अजूनकाही
आल्फ्रेड हिचकॉकचा ‘द बर्ड्स’ आठवतोय? हिचकॉकच्या कारकिर्दीच्या अखेरच्या दशकातील मोजक्या ग्रेट सिनेमांपैकी ‘द बर्ड्स’ हा एक भन्नाट सिनेमा होता. चित्रपट सुरू होतो एक प्रेमकथा म्हणून. साधारण अर्धा अधिक चित्रपट प्रेमकथेच्याच ट्रॅकवरून चालत राहतो आणि नंतर अचानक ट्रॅक बदलून तो हिचकॉकच्या सुप्रसिद्ध भय वा रहस्यमयतेकडे वळतो.
‘द बर्ड्स’च्या दोनच वर्षं आधी आलेल्या ‘सायको’मध्येदेखील हिचकॉकनं अशीच गंमत केली होती. सुरुवातीच्याच प्रसंगात नायिका तिच्या कंपनीतील ४० हजार डॉलर घेऊन पळ काढते. आपल्याला वाटतं चोरीचा मामला आहे. चोर-पोलिस कथानक आहे. पण थोड्याच वेळात नायिकेचाच रहस्यमय पद्धतीनं खून होतो आणि तिथून चित्रपट वेगळ्याच ट्रॅकवर जातो.
क्वांटिन टॅरँटिनो आणि रॉबर्ट रॉड्रिगेज या जोडगोळीच्या ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ या चित्रपटाची गतही काहीशी अशीच आहे. सेठ गेको (जॉर्ज क्लूनी) आणि रिचर्ड गेको (टॅरँटिनो) हे दोघे बंधू बँक लुटून मेक्सिकोच्या दिशेनं निघालेत. पोलिस आणि एफबीआय त्यांच्या मागावर आहेत. बँकेतली एक महिला कारकून त्यांच्या ताब्यात आहे. मेक्सिकन सीमेनजीकच्या वाळवंटी प्रदेशात एका लीकर शॉपमध्ये ते शॉप मॅनेजरचा आणि एका पोलिसाचा खून करतात, शॉपला आग लावतात आणि तिथून पुढे निघतात. पुढच्याच टप्प्यावर एक माजी पाद्री जेकब फुलर (हार्वी कायटेल), त्याचा मुलगा स्कॉट (अर्नेस्ट लिऊ) आणि मुलगी केट (ज्यूलिएट लुईस) यांच्याशी त्यांची गाठ पडते. जेकब आणि त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेऊन त्यांच्या गाडीतून मेक्सिकन बॉर्डर ओलांडण्याची योजना ते आखतात. त्यात यशस्वीही होतात. सीमा ओलांडल्यावर थोड्याच अंतरावर ऐन वाळवंटात असलेल्या ‘टिटी ट्विस्टर’ या स्ट्रिप क्लबमध्ये मेक्सिकोमधला त्यांचा काँटॅक्ट कार्लोस याला भेटायचं ठरलेलं असतं. तिथं हे सगळे पोहोचतात रात्री आणि कार्लोस भेटणार असतो सकाळी. या रात्रीत त्या बारमध्ये त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलेलं असतं, याची त्यांना सुतराम कल्पना नसते. तिथं त्यांचा सामना व्हँपायर्सशी होतो आणि मग एक धमाल सामना सुरू होतो. ‘आसमान से गिरे और खजूर पे अटके’, त्यातली गत होते. ‘Out of the stew pot and into the fire’- क्लबमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच जेकबनं उच्चारलेलं हे वाक्य तंतोतंत खरं ठरतं.
‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ हा टॅरँटिनो/रॉड्रिगेज जोडीचा भन्नाट चित्रपट आहे. ९०च्या दशकात या दोघांनी हॉलिवुडमध्ये कमर्शियल चौकटीत धमाल उडवून दिली होती. टॅरँटिनोचा ‘रिझर्व्हायर डॉग्ज’, ‘पल्प फिक्शन’ आणि रॉड्रिगेजचा ‘एल मारिआची’ आणि ‘डेस्परॅडो’ यांनी तरुण पिढीला अक्षरश: वेड लावलं होतं. अनेक उदयोन्मुख, धडपडे दिग्दर्शक टॅरँटिनो आणि रॉड्रिगेजसारखे चित्रपट बनवण्यासाठी धडपडत होते. नव्या पिढीचे हक्काचे दिग्दर्शक म्हणून अल्पावधीतच त्यांचं स्थान बळकट झालं होतं. दोघांची कारकीर्द एकाच टप्प्यावर पुढेमागे सुरू झाली होती. ‘फोर रूम’ या टॅरँटिनोच्या चित्रपटातली एक गोष्ट रॉड्रिगेजने दिग्दर्शित केली होती. त्याच्या पुढल्याच वर्षी ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’साठी दोघं एकत्र आले. टॅरँटिनोनं चित्रपटाची पटकथा लिहिली. त्यात एक प्रमुख भूमिकाही केली आणि रॉड्रिगेजनं हा चित्रपट दिग्दर्शित केला.
या दोघांच्या चित्रपटांत दिसणाऱ्या अनेक खाणाखुणा याही चित्रपटात आहेत. पॉप कल्चरचा सढळ वापर, ७० आणि ८०च्या दशकात लोकप्रिय झालेल्या बी ग्रेड चित्रपटांना आदरांजली वाहण्यासाठी तशा पद्धतीनं केलेली चित्रपटाची हाताळणी आणि कथानकापेक्षाही मांडणीला दिलेलं महत्त्व, ही सगळी वैशिष्ट्यं ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’मध्ये आहेत. टॅरँटिनोची सुप्रसिद्ध डायलॉगबाजीदेखील यात पुरेपूर आहे. पण चित्रपटाच्या मध्येच एक ज्यॉनर सोडून दुसरा ज्यॉनर पकडण्याचा प्रयोग कमाल आहे.
चित्रपट आहे साधारण पावणे दोन तासांचा. त्यापैकी पहिला एक तास गेको बंधूंची लुटालूट, खून, पोलिसांचा ससेमिरा चुकवत मेक्सिकोत पळून जाण्याची धडपड यावर खर्च होतो. टिपिकल क्राइम थ्रिलरच्या शैलीत हा एक तास उलगडतो. चोर-पोलिस कथानक असावं, असा आपल्याला फील येत राहतो. पण अद्याप पोलिसांच्या बाजूनं नायकसदृश कुठलीच व्यक्तिरेखा समोर आलेली नसते. गेको बंधूंना पहिल्या फ्रेमपासूनच उलट्या काळजाचे गुन्हेगार दाखवलंय. रिचर्ड (टॅरँटिनो) तर केवळ खुनीच नाही, तर सेक्स मॅनियॅक आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये विकृतीची झलक आहे. त्यामुळे हे दोघे चित्रपटाच्या कुठल्याच टप्प्यावर नायक होण्याची सुतराम शक्यता नाही. पूर्वार्धात त्यांच्याकडून इतकी कृष्णकृत्यं करवली गेली आहेत की, त्यांचे परतीचे दोर कधीच कापले गेलेत. त्यामुळे आता गेको बंधू आणि त्यांनी ताब्यात घेतलेलं फुलर कुटुंब यांच्यातल्या संघर्षाभोवतीच बहुदा पुढला चित्रपट फिरणार असं आपल्याला वाटतं. पण मेक्सिकोतल्या स्ट्रिप बारमध्ये पोहोचल्यानंतर चित्रपट आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा वेगळ्या वळणावर जातो. कथानक आमूलाग्र बदलतं.
या बदलाला कुठलंही लॉजिक नाही. असलाच तर एक प्रकारचा बेदरकारपणा आहे. व्यक्तिरेखांचा पोतच बदलणारा हा बदल आहे. फुलर कुटुंबाला ज्यांची क्षणभरही सोबत नकोय, कधी एकदा त्यांच्या तावडीतून सुटता येईल, असं त्यांना झालंय, अशा गेको बंधूंना वाचवण्याची जबाबदारी शेवटी जेकब फुलरवर येते. बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे देवावरचा विश्वासच उडून आपल्या पाद्रीपणातून मुक्त झालेल्या जेकबला देवावर विश्वास ठेवून अखेर स्वसंरक्षणासाठी हातात बंदूक घ्यावी लागते. एरवी संधी मिळताच गेको बंधूंचा खातमा करताना जेकबनं मागेपुढे बघितलं नसतं, पण आता त्यातल्याच सेठ गेको सोबत समोरच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी हातमिळवणी करण्याची वेळ त्याच्यावर येते. मारेकरी सेठला जेकबच्या दोघा मुलांचा संरक्षक बनावं लागतं. ज्याला आपण बंदुकीचं आणि मुलांच्या मृत्यूचं भय दाखवून ताब्यात ठेवलं, त्याच्याच नेतृत्वाखाली आपला जीव वाचवण्यासाठी सेठला धडपड करावी लागते.
शेवटचा हा पाऊण तास प्रचंड प्रमाणात रक्तपाताचा आहे. क्षणभरासाठीही विचार करायला उसंत मिळत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कथेचा ट्रॅक बदलण्यामागे काहीही लॉजिक नाही. व्हँपायर्स असतात का, समोर दिसणारा साधा माणूस अचानक व्हँपायर कसा बनू शकतो, वगैरे प्रश्नांना इथं बिलकुल थारा नाही. व्यक्तिरेखांनाही फारशी खोली नाही.
पूर्वी ड्राइव्ह इन थिएटरमध्ये ज्या प्रकारचे बी ग्रेडी मारधाडपट दाखवले जायचे, त्या जातकुळीतला हा चित्रपट आहे, पण हा ठरवून बनवलेला बी ग्रेडपट आहे. टॅरँटिनो/रॉड्रिगेज जोडीनं या चित्रपटानंतर १० वर्षांनी प्लॅनेट टेरर/डेथ प्रुफ हा आणखी एक बी ग्रेडी जोडपट बनवला होता, त्याचीही प्रेरणा असेच ड्राइव्ह इन थिएटरमधले बी ग्रेडपटच होते. पण ७०-८०च्या दशकातले हे बी ग्रेडपट आणि टॅरँटिनो/रॉड्रिगेज जोडीने बनवलेले बी ग्रेडपट यात असलेला मूलभूत फरक म्हणजे मूळचे बी ग्रेडपट तांत्रिकदृष्ट्या तोकडे, कमी बजेटचे, फारसे मेहनत न घेता, दुय्यम दर्जाचे कलावंत घेऊन घाईघाईत उरकलेले खरोखरीचे बी ग्रेडपट होते. या जोडगोळीचे बी ग्रेडपट ही त्या मूळ बी ग्रेडींना वाहिलेली आदरांजली होती. यांच्या चित्रपटांमध्ये अव्वल दर्जाचे नामांकित कलावंत, तांत्रिक सफाई, पुरेसं बजेट आणि मुख्य म्हणजे पुरेपूर कल्पकता ठासून भरलेली होती. चित्रपटाच्या प्रत्येक अंगावर भरपूर मेहनत घेतलेली होती. त्यामागे काही एक विचार होता. मग ते पार्श्वसंगीत असेल, स्पेशल इफेक्ट्स असतील किंवा संवाद असतील.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
संवादांमधून धमाल उडवून देण्यात टॅरँटिनो वाकबगार आहे. ‘फ्रॉम डस्क टिल डॉन'मध्येही अशा अनेक संवादांची पेरणी आहे. उदा. सुरुवातीच्या बँक रॉबरीच्या प्रसंगात (जो पडद्यावर कधीच दिसत नाही) जिला किडनॅप केलंय, तिला समज देताना सेठ तिच्या कपाळावर बंदूक टेकवून म्हणतो, ‘पळून जायचा चुकूनही प्रयत्न करू नकोस. नाहीतर माझ्याकडे तुझ्यापेक्षाही वेगानं पळणारे माझे सहा लहान मित्र आहेत,’ असे असंख्य संवाद ही टॅरँटिनोच्या चित्रपटांची एक ओळखीची खूण आहे.
जॉर्ज क्लूनीचा हा पहिला मोठा चित्रपट. तोवर टेलिव्हिजनवर स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या क्लूनीला निर्दयी गुन्हेगाराच्या रुपात बघणं हाच प्रेक्षकांसाठी मोठा धक्का होता. पण चित्रपटाच्या पूर्व प्रसिद्धीकडे फारसं लक्ष न देता थेट चित्रपट बघणाऱ्यांसाठी त्याहूनही मोठा धक्का चित्रपटाचा उत्तरार्ध हाच होता. स्वत: टॅरँटिनोनं क्लूनीच्या विकृत आणि काहीशा वेडसर भावाची भूमिका उत्तम रंगवली होती. ज्यूलिएट लेविस या गुणी अभिनेत्रीनंही केट फुलरच्या भूमिकेत ठसा उमटवला होता. ‘कॅलिफोर्निया’मधल्या ब्रॅड पिटच्या भोळसट प्रेयसीच्या भूमिकेत धमाल उडवून देणारी हीच ती अभिनेत्री.
टॅरँटिनोनं हा चित्रपट कसा लिहिला, याचीही एक गंमत आहे. चित्रपटाची कथा आहे रॉबर्ट कर्ट्झमनची. कर्ट्झमन हा खरं म्हणजे स्पेशल इफेक्ट्सचा तंत्रज्ञ. आपल्या ‘केएनबी’ या कंपनीला वाव मिळावा, यासाठी त्याला हा चित्रपट लिहून हवा होता. चित्रपटाच्या उत्तरार्धात स्पेशल इफेक्ट्स भरपूर प्रमाणात वापरण्याची सोय होती. टॅरँटिनोनं अवघ्या १५०० डॉलरच्या मोबदल्यात कर्ट्झमनला हा चित्रपट लिहून दिला. शिवाय, त्याबदल्यात कर्ट्झमननं टॅरँटिनोच्या रिझर्व्हायर डॉग्जमधला कान कापण्याचा प्रसंगही फुकटात करून दिला.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी फारसा चालला नाही. पहिल्या आठवड्यात तो अमेरिकेत सर्वाधिक गल्ला गोळा करणारा चित्रपट होता, पण नंतर त्याची घसरण सुरू झाली आणि दोन कोटी डॉलरच्या बजेटच्या तुलनेत त्याने जेमतेम अडीच कोटी डॉलरचा धंदा केला. पण आज चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ मानला जातो. चित्रपटात आशय वगैरे शोधायच्या भानगडीत पडाल तर वाट्याला निराशा येईल. पण चित्रपट तंत्राशी खेळत केलेला एक भन्नाट प्रयोग म्हणून ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ हा बहार उडवून देतो.
.............................................................................................................................................
ताजा कलम : हा चित्रपट बघण्यापूर्वी किमान तासभर काहीही खाऊपिऊ नका.
...........
विशेष सूचना : ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ बघण्यापूर्वी इंटरनेटवर त्याचं सविस्तर कथानक शोधून किंवा त्याचे रिव्ह्यू वाचण्याच्या भानगडीत पडू नका. थेट चित्रपटच बघा.
.............................................................................................................................................
लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment