लोकमतचे दिवस (पूर्वार्ध)
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • पत्रकार प्रवीण बर्दापूरकर
  • Tue , 24 October 2017
  • पडघम माध्यमनामा प्रवीण बर्दापूरकर लोकमत लोकसत्ता

देशाच्या आणि राज्याच्या राजधानीत काम करणं हे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं. राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या कुणाही पत्रकारासाठी तर या दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं अनमोल असतं. ती संधी मला मिळाली. मात्र, यात दिल्लीचं वळण अनपेक्षित होतं; त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी - तब्बल २९ वर्ष एक्सप्रेस वृतपत्र समूहाच्या ‘लोकसत्ता’ या तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या वृतपत्रात माझ्या पत्रकारितेचा प्रवास नागपूर ते मुंबई ते औरंगाबादमार्गे शेवटी ‘नागपूर आवृत्तीचा संपादक’ असा झाला़. मी लोकसत्ताचा दिलेला राजीनामा फारसा कुणाला माहिती होण्याइतके तासही उलटलेले नव्हते तोच म्हणजे; आदल्या रात्री राजीनामा दिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई विमानतळावर उतरून कारमध्ये बसतो न बसतो तोच, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष, तत्कालीन खासदार विजय दर्डा यांचा फोन आला. त्यांनी ‘लेटस बुक सीट फॉर यू इन लोकमत फ्लाईट’ अशी ऑफर दिली़. एकीकडे विजय दर्डा यांच्या या इंटिलिजन्सचं कौतुक वाटलं आणि दुसरीकडे त्यांनी दिलेली ऑफरही आवडली़. पण लोकसत्ताचा राजीनामा देतानाच दोन पुस्तकांच्या निर्मितीचं काम मनात होतं आणि ते संपल्याशिवाय दुसरी कोणतीही जबाबदारी स्वीकारायची नसल्याचं ठरवलेलं होतं. ते मी नम्रपणे विजय दर्डा यांच्या कानावर घातलं. तरी मी नागपूरला परतल्यावर एकदा भेटायचं असं आमच्यात ठरलं. नागपूरला परतल्यावर मला लोकमतमध्ये आणण्याची जबाबदारी विजय दर्डा यांनी विदर्भाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले दिग्गज गिरीश गांधी यांच्यावर सोपवलेली होती, असं लक्षात आलं. मग आम्हा तिघांची एक बैठकही विजय दर्डा यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी झाली़. ‘‘हातातलं कामं संपल्यावर लोकमतला रुजू होईन’’, हे मी अखेर मान्य केलं. अन्य तपशील मात्र ठरले नाहीत.

‘दिवस असे की’ आणि लोकप्रभातला स्तंभ ‘नोंदी डायरीनंतरच्या’ या पुस्तकांच्या निर्मितीचं काम सुरू असतानाच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मृत्यर्थ दर वर्षी प्रकाशित होणाऱ्या विशेषांकाची जबाबदारी घसघशीत मानधनासह सोपवतानाच संपादकीय कामाचं पूर्ण स्वातंत्र्य गिरीश गांधी यांनी दिलं. परंपरेनं चालत आलेल्या ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ या समजाला छेद देत ‘आईकडे एक स्त्री म्हणून बघण्याचा दृष्टीकोन’ असा मी करत असलेल्या ‘आई’ या अंकाचा प्रदीर्घ काळ मनात रेंगाळलेला विषय होता़. नंतर ज्येष्ठ स्नेही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाहण्यात हा अंक आला;  त्यांच्याच पुढाकाराने साधना प्रकाशनाकडून त्याचं पुस्तकही आलं. याच दरम्यान  कवीवर्य ग्रेस यांचं निधन झालं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘ग्रेस नावाचं गारुड’ या प्रकल्पात मी अडकलो़. या दरम्यान अधुनमधून विजय दर्डा यांच्याशी फोनवर बोलणं होत असे आणि लवकरच लोकमतला रुजू होण्यासंबंधी आम्ही दोघंही बोलत असू़, पण मुहूर्त काही ठरत नव्हता. ‘आई’ हा अंक आणि पुस्तकांच्या निर्मितीचं काम संपतं-न-संपतं तोच पत्नी मंगला हिचं हृदयाचं अतिगंभीर दुखणं उद्भवलं. तिच्या हृदयात आठ ब्लॉकेजेस होते! ती शस्त्रक्रिया आणि त्यातून सावरणं यात मी आकंठ बुडालो़.

मधल्या काळात विजय दर्डा आणि माझ्यातला संपर्क जवळजवळ खंडितच झाला़. त्यातच एक दिवस त्यांच्या पत्नी सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या निधनाची बातमी आली़. ‘ग्रेस नावाचं गारुड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं मी अंत्यदर्शनालाही जाऊ शकलो नाही आणि विजय दर्डा यांची भेटही घेऊ शकलो नाही. मात्र उठावणा कार्यक्रमाला गेलो़. तिथे लोकांची अक्षरश: रीघ होती़. विजय दर्डा यांच्याशी जुजबी नमस्कार-चमत्कार झाला़. रात्री उशिरा लोकमतमधून एका पत्रकार स्नेह्याचा फोन आला. दुसऱ्या दिवशी भेटता येईल का, अशी विजय दर्डा यांनी विचारणा केलेली़ असल्याचं त्यानं सांगितलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी मी विजय दर्डा यांना भेटलो़. पत्नीच्या मृत्यूच्या शोकात असूनही विजय दर्डा यांना मी लोकमतमध्ये रुजू झालो नसल्याची चुटपुट लागलेली होती़; त्यामुळे मी अक्षरश: अचंबित झालो़ आणि त्याच क्षणी लोकमतला जॉईन होण्याचा निर्णय घेतला़.

नंतर, कोणत्या आवृत्तीत रुजू व्हायचं हे ठरवण्यात बराच कालापव्यय झाला़. माझे एके काळचे ज्येष्ठ सहकारी आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यावर माझ्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती़. मी मुंबईला रुजू व्हावं, अशी विजय दर्डा यांची इच्छा होती तर, रायकर मात्र मी अकोल्याला जावं म्हणून आग्रही होते. अर्थातच अकोल्यात मला काहीही रस नव्हता़. ही चर्चा बरीच रेंगाळली आणि रायकर गटाला मी मुंबईत यायला नको असल्याचं हळूहळू माझ्या लक्षात आलं. गमतीचा भाग म्हणजे, या संदर्भात रायकर माझ्याशी थेट बोलतच नव्हते. माझा दोस्त डॉ. मिलिंद देशपांडे याच्यामार्फत ते संपर्कात होते. दिनकर रायकर खेळत असलेल्या या खेळी माझ्या आणि डॉ. मिलिंद देशपांडे यांच्या लक्षात आल्या; मग आम्ही दोघांनीच रायकरांना ‘खेळ’वायला सुरुवात केली! असं गुऱ्हाळ बरेच दिवस चाललं.  

अखेर दोन-एक महिन्यांनी पुन्हा एकदा विजय दर्डा यांनीच पुढाकार घेतला आणि त्यांनी दिल्ली की मुंबई असा ​चॉईस  विचारला. ३/४ वर्षांसाठी मी दिल्लीला जावं असं आमच्यात ठरलं. त्यांनी माझ्या अपेक्षा विचारल्या. मी त्या त्यांना सांगितल्या. पॅकेजबद्दलची सर्व बोलणी ऋषी दर्डा यांच्याशी करावीत, असं विजय दर्डा यांनी सुचवलं. दोन-अडीच तासांमध्ये लगेच ऋषी दर्डा यांचा फोन आला. माझ्या अपेक्षांबाबत बोलणं झालं. ‘उस बारेमे रायकरजी आपसे बात करेंगे’ असं ऋषी दर्डा यांनी सांगितलं. त्यांनी मागितल्याप्रमाणे मी लगेच बायोडेटा पाठवला. 

पुन्हा रायकर आणि माझ्यात गुऱ्हाळ सुरू झालं. मी सांगितलेल्या सोयीसुविधा आणि पगारासंबंधीच्या अपेक्षांना रायकरांनी साफ नकारच दिला; आणि तो अशा प्रकारे दिला, जणू रायकर त्यांच्या खिशातूनच हा सर्व खर्च करणार होते़. हेही गुऱ्हाळ थांबण्याची चिन्हं दिसेचनात. अखेर एक निर्णायक बैठक ठरली. दादरच्या कार्यालयात एका रविवारी दुपारी आमच्यातली अंतिम बोलणी झाली़. आमचं बोलणं सुरू असतानाच ऋषी दर्डा यांचा फोन आला. तेव्हा ‘आपली ऑफर प्रवीणला मान्य नाहीये’, असं रायकरांनी त्यांना सांगूनही टाकलं! आमचा कॉमन मित्र मुकुंद बिलोलीकर हाही त्या वेळेस हजर होता़. रायकरांचा एकूण नकारात्मक दृष्टीकोन ऐकून मी जाहीर केलं, ‘‘आता आपण थांबू या!’’ रायकरांनी निमूटपणे मान डोलावली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ‘सुटलो एका संकटातून’ असेच होते! मी आणि बिलोलीकर सिध्दीविनायक मंदिरापाशी येत नाही तोच ऋषी दर्डा यांचा फोन आला आणि त्यांनी नवीन ऑफर देत असल्याचं सांगितलं. मुलुंडला लेकीकडे पोहोचण्याच्या आतच लोकमत व्यवस्थापनाचा सोयी-सवलतींचा आणि पगाराचा रीतसर प्रस्ताव एचआरमार्फत मिळाला़. पुढच्या वीस-पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही सर्वांनी चर्चा करून तो स्वीकारत असल्याचा मेल लगेच ऋषी दर्डा यांना पाठवला़. मात्र, वेतनाची अपेक्षा यापेक्षा जास्त होती, हे नमूद करण्यास विसरलो नाही़ .

विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या दोघांशीही माझा जुना परिचय होता. हे दोघंही माझ्या लेखणीवर बेहद्द खूश असतं. तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते नितीन गडकरी हे विजय दर्डा यांचे खास मित्र. या दोघांनीही माझ्या ‘स्वच्छते’ची खात्री विजय दर्डा यांना दिलेली असणार आणि दर्डा यांनी ती खात्री करून घेतलेली असणार याची मला जाणीव होती. अन्यत्र असतात तसे लोकमतमध्ये अनेक अंतर्गत प्रवाह आहेत. राजेंद्र दर्डा यांचे चिरंजीव असलेले ऋषी दर्डा यांच्याकडे संपादकीय विभागाची अंतिम जबाबदारी आहे़. मात्र ऋषी दर्डा तसंच दिनकर रायकर आणि गँग यांच्याशी माझं सूत कधी जुळलंच नाही. पण खुद्द चेअरमन विजय दर्डा यांचा आग्रह असल्यामुळे ते मला सरळ सरळ नाकारूही शकत नव्हते, अशी ही गोची होती! अखेर नवी दिल्लीत फर्निश्ड फ्लॅट; तोही वसंत विहारसारख्या पॉश परिसरात, विजय दर्डा यांनी खास नागपूरहून पाठवलेली होंडा अ‍ॅकॉर्ड ही कार,  ड्रायव्हर, महिन्याला वीस हजार रुपये पेट्रोल भत्ता, ड्रायव्हरचा पगार आणि याशिवाय माझा पगार असं कोणालाही हेवा वाटेल असं पॅकेज घेऊन दिल्लीत रुजू झालो, तेव्हा माझं वय ५७ होतं. या वयात आजारी मंगलाला घेऊन दिल्लीला जाण्याची कल्पना म्हणजे अनेक मित्रांना वेडं साहस वाटत होतं. मात्र  या साहसाला मंगलाचं पूर्ण समर्थन होतं; त्याशिवाय मी तो वेडेपणा केलाच नसता म्हणा!

दिल्लीत पत्रकारिता करण्याचं माझं स्वप्न तर साकार झाल्याचं दिसत होतं, पण आयुष्यात आलेलं हे वळण फार काळ टिकणारं नव्हतं, हे दिल्लीत ​लँड  होताना माझ्या लक्षात आलं नव्हतं. कारण या वळणावर नाराजी, विरोध, वाद आणि प्रवादाचेही बरेच काटे पसरलेले असल्याची काही कल्पना मला नव्हती. मूळचा नागपूरकर मित्र आणि दिल्लीतली माझ्या पालकत्वाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारलेल्या, बड्या अधिकारी पदावर असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा खात्याच्या प्रफुल्ल पाठकसोबत महाराष्ट्र सदनाकडे कूच केलं, तेव्हा मध्यम पाऊस सुरू होता़, ट्राफिक जाम होता आणि वाटा बऱ्याच निसरड्या झालेल्या होत्या़. त्याच निसरड्या वाटांवरून एक दिवस आपल्याला अचानक परत फिरायचं आहे, याचे अगदी पुसटसुद्धा संकेत मला मिळालेले नव्हते...

====

दिल्लीत आम्ही रुळलो आणि मस्त रमलोही होतो. व्यक्तिगत पातळीवर क्षमा पाठक आणि प्रफुल्ल पाठक सोबतच जाई बंग आणि आनंद बंग, पूजा सोनावणे आणि टेकचंद सोनावणे, भारती झाडे आणि विकास झाडे, शीलेश शर्मा अशा अनेक नवीन मित्रांची भर पडलेली होती. पत्रकारितेतले प्राचीन मित्र सुषमा सातोकर आणि विजय सातोकर यांच्या होणाऱ्या भेटी आनंदायी होत्या. इंडियन हॅबिटॅट सेंटर, इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) ही आमच्या नियमित भेटीची आणि आठवड्यातून एक-दोन तरी संध्याकाळ घालवण्याची ठिकाणं झालेली होती.

दिल्लीत ज्या वेगानं राजकीय घडामोडी घडत होत्या, त्या कोणाही पत्रकाराला मोहात पडणाऱ्या होत्या. एक पत्रकार म्हणून अनुभवाची पोतडी संपन्न करणारं असं ते वातावरण होतं. निवडणुकीत दिल्ली राज्यात झालेलं सत्तांतर जवळून अनुभवता आलेलं होतं, तर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या मोठ्या सत्तांतराची चाहूल लागलेली होती. मात्र लोकमतच्या पातळीवर मी समाधानी नव्हतो. एक्सप्रेस वृत्तसमूहात, म्हणजे ‘लोकसत्ता’त एक साधा वृत्तसंकलक ते नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा प्रवास होताना अत्यंत मोकळ्या आणि संपादकीयदृष्ट्या स्वतंत्र वातावरणात काम करता आलं. मी ‘माधव गडकरी स्कूल’चा असलो तरी नंतर अरुण टिकेकर, सुरेश द्वादशीवार किंवा कुमार केतकर यांनी ते कधीच मनात आणलं नाही. आधी माधव गडकरी मग अरुण टिकेकर, सुरेश द्वादशीवार, कुमार केतकर, अरविंद गोखले यांच्यासारखे ज्येष्ठ संपादक आणि मुंबईत स्पेशल टीममध्ये काम करताना दिनकर रायकर हे बॉस म्हणून लाभले. या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही वैगुण्यं होती; नाही असं नाही, पण यांच्या हाताखाली आणि यांच्यासोबत काम करताना कधी ‘आपली गळचेपी होतेय’, ‘आपली अवहेलना केली जातेय’, ‘आपल्याला डावललं जातंय’ असं जाणवलंच नाही. ‘केतकर माझे बॉस आहेत’ किंवा ‘मी केतकरांच्या हाताखाली काम करतो’, अशी भाषा माधव गडकरींप्रमाणेच कुमार केतकरांना आवडत नसे. अगदी चपराशाचाही ‘हा माझा सहकारी आहे’, असा उल्लेख केतकर करत असत. कधी कुणामागे ‘सर’ करत किंवा कुणाच्या नावापुढे ‘जी’ ‘जी’ करत एखादं पद किंवा लाभ पदरात पडून घ्यावा असा अनुभव लोकसत्तातल्या नोकरीच्या २९ वर्षांमध्ये मला कधीच आला नाही.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

याचा अर्थ, ‘लोकसत्ता’त गटा-तटाचं राजकारण नव्हतं, स्पर्धा नव्हतीच असं म्हणणं हा भाबडेपणा ठरेल. सगळ्याच संस्था आणि संघटना यांच्यात थोड्या-बहुत प्रमाणात असते तशी स्पर्धा आणि तसं गटबाजीचं वातावरण लोकसत्तातही होतं. लोकसत्ताची नागपूर आवृत्ती सुरू झाल्यावर सुरेश द्वादशीवार तिचे निवासी संपादक झाले. कारणं काहीही असोत (आणि त्यात द्वादशीवार यांची बाजू जास्तच समर्थनीय होती तरी), अरुण टिकेकर आणि सुरेश द्वादशीवार यांचं फार काही सूत जमलेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे नागपूर आवृत्तीत टिकेकर समर्थक आणि द्वादशीवार समर्थक असे दोन गट स्वाभाविकपणाने पडले. नागपूर आवृत्ती सुरू होण्याआधीपासून मी लोकसत्तासाठी पत्रकारिता सुरू केलेली होती, म्हणून स्वाभाविकच टिकेकरांच्या जास्त संपर्कात होतो; आमचा संपर्क त्या काळात अगदी दैनंदिन होता. त्यातच टिकेकर यांनी खास महाराष्ट्र टाइम्समधून आयात केलेला त्यांचा ‘पित्तू’ द्वादशीवार कळपात गेला! त्यामुळे टिकेकर गटांच नेतृत्व ओघानं माझ्याकडे चालून आलं. तसं तर सुरेश व्दादशीवार हे माझे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ मित्र. त्यांच्या पत्नी जया वाहिनींकडे बघितलं की, मला माझ्या आईची आठवण होत असल्याचं जया वहिनी आणि सुरेश द्वादशीवार यांना माहिती असल्यानं आमच्या मैत्रीला एक हळवी किनारही होती. विदर्भ साहित्य संघ आणि इतर अनेक व्यासपीठांवर आम्ही सोबत वावरलो, वार्ताहर म्हणूनही सोबत काम केलं. अनेक विषयांचे गाढे अभ्यासक, लेखक, समीक्षक, प्राध्यापक, प्रभावी वक्ते, पत्रकार आणि उमदा स्वभाव अशा बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे द्वादशीवार लोकसत्ताची नागपूर आवृत्ती सुरू झाल्यावर माझे बॉस बनले आणि आमचे ‘गोट’ वेगळे झाले. तरी आमच्यातले संबंध कायम सौहार्दाचे राहिले. मी जरी टिकेकर गटाचं प्रतिनिधित्व करत असलो, तरी ‘राजकारण जेवढ्यास तेवढंच’ हे कसब ठेवण्यात आम्ही दोघंही सहजगत्या आणि कमालीचे यशस्वी ठरलो. सुरेश व्दादशीवार यांच्या वाणीबद्दल, त्यांच्या व्यासंगाबद्दल आणि त्यांच्या लेखणीबद्दल मला जितका नितांत आदर होता आणि आजही आहे, अगदी तश्शीच माझ्या पत्रकारीतेच्या क्षमता आणि माझ्या लेखणीबद्दल सुरेश द्वादशीवार यांची भावना होती. एक उदाहरणच सांगतो - आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध गटाचे आहोत, हे काही लोकसत्तात लपून राहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्याचा फायदा उचलण्याचा काही सहकारी प्रयत्न करत असत. एका उपसंपादकाने काही कागाळ्या करताना माझ्या पत्रकारितेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यावर आणि त्याबाबत हेकट भूमिका कायम ठेवल्यावर सुरेश द्वादशीवार जाम संतापले आणि त्यांनी सरळ त्याचा राजीनामाच घेतला. एवढंच कशाला, नंतर काही वर्षांनी मी अरुण टिकेकरांच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेलो, तरी आमच्यातला संवाद कायम होता. पत्रकार म्हणून असणारा माझा आवाका, वाचन आणि लेखणी यांबद्दल कधीही प्रतिकूल टिप्पणी न करण्याचा उमदेपणा टिकेकर यांनी दाखवला, हे आवर्जून नमूद करायला हवं. अशा निकोप वातावरणात मी कायम वावरत आलेलो होतो.

काम करत असताना अगदी बातमीचा इंट्रो ठरवण्यापासून ते लेखाची लाईन ठरवण्यापर्यंत मला ज्येष्ठांकडून किंवा संपादकाकडून कोणताही त्रास झालेला नव्हता. उलट सतत काहीतरी शिकण्याची आणि विकसित होण्याचीच संधी मिळाली होती. काही काळ आमचे वृत्तसंपादक असलेल्या रमेश झंवर यांना आम्ही जाम टरकायचो, कारण त्यांना लेखन निर्दोष लागायचं. आमच्या लेखनात अचूकता येत गेली, लेखन सफाईदार होत गेलं याचं खूपसं श्रेय रमेश झंवर यांच्यासारख्या कडक मास्तरांना आहे. लोकसत्तामध्ये काम करत असताना दैनंदिन, वार्षिक किंवा कोणतंही संपादकीय किंवा वृत्तनियोजन करण्यात मला इनव्हॉल्व करून घेतलं जायचं. अशी काही बैठक झाली आणि तिला मला उपस्थित राहता आलं नाही, तर बैठकीत ठरलेल्या बाबी भेट झाल्यावर संपादक आवर्जून माझ्या कानावर घालायचे आणि त्या संदर्भात केलेल्या सूचना किंवा मतप्रदर्शन गंभीरपणे ऐकून घ्यायचे. उपनिवासी संपादक झाल्यापासून पुढे तर अशा नियोजनांचा मीही एक भागच बनलो. दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे आणि कुमार केतकर यांच्याकडून तर मी जे काही शिकलो, ते अविस्मरणीय असंच आहे. संपादकाला जशी मतं असतात, काही एक भूमिका असते तशी मतं समोरच्याला असतात आणि त्यालाही प्रतिवादाचा अधिकार असतो. त्याला त्याचं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळायलाच पाहिजे, हे घुमरे आणि केतकर यांच्याकडून शिकायला मिळालेलं होतं.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......