अजूनकाही
‘अंतर्नाद’ या मराठी मासिकाच्या पुढच्या संभाव्य वाटचालीवर त्याचे संपादक भानू काळे यांचं संपादकीय ‘अक्षरनामा’नं पुनर्प्रकाशित केलं होतं. त्यावर संजय पवार यांनी त्यांच्या ‘‘कळ’फलक’ या स्तंभातून व्यक्त केलेले विचार वाचले. पवार यांनी त्यांच्या “कळ’फलका’तून बहुतेक वेळी सुरेल, उत्तम रचना निर्मिलेल्या आहेत, मात्र दुर्दैवानं यावेळी बेसूर स्वर उमटले आहेत.
अनेक चोखंदळ वाचकांच्या आवडीचं ‘अंतर्नाद’ हे गेली २२ वर्षं नियमित प्रकाशित होणारं वाङ्मयीन मासिक यापुढे बंद करणं, फक्त दिवाळी अंकापुरतं प्रकाशित करणं किंवा मालकीचं हस्तांतरण करणं असे तीन पर्याय काळे यांच्यासमोर आहेत. या निर्णयामागची पार्श्वभूमी समजावून सांगताना काळेंनी सध्याच्या एकूणच वाचनसंस्कृतीवर जे प्रांजळ भाष्य केलं आहे, ते कुठल्याही मराठी साहित्यप्रेमीनं मुळापासून वाचावं असं आहे. एकूणच मराठी साहित्यव्यवहाराच्या सध्याच्या दारुण स्थितीवर काळेंचं प्रकट चिंतन अचूक भाष्य करतं, वाचकांना अंतर्मुख करतं. मात्र काळे यांचा सूर संतुलित आहे, निराशावादी नाही – मासिकाचं व्यासपीठ सध्या कसं जास्तच गरजेचं आहे, याचा उहापोह त्यांनी केला आहे.
आपल्या प्रकट मनोगतातून वाचनसंस्कृतीवर काळेंनी उभ्या केलेल्या प्रश्नांना सामोरं जाण्याऐवजी संजय पवार यांनी मात्र भलतेच मुद्दे पुढे केले आहेत. त्या सर्वच मुद्द्यांचा प्रत्यवाय करण्याची ही जागा नव्हे. विसंगतीची गोष्ट म्हणजे काळेंच्या निरीक्षणावर प्रतिक्रिया देताना पवार यांना ‘Whataboutery’चा आधार घ्यावा लागला आहे. पवार यांच्या या बौद्धिक कोलांटीउडीचा खेद वाटतो, कारण ज्या ‘भक्त’मंडळींचा पवार नेहमी मोठ्या हिरिरीनं आणि धाडसानं समाचार घेतात, त्या झुंडीचं हे आवडीचं (एकमेव) शस्त्र आहे. ‘Whataboutery’ म्हणजे वादविवादाच्या वेळी चर्चेचा मुद्दा खोडून काढण्याऐवजी प्रतिपक्षाच्या आधीच्या वर्तनाची आठवण करून आपल्या चुकीचं समर्थन करणं. उदा. गुजरात-२००२ दंगलीचा विषय आला की, १९८५चं शिखांचं शिरकाण काढायचं. मुळात या दोन्ही घृणास्पद घटना या मानवतेविरुद्ध गुन्हा होत्या. एका बाजूनं एक गुन्हा केला म्हणजे दुसऱ्या बाजूचा गुन्हा समर्थनीय होत नाही.
म्हणूनच ‘सत्यकथा’ आणि इतर अनेक मासिकं बंद पडली, मग ‘अंतर्नाद’ अंतर्धान पावलं तर त्यात विशेष वाईट वाटायचं काय, हा पवार यांचा ध्वनित होणारा प्रश्न चुकीचा आहे. पूर्वीसुद्धा मराठी मासिकं बंद पडत असत, पूर्वीसुद्धा मासिकांना धड वर्गणीदार मिळत नसत, नियतकालिकं बंद होण्याची महाराष्ट्राची मोठी जुनी परंपरा आहे. याबाबी पूर्वी गंभीर होत्या, तशा आजही (किंबहुना कांकणभर जास्तच) आहेत. ‘सत्यकथा’ बंद पडली हे जसं वाईट, तसंच ‘अंतर्नाद’ बंद पडणं हेसपद्धा वाईट. उलट हाच मुद्दा पवार यांनी उल्लेखलेल्या नियतकालिकांबद्दलसुद्धा विचारला जाऊ शकतो. ‘अंतर्नाद’ थांबलं, मग ‘साधना’ किंवा ‘सुगावा’सुद्धा जर बंद पडलं तर त्यात वाईट काय? (अर्थात निव्वळ उदाहरणासाठी ही नावं घेतली आहेत. या नियतकालिकांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!)
तसंच ‘सत्यकथा’ बंद पडण्यामागची जी कारणं होती, ती बहुतांशी आताही तेवढीच लागू आहेत, हे पवार यांचं विधान असत्य आहे. ३० वर्षांपूर्वी मुद्रित शब्दमाध्यमांना भरपूर उठाव होता. छापील शब्दांचं अवमूल्यन झालं नव्हतं. दूरचित्रवाणीवर ४००-५०० वाहिन्या सोडा, चालू असलेली एकमेव वाहिनीसुद्धा दिवसातून धड दहा तास चालत नसे. पुस्तक\नियतकालिक वाचायला पुढे होणाऱ्या हाताला मागे न्यायला रिमोट-मोबाईल-टॅब असे पर्याय नव्हते. वाचताना क्षणाक्षणाला चाणाक्ष फोनमधून आपलं चित्त विचलित करणारी समाजमाध्यमं तर दूरच.
या बदलांची चाहूल लागायच्या सुमारास, म्हणजे नव्वदीच्या मध्यावर काळेंनी ‘अंतर्नाद’ सुरू केलं. आपला सुखानं चाललेला, आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला व्यवसाय (आणि मुंबई) सोडून एक मराठी मासिक सुरू करण्याचा निर्णय घेणं हे धाडसाचं काम होतं. मोठ्या निष्ठेनं एकेक वर्गणीदार जमा करत, अनेक अडचणींचा सामना करत काळे (आणि सौ. काळे) यांनी ‘अंतर्नाद’ चालवलं आहे. सलगपणे, अथकपणे बावीस वर्षं.
अशा परिस्थितीत नवीन लेखक काळेंनी तयार केले नाहीत, हा पवार यांचा रोख किती चुकीचा आहे, हे ‘अंतर्नाद’च्या कुठल्याही अंकावर नजर टाकली तरी कळून येतं. ‘अंतर्नाद’च्या लेखक परिवारात प्रथितयश लेखक जसे (कमीच!) आहेत, तसंच होतकरू, नित्यनेमानं न लिहिणारे तरुणही आहेत. महाराष्ट्राबाहेर असलेल्या अनेक वाचकांना ‘अंतर्नाद’नं लिहिलं केलं आहे. (लेखन आशयसंपन्न व्हावं, मनातले विचार वाचकांपर्यंत नीट पोहोचावेत यामागची काळेंची संपादक म्हणून असलेली तळमळ आणि शिस्त ‘अंतर्नाद’च्या दिवाळी अंकांसाठी लिहिताना मी स्वत: दोन वेळा अनुभवली आहे.) मात्र निव्वळ लेखनसामग्री मिळणं आणि आशयघन, विचारप्रवण साहित्य सातत्यानं मिळवणं – जे कुठल्याही नियतकालिकाचा प्राण असतं, यातला फरक काळेंनी नमूद केला आहे.
गेली बावीस वर्षं ‘अंतर्नाद’नं अनेक उपक्रम हाती घेतले. वाचक मेळाव्यांपासून ते उदयोन्मुख लेखकांसाठी लेखन-कार्यशाळा घेणं, अभिजात चित्रं, कविता, मुखपृष्ठावर छापून त्यांचं रसग्रहण करायला मदत होईल असे लेख छापणे, कथांना मिळणारा संकोचित अवकाश लक्षात घेत नियमितपणे कथा प्रकाशित करणं, मराठी साहित्यपरंपरेचं सापेक्षपणे अवलोकन करत नवीन प्रवाहांचा सातत्यानं वेध घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं, दीर्घपल्ली (Longform) लेखनाला वाव देणं – एक ना अनेक.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
वाचकांची अभिरुची वाढवत, दर्जाशी तडजोड न करता, चांगल्या निर्मितीमूल्यांचा आदर ठेवत सातत्यानं नियतकालिक प्रकाशित करण्याचा काळेंचा प्रयत्न जर थांबला, तर त्यात आनंद वाटण्यासारखं काय आहे? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चाललेला एक सकस प्रयत्न थांबवावा लागत आहे, हे पाहून जर त्या प्रयत्नाशी निगडित असलेल्यांना खेद वाटत आहे, तर त्या विषादाला निव्वळ ‘पेठांतले, शहरात राहणारे, अभिजनांचे सुस्कारे’ असं म्हणून खिल्ली उडवण्यासारखं काय आहे? (आणि हा प्रयत्न तळमळीनं काम करत झटणाऱ्या काळेंसारख्या साहित्यप्रेमीला ‘मनोरा संपादक’ असं हेटाळून पवार यांना नेमकं काय साधायचं आहे?)
भारतात एकूण आचार-विचार स्वातंत्र्यावर अनेक आक्रमणं होत आहेत. सामाजिक माध्यमांतून जनांचं जोमानं बत्थडीकरण होत आहे. उदारमतवादी, सेक्युलर विचारधारांना मिळणारं अवकाश तर झपाट्यानं आक्रसत आहे. दाटून आलेल्या या अंधारात ‘अंतर्नाद’सारखे दिवे वाचकांना उमेद देत होते. जर अशा दिव्यांतून येणारा प्रकाश मंदावत असेल, नियतकालिकं आणि मुद्रित शब्दांचं महत्त्व जर कमी होत असेल, लेखक-वाचक एकत्र यायला मदत करणारं अजून एक व्यासपीठ बंद पडत असेल, तर साऱ्या समाजाचीच हानी होते. हे मळभ कसं दूर करता येईल, यावर पवार यांचं भाष्य अपेक्षित होतं, मात्र ‘तुतारी’, ‘दुर्गावतार’, ‘अक्षयकुमार काळे’ असे मुद्दे (?) उपस्थित करून त्यांनी ही संधी घालवली, असं दु:खानं म्हणावं लागत आहे.
.............................................................................................................................................
लेखक भूषण निगळे हे साहित्यात रुची असलेले संगणक अभियंता आहेत. ते जर्मनीतील Hemsbach इथं राहतात.
bhushan.nigale@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vishakha Patil
Thu , 26 October 2017
यात दोन बाजू आहेत – दर्जेदार साहित्य देणं आणि आर्थिक गणित जुळवण. संजय पवार ज्याला ‘मनोर्यातले संपादक’ म्हणतात तो लेखकांना लिहिते करण्याशी आहे. एकांडे शिलेदार असले की ते अजून अवघड होते. एकहाती कारभार असला की नवीन प्रयोग करण्याला ठराविक काळाने मर्यादा येतात. दुसरा मुद्दा, बदलत्या काळात तग धरण्याचा आहे. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. ‘अक्षरनामा’ ‘अक्षरमैफिल’ ‘बिगुल’ हे online अंक पुढे येतायत. काही अंकांनी छापील अंकांबरोबर ‘PDF’ द्यायला सुरुवात केलीय. हे तांत्रिक बदल करून तग धरणे हे पुन्हा एकहाती कारभारात शक्य होणारे नाही. समाजमाध्यमांमधून जाहिरात करणे हा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. जाहिरात न करण्याच्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे. पुन्हा त्याचा संबंध ‘टीम’ उभी करणे, तरुण लोकांना सामावून घेणे याच्याशी येतो. हे बदल एका दिवसात घडणारे नाहीत. काळाची पाऊले ओळखून आधीच आपल्यात बदल करत राहतो तो टिकतो.
Bhagyashree Bhagwat
Thu , 26 October 2017
bhavna samarthaniy, pun yuktivaad tokde.