालेला धुरळा डोळ्यात खुपू लागला आणि बघ्यांच्या गर्दीनं तोंड फिरवलं, तेव्हा तर डोळे पांढरे झाले!
याची पहिली प्रचिती आली ती नेहमीप्रमाणे जवानांसोबत दिवाळी साजरी करायला गेलेल्या प्रधानसेवकांना. तिथं नेहमीप्रमाणे त्यांनी शब्दांच्या हुकमी कसरतीनं सुरुवात केली, पण खेळ नमनालाच पडला! संपूर्ण भाषणभर जवान पुतळ्यासारखे स्तब्ध होते, ना त्यांच्या हातांनी टाळी वाजली, ना त्यांचे डोळे पाणावले, ना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. (यावेळी शिताफीनं त्यांचे चेहरे कॅमेऱ्यानं टिपलेच नाहीत, पण त्यांच्या दगडी पाठी बोलक्या होत्या!) प्रधानसेवकांनी सगळी हुकमी शब्दास्त्रं फिरवून पाहिली. पण बर्फ वितळेना! शेवटी ‘जय हिंद’चा जोरदार प्रतिसाद (संपलं भाषण म्हणून?) वगळता बाकी सारा न रंगलेला प्रयोग.
दरम्यान दिवाळी शांतच गेली. शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे उद्योग… सर्वांतच अस्वस्थता. आणि गुजरातमध्ये तर यांचा समुच्चय होऊन त्यात जात राजकारणाची भर पडली आणि ‘विकास गांडो’ ठरलाच, पण नेहमीचा हिंदू-मुस्लीम मुद्दाही अडगळीत गेला. इभ्रतच पणाला लागली, तेव्हा निवडणूक आयोग धावून आला. तेवढ्यात विक्रमी दौरे, शिलान्यास आणि लोकार्पणं झाली. आता तीन वर्षानंतरही प्रधानसेवक ६० वर्षांचं काँग्रेस राज्य आणि त्यांची घराणेशाही यातच गुंतून पडलेत.
एका बाजूने १२ वर्षांतल्या गुजरात मॉडेलचा उदोउदो करायचा आणि त्याच वेळी या १२ वर्षांत केंद्रातल्या काँग्रेसनं कशी कोंडी केली म्हणून गळा काढायचा! मग खरं काय? विकास का कोंडी? आणि गेली तीन वर्षं तर भरभक्कम सरकार दोन्हीकडे. तरी मग निवडणुकीआधी महिन्यातून तीनदा का भेट घ्यावी लागते? सोशल मीडियावर आता पोलिस का?
एक करंगळीएवढा मुलगा पंतप्रधानांना हुबेहूब रंगवतो काय आणि बटिक मीडिया त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवतो? राजस्थानात वसुंधरा राजे भुईकोट किल्ले उभारतात कायद्याचे आणि रमणसिंग पत्रकाराच्या मुसक्या आवळतात! महाराष्ट्रात व्हॉटसअॅप मानवेनासं होतं आणि पोलीस कामाला लागतात!
‘शोले’मधला गब्बर म्हणतो- ‘जो डर गया, समझो मर गया!’ तर मोदींच्या करिष्म्यासमोर पाचोळा झालेले विरोधक मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही तसं उभं राहू लागले आणि मोदींसकट भाजप आणि रा.स्व.संघ भंजाळले.
त्यामुळे पुन्हा राष्ट्रगीत, राममंदिर, ताजमहाल हे पोतडीतले साप बाहेर निघू लागलेत! या सर्व धावपळीत फार काही विशेष न करता राहुल गांधी यांची प्रतिमा उजळत गेली.
भंजाळलेल्या भाजप व मोदींनी धूळ आरशावर नाही, चेहऱ्यावर आहे हे ओळखावं आणि राहुल गांधींचा आरसा स्वच्छ म्हणून त्यावर धूळ उडवायचे उद्योग थांबवावेत. नाहीतर बाकी कुणाचे नाही तरी राहुल गांधीचे ‘अच्छे दिन’ सुरू होतील...
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Akshaya A
Tue , 31 October 2017
खांग्रेसकडून महिनाअखेरिस 'पाकीट'(!) आले की त्या आनंदात काही जणांची अवस्था BJP,RSS ला किती शिव्या देऊ न किती नको अशी होते..असू दे बरयाच जणांचे पोट व घर अश्या पाकिटांवर चालते त्यामुळे ऊगाच एखाद्याचे दाणापाणी बंद होऊ दे अशी इच्छा करणे योग्य नाही.पण हे भाडोत्री टिकाकार बरेचदा जुनेच आरोप करतात. म्हणजे BJP जातियवादी, गोबेल्स प्रचार करतात वगैरे वगैरे.. अरे पैसे घेता मग लिखाण तरी चोख द्या उगाच घिसेफिटे लिखाण करायचे. आणि या लोकांना सगळ्या क्षेत्राचे ज्ञान असते म्हणजे तसे दाखवायचा यांचा प्रयत्न असतो. म्हणजे यांचे कार्यक्षेत्र एक असले तरी सगळ्या विषयावर म्हणजे राजकारण, क्रिकेट, संप, समाजकारण वगैरेवर हे ओकल्याप्रमाणे ज्ञान(?) पाजळतात. कदाचित स्वत:च्या क्षेत्रात हे लोक अपयशी ठरल्याने (गुणवत्ता नसल्याने) व त्या क्षेत्रातली मंडळी ह्यांना हिंग लावून पण विचारत नसल्याने, न्यूनगंडामुळे हे लोक इतर विषयात आपल्याला कशी गती आहे ह्याचा आव आणत असावे. पण लोक हुशार असतात ते भाडोत्री टिकाकारांना ओळखतात आता. अर्थात हे माझे आॅब्सरवेशन आहे मी कोणा एका लेखकाबद्दल बोलत नाही
ADITYA KORDE
Tue , 31 October 2017
good article 'bjp'ians must read think and act....