आज ‘अक्षरनामा’ एक वर्षाचा झाला...
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • अक्षरनामा
  • Tue , 24 October 2017
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama

आज २४ ऑक्टोबर.

म्हटलं तर महिन्यातल्या उर्वरित तारखांसारखीच एक तारीख.

पण या तारखेला निदान ‘अक्षरनामा’च्या संदर्भात विशेष महत्त्व आहे.

कारण आज ‘अक्षरनामा’ एक वर्षाचा झाला आहे.

गतवर्षी २२-२३ ऑक्टोबर हा दोन दिवसांचा ‘ड्राय रन’ सुरू करून २४ ऑक्टोबरपासून ‘अक्षरनामा’ अधिकृतपणे सुरू झाला.

त्या दिवशीच्या पहिल्या संपादकीयात आम्ही म्हटलं होतं - “आश्वासनं, अभिवचनं, महत्त्वाकांक्षा, ध्येय, उद्दिष्टं यांच्या अर्थांमध्ये न अडकताही असं म्हणता येईल की, एक तारतम्यपूर्ण दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न इतकाच आमचा मानस आहे. आम्हाला कुणाच्या पुढे जायचं नाही की, कुणाशी स्पर्धाही करायची नाही. कशाचा न्यायनिवाडा करायचा नाही की, कुणाची उपेक्षा करायची नाही. आम्हीच तेवढे नि:पक्षपाती असा आमचा दावा नाही आणि आम्हीच तेवढे अग्रेसर अशी अहमअहमिकाही नाही. ‘वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षाही तारतम्यपूर्ण विवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते,’ असं व्हॉल्टेअर म्हणतो. ती आपल्यापरीनं निभावण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

गेल्या वर्षभरात या इमानाला जागत ‘अक्षरनामा’नं आपली वाटचाल केली आहे. किंबहुना त्यामुळेच ‘अक्षरनामा’ दिवसेंदिवस नवनव्या वाचकांपर्यंत पोहचत आहे, वेगवेगळ्या वयोगटांतल्या आणि थरांतल्या वाचकांना तो आवडत आहे.

गेल्या वर्षभराच्या काळात ‘अक्षरनामा’नं अनेकविध विषय, चांगला मजकूर, जुन्या-जाणत्यांबरोबरच नवे लेखक आणि योग्य-परखड विश्लेषण यांच्या बळावर आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. चालू घटना-घडामोडींवरील लेखन शक्य तितक्या तत्परतेनं देण्याचा ‘अक्षरनामा’चा प्रयत्न असतो. त्यात प्रत्येक वेळीच यश येत असं नाही, पण तरीही रोज काही महत्त्वाच्या घडामोडींवरील लेख दिले जातात. भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संकल्पनांशी बांधीलकी हे ‘अक्षरनामा’चं सुरुवातीपासूनचं ब्रीद आहे. त्यामुळे गेल्या वर्षभराच्या काळात ‘अक्षरनामा’नं आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे.

राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, नाटकांपासून सिनेमांपर्यंत, पुस्तकांपासून ई-बुकपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत, फटाक्यांपासून धमाक्यांपर्यंत, फॅशनपासून पॅशनपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करण्याची ‘अक्षरनामा’ची भूमिका असेल, असंही आम्ही पहिल्या संपादकीयात म्हटलं होतं. आजही ‘अक्षरनामा’ची तीच भूमिका आहे, उद्याही राहील. मात्र गेल्या वर्षभरात वर नमूद केलेल्या सर्वच क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल आम्हाला घेता आली नाही, हेही नमूद करायला हवं. खेळ, फॅशन, अर्थकारण, संस्कृती, कला यांविषयी तुलनेनं खूपच कमी लेखन आम्ही प्रकाशित करू शकलो. महिलांविषयीही जेवढा मजकूर प्रकाशित केला, तो संख्यात्मक बाजूनं पुरेसा नाही.

याच बरोबर काही महत्त्वाच्या घटनांवर शक्य तितक्या लवकर मजकूर देता आला नाही, हेही मान्य करायला हवं. इतर राज्यांतल्या महत्त्वाच्या घटना-घडामोडींचीही फारशी दखल घेता आली नाही. साहित्यविषयक लेखांचं प्रमाणही जरा कमीच राहिलं.

मात्र एवढं खरं की, एखाद्या वर्तमानपत्राच्या प्रादेशिक आवृत्तीचं स्वरूप आम्ही ‘अक्षरनामा’ला येऊ दिलं नाही आणि उगाचच ‘जागतिक घटना-घडामोडींचा भाष्यकार’ या हल्लीच्या ट्रेंडमागेही फारसे गेलो नाही. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक केली, ती म्हणजे राजकारणातल्या उथळ, फुटकळ आणि निव्वळ द्वेषातून निर्माण केलेल्या गेलेल्या विषयांना फारसं महत्त्व दिलं नाही. एवढंच नव्हे तर एकंदर राजकारणाला – मग ते राज्यातील असो की केंद्रातील – आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही. त्यापेक्षा सामाजिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात आर्थिक घडामोडींना जरा अधिक प्राधान्य दिलं.  याचा अर्थ राजकारणाला आम्ही दुय्यम समजतो असं अजिबात नाही.

नव्या वर्षांत वरील उणिवांवर मात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू. त्याचबरोबर अजून काही नवे लेखक, नवी सदरं आणि नवे विषय ‘अक्षरनामा’वर दिसतील. घटना-घडामोडींची अधिक तत्परतेनं दखल घेऊन त्यांचं शक्य तितकं अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचाही प्रयत्न करू. माध्यमांच्या मुस्कटदाबीच्या आणि ऐनकेनप्रकारे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटू पाहणाऱ्या सध्याच्या काळात ‘अक्षरनामा’नं गेल्या वर्षभरात शक्य तितक्या तटस्थ, नि:पक्ष आणि विवेकीपणानं पत्रकारिता केली आहे. ती यापुढेही अशाच प्रकारे, अधिक नेमक्या पद्धतीनं आणि जलद गतीनंही करण्याचा प्रयत्न राहील.

एक वर्षाचा अवधी हा काही आवर्जून नमूद करावा असा कालावधी नाही. पण तरीही या वर्षभराच्या काळातल्या ‘अक्षरनामा’च्या दमदार वाटचालीवरून एवढं आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की, केवळ एक नवा ट्रेंड निर्माण करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. ट्रेंडी पत्रकारिता करण्याचा तर अजिबातच मानस नाही. तर ज्या प्रकारे 'https://thewire.in''https://scroll.in' आणि ‘https://www.altnews.in' ही पोर्टल्स ऑनलाइन इंग्रजी पत्रकारिता करत एक नवी परंपरा निर्माण करू पाहत आहेत, तशीच एक नवी परंपरा मराठी ऑनलाईन पत्रकारितेमध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. कारण ट्रेंड येतात आणि जातात, परंपरांचं तसं नसतं. त्यांची मुळं मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. आणि झेप आकाशाच्या दिशेनं असते. विस्तार मात्र सभोवताल कवेत घेणारा असतो. मराठी ऑनलाइन माध्यमातल्या त्या नव्या परंपरेचा पाईक\शिलेदार होण्याची मनिषा आम्ही बाळगून आहोत.

दुसरं असं की, ट्रेंडस उडणाऱ्या पक्ष्यांच्या पावलांच्या ठशाप्रमाणे असतात. त्यांचं अस्तित्व क्षणभंगूर असतं. शिवाय त्या पावलांच्या परतीचे ठसे कधीच दिसत नाहीत. ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता ऑनलाइन माध्यमातली असली तरी ती मराठी पत्रकारितेची परंपरा मानणारीच आहे, असेल. आणि मराठी पत्रकारितेनं रूढ केलेली नीतिमत्ताही. त्यामुळे वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या यांच्यापेक्षा आम्हीच कसे ‘सरस’ आहोत, या अहमहमिकेमध्ये ‘अक्षरनामा’ कधीच नसेल. माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न मात्र वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हाही व्यक्ती, संस्था यांपेक्षा प्रवृत्तीवर अधिक भर असेल. (या वर्षीचा संपूर्ण दिवाळी अंकच ‘माध्यम-चिकित्सा’ करणारा होता.)

गेल्या वर्षभरात ‘अक्षरनामा’वर ‘कुठल्यातरी पक्षाची बाजू घेणारं पोर्टल’ अशा प्रकारची टीका क्वचितच कुणी असेल. त्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण हेच आहे की, कुठल्याही पक्षीय विचारसरणीपासून ‘अक्षरनामा’ मुक्त आहे. देशाला काँग्रेस‘मुक्त’ करण्याचा अजेंडा भाजपचा असू शकतो आणि भाजपला सत्ता‘मुक्त’ करण्याचा अजेंडा काँग्रेसचा असू शकतो. तो त्यांच्या पक्षीय राजकारणाचा भाग असतो. आणि लोकशाही शासनप्रणालीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून हे परस्पर ‘मुक्त’तेचं राजकारण जोवर घडत असतं, तोवर यात काहीच आक्षेपार्हही नसतं.

पत्रकारितेनं या राजकारणाकडे तटस्थपणेच पाहायचं असतं. कारण पत्रकारितेची बांधीलकी फक्त भारतीय राज्यघटनेशी असायला हवी असं आम्ही मानतो. त्यामुळेच काँग्रेसवाद, समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद, गांधीवाद, सावरकरवाद, उग्रवाद, हुकूमशाही, एकाधिकारशाही, घराणेशाही अशा कुठल्याही वादापासून ‘अक्षरनामा’ ‘मुक्त’ राहिला, यापुढेही राहील.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

आपल्याकडे एकंदरच हळहळे-हुळहुळे लोक फार आहेत. त्यामुळे सारा मामला हौसेचा नाहीतर एकांड्या शिलेदारांचा असतो. नुसत्या हौसेला वा एकांड्या शिलेदारीला स्वभावत:च अंगभूत आणि मूलभूत मर्यादा असतात. त्यात आपले प्रायोगिकतेचं वेडही अतोनात. अशा एकांड्या प्रयोगांचे वा वैयक्तिक अनुभवांचे सामाजिक सिद्धान्त होत नसतात. तसे ते व्हावयाचे असतील तर त्यासाठी नियोजनबद्ध आणि सांघिक प्रयत्न करावे लागतात. अन् तेही वर्षानुवर्षं. पण सामोपचारानं आणि एकोप्यानं प्रदीर्घ काळ काम करण्याचा मुळात महाराष्ट्राचा स्वभाव नाही आणि तशी इच्छाशक्तीही नाही. पन्नाशीनंतरही चालू असलेल्या कुठल्याही संस्था वा उपक्रम यांच्याकडे पाहिलं की, त्याची खात्रीच पटते.

असं का होतं?

कारण ‘खाऊनपिऊन टामटुम’ इतकीच आपल्यापैकी बहुतेकांच्या एकंदर सामाजिक जीवनाची लांबी- रुंदी आणि खोली असते, किमान तर्कसंगत आणि तारतम्यपूर्ण विचार या बहुतेकांना करता येत नाही, प्रतिक्रिया आणि विचार यातला फरक समजून घेता येत नाही. हे बहुतेक सदासर्वदा भूतकाळातच रमून जातात आणि वर्तमानाच्या हाकांना प्रतिसाद द्यायची नितांत निकडीची गरज आहे, याचं भान त्यांना असतंच असं नाही.

जागतिकीकरणाच्या गेल्या अडीच दशकांत मराठी समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक अशी सर्वच क्षेत्रांत कमीअधिक फरकानं जी केविलवाणी अवस्था झाली, त्यातून याचंच प्रत्यंतर येतं. सोशल मीडियावर तर या प्रत्यंतराचं सदोदित दर्शन होत असतं.

या बहुतेकांचं भान जागृत करणं, त्यांना ‘तारतम्यपूर्ण विवेकाचं’ महत्त्व पटवून देणं, सामाजिक सौहार्द, एकोपा, सलोखा यांच्याशी दिवसेंदिवस तुटल चाललेली त्यांची नाळ पुन्हा जोडण्यासाठी काहीएक प्रमाणात हातभार लावणं, अल्पसंख्याक, शोषित-वंचित-पीडित यांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी प्राणपणानं प्रयत्न करणं, ही आजच्या भारतीय पत्रकारितेसमोरची सर्वांत मोठी आव्हानं आहेत. या आव्हानांविरोधात ठामपणे उभं राहण्याचं काम हाच आजच्या पत्रकारितेचा ‘धर्म’ असायला हवा. 'https://thewire.in''https://scroll.in' आणि  ‘https://www.altnews.in' यांसारखी इंग्रजी न्यूज पोर्टल्स आणि ‘इंडियन एक्सप्रेस’सारखी काही प्रसारमाध्यमं त्या दिशेनं सक्षमपणानं काम करत आहेत. ‘अक्षरनामा’चाही तोच प्रयत्न आहे, यापुढेही राहील.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sharad Gogate

Tue , 24 October 2017

अग्रलेखात वाचकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे कितीजण वर्गणीदार (सब्स्क्रायबर) झाले याचाही आढावा घेणे श्रेयस्कर झाले असते.


Nivedita Deo

Tue , 24 October 2017

अतिशय सुंदर संपादकीय अक्षरनामाला शुभेच्छा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......