‘दंशकाल’ - रहस्य, भीतीच्या पलीकडे जात समग्र मानवी आयुष्य कवेत घेणारी कादंबरी
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
स्वप्निल शेळके
  • ‘दंशकाल’ या ऋषिकेश गुप्ते यांच्या कादंबरीची मुखपृष्ठं
  • Fri , 27 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama बुक ऑफ द वीक दंशकाल ऋषिकेश गुप्ते राजहंस प्रकाशन

‘दंशकाल’ ही ऋषिकेश गुप्तेची कादंबरी मूल मानवी प्रवृतींना भिडते. समोरासमोर. चिकित्सक पद्धतीनं आणि तेही रंजक घाट वापरून. लेखकाला जी गोष्ट सांगायची आहे, तीच गोष्ट सांगून! हे तिचं यश आहे. म्हणूनच तिचं मुक्त कंठानं सामान्य वाचक म्हणून आपण कौतुक केलं पाहिजे.

‘दंशकाल’ला मी तरी रहस्यकथा, गूढकथा असल्या ठोकळेबाज वर्गीकरणात बसवणार नाही.

‘दंशकाल’ ही स्वतःवर विश्वास असणारी कलाकृती आहे. ऋषिकेशला जी गोष्ट सांगायची आहे, ती तो सांगतो आहे. कुठलाही संवेदनशील वाचक त्या गोष्टीतल्या सापेक्ष संदर्भांना पुसून अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला लागत असतोच. शेवटी गोष्टीत दम असेल, तर ते बोलणं अंतिमतः राजकीय होणारच असतं. मुळात ‘अराजकीय’ असं काहीच नसतं, पण केवळ ‘संसदीय’ तेच राजकीय अशी सवय लागल्यावर काय बोलणार! परंतु यामुळे होतं असं की, या अनागोंदीचा स्पष्ट आणि थेट सामना (केवळ कागदावर) ‘न’ करणारी कलाकृती जुनाट, बुरसट किंवा इतर काही विशेषणांनी दाबली जाऊ शकते. ‘दंशकाल’बाबतीत हे होऊ नये, असं वाटतं.

आधी एक मुद्दा स्पष्ट केला पाहिजे. ही माझी प्रतिक्रिया आहे. ही समीक्षा वा परीक्षण नाही. यात तौलनिक विचार केलेला नाही. केवळ माझ्या अनुभवावर, आजवरच्या थोड्याफार वाचनावर आणि सध्याच्या मनःस्थितीवर ही प्रतिक्रिया उभी आहे. ती देण्याआधी मी ही पूर्ण कादंबरी दोनदा वाचली आहे. त्यातले काही भाग त्यापेक्षा जास्त म्हणजे तीन-चार वेळा वाचले आहेत.  

‘दंशकाल’मधलं भूगाव हे कोकणातलं गाव. त्या गावच्या देशमुख कुटुंबाचा वारस असलेल्या आणि सध्या मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या नानूच्या प्रथम निवेदनातून ही कादंबरी उलगडत जाते. वरवर पाहता ही गूढकथा किंवा रहस्यकथा वाटत असली, तरी तिच्या आत माणसाची गोष्ट आहे. खरं तर कोणत्याही चांगल्या कलाकृतीत शब्द पुसले की, अस्सल माणसाची गोष्टच उरत. माणूस म्हटलं की काही मूलभूत भावना त्याला चिकटून येतात. उदाहरणार्थ, भय-निद्रा–आहार-मैथुन या जनावरी/नैसर्गिक प्रेरणा आणि तर्क, संवेदनशीलता, विवेकी विचाराची क्षमता इत्यादी मानवी भावना; ज्या अर्जित केल्या जातात, उन्नत होत जाऊ शकतात. इतिहासाच्या एका टप्प्यावर या भावनांमधली मैथुन ही प्रेरणा सोयीनं वापरली गेली. त्यातलं मूल्य हवं तेव्हा शोधलं गेलं, हवं तेव्हा त्याला तुच्छ ठरवलं गेलं. विशुद्ध निसर्ग भावना म्हणून त्याला नाकारण्याचा प्रकार भंपक वासाहतिक व्हिक्टोरिअन प्रभावात आणखीच रूढ झाला. त्यात स्त्रीचं दमन करणं, ही एक प्रमुख प्रेरणा राहिलेली आहेच (संभोग क्रियेतल्या मिशनरी आणि वुमन ऑन टॉप या दोन आसनांचा वापर /इतिहास पहिला तरी हे लक्षात येऊ शकतं.)   

भय–निद्रा–आहार–मैथुन आणि अपराधगंड या त्यातल्या महाकाय भावनांना या कादंबरीत अक्षरश: मानाचं स्थान आहे. भाषा सौष्ठव हे या कादंबरीच्या निवेदनाचं वैशिष्ट्य आहे. हृषीकेश याला जरी एक सहज आणि साधा गुण मानत असला, तरी फार लोकांकडे हा गुण नसतो. म्हणूनच खरं तर चांगलं–वाईट लेखन किंवा लेखक असणं-नसणं ही विभागणी केली जात असावी. (उदा. – “तोल जाऊन तो पिकल्या आंब्यासारखा खाली पडला आणि फुटला.”)  

कादंबरीची सुरुवात वाचनीय आहे. वाचकाचा रस, उत्कंठा टिकवून ठेवणं ही लेखकाला दमवणारी गोष्ट आहे. शिवाय सुरुवातीच्या निवेदनात एक करडी छटा उभी राहते, जी तुम्हाला गर्भगळीत कदाचित करेल की नाही माहीत नाही किंवा ती अगदीच भेदरवून टाकणार नाही, परंतु ती तुम्हाला एक कुबट आणि धूळभरली दमछाक अनुभवायला लावते. त्यातली भीती ही काही ‘झी हॉरर शो’ किंवा ‘आहट’छापाची स्वस्त भीती नाही. तुमची इच्छा असो वा नसो, तिच्यात, तिच्याकडे तुम्हाला खेचणारं काहीतरी जाणवतं. ती आदिम भीतीची ओढ आहे. भीतीत एक थ्रीलदेखील असतं. शिवाय दुर्दैवानं हल्ली कोणतीही गोष्ट रंगवून करता येत नसल्यानं भीतीदेखील पूर्ण नसते. त्यामुळे एका मर्यादित जागेत जखडून गेल्याची जाणीव देण्यात, तुम्ही सुटण्याचा प्रयत्न केला तरी दम कोंडवण्यात ते निवेदन यशस्वी होतं, हे नक्की. तुम्हाला त्यातून सुटता येत नाही. सुरुवातीच्या काही पानांमध्ये अगदी शास्त्रीय तर्कानं चालणाऱ्या व्यक्तीलादेखील भूत लागणं किंवा झपाटणं याबद्दलचा लेखकाच्या मेक बिलिव्हचा चकवा चुकवता येत नाही. पुढे नेमकं काय असेल, याचा अंदाज येत नाही. शिवाय पुढे जाऊन ज्या घटनांचं मानसिक विश्लेषण करण्यात, त्यांच्याबद्दल थरार निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

केवळ सुरुवातच नव्हे, तर संपूर्ण कादंबरीभर निवेदन ओघवतं आहे आणि एका साच्यातून काढलेलं आहे. लिहिण्याच्या ओघात बऱ्याचदा दीर्घ काळामुळे निवेदन विखंडीत होण्याचा धोका असतो, परंतु इथं तसं झालेलं नाही. मुळात सारं घडून गेल्यावर त्याचा तटस्थपणे केलेला हा विचार आहे. त्यातून नीती-अनीतीच्या संदर्भात निवेदक आणि पर्यायानं लेखक आपला एक मूल्यविचार मांडत राहतो.

निवेदनापेक्षा घटनांमधून जे सांगायचं आहे, ते सांगणं, थोडक्यात ‘गोष्ट सांगणं’ ही कथनाची पद्धत, हे ‘दंशकाल’चं बलस्थान आहे. ती रटाळ होत नाही. उलट घटनांच्या मध्ये येणाऱ्या ‘प्रथम’ निवेदनानं वाचक प्रगल्भ होत जातो. या निवेदनाचा दर्जा अद्भुत आहे. कारण यात मनोविश्लेषकाची दृष्टी (insight) आहे. थोडक्यात, प्रचलित बायनरी पर्यायांच्या मर्यादा आणि त्या मर्यादांमुळे मानवी सभ्यतेची होणारी कुचंबणा अधोरेखित करण्याचं काम हे निवेदन करत जातं.

परात्मतेच्या दृष्टीनं बोलायचं तर, निर्माण केलेल्या वस्तू – मग त्या सांस्कृतिक का असेनात - तुम्हाला नंतर नियंत्रित करायला लागतात आणि शेवटी येते ती परात्मता आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे मानसिक अस्वास्थ्य! त्याच चक्राचा धांडोळा कादंबरीतला घटनाक्रम आणि निवेदन घेत राहतं. अर्थात इथं केवळ जड जाणिवांमधून आलेलं दुःख एवढंच त्याचं मर्यादित स्वरूप नाही, तर ‘प्रारब्ध’ ही मानवी जीवनातली अटळ आणि असंदिग्ध बाब तेवढीच ताकदवान असते, हेही या चित्रणातून सुटत नाही.  

या निवेदनात माणसाइतकंच महत्त्व जागांचं आहे – त्या जागा जर हृषीकेशनं तशा रंगवल्या नसत्या तर ‘दंशकाल’ आहे तशी झाली नसती असं वाटतं. त्या जागांना स्वभाव आहे. उदा. माजघर, माजघरातून स्वयंपाक घराकडे जाणारी जागा, सुईणीची खोली, देवघरातली समई, विहीर, तायडीचा गोठा, नको ते दाखवणारा अंधुक पिवळा प्रकाश, धान्याचं कोठार, आईबाईची विहीर. मुळात या जागांची या कादंबरीत फक्त लेपून लावलेली वर्णन येत नाहीत.

लेखकानं कादंबरीतील घटनांना आवश्यक अशा ‘परिसंस्थेची’ (Ecosystem) ची उभारणी ताकदीनं केलेली आहे. सजीव –निर्जीव, जड-जाणीव आणि यांच्याशी संबंध येणारी पात्रं अशी ती स्वतःत पूर्ण असणारी संस्था आहे. रोजच्या आयुष्यातही केवळ ‘व्यक्ती-व्यक्ती’ असा संबंध येत नसतो. जगण्यात या परिसंस्थेची भूमिका अपरिहार्य आणि महत्त्वाची असते. कादंबरीसारख्या विशाल रचनेत अशा पर्यावरणाला उभारणं हे जिकीरीचं तरी अटळ असतंच. (हल्ली लघुत्तम कथांचं (Flash Fiction) काँग्रेस गवत चौफेर उगवत आहे. ढिसाळ पद्धतीचे शेंडा बुडखा नसलेले किस्से साहित्य म्हणून बोकांडी बसत आहे. त्यांना आणि सकस साहित्याला वेगळ करणारी ही खरं तर महत्त्वाची बाब ) बऱ्याचदा विचार प्रसावण्याच्या ओघात कथात्म साहित्यात अशा सुदृढ परीसंस्थेची निर्मिती दुर्लक्षित होते. इथं ती समर्थपणे निर्माण झाली आहे. आणि ती तिची भूमिका वठवते आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

या बरोबर, कादंबरीतील गंध-दुर्गंधांच्या वर्णनाची नोंद घेतली पाहिजे. तायडीचा श्लेम, मटणाचा कुजका वास, ढेकराचा आंबूस वास इत्यादी. हे सारं परिसंस्थेला पूरक घटक म्हणून येतात. शिवाय मटणाच्या जेवणाची वर्णनं हीदेखील बीभत्स आणि तामसी निर्मितीसाठी आवश्यक बाबी म्हणून येतात. जी कादंबरीच्या वातावरणात स्वतःचं पक्कं स्थान निर्माण करून जातात. त्यांना बाजूला काढता येत नाही. 

तर्क आणि अतर्क्य, विवेक आणि श्रद्धा, जड आणि चैतन्य यांच्या सीमारेषेवर या सर्व द्वैतांची तटस्थ चिकित्सा करणारी ही कादंबरी आहे. कार्यकारण भावावर खल न करता त्याचं आहे तसं स्वीकारलं जाणं - उदा. भानूकाकाला वेड लागल्यावर गावात एकाच दिवशी होणारे अनेक मृत्यू - हे ‘जे जसं आहे ते तसं पाहावं’ या परंपरेचं द्योतक बनून आलेलं वाटतं. मोक्षाच्या चर्चेत साधकानं सिअर / तटस्थ बघ्या = तोच स्थित प्रज्ञ किंवा मुमुक्षु असा असावा असं म्हटलं जातं. नानू हा कादंबरीचा निवेदक त्याच्या सोयीनं अशी बघ्याची भूमिका घेत जातो. जी त्याच्या स्वभावाला आणि वाढीलाही पोषक असते. म्हटलं तर ही सर्वसाधारण मनुष्याची प्रवृत्ती. भोगात त्याला भोग हवा असतो आणि वैराग्यात निवडीचं स्वातंत्र्य! नानू म्हणजेच सामान्य माणूस याच बेरकीपणे आणि कधी भोळेपणानंदेखील हे करतो. निवेदन ‘प्रथम’ असल्यानं त्याचा ‘दृष्टीकोन’ मर्यादित होतो. जो लेखकाला हा सर्व पट उभारण्यासाठी गरजेचा असावा, असं सतत वाटत राहतं. 

निवेदक नानू हा जाणता आहे. तो प्रत्येक घटनेचं तटस्थ विश्लेषण करू पाहतो आहे. कादंबरीतील काकूचं चित्रण हे या कादंबरीच मोठं बलस्थान आहे. सुरुवातीचा काही भाग सोडला तर काकूविषयीचं नानूचं आकर्षण पडद्यामागे निरंतर चाललेलं असतं. ज्याला नंतर भय आणि अपराधाची संगत लाभते. पुढे नानूचा साराच व्यापार या त्रिकुटाकडून नियंत्रित केला जातो. जो ‘दंश-काला’ला संपू देत नाही.  

प्रेम  आणि शरीर यातलं अद्वैत मानवी जगण्याचं वरदान आणि शाप दोन्ही असावं. ते स्वीकारलं जात नाही बऱ्याचदा. पण एक गोष्ट मात्र पक्की, समकाळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वतःचे लैंगिक विकार लेखनाच्या माध्यमातून भागवून घेण्याचेही (व्होयारीझम) प्रकार सर्रास पाहायला मिळू शकतात. कुठल्याही विचारी वाचकाला ते समजत असतं. अशा लेखनाला बोल्ड म्हणून खपवलंही जातं. खरं तर बोल्ड आणि घाबरट असं काही नाहीये आता. पण हैदोस आणि कथा-कादंबरी यात काही फरक असायला हवा. ऋषिकेश याबाबतीत खरा उतरलेला आहे. कुणाच्याही आंबट भावना चाळवण्याकरता आपण लिहीत नाही आहोत, हे स्पष्टपणे इथं जाणवतं.

या कादंबरीत आई आणि काकू या दोघींवर अण्णांनी केलेल्या प्रेमाची तुलना निवेदक करत बसत नाही. त्या प्रेमभावनेच्या दर्जाबद्दलची उच्च-नीच अशी उभी विभागणी तो करत नाही. त्याची कारणमीमांसादेखील करत नाही. प्रेम या विशुद्ध भावनेला यापेक्षा अधिक काय हवं? फक्त यातले जे उपभोग घेणारे (stakeholders) आहेत, ते फक्त पुरुष आहेत. स्त्रिया नाहीत. काकूचा यातील सहभाग प्रारब्ध म्हणून जास्त येतो, तिची इच्छा म्हणून कमी.

‘दंशकाल’ गूढतेचे प्रसंग घेऊन मानवी जगण्याचा अटळ भाग असलेल्या विकार–प्रवृत्तीविषयी विचार करायला भाग पाडते. साधारणतः तिच्यातील प्रसंग आणि त्यातून परावर्तीत भावना मांडण्याचा मी काहीएक प्रयत्न खाली केला आहे.

ही कादंबरी तीन भागात येते.

भाग पहिला

            घटना                                                   भाव /विश्लेषण

१) भानुकाकाला वेड लागणं आणि सधन देशमुखांची पार्श्वभूमी – गूढता – भय        

२) काकूचं येणं – लैंगिकता, वासना (Desire)

            अ ) संभोग – हिंसा – कुत्र्यांचा वावर

            ब) नीती आणि लैंगिकता

            क) नानुचं (निवेदकाचं) तुटलेपण – तुटलेपण (Trauma)  

            ड) नानूच्या लैंगिक इच्छा – यातून पुढे सबंध कादंबरीभर नानूची काकूबद्दलची संभोगेच्छा आणि विवाहसंस्थेमुळे आलेला अपराधगंड पार्श्वभागी स्पष्टपणे जाणवत राहतो. हे कादंबरीकाराचं यश. त्याचं निवेदन, त्याच्या कृती यात या भावनांचा अंश अस्पष्टसा निनादत राहतो. वास्तव जीवनातही एकमेकांशी थेट संबंध नसलेल्या अनेक बाबींचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो, ते सूक्ष्म पातळीवर इथं अधोरेखित होतं. यासाठी ऋषिकेशचं कौतुक.

३) भिवली –मूठ मूठ भर थुंकी उडवणारी, सोललेल्या बोकडाच्या वासाची भवली – बीभत्स रस

४) आईचं वेड – कारुण्य / लैंगिकता / रूढ व्यवस्थेतील समजुतींमुळे लागलेले वेड – परंपरेला प्रश्न – या वेडाचाही नानू गांभीर्यानं पाठपुरावा करत नाही – कदाचित त्यामुळेच आईचा मृत्यूचीदेखील त्यानं न केलेली उकल वाचकाला आकळू शकते.

५) अण्णांचा मृत्यू – रहस्यमयता  आणि मानवी प्रमादाचा आघात यांची झालेली सरमिसळ

- तिरड उचलण्याचा प्रसंग – यात जड बाजू कुठली याचा विचार करणारा नानू, तिरडीच्या ओझ्यानं दमलेला नानू (इथं ‘आउटसाइडर’मधला कामूचा मरसो आठवतो.)

- वडिलांच्या मृत्युनंतर काकूच्या वेदनेतल सौंदर्य पाहणारी नानूची नजर. आदिम मादीसाठीच्या संघर्षाची आठवण. उदा. “त्या दुःखाच्या काळातही काकूनं अस्वस्थ करणं सोडलं नाही”

-निरपेक्ष असणाऱ्या आणि म्हणूनच नीती-अनीतीशी संबंध तोडायला लावू पाहणारी नैसर्गिक लैंगिकता.

वरील दोन मुद्द्यांमुळे दंश ‘काल’ पुढे सुरूच राहतो.

६) वेड्या भानुकाकाचा मठ – फिक्शन करिताची प्रसंग उभारणी – काकूची शारीर ओढ

७) आईचा मृत्यू – गूढता – या मृत्यूची कारणमीमांसा करू नये, त्यातील कार्यकारणभाव तपासू नये, ही निवेदकाची इच्छा. भानुकाका – भिवलीचा वास तिच्या शारीरिक उपस्थितीमुळे येतो की, नानूच्या अतिंद्रिय संवेदनांमुळे? हा प्रश्न जसा अप्रस्तुत तसेच मृत्यूची उकलही. आपल्या आजूबाजूच्या भीतीचा व्यावहारिक आधार किती असतो? म्हणजे दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा चहूबाजूंनी अंधार झाल्यासारखा वाटला की, अंधार आधीच मनात होता त्याला ट्रिगर मिळून तो गडद झाला? ‘कैचा धाक कैचा धाक / सकळीक हे आपुले’ या तुकोबाच्या अभंगातील ओळींनी नेमका कोणता धाक दूर पळतो? उजव्या शक्तींचा, महानगरातील गर्दीचा कि आतला?

- आईच्या मृत्युच्या भयाण दुःखात पुन्हा तिरडीच्या ओझ्याची जाणीव आणि नानूचं चोरून चप्पल घालणं. दुःख आणि मानवी वर्तन यातला अतर्क्य संबंध सूचित होतो. जसं भानूकाकाचा उपचार करण्याचं नानू टाळतो, त्याच प्रवृत्तीनं तो आईच्या मृत्युचं कारणही शोधायला जात नाही. त्याची ही कृती कथानकाशी तादात्म्य पावलेल्या वाचकाला टांगून ठेवत नाही – हे निवेदनाचं यश. त्यात लेखकाचा क्राफ्ट वाखाणण्याजोगा आहे. आपल्या आयुष्यातही असे काही कोपरे असतात की, ज्यावरची धूळ झटकायला आपण जात नाही. तरी आयुष्य चालू राहतंच. सर्वच प्रश्नांची उत्तरं आयुष्यानं आणि पर्यायानं कलाकृतीत लेखकानं द्यावीत आणि वाचकानं ती घ्यावीत असा करार नसतोच. तसा अट्टहास केला तर कलेचं शास्त्र होईल. निवेदकाच्याच भाषेत बोलायचं तर अभेद्य तटबंद्या तिथं पुरेशा असतात.

- काकूचं आकर्षण - इथंही काकूला मादी म्हणून पाहणं आहे. काकूबद्दलचं आकर्षण ती येण्यापासून काही काळानंतर सुरू होतं ते निवेदकाच्या आजपर्यंत टिकून राहिलेलं दिसतं. म्हणजे या ज्या काही नैसर्गिक वृत्ती असतात त्या आतून बाहेर आणि बाह्य जगातून आत यांच्या आदानप्रदानात भूमिका बजावत असतातच. किंबहुना या दोहोंच्या संयोगातून व्यक्तीची सामाजिक वर्तणूक सिद्ध होत असते. या समजुतीला बळकट करणारं हे निवेदन आहे.

-शिवाय काकूबरोबरच्या संबंधांची चिकित्सा करत असताना नानू लैंगिक मूलप्रेरणा विखारी का म्हणून अस्वस्थ होतो आणि वाचकाला प्रेरणा विखारी नाहीत, व्यवस्थेनं त्यांना विखारीपनाचा शिक्का दिल्याची जाणीव करवून देतो. Earthquake does not kill, buildings kill. तसंच हेदेखील. हे पोचतं. पोचलं. उत्तम.  

८) नानूचा संसार आणि गाव सोडणं-  काकूबद्दलचं तीव्र आकर्षण

९) लामणा आणि संततीप्राप्तीचं प्रकरण – नानूचा काकूकडून झालेला अपमान. इथं पहिला भाग संपतो.

पहिला भाग :  चित्र १.

 
   

पहिल्या भागात गोष्ट दृश्य पातळीवर आहे. ती रंजक, वाचनीय आहे. ती घटनांद्वारे खिळवून ठेवते आहे. आणि तिच्या पार्श्वभूमीला एकावेळी एक किंवा त्यापेक्षा जास्त भावना (लैंगिक भूक, आहार लालसा, भय, निद्रा आणि या सर्वांना जोडणारा गंध किंवा दुर्गंध) यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वावर वाचकापर्यंत पोचतो. आणि त्यानंतर वाचक स्वतःच्या आतील या भावनांचा खेळ नेणीवेत खेळू शकतो किंवा खेळायला लागतो. म्हणजे कादंबरीतील घटना – त्यांच्या पार्श्वसंगीतासारख्या वरील भावना आणि त्याच वेळी वाचक आणि त्याच्या नेणिवेतील भावना आणि त्याचा खेळ – वाचक आणि निवेदकांच्या मनःस्थितीचं तादात्म्य केवळ जोरकस भाषा आणि निवेदनावरचा हातखंडा यामुळे शक्य होतं. कुठेही पकड ढिली झाली कि, खेळ पडतो. इथं तो क्वचित पडतो.

पहिल्या भागाची गोष्ट : चित्र २.                                                          

दुसरा भाग

            घटना                                                   विश्लेषण

१) डोंबिवलीतलं घर – संसार - काळ आजचा – भूगावातलं घर नष्ट होणं –परिसंस्था मोडणं –हे प्रतीकात्मक आहे. त्या परिसंस्थेचा उद्देश नष्ट होतो कारण कादंबरीकाराला जे सांगायचं होतं त्यासाठी ते विश्व गरजेच होतं आणि इथून पुढे जे सांगायचं आहे त्यासाठी ती नष्ट करणंही. २) लामणाबुडवी – पोलीस-पत्रकार –सावकारी या रूढ नोंदी.- वेळप्रसंगी स्वार्थ साधणाऱ्यांच्या नोंदी. –घराचा वास –भीती. ३) या प्रसंगातही एकदा काकूविषयी ‘नसलेल्या’ आकर्षणाची नोंद नानू घेतो. त्याच्या निवेदनाचा संदर्भ आकर्षण असणं आणि नसणं यादरम्यान झुलत राहतो. - इथे सुरू होतो भयाचा दुसरा खेळ. भीतीला चिकटतो अपराधगंड. ४) निवेदनात वेगळं वळण  – घटनांचं –भावनांचं सखोल विश्लेषण निवेदक सुरू करतो. ५) कोर्टातील प्रसंग – नंदाकाका आणि तंट्या भोईर –चित्रण प्रभावी. ६) विश्लेषणातून – समलैंगिक नंदा काकाविषयीचा खेद. मध्ये मध्ये यजमान कर्णिक या कुप्रवृत्तीचं घोटीव चित्रण येतं.

भाग दोन : चित्र १.

भाग तिसरा

              घटना                                      भाव/ विश्लेषण  

डोंबिवलीतलं घर – ज्यात भूगावच्या घराचं प्रतिबिंब येतं. नानू-अनुचे संबंध – सूचन – नानू-काकूतील संबंधाबाबत नानूला असलेली भीती - काकूच्या अस्तित्वामुळे नानूचं संसारात दुभंगलेलं असणं. – ज्या दंशकाळाची सुरुवात भूगावात अण्णा –आईच्या घरी झाली, ती तशीच इथंही स्वतःला राखून आहे.

अनु–नानू मधले संवाद – नानूचं वाढतं भय. वाचकालाही जाणवणारं. विशेषतः पुरुष वाचकाला. कायम असणारी लैंगिकता.  आत्याचं सोनं. नानुची स्पष्ट निवड – सोनं आणि लालसा-लोभ - पत्त्याच्या बंगल्यांचा खेळ आणि लामणा टाकून विहीर उपसण्याचा खेळ – कादंबरीतील उत्कृष्ट प्रसंगांमधील प्रसंग. - भानुकाकाच्या वेडाला आणि त्याचबरोबर वाचक आणि नानू या दोघांना जादुई खेळ खेळायला लावणारं वर्णन. शहाणपण आणि वेड यांच्या सीमारेषा धूसर करणारं निवेदन. उदा. “मनातले वारे खूप भयाण असतात ....ते सुटले कि सगळी तबाही ....”

याच भागात नानूचं विश्लेषण आणखी खोल होत जातं. नवीन जीव निर्माण करणं आणि टिकून राहणं हे नानूला उत्क्रांतिवादाच्या अभ्यासातून कळतं. कुण्या वाचकाला ते योग – किंवा वेदांती परंपरेच्या ध्यानातूनही कळू शकतं. मार्ग अनेक आहेत. त्या शून्यविचाराशी वेगवेगळ्या मार्गानं पोचतं येतं.

७) लाल डायरीनं व्यथित झालेला नानू मुक्त लैंगिकतेला आणि आत्याच्या सोन्याला मात्र सहज स्वीकारतो – नानू या स्खलनशील माणसाची सोयीची नैतिकता.   

८) या शेवटच्या भागात रहस्य पूर्ण उकलतं. नानू आणि वाचक दोघेही कथेमागची कथा स्पष्ट ऐकवू आणि ऐकू लागतात. एका ताणातून बाहेर पडतात. या सर्व प्रसंगावर कडी करणारा आणि या कादंबरीतला सर्वोत्कृष्ट प्रसंग पुढे येतो.

तो म्हणजे भानुकाकाच्या अंगात भिवली येते आणि सुपडीच्या अंतिम फडफडीवर भानुकाका झुलत जातो. त्याच वेळी नानूदेखील जड अस्तित्व सोडून हलकं होत तुरीय अवस्था अनुभवतो. या कादंबरीतीतील हा सर्वोत्तम प्रसंग आहे. याचं एक कारण म्हणजे ऋषिकेशनं नानूला त्या अवस्थेपर्यंत पोचवण्यासाठी उलट्या पंखांची कोंबडी कापून फडफडवण्यापासून ते लहानपणापासून दमवत आलेली भीती – भिवलीच्या रहस्याची उकल करून ज्या ताकदीनं या प्रसंगाची उभारणी केली आहे. आणि याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे,  केवळ शब्दशक्तीमधून आयुष्यात कधीतरी एकदा ती अवस्था अनुभवलेल्या वाचकाला ती जाणीव विसरायला लावणारी अवस्था अनुभवयाला देणं. तीव्र ध्यानात टिकून राहणं ज्यांना जमतं त्यांना शब्दांमधून तिथपर्यंत पोचवणं यात लेखकाच्या शैलीचा, कष्टाचा मोठा वाटा आहे.

मंडुक्य उपनिषदात ज्या तुरीय अवस्थेचं वर्णन येतं, तिथं व्यक्तीचा एक प्रयत्न गृहीत धरलेला आहे. निद्रा ही एका पातळीवरची अवस्था  आणि जिवंत आयुष्य ही दुसऱ्या पातळीवरची निद्रा आणि या निद्रेचं स्वरूप आकळून घेतलेली मुक्ती – ती म्हणजे विराटाच्या जाणीवेसकट तुरीय अवस्थेत केलेला प्रवेश – असे हे वेदांती प्रयास.

कला या प्रवासाला किती सहजतेनं इंचभर अंतरावर आणू शकते याचा पुरावा म्हणजे हा प्रसंग आहे. मला आणखी एक  थोरपण या प्रसंगात आढळलं ते म्हणजे – मनाच्या ज्या खेळांना दूर सारून अनेकदा तुरीय अवस्थेचा विचार होतो – उदाहरणार्थ भय, लोभ, वासना; त्यातील भय या भावनेपासून मुक्ती मिळवत आणि त्याच वेळी भयावर स्वार होऊन त्या  अवस्थेपर्यंत पोचणं शक्य आहे, याचा स्पष्ट पुरावा ऋषिकेश देतो. मी या प्रसंगाच्या वेळी लक्ष टाळ्या वाजवल्या आहेत. यासाठी ऋषिकेशचे कौतुक. गोंधळी–वाघे-मुरळ्या यांना ध्वनी असतो, ऋषिकेशच्या हातात केवळ शब्द होते. त्याच्या कष्टांना आणि क्राफ्टला दाद दिली पाहिजे.  

९) शेवटी पूर्ण उकल – काकू –भानुकाकात ‘नसलेले’ संबंध आणि भानुकाकाचं वेड, १०) भिवली आणि दादुमियाची मिथककथा यातील भिवलीवरचा अन्याय. – बळी जाणारी स्त्री, ११) नानू आणि अनुचा संभोग – नानूची हरवलेली शुद्ध, १२) शेवटी गुलबकावलीची कथा.

ही कथा थेट अपराधगंड – कामेच्छा- स्वच्छंदवादी वृत्तीचं आकर्षण या तिघांचं कोलाज आहे. हे चित्रण  मानवी आहे. भले भले तर्कवादी अशा रोमँटिक प्रभावातून सुटलेले नाहीत. किंबहुना अशी विसंगतीच कार्यकारणभावापासून दूर नेत असते.

१३) शेवट त्याच मानवी प्रमादाच्या दंशानं होतो. वाचक आतल्या आत निववत जाऊन. स्वतःची कथा स्वतःला पुन्हा नव्यानं सांगायला लागतो. हे ‘दंशकाल’चं यश.

भाग तिसरा : चित्र १.

जगण्याच्या नैसर्गिक प्रेरणा आणि प्रचलित सामाजिक संस्था यांच्यातील घर्षणाची (Friction) ही गोष्ट म्हणजे ‘दंशकाल’ आहे. ‘दंशकाल’चं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यामागे हेतू खरं तर हाच –की, गोष्ट सांगणारा कुणी गोष्टकार, गोष्ट न सांगताच काळाच्या उदरात गडप होऊन जाऊ नये आणि आपल्या सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांना स्पष्ट ऐकू येत राहाव्यात.

दंशकाल - हृषीकेश गुप्ते

राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे - ४२० मूल्य – ५०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

लेखक स्वप्निल शेळके तरुण कवी, प्राध्यापक आहेत.

Swapnil.shelke20@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......