‘अग्निपंख’ : वैचारिक, पण कर्कश नसलेलं नाटक
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘अग्निपंख’मधील बाईसाहेबांच्या काही मुद्रा
  • Sat , 28 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe अग्निपंख Agnipankh

प्र. ल. मयेकरांचं ‘अग्निपंख’ हे  १९८०च्या दशकात मराठी रंगभूमीवर सादर झालेलं नाटक आता हिंदी रंगभूमीवर गेलं आहे. ‘अग्निपंख’चा आशय तसा दाहक आहे. यात भारतीय समाजाच्या रोमारोमात भिनलेल्या जातिव्यवस्थेवर भाष्य आहे. मयेकरांचं खास कौतुक असं की, त्यांनी निःसंकोचपणे या नाटकात जातींचा उल्लेख केले आहेत. यात ब्राह्मण आहेत, मराठा आहेत. त्यांच्यातील ताणतणाव आहेत. याचा अर्थ हे नाटक फक्त जातिव्यवस्थेबद्दल आहे, असं नाही. यातील मध्यवर्ती सूत्र आहे - संरजामीशाहीचा अस्त आणि नव्या लोकशाही शासनव्यवस्थेचा उदय. या बदलांमुळे उदध्वस्त झालेली व्यवस्था आणि या बदलांना सामोरं जाताना जुन्या सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या मानसिकतेत करावे लागलेले बदल. या सर्व कारणांसाठी ‘अग्निपंख’ महत्त्वाचं ठरतं.

मयेकरांनी नाटकाचा काळ नुकतंच स्वातंत्र मिळाल्यापासून ते जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधींचा खून होर्इपर्यंतचा घेतला आहे. ही काळाची केलेली निवड अतिशय अचूक आहे. कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. हे फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हतं, तर महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर वगैरे महामानवांच्या अथक प्रयत्नांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबर समता, बंधुता वगैरे आधुनिक मूल्यं मान्य झाली होती. अर्थात ही मूल्यं भारतीय समाजातील सर्व वर्गांनी आणि सर्व वर्णांनी स्वीकारली होती, असं नाही. हा जो जुन्या व नव्या मूल्यांचा संघर्ष (व आजही होत आहे) झाला, तो नाटकाचा खरा आशय आहे.

महाराष्ट्रातील एक संस्थान जे ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे. तेथील जमीनजुमला, कर्जानं पैसे देण्याचे व्यवहार, कापडाची गिरणी वगैरे सर्व प्रकारच्या आर्थिक नाड्या एका ब्राह्मण कुटुंबाच्या ताब्यात आहेत. या कुटुंबाकडे हवेली आहे, प्रचंड दागदागिने आहेत. पण कुटुंबाच्या चाव्या बार्इसाहेब (मिता वशिष्ठ) यांच्या हातात आहेत. या जमीनदार कुटुंबाचे एकुलते एक वारस रावसाहेब (सत्यजित शर्मा) यांना आर्थिक व्यवहारांत काडीचा रस नाही. त्यांचं आयुष्य शिकार करणं, जुगार खेळणं, नायकिणींचं गाणं ऐकणं व मद्यपान करणं यात आरामात जात आहे.

नवरा असा असल्यामुळे बार्इसाहेब कंबर कसून सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेतात. पण अशी सत्ता आल्यावर अशा व्यक्तीत एक प्रकारचा कोरडेपणा येतो, तो बार्इसाहेबांमध्येही आलेला आहे. बार्इसाहेबांना एक मोठा मुलगा (प्रसाद जावडे) व एक मुलगी (रक्षा शेट्टी ) आहे. दोघेही मुंबर्इला उच्चशिक्षण घेत असतात. बार्इसाहेब जमिनीचा एक मोठा तुकडा विकून मुंबर्इच्या एका गिरणीत भागीदारी घेण्याच्या गडबडीत असतात. या प्रसंगावर नाटकाची सुरुवात होते.

पहिल्या प्रसंगापासून नाटककारानं बार्इसाहेबांचं करडं, काहीसं गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व रंगवलं आहे. पहिल्या प्रसंगात बार्इसाहेब कागदपत्रं वाचत असतात, थोड्या वेळात रावसाहेब झिंगत झिंगत येतात. हातात गजरा, पोटात भरपूर मद्य वगैरेंमुळे हा गृहस्थ कोठून आला असेल याचा बार्इसाहेबांना आणि प्रेक्षकांना अंदाज येतो. बार्इसाहेब त्यांना नव्या व्यवहाराचे कागदपत्रं दाखवतात, रावसाहेब ती न वाचता त्यावर सही करतात. या पहिल्या प्रसंगातूनच दोघांमधील संबंध कसे आहेत याचा अंदाज येतो.

बार्इसाहेबांना त्यांच्या हेराकडून समजतं की, त्यांची मुंबर्इला शिकणारी मुलगी नाटकात काम करायला लागली आहे. महाविद्यालयातील या नाटकाचा नायक गावातील एका गरीब मराठा समाजातील मुलगा (सुमुखा) असतो. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असंही बार्इसाहेबांना कळतं. ती तडकाफडकी कारभाऱ्याला सांगून मुलीला बोलावून घेते. येथून नाटक पकड घ्यायला लागतं.

बार्इसाहेब मुलीच्या प्रियकराला बोलावून घेतात आणि गिरणीत नोकरी देण्याचं आमिष दाखवतात. हा मुलगा म्हणजे हवेलीवर पिढ्यानंपिढ्या राबणाऱ्या कुटुंबाचा आजचा प्रतिनिधी. त्याला आधुनिक मूल्यं माहिती असतात आणि तो या गुलामगिरीत पडणार नसतो. बार्इसाहेब स्वतःची सर्व ताकद वापरून त्याला स्वतःच्या मुलीपासून दूर करतात. त्यासाठी बार्इसाहेब हवेलीची मनोभावे सेवा करणाऱ्या त्याच्या वडिलांना रघूला (सोमेश अगरवाल) ताबडतोब नोकरीवरून काढतात. रावसाहेब त्या नोकराच्या बाजूनं रदबदली करतात, पण बार्इसाहेबांवर त्यांचं काही चालत नाही. त्यांच्या हातातील हुकूमाचा एक्का म्हणजे, मग तुम्हीच इस्टेटीचे आर्थिक व्यवहार सांभाळा, जे रावसाहेबांना मुळीच जमणार नसतं.

आपलं प्रेम मोडायला लावल्याबद्दल मुलगी चिडून बार्इसाहेबांना सांगते की, तिच्या भावानं मुंबर्इला गुपचूप लग्न केलं आणि आता तो पत्नीसह (गुल्की जोशी) दक्षिण भारतात हनिमून साजरा करत आहे. मुख्य म्हणजे त्याची पत्नी कायस्थ आहे, ब्राह्मण नाही. बार्इसाहेबांसाठी हा मोठा धक्का असतो. बार्इसाहेब कशीबशी वेळ मारून नेतात, पण त्या आतून खचतात. त्यांच्याच मुलानं जिथं त्यांची मूल्यं पायदळी तुडवली, तिथं इतरांचं काय? काही काळानंतर त्यांचा मुलगा व त्याची कायस्थ पत्नी हवेलीवर येतात. सून जरी कायस्थ असली तरी तिचे वडील आयसीएस अधिकारी असतात आणि एका संस्थानाचे दिवाणही. यातून नाटककार आधुनिक भारतातील नव्या सत्तास्थानांकडे बोट दाखवतो. तरीही बार्इसाहेब सुनेच्या वडिलांना ‘नोकरी करणारा’ म्हणून हिणवतातच आणि सुनेला ‘आमच्या सात पिढ्यांत कोणी नोकरी केली नाही’, ‘आम्ही ब्राह्मण जमीनदार आहोत’ वगैरे म्हणत तिचा पदोपदी अपमान करतात.

हवेलीवर हे ताणतणाव असताना बार्इसाहेबांच्या गावातल्या गिरणीत संप सुरू होतो. त्याचं नेतृत्व तो गरीब मराठा समाजातील तरुण करत असतो. तो जेव्हा पगारवाढीची अव्वाच्या सव्वा मागणी करतो, तेव्हा मात्र रावसाहेब त्याला सांगतात की, ज्या सुभानरावांच्या चिथावणीनं तो अशा मागण्या करत आहेत, तो त्याच्या कामगारांना किती पगार देतो हे बघून ये. ही वस्तुस्थिती बघून तो तरुण हबकतो.

एव्हाना नाटक टिपेला जातं. नंतरची अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत महात्मा गांधींचा झालेला खून आणि त्यानंतर ब्राह्मणांविरुद्ध झालेले दंगे. ही आग बार्इसाहेबांच्या हवेलीपर्यंत येते. हा प्रकार कुठपर्यंत आला आहे, हे बघण्यासाठी बार्इसाहेब मुलाला पाठवतात. तो ही संधी साधून आर्इ-वडील, पत्नी, बहीण सर्वांना सोडून मुंबर्इला पळून जातो. बार्इसाहेबांसाठी हा फार मोठा धक्का असतो- आपल्या पोटी आलेला मुलगा असा पळपुटा निघावा? त्यांची सून मात्र हवेलीतच राहते, बार्इसाहेबांच्या मदतीला. यातील विसंगती उघड असते.

दंगेखोर हवेलीपर्यंत येतात, गावात जाळपोळ सुरू झालेली असते. बार्इसाहेब सर्वांना हट्टानं हवेलीबाहेर जाण्यास भाग पाडतात. त्यांच्या हुकूमानुसार सर्व जातात, रावसाहेब मात्र जात नाही. दोघेही शांतपणे विनाशाला सामोरे जातात, या विश्वासासह की आपण फिनिक्स पक्षासारखे राखेतून पुन्हा निर्माण होऊन त्याच बळानं व त्याच दिमाखानं आकाशात उडणार आहोत. इथं नाटक संपतं.

‘अग्निपंख’चा प्रयोग एवढा देखणा होतो की, विचारता सोय नाही. यातील कलाकारांचं यथोचित कौतुक झालं पाहिजे. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची आहे. त्यांनी बार्इसाहेब, रावसाहेब व आधुनिक विचारांच्या त्यांच्या सुनेचे पोशाख इतके अचूक केले आहेत की, तो काळ, ते वातावरण केवळ कपड्यांतून उभं राहतं. नेपथ्यकार अजित दांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर असलेल्या काळातील एका ब्राह्मण जमीनदाराचा वाडा सर्व बारीक तपशिलांसह उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी रंगमंचाचा खुबीनं वापर केला आहे. रंगमंचाच्या पुढच्या भागात दिवाणखाना आहे, जिथं महत्त्वाचे प्रसंग व वादविवाद होतात. डाव्या कोपऱ्यात बार्इसाहेबांचं टेबल आहे, जिथं बसून त्या महत्त्वाची कागदपत्रं वाचतात, त्यावर निर्णय घेतात. उजव्या कोपऱ्यात थोडीशी बाल्कनी आहे, तिथून बाहेरची दृश्यं दिसतात. दिवाणखान्यातील झुंबरांमुळे जमिनीदारी वातावरण ठळक होतं. ‘अग्निपंख’सारख्या अनेक प्रसंग असलेल्या नाटकात प्रकाशयोजना अतिशय महत्त्वाची असते, जी भूषण देसार्इ यांनी सांभाळली आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

नाटकात बार्इसाहेबांची मध्यवर्ती भूमिका मिता वशिष्ठ यांनी साकारली आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपैकी ही भूमिका जास्त महत्त्वाची समजली पाहिजे. इथं त्यांनी बार्इसाहेबांसारखी गुंतागुंतीची व्यक्तीरेखा साकार केली आहे. मुळात कोमल मनाच्या बार्इसाहेबांना अनेकदा पतीशी वाद करावे लागतात. त्या ते तितक्याच हिरीरीनं घालतात व जिंकतात. हा सर्व परस्परविरोधी भावना मिता वशिष्ठ यांनी लिलया सादर केल्या आहेत. त्यांना तितकीच सुरेख साथ रावसाहेबांच्या भूमिकेत असलेल्या सत्यजित शर्मा यांनी दिली आहे. व्यसनी असला तरी मुळात दिलदार रावसाहेबांना अनेक प्रसंगी बार्इसाहेबांची दादागिरी, क्रौर्य मान्य नसतं, पण ते हतबल असतात. ती शर्मा यांनी अचूक व्यक्त केली आहे. व्यसनी असले तरी रावसाहेब मूर्ख नसतात. ज्या प्रकारे ते कामगार नेत्याशी वाटाघाटी करतात, तेव्हा जाणवतं की त्यांना मुळात योग्य समज आहे, पण व्यसनांपोटी त्यांनी यात लक्ष घातलेलं नाही. तिसरा विशेष उल्लेखनीय अभिनय बार्इसाहेबांची सून झालेल्या गुल्की जोशी यांचा आहे. सूनबाई सतत बार्इसाहेबांची वाद घालत असतात आणि त्यांच्या अधिकारांना आव्हान देत असतात. बार्इसाहेब व सूनेतील प्रसंग नाटकातील संघर्ष अधोरेखित करतात.

दिग्दर्शक गणेश यादव यांनी एक सर्वांगसुंदर प्रयोग सादर केला आहे. यातलं मोठं यश त्यांच्या कास्टिंगला आहे. बार्इसाहेब झालेल्या मिता वशिष्ठ आणि रावसाहेब झालेल्या सत्यजित शर्मा यांनी संरजामशाही वातावरणातल्या जमीनदार व्यक्ती फार सफार्इनं आणि सहजतेनं उभ्या केल्या आहेत. सत्यजित शर्मांच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वानं भूमिकेत रंग भरले आहेत. गुल्की जोशीनं आधुनिक विचारांची तरुणी तितक्याच ताकदीनं उभी केली आहे. जेव्हा कास्टिंग योग्य असतं, तेव्हा दिग्दर्शक अर्धी लढार्इ जिंकलेला असतो. गणेश यादव यांनी हे साधलं आहे. शिवाय त्यांनी नाटकातल्या इतर महत्त्वाच्या घटकांचा योग्य वापर केला आहे. परिणामी, ‘अग्निपंख’ एक प्रसन्न अनुभव ठरतो.

नाटककार मयेकर यांनी या नाटकात योग्य वैचारिक तोल साधला आहे. अशा नाटकात नायक विरुद्ध खलनायक असा बटबटीत संघर्ष उभारण्याचा मोह होणं स्वाभाविक असतं, पण मयेकरांनी कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. या संदर्भातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, रावसाहेब आणि कामगार संघटनेचा तरुण नेता यांच्यातला वादविवाद. अशा बारकाव्यांमुळे ‘अग्निपंख’ वैचारिक असूनही कर्कश होत नाही.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Nilesh Pashte

Fri , 10 November 2017

testing date on comments


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख