एका स्थानिक महापालिका निवडणुकीच्या निकालाची चर्चा राष्ट्रीय राजकारणात व्हावी हे जरा ऎतिहासिकच आहे. अर्थात नांदेड महापालिका निवडणुकीत काँगेसला मिळालेलं यश अभूतपूर्व आहेच. मात्र एका स्थानिक महापालिका निवडणुकीच्या निकालाची चर्चा इतकी जास्त झाली की, जणू काही काँग्रेसनं राज्य जिंकलं आहे. नांदेडच्या विजयानंतर अशोक चव्हाणांचं राहुल गांधींनी ट्विट करून अभिनंदन केलं नाही, याची उथळ माध्यमांनी चर्चा इतकी केली की, शेवटी गांधींना चव्हाणांचं अभिनंदन ट्विटरवर करावंच लागलं!
या निकालाचं महत्त्व किती आहे यापेक्षा त्याचा अन्वयार्थ काय आहे, कसा आहे अन त्याकडे कसं पाहावं, हे मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत. नांदेडचा निकाल लागून आता जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. तरी या निकालाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा लांबण्याचे अर्थ समजून घ्यावे लागतील. त्याशिवाय अशा तुलनेनं छोट्या निकालाकडे कसं पाहावं हेदेखील अधोरेखित करावं लागणार आहे.
या निकालात काँग्रेसच्या विजयाची कारणं भाजपच्या पराभावात शोधली गेली. खरं तर भाजपचा तिथं निवडणुकीत पराभव झाला असला तरी या निकालाकडे केवळ भाजपचा पराभव म्हणून पाहिलं गेल्यानं विश्लेषणाच्या वास्तविक वर्णनाला मर्यादा आलेल्या आहेत. हा काँग्रेसचा विजय आहे. तो कसा झाला हे पाहणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं हेही आहे की, तिथं भाजप अन इतर सर्वांचाच पराभव का व कसा झाला? थोडक्यात नांदेड महापालिका ही सर्वार्थानं छोटी भूमी असली तरी तिथल्या आत्ताच्या निकालाला काही स्थानिक अन बरेचसे व्यापक पदर आहेत. ते नीटपणे समजून घेतले पाहिजेत.
वरवर पाहता काँग्रेसला या निकालात फारच मोठं यश मिळालं आहे. विशेषतः एकुण पाडावाच्या काळात हे यश मिळालेलं असल्यानं त्याचं महत्त्व अधिक आहे. त्यातच नांदेड हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा गड असल्यानं हे यश अधिक महत्त्वाचं आहे. ते स्वाभाविकही आहे. या निकालात भाजप पराभूत झाला, याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र भाजप या निकालाकडे पराभव म्हणून पाहत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष एरवी फार मोलाचं बोलत नाहीत, पण या निकालावर ते नेमकं बोलले आहेत. ते म्हणाले, “नांदेडला आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही, कारण तिथं आमची ताकद नव्हतीच.” (‘मोदी लाटे’तदेखील नांदेडची जनता काँग्रेस सोबत होती!) दानवेंच्या म्हणण्याला अर्थ आहे. कारण मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्या दोनवरून सहावर गेल्या आहेत अन मतांची आकडेवारी पाहिली तर भाजपला मोठं यश मिळालं आहे. कारण भाजपला तब्बल २४ टक्के मतं मिळाल्याचा दानवेंचा दावा आहे. इथं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की, काँग्रेस अभूतपूर्व यश मिळवते, तेव्हा भाजप मतांच्या वाढलेल्या टक्क्याला महत्त्व देत आहे. भाजपनं आत्तापर्यंत मतांच्या वाढत्या टक्क्याला सतत महत्त्व दिलेलं आहे. मतांची टक्केवारी वाढवणं भाजपच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा पराभव चर्चेचा विषय बनणं स्वाभाविक आहे. त्याचबरोबर भाजपचा एकुण प्रचार, मंत्र्यांचं तळ ठोकून बसणं किंवा अगदी मुख्यमंत्र्यांचं आक्रमक भाषण हे सगळं पाहता भाजपला यश मिळालं नाही, असं मर्यादित अर्थानं म्हणायला जागा आहे. कारण अशोक चव्हाणांना एकतर्फी टार्गेट केल्यानं भाजपची नेहमीची नीती यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र असं असलं तरी मतांचं प्रमाण वाढणं हे भाजपसाठी दिलासाजनकच आहे.
भाजपच्या पराभवात स्थानिक नेतृत्वाचा अभाव हा मुद्दा आहे. त्याचबरोबर आयात केलेल्या कार्यकर्त्यांवर फार काळ विसंबून राहता येत नाही, हाही भाजपच्या अपयशाचा एक प्रमुख भाग आहे. भाजप सत्ताधारी असल्यानं काही गोष्टी जास्त गांभीर्यानं लक्षात घ्यायला हव्या आहेत. कारण कुठल्याही निवडणुकीत विजय नेत्यांनी तळ ठोकल्यानं मिळतोच असं नाही, तर त्यासाठी स्थानिक ठिकाणी तळ ठोकणारा स्थानिक अन आश्वासक नेता आपल्याकडे असावा लागतो. यापैकी भाजपकडे काहीच नव्हतं. त्यामुळे वरवर पाहता त्यांचा पराभव फार विशेष बाब नाही.
दुसरा मुद्दा काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयात पराभव कुणाचा आहे? हा पराभव उतावळ्या शिवसेनेचा आहे. अति आत्मविश्वासू राष्ट्रवादीचा आहे. अन उरलासुरला भाजपचा आहे. सगळ्यात विशेष म्हणजे धर्मकेंद्री संकुचित राजकारणाचा हा पराभव आहे. यामध्ये नांदेडपुरता धर्मकेंद्री संकुचित राजकारणाचा मुद्दा एमआयएम (MIM) या पक्षाभोवती आहे. कारण नांदेडमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत या पक्षानं जोरदार मुसंडी मारली होती. मात्र ते यश ज्या संकुचिततेच्या मुद्द्यावर त्यांनी मिळवलं होतं, त्याच संकुचिततेच्या व्यापक अनुभवानंतर त्यांचा त्याच मुद्द्यांनी पराभव केलेला आहे. या पक्षाला नांदेडच काय, कुठेही मुख्य प्रवाहात आपल्या राजकीय अजेंड्याला मान्यता मिळवता आलेली नाही.
निवडणुका जिंकताना घेतलेली तात्कालिक संकुचित भूमिका सत्ता आल्यावरही सोडता आली नाही, तर काय होऊ शकतं याच उत्तम उदाहरण म्हणून एमआयएमच्या अपयशाकडे पाहता येईल.
काँग्रेसला सत्ता मिळणं फारसं महत्त्वाचं नाही. तर जास्त जागा मिळणं चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातलं बरंचसं यश काँग्रेसचं आहे अन काहीसं इतरांच्या चुकांचं आहे. अर्थात हे केवळ नांदेडपुरतं नाही, तर निवडणुकांच्या राजकारणातील कुठल्याही यशात इतरांच्या चुकांचा काहीतरी वाटा असतोच. तोच नांदेडमधल्या काँग्रेस विजयाबाबतही आहे. काँग्रेससारख्या ऎतिहासिक पक्षाला सत्ता टिकवण्याचं फारसं कौतुकदेखील असणार नाही. मात्र सत्तेत असताना जेव्हा पुन्हा ‘छप्पर फाड के’ यश मिळतं, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक असतं. असं यश काँग्रेसच्या राष्ट्रीय पिछेहाटीच्या काळात असल्यानं त्याचं महत्त्व अधिक आहे. कारण या निकालानं राज्यातील मरगळलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे.
लढाईचं बळ वास्तवात असतं. या यशस्वी वास्तवात ते आहे. अन म्हणूनच या यशाकडे कसं बघायचं हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत्तो. नांदेड महापालिका निवडणूक निकाल काँग्रेससाठी आश्चर्यजनक नक्कीच नाही. कारण गड राखण हे राजकारणात तसं खूप काही मिळवल्यासारखं नसतं. मात्र या यशानं काँग्रेसचा आशावाद वाढवला आहे. काँग्रेस विचार म्हणून आस्था असणारे घटक या विजयाकडे आशेनं पाहणं स्वाभाविक आहेच. त्याशिवाय काँग्रेससाठी लढणार्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात लढण्यात अर्थ आहे हा संदेश या निकालानं दिलेला आहे. लढणार्यांचे पंख कापण्याचं सत्ताधारी राजकारण प्रस्थापित होऊ पाहत असताना वैचारिक निष्ठेनं काँग्रेस सोबत असणार्या अशोक चव्हाणांना मिळालेलं हे यश आहे. या यशानंतर काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विजय असल्याचं अशोक चव्हाणांनीही म्हटलेलं आहे. त्यामुळे या निकालाकडे काँग्रेस नावाच्या विचाराला निवडणुकीच्या राजकारणात पुन्हा चांगली मान्यता मिळू शकते, हा त्याचा एक अर्थ आहे. तो अधिक व्यापक स्तरावर समजून घ्यावा लागेल.
सामाजिक संकेतांचं अन गणिताचं राजकारण पाहता या विजयात अनेक गोष्टींचा अर्थ लावता येईल. मुळात इतक्या छोट्या महापालिका निवडणुकीवरून अंतिम निकषाला जाणं घाईचं ठरेल. भाजपच्या लाटा–लहरींच्या काळात काँग्रेस गड जिंकत आहे. तोही सामाजिक-धार्मिक गणितांची बरीच संमिश्रता असलेल्या नांदेडमध्ये. नांदेडमध्ये मुस्लिम संख्याबळ मोठं आहे. त्याशिवाय शीखांचं दखलपात्र संख्याबळ आहेच. अल्पसंख्याक दखलपात्र आहेत. त्याशिवाय हिंदूही मोठ्या प्रमाणात आहेत. एकप्रकारे नांदेड बहुधार्मिक केंद्र आहे. सामाजिक संमिश्रता हे तिथल्या सामाजिकतेचं प्रमुख बळ आहे. या अशा संमिश्र समुदायाला आपलंसं करून ठेवण्यात अशोक चव्हाणांना यश आलेलं आहे. म्हणूनच नांदेडच्या निकालाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे.
काँग्रेस जिंकल्यानं अशोक चव्हाणांचा पक्षातील गवगवा वाढेल, यापेक्षा तो पक्ष विचारासह टिकवल्यानं तिथं काँग्रेस जिंकली आहे. हे राज्यातील काँग्रेस वाढवू इच्छिणार्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं. या यशातून जे मानसिक बळ काँग्रेसच्या नेत्यांना अन कार्यकर्त्यांना मिळालं आहे, त्यांनी अशोक चव्हाणांचं राजकारणही समजून घेतलं पाहिजे. यावेळी चव्हाणांनी केवळ राजकीय लढाई जिंकलेली नाही, तर जे मुस्लिम धर्मकेंद्री संकुचित राजकारण करणार्या ओवेशीच्या नादी लागले होते, त्यांना त्यांनी काँग्रेसबरोबर चव्हाणांनी आणलं आहे. अशा प्रक्रिया रोज घडत नसतात. त्या काँग्रेसच्या नेतृत्वानं समजून घ्याव्यात. तसंच मुस्लिम काँग्रेस सोबत आणण्यासाठी चव्हाणांनी नांदेडला जे ‘पोलिटिकल स्किल’ वापरलं आहे, ते स्किल राज्यस्तरावरदेखील वापरावं. मुस्लिम अन हिंदूशिवाय नांदेडमध्ये शीख समाजाचा दखलपात्र सामाजिक आकडा अन अस्तित्व आहे. मुस्लिमांना सोबत घेणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच शीखांना आपल्यासोबत ठेवणही. सामाजिक बाजूनं पाहता या सर्वांना पक्षाच्या पडत्या काळात बरोबर ठेवण्याची प्रक्रिया घडली, ते काँग्रेसच्या राजकीय वर्तमानाला आकार आणि उभारी देणारं आहे.
काँग्रेसनं या यशाकडे स्थानिक यश म्हणून पाहू नये. कारण या यशात निवडणुकांच्या राजकारणाचे अनेकानेक व्यापक अर्थ आहेत. सर्वप्रथम हे यश एका बाजूला स्थानिक नेतृत्वाचं सातत्य, संयमाच अन निष्ठेचं आहे. अशोक चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ असण्याचादेखील यात वाटा आहे. त्यामध्ये काँग्रेसशी एकनिष्ठ असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व फक्त एकनिष्ठतेचंही आहे. कारण सर्वसामान्य लोकांना पक्षनिष्ठ असणं महत्त्वाचं वाटत असतं. त्यामुळे या यशात काँग्रेस पक्ष नावाचा विचार तिथं रुजलेला आहे, त्या विचाराचा मोठा वाटा आहे असं म्हणायला जागा आहे.
काँग्रेसच्या मूलभूत व्यापक समाजहिताच्या विचारांचा जसा हा विजय आहे, तसाच तो काँग्रेस नावाच्या भूमिकेनं जे व्यापक विकासाचं मूलगामी धोरण अवलंबलं आहे, त्याचाही विजय आहे. जिथं काँग्रेस मूलभूत विचार सोडत नाही अन मूलगामी परिवर्तन साततत्यानं घडवत आहे, तिथं काँग्रेस विचार टिकवून राहिला आहे. जिथं विचार टिकतो, तिथं पक्ष टिकतो. जिथं पक्ष मूल्य सोडत नाही अन सामाजिक नाळ व्यावहारिक भानासह जपतो, तिथं सत्ता टिकवणं सोपं जातं असाही या निकालाचा अर्थ आहे.
त्याशिवाय जिथं निवडणुकांच्या राजकारणातील पराभवानंतरदेखील काँग्रेस विचार काय आहे? तो कसा मूलगामी आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला गेला, तिथं काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकतो, हाही या निकालाचा महत्त्वाचा बाह्य अर्थ आहे. कारण नांदेडची सामाजिक परिस्थिती पाहता, तिथं काँग्रेस नावाच्या विचाराचं महत्त्व आहे. त्या विचाराची तिथं गरज आहे. ही गरज ओळखून ती रुजवण्यात व टिकवण्यात अशोक चव्हांणाना यश आलेलं आहे.
सामाजिक गणितं राजकारणासाठी खूप महत्त्वाची असतात. ती समजून घ्यावी लागतात. त्यात आव्हानं असततात. त्या आव्हानावर स्वार व्हावं लागतं. पर्यायी किंमत मोजावी लागते. अशोक चव्हाण अन काँग्रेसनं ती मोजली आहे. त्यामुळे ते तिथं आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. समकालीन सामाजिक-राजकीय आव्हानांना समाजानं ओळखलेलं आहे असाही याचा अर्थ काढला तर वावगं वाटणार नाही. मात्र समाज अशी आव्हानं आपोआप ओळखत नसतो. ती समाजानं ओळखावीत अशी नेमकी भूमिका नेतृत्वाला घ्यावी लागते. अशोक चव्हाणांनी ती भूमिका नेमकेपणानं वठवलेली आहे.
दुसर्या बाजूला काँग्रेस नावाच्या पक्षाला आणि विचाराला एमआयएम या मुस्लिम धर्मकेंद्री पक्षानं आव्हान दिलं होतं, ते राजकीय बाजूनं संपुष्टात आणण्यात अशोक चव्हाणांना यश मिळालं आहे. या पक्षाच्या पराभवात काँग्रेसच्या दीर्घकालीन राजकारणाचं हित दडलेलं आहे. कारण तो केवळ एमआयएमचा राजकीय पराभव नाही, तर काँग्रेसची ऎतिहासिक वोट बॅंक पुन्हा काँग्रेस सोबत आली आहे. काँग्रेसला ती परत आणत असताना मुस्लिम समाजात स्वतंत्र अस्तित्वाचं राजकारण घडवण्यात आपलं सामाजिक-राजकीय नुकसान आहे हे लक्षात आलेलं असावं! त्यामुळे एमईयआमच्या पराभवाला व्यापक अर्थ आहे. त्याकडे लगेच देशव्यापी परिणाम म्हणून पाहणं घाईचं ठरेल. मात्र मुस्लिम समाजानं संकुचित राजकारणाचा अनुभव घेऊन झाल्यावर त्यांनी काँग्रेस बरोबर परत येणं ही अभूतपूर्व बाब आहे. ती काँग्रेसची देशव्यापी गरज आहे. विशेषतः सध्याच्या सत्ताधारी राजकीय पक्षाची मुस्लिम समाजाप्रतीची मनोभूमिका पाहता काँग्रेस बरोबर परतणं हाच पर्याय उरला आहे. फक्त भाजपच्या भीतीपोटी काँग्रेसबरोबर जाणं राजकीय चूक ठरू शकेल. सार्वत्रिक विकासाच्या धारणेत मुस्लिम समाजाला अग्रक्रम कसा राहू शकेल याची चर्चा यानिमित्तानं पुढे सरकली, तर या बेरजेच्या जुन्याच राजकारणाला नवा अर्थ प्राप्त होईल.
मुस्लिम समाजाचं नांदेडमध्ये काँग्रेस सोबत झालेलं गठबंधन काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणासाठी आधारभूत ठरू शकणार आहे. ते भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतं. कारण मुस्लिम मतांचं विभाजन घडवून आपण यशस्वी होऊ शकतो, या भाजपच्या नीतीला काळाच्या मर्यादा आहेत.
या निकालात केवळ मुस्लिम काँग्रेस सोबत आले आहेत, एवढाच मर्यादित अर्थ नाही. हिंदू बहुसंख्याकदेखील काँग्रेस सोबत एकवटेलेले दिसतात. कारण ज्या प्रमाणात काँग्रेसला जागा मिळाल्या, त्या पाहता प्रस्तुत यश फारच व्यापक आहे. मुस्लिम वोट बॉंक आपलीशी करताना काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हिंदू विरोधी असल्याचा अवास्तवी आरोप केला जात होता, तो राजकीय होता. तो फार महत्त्वाचा नाही हे समाजानं दाखवून दिलं आहे.
काँग्रेस हा व्यापक भूमिका असलेला पक्ष आहे. या पक्षासोबत सगळे लोक येऊ शकतात, किंबहुना सर्वांना सोबत घेण्याचं कसब या पक्षाकडे आहे, हेही चव्हाणांनी दाखवून दिलं आहे. आत्ताच्या राजकारणात सगळ्यांना सोबत घेणं हीच मोठी अडचण निर्माण झालेली आहे. बहुसंख्याकांचा अजेंडा केंद्रस्थानी आणून त्यावर निवडणुका जिंकणं, यात भाजपला यश आल्यानं त्याचा रेटा सर्वच राजकीय पक्षांना आपापल्या अजेंड्यावर फेरविचार करावा की काय असा झालेला आहे. यामध्ये सगळ्यात जास्त अडचण काँग्रेसची झालेली आहे. हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं एकतफी भूमिका काँग्रेसला घेता येत नाहीत. त्याचाच राजकीय फायदा भाजपसारख्या पक्षाकडून घेतला जातो. भाजपचं बाह्य रूप ‘सबका साथ सबका विकास’ असं असलं तरी अंतर्गत वैचारिक भूमिका या हिंदू बहुसंख्याकवादी राहिलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस हा मुस्लिमांच्या हिताचा पक्ष म्हणून मध्यममार्गी हिंदूंनाही काँग्रेसपासून तोडण्याचं संकुचित राजकारण घडवण्यात हिंदू धर्मकेंद्री राजकारणाला यश मिळत आलेलं आहे.
हे हिंदू धर्मकेंद्री राजकारणाचं यश व्यापक सामाजिक हिताच्या धोरणात्मक राजकारणाचा पराभव करत असतं. त्यामध्ये बहुसांस्कृतिक सामाजिक-राजकीय मूल्यांचा पराभव आपोआप होत असतो. म्हणून नांदेडचा निकाल महत्त्वाचा ठरतो. ज्या काळात मुस्लिम राजकारणासाठी सोबत असणं जणू काही धोकादायक आहे असं मानलं जात असताना काँग्रेसनं उभे केलेले सर्वच मुस्लिम उमेदवार निवडून येतात अन हिंदूदेखील अतिशय मोठ्या प्रमाणात निवडून येतात, हे व्यापक अर्थानं बहुसंख्याकांच्या (संख्येच्या बाजूनं बहुसंख्याक) बहुसांस्कृतिक मूल्यांचं यश आहे. म्हणूनच नांदेडच्या राजकीय यशाकडे अधिक सामाजिक अंगानं पाहावं लागेल. त्याचबरोबर मूल्यात्मक सामाजिक-वैचारिक भेदांच्या पलिकडे जाऊन भूमिका वठवणार्यांना दीर्घकालीन महत्त्व आहे, हेही याच यशाचं वर्णन ठरू शकेल!
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
त्याशिवाय या यशात सत्ताधारी पक्षांच्या गोंधळाचादेखील वाटा आहे. चुकलेल्या आर्थिक धोरणांचा यात वाटा आहे. नोटाबंदीनं थकवलेल्या अवस्थेत जीएसटीनं दरड कोसळवलेली आहे. त्यातून समाज अजून सावरलेला नाही. त्यातच राष्ट्रीय स्तरावर अन राज्यस्तरावर शेतकरी विरोधी सरकार असल्याची भावना महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. अतिरेकी आश्वासनाचा बुमरँग झालेला आहे. त्याची जोरात चर्चा सुरू असल्याचा हा परिणाम आहे. हा निकाल महापालिकेचा असला तरी हा ग्रामीणतेचा सर्वांगीण ‘टच’ असलेला भाग आहे. सध्याचं सरकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बदनाम असल्याच्या चर्चेला दिलेली ही पावती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भव्य यशात भाजपच्या धोरणात्मक चुकांचा सामाजिक हिशेब दडलेला आहे. त्याशिवाय या यशाचा अन्वायार्थ लावताना विकासाच्या भूमिकांबरोबर राजकारणातील मूल्यात्मक निष्ठादेखील लोक तेवढ्याच प्रमाणात बघत असतात, हे विसरून चालणार नाही.
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी केलेला विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्याशिवाय स्थानिक ठिकाणाच्या विकासात छोटी महापालिका फार भव्यदिव्य विकास करू शकत नाही, हेदेखील लक्षात घ्यायला हवं. कारण छोट्या महापालिकांना उत्पन्नाच्या मर्यादा असतात. म्हणूनच कुठल्याही स्थानिक विकासात भव्यदिव्य काहीतरी करून दाखवायला राज्याच्या सत्तेवर वचक असावा लागतो. तो वचक एकेकाळी अशोक चव्हाणांचा सत्तेत असताना होता. त्यातच विकास करणं ही कुठल्याही राजकीय पक्षाची जबाबदारी असते. सत्तेवर कुणीही असो, विकास होतच असतो. मुद्दा फक्त प्रमाणाचा अन दर्ज्याचा असतो. त्याशिवाय विकासाच्या प्रेरणा काय आहेत? विकासाचा दृष्टिकोन काय आहे? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विकासाचा अग्रक्रम काय आहे? सत्ताधारी पक्ष म्हणून आपल्याला काय करावंसं वाटतं, यापेक्षा लोकांना काय हवयं? सत्ताधारी पक्ष म्हणून विकास कामाच्या व्यवस्थेच्या क्षमता लोकभावनेशी ज्या सत्ताधार्याला जुळवता येतात, तो सर्वांत यशस्वी सत्ताधारी मानायला हवा. त्या अर्थानं नांदेडच्या लोकभावनेला अशोक चव्हाणांची काँग्रेस पुरेपूर उतरलेली दिसते. हे यश मरगळलेल्या काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचं आहे.
याच दरम्यान पंजाबच्या पोटनिवडणुकीत भाजपनं चार वेळा नेतृत्व केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार जवळपास दोन लाख मतांनी विजयी होतो! याचा अर्थ काँग्रेसच्या दिशेनं आशादायी वातावरण आहे. सत्तेवर कुणीही येवो, लोकशाहीत विरोधी पक्षांचा वचक असला पाहिजे, हे जनतेला नीटपणे कळत असतं. नांदेडचा निकाल काँग्रेसच्या पारड्यात जनतेनं टाकला आहे. तो काँग्रेसच्या नेतृत्वावर जेवढा विश्वास दाखवला आहे, तेवढाच तो भाजपला सूचक इशाराही आहे.
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Thu , 26 October 2017
sundar aani nemaka