अजूनकाही
१. नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्या निषेधार्थ अमेरिकेत सर्वत्र निषेध मोर्चे, ट्रम्प हे आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, अशा घोषणा देत हजारो नागरिक रस्त्यावर
अरे, लोकशाहीत राहायचं तर बहुमताच्या निर्णयाचा आदर करायला नको का? जरा शिका २०१४ नंतर घटनात्मक पदं आणि बहुमताचा आदर करायला शिकलेल्या आमच्या देशबांधवांकडून. त्यांना ते शिकायला ६० वर्षं लागली, म्हणून काय झालं!
..........
२. मोदी यांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची सूचना मीच केली होती, योगगुरू रामदेव बाबा यांचा दावा
अलबत्! पतंजलीचा नोटा छापायचा कारखाना एवढ्या पटकन् उभारला जाणार नाही आणि अमूलचं तूप पतंजलीच्या डब्यात भरून विकण्याची स्वदेशी व्यावसायिक चतुराई नोटांच्या बाबतीत चालणार नाही, म्हणून. नाहीतर या नोटाही तुमच्याच कारखान्यात छापून गोमूत्र शिंपडून बाजारात आल्या असत्या, यात शंका नाही.
..........
३. पुन्हा बाबा रामदेव : (पाचशे, हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द करण्याचा) एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.
बाबा, एक शब्दसमुच्चय फार उपयोगी पडतो अशी पसरट विधानं करताना… 'माझ्या माहितीनुसार', 'माझ्या आकलनानुसार' किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे 'माझ्या अल्पमतीनुसार'. तो वापरला की उगाच बेअब्रू होत नाही चारचौघांत.
..........
४. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अनियंत्रित असल्याचे प्रसारमाध्यमांनी समजू नये : ज्येष्ठ वकील उज्जल निकम
म्हणजे काय? बरोबरच आहे. दहशतवाद्यांना तुरुंगात बिर्याणी मिळते, अशा अनियंत्रित थापा मारून देशहित साधण्याचं उच्च नैतिक बळ असायला प्रसारमाध्यमं म्हणजे काय उज्वल निकम आहेत काय?
..........
५. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयानंतर कॅनडामध्ये स्थलांतराची माहिती घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढून कॅनडा इमिग्रेशनची वेबसाइट क्रॅश झाली.
...तरी कॅनडा शेजारी देश आहे आणि अमेरिकेइतकाच संपन्न आहे. ट्रम्पतात्यांनी निवडून येण्याआधी उधळलेल्या मुक्ताफळांवर कार्यवाही सुरू केली, तर काही दिवसांनी घाना, टोंगो, सोमालिया, बुरुंडी, नायजर आदी जगातल्या सर्वात गरीब देशांच्याही इमिग्रेशन वेबसाइट (असल्यास) क्रॅश होऊ लागतील.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment